परतुनी येतात का लाटा

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 September, 2017 - 07:47

वेगळ्या झाल्यात वहिवाटा
काढला गेला तुझा काटा

ओघ ओसरणार केव्हा हा
परतुनी येतात का लाटा ?

घ्या स्मृतीन्नो फारकत माझी
जा नवा संसार जा थाटा

गैरसमजांचे धुके लांघू
फटफटू दे धुंदल्या वाटा

गजबजू दे काठ स्मरणांचा
ओसरू दे घोर सन्नाटा

संपल्यावरती हवे वाटे
जीवनाचा खेळ उरफाटा

गोपिकांनी घेरला कान्हा
राधिकेचा फक्त बोभाटा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users