एका 'डोळस' त्यागाची गोष्ट

Submitted by कुमार१ on 18 September, 2017 - 03:00

लग्न ही आपल्या आयुष्यातील एक महत्वाची घटना असते. त्यासाठी सुयोग्य जोडीदार निवडणे हा वाटतो तितका सोपा प्रश्न नसतो. ‘बघून’ करावयाच्या लग्नांमध्ये जोडीदार-निवडीचे अनेक निकष (फूटपट्ट्या) लावले जातात. त्यापैकी मुलाची आर्थिक सुस्थिती हा मुलींच्या दृष्टीने एक महत्वाचा निकष असतो. त्याला किती महत्व द्यायचे हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून आहे. त्यात काही गैर नाही.

मुलाची आर्थिक स्थिती उत्तम नाही म्हणून स्थळे नाकारलेल्या अनेक मुलींचे किस्से आपण ऐकलेले असतात. पण, माझ्या माहितीतील एका मुलीचे उदाहरण अगदी वेगळे आहे. सध्याच्या शहरी संस्कृतीत मला ते अपवादात्मक वाटले. म्हणून ते लिहीत आहे.
ती मुलगी उच्चशिक्षित असून तिला चांगल्या पगाराची सुरक्षित नोकरी होती. लग्न करताना तिने तिच्यापेक्षा अधिक कमावणारा मुलगा बघावा अशी तिच्या पालकांची पारंपरिक अपेक्षा. पण घडायचे होते वेगळेच. ती छंद म्हणून संगीत शिकण्यासाठी एका अंध तरुणाकडे जात असे. त्या सहवासात त्यांच्या मैत्रीचे धागे जुळले. ती त्याच्या कलेवर बेहद्द खूश होती तर तो तिच्या सहृदय अंतःकरणावर. कळत नकळत मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जन्मांध असलेल्या त्या तरुणाला स्वतःच्या आई-वडिलांबद्दल काही माहिती नव्हती. तो अनाथालयात वाढलेला होता. पण जिद्दीने त्याने संगीतात प्रावीण्य मिळवले होते. स्वतःच्या हिमतीवर धडपड करीत तो कनिष्ठ मध्यमवर्गीय परीस्थितीत पोचला होता.

एके दिवशी तो तिला म्हणाला, “तू मला खूप प्रेम दिलेस. पण आता लवकरच तुझे पालक तुझे लग्न ठरवतील व आपली ताटातूट होईल. मग माझ्यापाशी उरतील त्या फक्त आपल्या निखळ प्रेमाच्या आठवणी. त्यांच्या आधारावर मी माझे आयुष्य काढेन”. हे ऐकल्यावर तिला गलबलून आले. पूर्ण २४ तास तिने खूप विचार केला. तिच्या मनाची खूप चलबिचल झाली. तिने जर सर्वसामान्य मुलींप्रमाणेच ठराविक निकष लावून लग्न जुळवले असते तर तिला चाकोरीबद्ध सुखासीन जीवन मिळाले असते. ते नाकारून या तरुणाशी लग्न करण्याचा विचार हा खूपच धाडशी होता. पण अखेर तिने त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला .

प्रथम त्यानेही तिला वेड्यात काढले. “आपली भेट हा एक अपघात होता असे समजू, पण माझ्याशी लग्न करून तू तुझ्या सुंदर आयुष्याची माती करू नकोस,” त्याने तिला विनविले.
परंतु, आपल्या निर्णयामुळे तो मनोमन सुखावला आहे आहे हे तिने ताडले. जेव्हा तिने हा निर्णय घरी सांगितला तेव्हा अर्थातच तिला तीव्र विरोध झाला. कुटुंबीयांनी विनवणीपासून ते धमकावणीपर्यंत सर्व प्रकारांनी तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या या मुलीने विरोधाला न जुमानता तिचा निर्णय अमलात आणला. पांढऱ्या काठीच्या आधाराने धडपडणाऱ्या जिद्दी तरुणाला तिने आपलाच भक्कम आधार कायमचा दिला.

त्यागाचे याहून चांगले उदाहरण माझ्यातरी पाहण्यात नाही. धडधाकट, निरोगी, उच्चशिक्षित व कमावत्या या तरुणीने एका अंधाला आपला जीवनसाथी केल्याची घटना माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. सदर जोडपे हे आमचे कुटुंबं-मित्र आहे. त्याना एक छानशी मुलगी असून ती एक उत्तम गायिका झालेली आहे. नुकताच तिच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला. त्यानिमित्ताने या गतस्मृतींना उजाळा मिळाला आणि हा लेख लिहिता झालो.
*************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय उत्तम उदा. त्या तरूणीचे खूप कौतुक. कारण जन्मांध व्यक्तीबरोबर राहणे किंवा त्यांना साथ देणे हे अतिशय संयमाचे काम आहे. जीवन जगताना आपल्याला सुद्धा अनेक मर्यादा येतात तसंच अन्ध व्यक्तिंना सुद्धा येतात. प्रसंगी त्यांचे डोळे व्हावे लागते.. ताण येऊ शकतो. पण हे एक खूप छान उदा. आहे तुम्ही दिलेले.
अजून एक मला सांगावेसे वाटते ते म्हणजे कदाचित आपण विचार केला तर हे गोष्ट जी त्या तरूणीने केली ती आपल्याला 'त्याग' वाटू शकते. पण करणार्‍या व्यक्तिला त्याचे खरंतर काही वाटत नाही हे विशेष असते. Happy

तुम्ही तुमच्या लिखाणातून नेहमी काही ना काही शिकवत असता.. मला तुमचे लेख वाचायला खूप आवडते. Happy

पुलेशु

दक्षिणा, मनापासून आभार !
आणि....
कदाचित आपण विचार केला तर हे गोष्ट जी त्या तरूणीने केली ती आपल्याला 'त्याग' वाटू शकते. पण करणार्‍या व्यक्तिला त्याचे खरंतर काही वाटत नाही हे विशेष असते. >>> या वाक्यासाठी सलाम !
जाता जाता.....
'अन्ध ' हे बरोबर. 'अंध' नव्हे, हेही पटले.

अंध व्यक्तींबद्दल मला विशेष कणव आहे.पण त्यांच्याकडे खुप विलपॉवर असते.
सध्या नवीन संशोधनानुसार येत्या काही वर्षात अंधव्यक्तीही जग बघू शकतील अशी परीस्थीती आहे.तो सुदीन लवकर यावा अशी इच्छा आहे.

तुम्ही तुमच्या लिखाणातून नेहमी काही ना काही शिकवत असता.. मला तुमचे लेख वाचायला खूप आवडते.>>>
अगदी हेच बोलायचं आहे.
बाकी खरच त्या मुलीने केलेलं कौतुकास्पद आहे.

येत्या काही वर्षात अंधव्यक्तीही जग बघू शकतील अशी परीस्थीती आहे.तो सुदीन लवकर यावा अशी इच्छा आहे.>>>> अस खरंच व्हाव.

कऊ, मनापासून आभार ! तुमच्यासारख्या वाचकांनी मोठ्या मनाने दिलेल्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या असतात.

अंकु व शशांक, सहमत.

छान लिखाण, कुमार. असे सकारात्मक अनुभव वाचून छान वाटतं. त्या मुलीला सलाम, आणि तुम्हाला विशेष धन्यवाद हा लेख लिहिल्याबद्दल.

खुपच सुंदर.. छान अनुभव
____/\____
सध्या नवीन संशोधनानुसार येत्या काही वर्षात अंधव्यक्तीही जग बघू शकतील अशी परीस्थीती आहे.तो सुदीन लवकर यावा अशी इच्छा आहे.>>> +111111

खुप छान. सहज आणि ओघवती शेली अस्ल्याने तुमचे लिखाण वाचायला आवडते.
त्या मुलीचे खूप कौतुक..! शिर्षक समर्पक.

तिने जर सर्वसामान्य मुलींप्रमाणेच ठराविक निकष लावून लग्न जुळवले असते तर तिला चाकोरीबद्ध सुखासीन जीवन मिळाले असते. ते नाकारून या तरुणाशी लग्न करण्याचा विचार हा खूपच धाडशी होता. पण अखेर तिने त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला .

>>>> यात सर्व सार आले. अशी धाडशी माणसे फार थोडी असतात जगात. _/\_ अनोखी हिंमत दाखवून ती आयुष्यभर निभावून न्यायला वेगळंच काळीज लागतं, त्यासाठी त्रिवार वंदन!!

पण माझ्यामते ह्या धाग्यात जो 'त्याग' शब्द आहे तो बदलून धाडस शब्द ठेवावा. एका डोळस धाडसाची गोष्ट हे शिर्षक जास्त न्याय्य दिसेल.
त्या मुलीने अनेक प्रसंगांना निश्चयाने तोंड दिले असेल, जे आपल्याला माहितही होणार नाही. पण तीने (मुलगी असून - कारण मुलींवर प्रचंड दबाव असतो) जे अचाट धाडस केले त्यास त्याग हे नाव दिल्यास अंध व्यक्तीवर उपकाराची भावना आल्याचे व तिच्या धाडसाचे, हिंमतीचे मोल कमी होते आहे असे भासते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.

अवान्तर ठरेल तरिही एक अनुभव मला इथे नोन्दवावासा वाटतो आहे. मी एका अन्ध मुलांना सपोर्ट करणार्‍या गृपशी निगडीत आहे, त्यांच्या परिक्षांना रायटर म्हणून मी जाते.
वर सिंजी नी जे वाक्य लिहिले आहे >> त्यांच्याकडे खुप विलपॉवर असते. >> हे इतकं खरं आहे की मला आचंबा वाटतो. एकदा एका अन्ध मुलीसाठी मी इन्शुरन्स ची एन्ट्रन्स एक्झाम द्यायला गेले होते. ती मुलगी हॉस्टेल वर एकटी (फॅमिली सोडून) रहात होती, शिवाय तिला घरून कोणताही आर्थिक हातभार/ मदत नसल्याने ती नोकरीही करत होती. खूप लांबून आपल्या अन्ध मैत्रिणी सोबत आणि अजून २ मुलांसोबत उबर (शेअर) करून परिक्षा द्यायला आली होती. खूप गप्पा मारल्या माझ्याशी तिने.. आणि मी पण..
दुसरे उदा म्हणजे मला कित्येक लोक आपल्याशी नीट सुद्धा बोलत नाहीत असे वाटते. पण हे अन्ध लोक इतके विनम्र असतात की सान्गता सोय नाही. अगदी मागच्या आठवड्यात ज्या मुलासाठी परिक्षा द्यायला गेले होते, त्याला आधी रायटर मिळाला नव्हता.. आम्हाला दोघांना एकमेकांचे डिटेल्स एकदम मि ळाले कारण गृप कडून आधी मी जाईन का असे मला विचारण्यात आले, आणि आम्हाला एकमेकांचे नंबर पाठवले त्यात, माझ्याकडू न त्याला फोन जाण्या आधी त्याचा मला फोन आला. ज्या दिवशी पेपर होता त्या दिवशी सकाळी मला रिमाईंडर चा फोन त्यात आमची जी काही कागदपत्र तिथे द्यावी लागतात त्याची आठवण ही त्याने केली. सेंटर ला पोहोचल्यावर मला कळवले की मी आलो आहे आणि तुम्ही रिपोर्टिंग टाईम लाच या.. मी पोहोचून पेपर लिहिला. सुटल्यावर त्याने हात हातात घेऊन माझे शतशः आभार मानले ( मला अक्षरशः रडू फुटलं) मी त्याला म्हणाले अरे माझं कामच आहे मला कधीही फोन कर मी येत जाईन. तो म्हणाला आमच्यासाठी पेपर लिहायला कुणीही तयार होत नाही. हे ऐकून मी इतकी खिन्न झाले Sad
आपल्याकडे काय आहे याची जाणिव अशा लोकांना भेटल्याशिवाय होत नाही.
शाळेत जाणारी अन्ध मुलं तर इतकी गोड असतात. की मनातून जात नाहीत.
असो.. अवान्तराबद्दल क्षमस्व.

अगदी सिनेमात / कथा कादंबर्‍यात फक्त वाचण्यात येतात तशी सत्य घटना आहे ही.
त्या मुलीला त्रिवार वंदन, आणि कुटुंबाला शुभेच्छा.

सर्व नवीन प्रतिसाददात्यांचे आभार.
भाचा, त्या मुलीपुढे मी नतमस्तक आहे. तिच्या कृतीपुढे लेख लिहीणे ही किरकोळ गोष्ट आहे.
बी. एस. , तुमचा प्रतिसाद हा माझ्यासाठी 'टॉनिक' आहे !
नाना, तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. त्यावर मी खूप विचार केला होता. पण, आता लेखक म्हणून आहे त्या शीर्षकावर ठाम राहतो. क्षमा असावी.
हिमालय, विपुला उत्तर दिले आहे. फक्त तिथे मराठी टंकन गंडते आहे.

दक्षिणा, अजिबात अवांतर नाही तुमचा प्रतिसाद. तो इथे अगदी योग्य आहे. आवडला.
रच्याकने, ते साष्टांग नमस्काराचे चिन्ह कसे टंकतात ?

खूप सुंदर लेख.

त्याग हा शब्द नाही पटला. त्यागात कुठेतरी उपकाराची भावना आहे, मुलीने जे केलं ते प्रेमातील वेडं धाडस.

दक्षिणा __/\__.

माझी मुलगी कॉलेजात होती तेव्हा तिच्या वर्गात 2 3 अंध मुले होती. एकदा बोलता बोलता ती म्हणाली की आम्ही सगळ्यांनी क्लास बंक केला आणि कॅन्टीनमध्ये टाइम पास केला. अंधानीही? माझ्या तोंडून निघून गेले. मग? आंधळे झाले म्हणजे काय त्यांनी कॉलेज लाईफ एन्जॉय नाही करायचे? इतर मुलांसारखी धमाल नाही करायची? मुलगी एकदम म्हणाली. माझ्या डोक्यातल्या स्स्टीरीओटाईप विचारांची मलाच शरम वाटली.

खुप छान वाटल वाचुन, इथे शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद.

आपल्याकडे काय आहे याची जाणीव अशा लोकांना भेटल्याशिवाय होत नाही. >>> खरय, दक्षिणा तुमच काम ही वाखाणण्याजोग आहे.

माझ्याही ओळखीत असेच एक कुटुंब आहे. नवरा संपूर्ण अंध आहे व अंध संस्थेत (नॅब) अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांचा मुलगा माझ्यामागेच एक वर्ष होता.

माझे वडिल बर्‍याच अंध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर असतात. तसेच त्यांच्या नॅब, विवेकानंद नेत्रालय इत्यादी संस्थांतील कामांमुळे अनेक अंध व्यक्तिंशी नेहेमी संबंध येत असतो. अंध व्यक्तिंच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील चर्चा ते कधी कधी मला दाखवतात. त्या सर्वांचे चालू घडामोडींवरील भाष्य, माहिती थक्क करणारी असते. अंधत्व हे सर्व प्रकारच्या अपंगत्वांपैकी सर्वात जास्त दुर्बल करणारे आहे. कारण दृष्टी नसणे हे ऐकू न येणे, बोलता न येणे अगदी पंगू असण्यापेक्षा माणसाला जास्त परावलंबी बनवते.

आमच्या वडिलांच्या ओळखीत एक मिरजेजवळच्या खेड्यात राहणारा युअवक आहे. त्याला ऐकू येत नाही, बोलता येत नाही व पूर्ण अंध आहे. तो पिठाची गिरणी चालवतो. एकाचे पीठ दुसर्‍याला कधी जात नाही, बारीक-जाड-भाजणी अश्या सुचना कधी चूकत नाहीत, पैसे बरोबर मोजून देतो. थक्क करणारे आहे त्याचे काम. त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कुणालाही भेटला की हस्तांदोलन करताना हात हातात घेउन चाचपडतो. पुढल्या वेळी फक्त हात हातात घेवून त्याला आपण कुणाबरोबर 'बोलत' आहोत ते कळते. अगदी फक्त एकदाच आयुष्यात भेटलेला माणूस असला तरी. त्याच्यावर एक डॉक्युमेन्ट्री आहे. त्याची लिंक मिळाली की देतो.

टण्या __/\__ धन्य झाले ऐकून...
डोळे पाणावले.

मला नेहमी अकबर बिरबलाची किती अन्ध आणि किती डोळस ही गोष्ट आठवते.
आणि वाटतं. खरे डोळस ते... (ज्यांना दृष्टी नाही, बघण्यापुरती) आणि खरे अन्ध आपण... डोळे असून .. डोळे मिटलेले... Sad

फार सुंदर
मी पण एका अद्भुत अंध व्यक्तीला भेटलो होतो. त्याने जोड सायकलने मनाली ते खरडूनगला केलं होतं. मी त्याला विचारलं की कसं काय असं करावं वाटलं तर म्हणाला
मी मला वेगळा असा समजतच नाही. आज मी हे केलाय हे तुम्हाला स्पेशल वाटतंय, पण माझी इच्छा आहे की इतकया अंध लोकांनी असे वेगळे मार्ग घ्यावेत की लोकांना त्यांच्या अंध असण्याची वेगळी दखल घ्यावी लागणार नाही

छान अनुभव टण्या सर..

एक प्रश्न - अंधांचा व्हाट्सअप्प ग्रुप म्हणजे?ते कसा चाट करतात.. व्हॉइस चाट का..

अंधांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप म्हणजे त्या ग्रुपचे सर्व सदस्य अंध आहेत. इतर डोळस लोक जसे चॅट करतात तसेच चॅट करतात. व्हॉइस चॅट नाही. मला वाटते बहुतेकांच्या फोनवर टेक्स्ट टू वॉइस अ‍ॅप असते.

छान लेख, उदाहरण आणि प्रतिसाद ..

प्रेमापेक्षा मोठी ताकद नाही या जगात.
जी जोडी आपले नेहमीचे निकष लावता विजोड असते, त्यात जेव्हा प्रेम बहरते तेव्हा त्याचे बंध आणखी घट्ट असतात. कारण त्यांना टिकून राहायला कुठल्याही भौतिक आकर्षणाच्या आधाराची गरज नसते. त्याग म्हणा वा धाडस वा आणखी काही, त्या मुलीला याचे फळ मिळणारच. कारण आयुष्यभर ती या नात्यात सुखी आणि समाधानी राहणार.

Pages