वाचलो बुवा..!

Submitted by अजय चव्हाण on 3 September, 2017 - 07:11

वाचलो बुवा...!

आज हाॅस्पिटलमध्ये म्हणावी तशी गर्दी नव्हती..
बंडु आपला ऊगाच टगळमगळ करत केसपेपर काढायला रांगेत उभा होता..
खरंतरं बंडुला जास्त काही लागलं नव्हत आणि कुठला रोगही त्याला नव्हता फक्त गेले काही दोन दिवस त्याच्या बेंबीतून पु आणि रक्त निघत होतं.. नक्की काय भानगड आहे आणि एकदा चेकअप करून घ्याव म्हणून तो ठाण्याच्या सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये आला होता..
यशावकाश केस पेपर काढला आणि बंडुने तिथून जात असलेल्या वाॅर्डबाॅयला " आता कुठे जायचं चेकअपला??"
असा प्रश्न विचारला तसा त्या वाॅर्डबाॅयने तोंडात असलेल्या तंबाखूचा बार लावत " हिकड्न सरळ जावा " असं बंडुला सांगितले..
बंडू आपल्या त्या कक्षात गेला..

तिथल्या बाकावर अगदी जीवनाला कंटाळलेले लोक हातात केस पेपर घेऊन एरंडेल तेल पिल्यासारखे चेहरा करून बसले होते..
बंडु आत आला तसा सगळेच आश्चर्यने त्याला पाहु लागले..

गोरा रंग, वेडेवाकडे दात, निळया जीन्समध्ये खोचलेला काळा शर्ट ..बंडु हाॅस्पिटलमध्ये आला नसून एखाद्या पार्टीला आल्यासारखा आला होता..
बाकावर जागा थोडी रिकामी झाली तशी बंडू बसला आणि उगाच आपला इकडे तिकडे पाहू लागला..
असंच पाहत असताना त्याची नजर
" एच आय व्ही कक्ष " असं ठळक अक्षरात लिहलेल्या पाटीवर गेली..
आणि तो ही त्याच कक्षामध्ये बसलाय याची जाणीव झाल्यावर
बंडुला दरदरून घाम फुटला..
त्याच्या चेहर्‍याचा रंगच उडाला..
कधीही देवाला नमस्कार न करणारा बंडु आज तेहतीस कोटी देव आठवून धावा करत होता..
तो आपल्या मागील आयुष्यातील क्षण न क्षण आठवू लागला..
त्याने कधी असं कुठलं पाप केलं नव्हत फक्त गावाला असताना एकदा शेतात चोरून शेवंताचा चुम्मा घेतला होता आणि त्याने असं काही होईल असं बंडुला अजिबात वाटत नव्हतं. .
मग तो आपल्या हनुवटीवरून हात फिरवू लागला .
दाढीचे खुंट थोडे वाढले होते.. परवाचा त्याने सलिम न्हाव्याकडे दाढी केली होती.. सलिम न्हावी म्हणजे महाचतुर माणूस अफरातर करायला एक नंबर .. साला त्यानेच जुना ब्लेड लावला असणार..
" त्याची माय वरात" एक हासडून शिवी त्याने सलिम न्हाव्याला घातली..

आता आपलं पुढे कसं होणार?? ह्याची चिंता त्याला सतवू लागली..
सगळंच संपलं आता.. आता आपण सडून सडून मरणार ह्या कल्पनेनेच त्याला रडू कोसळले. .

इतक्यात एक नाजूक हात त्याच्या खांद्यावर पडला ..
बंडुने चमकून वर पाहीलं तर त्याची दिलरूबा 'सपना' होती.

"बंडू काय झालंय आणि इथे काय करतोयस??"

तिला इथे बघून बंडुला धक्काच बसला..

"ते ..ते..आपलं काय नाय.."

बंडु सारवासारव करत उत्तर देत होता..

सपनाने वरती लावलेल्या पाटीकडे पाहील आणि
तिलाही तो बोर्ड वाचून धक्का बसला..

" तशी साॅरी बंडूबु ( मुली लाडाने प्रियकराला काहीही म्हणतात, शोना, पिल्लू, बाबू वैगेरे तसचं सपना बंडूला बंडू-भु म्हणायची पण ऐकायला बंडूबु असं वाटायचं असो ) हे रिलेशन नाही ठेवू शकत..."

असं म्हणून ती गेलीसुद्धा..

इकडे बंडुला अजूनच रडू कोसळले. .

तेवढ्यात बंडु काळेऽऽऽऽ आतून आवाज आला तसा बंडु त्या डॉक्टरच्या रूममध्ये शिरला..

"डागदर मले बचाव.. डागदर मले बचाव.."

असं आपल्या भाषेत म्हणत तो जवळजवळ त्यांच्या पायातच पडला

डाॅक्टरही थोडे भांभवले.

"अहो मिस्टर काय करताय? हे बघा मी समजू शकतो..मी माझ्या परीने पुर्ण प्रयत्न करीन उठा अगोदर मला तपासू तरी द्या. "

तसा बंडू आज्ञाधारक बालकाप्रमाणे उभा राहीला..

"झोपा तिकडे.."

पडत्या फळाची आज्ञा समजून बंडु त्या छोट्याश्या पलंगावर जाऊन झोपला..

"हं.. काय त्रास होतोय??"

डाॅक्टर स्टेथोस्कोपने बंडूला तपासत विचारलं..

"डागदर ये बगा" असं म्हणत बंडुने शर्ट वर केला..

तसा डाॅक्टरने कपाळावर हात मारला..

अहो स्कीन इंफेक्शन आहे हे... इथे कुणी पाठवलं तुम्हाला. .

त्वचारोग तज्ञाचा कक्ष वरती पहिल्या माळ्यावर आहे...

डाॅक्टर म्हणाले तसा बंडुचा जीव भांड्यात पडला..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users