तुझ्या श्वासांवरी त्याचा पहारा

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 September, 2017 - 13:12

विचारांचा सुटे बेबंद वारा
स्मृतींचा वाढवी फापटपसारा

मनाची नाव घेते हेलकावे
कुण्या डोळ्यात गवसेना किनारा

पुढे जाणे, वळुन मागे पहाणे
अता अप्राप्य हा झाला नजारा

करू अदलाबदल...समजेल तेव्हा
कसा होतो मनाचा कोंडमारा

कुठुनही पोचते त्याच्याचपाशी
कधी संपायच्या ह्या येरझारा ?

रिव्हॉल्व्हरसारखा हा खनपटीला
अगोदर संशयाला दूर साऱा

प्रवाहाला भयानक ओढ आहे
प्रवाहाच्या दिशेने हात मारा

दिसत नसला तरी आहेचआहे
तुझ्या श्वासांवरी त्याचा पहारा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच शेर भारीयेत...
>>> रिव्हॉल्व्हरसारखा हा खनपटीला
अगोदर संशयाला दूर साऱा>>>
हा सर्वाधिक आवडला.

खुप छान लिहलय...आवडेश..

येऊ देत पुन्हा रिमझिम .बहरू दे तोच आसंमंत.
न कळणारा जाणवू दे, पुन्हा तुझा तोच शहारा...