गोळवशी_माझं_गांव
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यापासून ११ किमीवर वसलेले हे एक खेडेगाव होय.कोकणातील ईतर गावांप्रमाणेच या गावावर सुद्धा निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे.चारही बाजुंनी पसरलेल्या डोंगररांगा,घनदाट जंगले,त्यात दाटीवाटीने वसलेली कौलारु घरे,मुचकुंदी नदीचे खळाळत वाहणारे पात्र गावाच्या वैभवात अजुन भर टाकते.
लांजा तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माचाळ गावातील डोंगरावर असणारया मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळुन नदीचा उगम होतो.मुचकुंदी माईचा गावाला सहवास लाभला आहे.मुचकुंद ऋषींच्या तपाचरणाने पावन झालेली हि नदी यामुळेच या नदीला मूचकुंदी असे नाव पडले.पुढे ही नदी पूर्णगडच्या खाडीला जाऊन मिळते.गावाच्या सीमेलगत वाहणारी हि नदी पार केल्यास आपण राजापुर तालुक्यातील हसोळ या गावी प्रवेश करतो.या नदीवरती पुल उभारल्यास लांजा ते राजापुर हे अंतर काही तासांचे होईल.हा प्रकल्प शासनाच्या विचारधीन असून लवकरच कामाला सुरुवात होईल अशी आशा आहे.
गोळवशी हे ७०० ते ८०० लोकसंख्येचे गांव होय.सहा वाडयांची ईथे नागरी वस्ती आहे.गावातील लोक प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात.कोरडवाहु व खडकाळ जमीनीमुळे पिके घेण्यावरती मर्यादा येतात.येथील शेतकरी शेतीसाठी सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे.त्यामुळे पावसाळी पिके यामध्ये भातशेतीचे प्रमुख उत्पादन याजोडीने फळभाज्या पालेभाज्या यांची लागवड केली जाते.पशुपालन हा कमी प्रमाणात जोडधंदा केला जातो.कोकणातील प्रसिद्ध हापुस आंबा व काजूगर याच्या गावामध्ये फळबागा आहेत.गावातील आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे पाहिले जाते.याबरोबरच फणस,चिकु,पेरू,नारळ,सुपारी याची फळझाडे सुद्धा घरोघर दिसून येतात.कोकणातील रानमेवा अशी ओळख असणारी करवंदे,जांभुळ,आवळा,चिंच,अशी अनेक फळे गावाच्या आजुबाजूला असणाऱ्या जंगलात विपुल प्रमाणात आढळतात.एप्रिल ते मे महीना भेटीसाठी योग्य कालावधी आहे.
●गावातील प्रेक्षणीय स्थळे ●
@ आई नागादेवी मंदिर ©
आई नागादेवी हि गावाची ग्रामदेवता होय.स्वयंभु शंकराचे हे स्थान अत्यंत रमणीय अशा ठिकाणी आहे.येथील वातावरण मन प्रफुल्लीत केल्याशिवाय राहत नाही.संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण मोठ्या संख्येने आईच्या दर्शनासाठी येत असतात.विशेष आकर्षण म्हणजे बायंगी देवता होय.देवळाच्या बाजूला असणारी देवराई,प्राचीन तळे,सतीची १0५ शिल्पे अभ्यासण्यासारखी आहेत.जैवविविधतेने नटलेला असा हा एकूण परिसर आहे.
© मुचकुंदी नदी खोरे ©
गावच्या सीमेवरुन वाहत जाणारी मुचकुंदी माईचे विस्तीर्ण पात्र पाहताना आत्माही सुखावतो.हिरवागार असा संपूर्ण परिसर,नारळी_पोफळीच्या बागा,लांबवर पसरलेले मैदान व धावगी देवाचे मंदिर यांना आवर्जून भेट दयायलाच हवी.पावसाळा संपल्यानंतरचा काळ यासाठी सर्वोत्तम आहे.
● गावातील प्रमुख सण ●
© होळी ©
हा गावचा प्रमुख सण आहे.या दिवशी सर्व गावकरी होळीचा मांड या पुरातन ठिकाणी जमतात.गावातील सर्व प्रमुख देवतांची पालखी सजवली जाते.यालाच रुपे लावणे असे म्हणतात.प्रामुख्याने आंबा किंवा ताड या झाडांच्या होळया असतात.ही होळी आदल्या दिवशी रात्री देवीची पालखी घेवून वाजतगाजत मांडावर आणली जाते.दुपारच्या सुमारास पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होळया पेटवल्या जातात.एकुण दोन होळयापैकी होम होळीभवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा घालुन मानाचा नारळ आगीतुन उडी मारुन पाडला जातो.तसेच दिवसभर देवीला कोंबडीबकरे यांचे नवस केले जातात.यानंतर तीन दिवसानंतर खावडी गावची नवलादेवी आणि नागादेवी या बहिणीची मांडावर ओटी भरून भेट होते.व दोन्ही पालख्या नाचवल्या जातात.हा सोहळा पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. शिवजयंती साजरी झाली कि गावकरी देवीची पालखी घेवून गांव प्रदक्षिणेला म्हणजेच गावातील प्रत्येक घरामध्ये पालखी घेवून जातात.दहा दिवस गावात आनंदाला उत्साहाला भरते येते.कित्येक भोजनावळी उठतात.
© गणेश उत्सव ©
या सणाला मुंबईतील चाकरमानी गावात हजेरी लावतात.संपूर्ण गावामध्ये घरगुती गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते.सामूहिक आरत्या व भजने,फुगडया,जाखडी असे कार्यक्रम करून रात्रभर जागरणे केली जातात.गौराई मातेचे मनोभावे पूजन केले जाते.अनुक्रमे ६ व १० दिवसाच्या बाप्पाना पारंपारिक वारकरी संप्रदायाच्या अभंगावरती दिंडी काढून आणि ढोलताशांच्या गजरात साश्रुनयनांनी निरोप दिला जातो.गणेशमुर्त्या शाडुच्या मातीच्या असल्यामुळे तसेच मुर्तीचे नैसर्गिक स्त्रोतांमध्ये विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केला जातो.
● विशेष आकर्षण ●
© खांबडवाडी नवरात्र उत्सव व गोकुळाष्ठमी ©
आश्विन शुद्ध पक्षी दुर्गादेवीचे मोठया जल्लोषात खांबडवाडी समाजमंदिर येथे आगमन होते.गेली 19 वर्ष खांबडवाडी मित्र मंडळ देवीची प्रतिष्ठापना करत आले आहे.यामध्ये 'नऊ दिवस नऊ कार्यक्रम' हि संकल्पना राबविली जाते.भजन,कीर्तन,जाखडी,रास गरबा,गोपी नृत्य,लहान मुलांसाठी स्पर्धा,गुणवंत विद्यार्थी व थोरामोठयांचा सत्कार यासारखे उपक्रम राबविले जातात.दसरयाच्या दिवशी सोनेलुट करून सर्व ग्रामस्थांची गळाभेट घेतली जाते.
व दुसऱ्या दिवशी देवीची विसर्जन मिरवणूक काढुन भजनाच्या तालावर आणि वाद्यांच्या गजरामध्ये धरणामध्ये विसर्जन केले जाते. मोठ्या प्रमाणावर भक्तगण या सोहळ्याला उपस्थीत असतात.यावेळी भाविकाना प्रसादाचे वाटप केले जाते.
गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव खांबडवाडीमध्ये गेल्या ५० वर्षापासून हा सोहळा साजरा केला जातो.गोकुळाष्टमीला वाडीतील सर्व ग्रामस्थ एकत्र येवून श्रीकृष्णाची मनोभावे पूजा व आरती करतात.बाळ श्रीकृष्णाला पाळण्यात घालून स्त्रीया पाळणा गीते गातात.दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो.देवाला आलेल्या नवसाच्या हंडया चार ते पाच थरांवर बांधल्या जातात.भजनाच्या दिंडीमधून श्रीकृष्णावरील कवने गायली जातात.पाण्याचा कमी वापर आणि योग्य नियोजनाने व गांवकऱ्यांच्या सहभागातुन ४ ते ५ हंडया बाळगोपाळ फोडतात.भाविकाना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता होते.
© गावातील शाळा ©
पहिली ते सातवीपर्यन्त म्हणजेच प्राथमिक शिक्षणाची गावात सोय आहे.गावामध्ये एकुण तीन शाळा आहेत.माध्यमिक शिक्षणासाठी बाजुच्याच खावडी गावातील माध्यमिक शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी लांजा येथे जावे लागते.
● गावात कसे पोचाल ●
ट्रेन -जवळचे स्टेशन रत्नागिरी,आडवली,विलवडे,लांजा
बस-रत्नागिरी ते लांजा आगार
लांजा आगार ते गोळवशी गांव
रिक्षा /वडाप/जीप
लेखक
किरण प्रकाश भालेकर
Bhalekar117.blogspot.com
आई नागादेवी ग्रामदैवतपालखी आई नागादेवी
पाण्याचे टाकं
गावाला लाभलेली प्राचीनता मंदिरात असणाऱ्या या वीरगळीवरुन स्पष्ट होते.मंदिराच्या मागच्या बाजूला अजून काही वीरगळी आहेत.
वीरगळ
गावात अशी 5 ते 6 छोटी धरणेवजा बंधारे आहेत.पावसाळ्यात जेव्हा हि धरणे भरून वाहायला लागतात तेव्हा इथल्या छोट्या मुलांच्या आनंदाला उधाण येते.गणपती विसर्जनासाठी याचा प्रामुख्याने वापर होतो.
धरणभातशेती
शेती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे तसेच प्रमुख पीक हे तांदूळ आहे.
गोळवशी गावची ओळख असलेली ही शेड इथून गाव सुरू होतो.गोळवशी आंबा असे या ठिकाणचे नाव आहे.
प्रवासी शेड
पहिली ते चौथी (खांबडवाडी)
माझी शाळा लहानपणीची गावातील माझं घर
गणेश विसर्जनचा 2017चा हा विडिओ लिंक देत आहे पाहायला विसरू नका.
https://youtu.be/YtBqfwKe_6U
गावातील होळी उत्सव कसा साजरा होतो त्याचीसुद्धा आपल्याला एक झलक नक्कीच पाहायला मिळेल.
खाली लिंक देत आहे.
https://youtu.be/zlvCKWcXvGk
खांबडवाडीची पारंपरिक दहीहंडी लिंक देत आहे.
https://youtu.be/khrINEPBXQs
किरण प्लिज लिही आणि छान छान
किरण प्लिज लिही आणि छान छान फोटो टाक
अन्जू किती गोड नक्की.
अन्जू किती गोड
नक्की.
दक्षिणाताई मी नक्कीच हा
दक्षिणाताई मी नक्कीच हा प्रयत्न करणार आहे.माझ्या आजूबाजूच्या गावांमध्ये देवस्थाने,चालीरीती,परंपरा,ऐतिहासिक ठिकाणे आहेत त्यांची माहिती लिहणार आहे.जेणेकरून खर कोकण कसं आहे ते सर्वांपर्यंत पोचण्यास मदत होईल.
Pages