"अमृताहुनी गोड - <<<खजुराचे लाडू >>> - <<< दीपा जोशी >>>’’

Submitted by दीपा जोशी on 27 August, 2017 - 12:00

reduced khajur ladu.jpegखजुराचे लाडू
१) प्रकार पहिला - साधे लाडू
साहित्य :
१. बिनबियांच्या खजूराचे बारीक केलेले तुकडे - एक मोठी वाटी दाबून भरून
२. बेदाणे - पाव वाटी
३. सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे - एक मोठी वाटी गच्चं भरून
४. खसखस - पाव वाटी
५. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट -पाव वाटी
६. वेलदोडे - ३/४

कृती :
१. प्रथम सुक्या खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामधून मधून थोडे जाडसर (म्हणजे शेंगदाण्याचे जाड कूट असते तेवढे) दळून घ्यावे.
२. एका जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर सुक्या खोबऱ्याची पूड साधारण गुलाबी रंगावर भाजून ताटात काढून घ्यावी.
३. त्याच कढईत अगदी थोडा वेळ खसखस भाजून घ्यावी .
४. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सुक्या खोबऱ्याची भाजलेली भरड पूड, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, भाजलेली खसखस, खजूर तुकडे, बेदाणे, वेलदोडे हे सगळे साहित्य एकत्र करावे.
५. थोडा थोडा वेळ मिक्सर चालवून, मध्ये मध्ये मिश्रण ढवळून, चांगले एकजीव करावे.
६.या मिश्रणाचे बेताच्या आकाराचे लाडू वळावेत.

वरील साहित्याचे बेताच्या आकाराचे साधारण १५ लाडू होतात.

अधिक टीपा :
१. सुक्या खोबऱ्याचा किस घेतला तरी चालतो. फक्त तो भाजल्यावर कुस्कुरून घ्यावा.
२. बाजरातला तयार पांढरा किस असतो तो वापरू नये. त्याने चव कमी होते.

२) प्रकार दुसरा : खजुराचे शाही लाडू
साहित्य :
१. बिनबियांच्या खजुराचे बारीक तुकडे - दोन वाट्या गच्चं भरून
२. बेदाणे - अर्धी वाटी
३. सुके खोबरे, मिक्सरवर जाडसर दळून - एक वाटी दाबून भरून
४. खसखस - पाव वाटी ५. डिंक (जोंधळ्याएवढे बारीक तुकडे करून ) - पाव वाटी
६ वेलदोडे- तीन/चार
७. साजूक तूप- पाव वाटी
८. काजू तुकडे - अर्धी वाटी
९. बदाम (तुकडे करून)- पाव वाटी

कृती :
१. प्रथम सुक्या खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामधून मधून थोडे जाडसर (म्हणजे शेंगदाण्याचे जाड कूट असते तेवढे) दळून घ्यावे.
२. एका जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर सुक्या खोबऱ्याची पूड साधारण गुलाबी रंगावर भाजून ताटात काढून घ्यावी.
(हे भाजण्याचे काम होताना एकीकडे काजू बदामाचे तुकडे करून घ्यावेत, वेळ वाचतो.)
३. त्याच कढईत अगदी थोडा वेळ खसखस भाजून घ्यावी .
४. कढईत साजूक तुप गरम करून डिंकाचे छोटे तुकडे घालून तळून घ्यावे.
५. डिंक तळून झाल्यावर निथळून तो खोबऱ्यावर टाकावा, म्हणजे तूप आत शोषले जाते.
६. कढईतल्या राहिलेल्या तुपात खजूर तुकडे, अर्धे काजू तुकडे - बदाम तुकडे, बेदाणे थोडे परतून घ्यावेत.
७. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये वरील सर्व पदार्थ, वेलदोडे हे सगळे साहित्य एकत्र करावे.
५. थोडा थोडा वेळ मिक्सर चालवून, मध्ये मध्ये मिश्रण ढवळून, चांगले एकजीव करावे. (फार बारीक करू नये.) राहिलेले अर्धे काजू तुकडे घालावेत. लाडूमध्ये ते मधे मधे छान दिसतात.
६.या मिश्रणाचे बेताच्या आकाराचे लाडू वळावेत.

वरील साहित्याचे बेताच्या आकाराचे साधारण १५ लाडू होतात.

अधिक टीपा :
१. सुक्या खोबऱ्याचा किस घेतला तरी चालतो. फक्त तो भाजल्यावर कुस्कुरून घ्यावा.
२. बाजरातला तयार पांढरा किस असतो तो वापरू नये. त्याने चव कमी होते.
३. खजूर तुपावर परतल्याने, गरम असताना मऊ असतो. म्हणून मिक्सर ऐवजी हाताने सर्व मिश्रण बारीक कुस्करूनही लाडू छान होतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users