विसर आता

Submitted by निशिकांत on 4 September, 2017 - 01:10

शांतता होती इथे हे विसर आता
चांदण्याचे दूर गेले शहर आता

लावले बागेत हे विषवृक्ष कोणी?
पारखे झाले मधाला भ्रमर आता

जाहली अडचण घराला सुरकुत्यांची
ना वयस्कांची कुणाला कदर आता

पश्चिमेच्या संस्कृतीने ग्रासल्याने
लोपली साडी, हरवला पदर आता

देवही भक्तांकडे ना लक्ष देतो
राव लोकांवर कृपाळू नजर आता

घेरल्यावर वेदनांनी सांज वेळी
आठवावे बालपणचे प्रहर आता

लाटती धन धेंड, त्यांना धूर्त म्हणती
" लाच पटवार्‍यास " होते खबर आता

शापिले नंदनवनाला दहशतीने
मातला आहे तिथेही कहर आता

शांतता चिर पाहिजे "निशिकांत "ला तर
घे कुदळ अन् खोद अपुली कबर आता

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users