दयायचे तर दु:ख दे दु:खातले

Submitted by सुप्रिया जाधव. on 9 September, 2017 - 01:24

पाळुनी औदार्य ह्या नात्यातले
खेळणे झाले तुझ्या हातातले

सौख्य दे उधळून कोणाहीवरी
दु:ख दे माझे मला हिश्श्यातले

वादळाचा रोख हा बदलेलही
हात बदलाया नको हातातले

पूर्ण उद्यानात ना मावायचे
गंध जर झाले उघड काट्यातले

गैरसमजांवर जगत राहिल जग
वाद राहो तेवते अपुल्यातले

तुकविली नाही तरीही मान मी
बाण गेले संपुनी भात्यातले

जायचे असल्यास जा सोडून ते
जे कधी होते तुझ्या-माझ्यातले

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users