सखे पावसाने

Submitted by निशिकांत on 28 August, 2017 - 06:00

मनी रुजवली एक आठवण सखे पावसाने
तुझ्यासोबती नाव कागदी कधी सोडल्याने

खळखळणारे जीवन होते मित्र मैत्रिणींचे
राग, लोभ अन् हेवे, दावे मनात नसल्याने

शुष्क जीवनी शोध घेतला, हिरवळ सापडली
बालपणीचे वैभवशाली पान चाळल्याने

कष्टाला का महत्व नाही दिले संस्कृतीने?
शास्त्र सांगते इष्टच होते देव पावल्याने

पाय टेकुनी जमिनीवरती भविष्य ठरवावे
जरी घ्यायची उंच भरारी, तरी माणसाने

ऊन नको पण श्रावणमासी भिजावयाचे का
स्वप्न बघावे दिवाणखान्यातल्या रोपट्याने?

ओंगळवाण्या स्पर्शाने का उगा थिजायाचे?
टळेल संकट हिंमत करुनी दूर लोटल्याने

वादग्रस्त मी ठरलो होतो खूप कधी काळी
भंपक रूढीं विरुध्द थोडे स्पष्ट बोलल्याने

एकलकोंडे पुरे अता "निशिकांत" जगायाचे?
आयुष्याचे रंग बहरती आल्यागेल्याने

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users