चकवा.........आयुष्याच्या वाटेवर!(भाग ५ शेवटचा)

Submitted by पद्म on 17 August, 2017 - 04:40

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

[त्यानंतर सृष्टीने अनिकेतशी संपर्क करण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. आणि १ महिन्यानंतर सृष्टीने अनिकेतला शेवटचा मेल केला......]

हाय अनिकेत,
आपण याआधी भरपूर गप्पा मारल्या, चॅटिंग केली आणि इतकं बोलताना मी कधीच विचार केला नव्हता. पण आज तुला हे लिहिताना खूप विचार करूनसुद्धा काहीच सुचत नाहीये. तरीही आज मला लिहावंच लागेल, कारण माझ्या भावना मी अजून जास्त बांधून ठेऊ शकत नाही.

अनिकेत, मागच्या १ महिन्यात खरंच तुला माझी आठवण नाही का आली? मी रोज वेड्यासारखी तुझ्या मेसेजची वाट पाहत होती, तुला रोज कितीतरी कॉल करत होती. पण तुझा नंबर लागलाच नाही. माझ्यासाठी काहीतरी कारण करून मुंबईला येणंही शक्य होतं, पण माझ्यामुळे तुला त्रास नको. पण अनिकेत, मी विचार करतीये की, हे सगळं माझ्यासोबतच का होतं? असा काय गुन्हा मी केलाय की, मला ह्या वयात इतकं पुन्हा पुन्हा सहन करावं लागतंय?

अनिकेत, तुला आठवत असेल, लहानपणी जेव्हा तुम्ही शिफ्ट झाले होते तेव्हा मला एकच मित्र होता. त्यानंतर तुझे भरपूर मित्र असतील, पण माझी कधीच कोणी मैत्रीण नव्हती. त्यावेळीसुद्धा मी खूप रडले होते, तेव्हाही मला वाटलं कि तू येथून जाऊ नयेस. पण माझ्या इच्छेनुसार कधीच काही झालं नाही. इथून गेल्यावर तू मला विसरला असशील, पण मी तुला कधीच विसरू शकली नव्हती.

माझ्या शिक्षणानंतर घरी माझ्या लग्नाचा विषय झाला आणि सगळ्यात आधी मला तुझी आठवण आली. का आली? मलाही नाही सांगता येणार! काही दिवसातच योग्य स्थळ आलं, आणि घरच्यांनी माझे हात पिवळे करायला जराही उशीर केला नाही. माझ्या लग्नात तू असावं अशी खूप इच्छा होती, आणि शेवटी ती इच्छाच राहिली. लग्नानंतर काही दिवसातच मी संसारात रुळू लागली, तेवढ्यात मला अजून एक धक्का बसला, जे स्थळ आम्हाला योग्य वाटलं होतं, ते पूर्णपणे अयोग्य होतं. त्याबद्दल तुला सांगितलंच होतं, त्यावेळी मला खरंच तुझी गरज होती आणि काही महिन्यातच तू मला भेटला, खरंच कित्ती खुश होती मी!

तुझ्यामुळेच मी माझे सगळे दुःख विसरू शकली. तुझ्या सोबतचे हे इतके दिवस माझ्यासाठी खरंच स्वर्गीय होते. मी तुला एकदा बोलली होती, "तुझं माझ्या आयुष्यातलं स्थान तुलाही माहिती नाही". आणि तू खरंच ते समजू शकला नाहीस. असो, त्यात तुझाही काही दोष नाही. पण मनात प्रश्न हाच उरतो की, इतके दुःख माझ्याच वाट्याला का? कारण माझाही काही दोष नाही...

आज वाटतंय, तू मला पुन्हा भेटला नसतास तर बरं झालं असतं. मी हळूहळू का होईना, पुन्हा जगायला शिकले असते. पण हे असं नातं जोडून पुन्हा तोडून फेकणं खूप त्रासदायक असतं. तुला मी एकदा बोललीसुद्धा होती की, माझ्यात अजून सहन करायची शक्ती नाहीये, तेंव्हा तू मला सोडून न जाण्याचं वचनही दिलं होतंस आणि काही दिवसात तूच माझ्यावर हा वार केलास, जो आता खरंच माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे.

अनिकेत, खूप सहजपणे तू मला तुझ्या आयुष्यातून दूर केलंस. पण, यावेळी मात्र मीही स्वार्थी बनणार आहे. आज माझ्या स्वार्थासाठी मी काहीही करायला तैयार आहे, आणि जीवनातले दुःखच माणसाला या स्तरापर्यंत पोचवतात. मी आता जातेय कायमची.....सर्वांसाठी! पण एक लक्षात ठेव माझ्या स्वार्थासाठी मी तुला माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ देणार नाही.

अनिकेतची सृष्टी.

[त्या रात्री अनिकेत मेल वाचू शकला नाही.
आणि सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे, तो हा मेल कधीच वाचू शकणार नव्हता...........
कारण, दुसऱ्या दिवशी सकाळी........]

"दादा........उठ लवकर! ७ वाजले", मम्मीने पांघरूनसुद्धा ओढून घेतलं, "तुला जायला उशीर होईल नाहीतर. आणि पप्पा पण यायचं म्हणताहेत."
"बरंय तेवढाच माझा बसने जायचा त्रास कमी होईल", माझी मेहनत कमी झाली कारण आता पप्पांच्या बाईकने जाणार.
मी शिरपूरला आजी बाबांना भेटायला जातोय, असं मम्मी पप्पांना तरी वाटतंय. पण खरं तर मी फक्त सृष्टीला भेटण्यासाठी हे सर्व प्लॅन केलंय.

[अनिकेतच्या मते त्याने त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं प्रकरण संपवलं होतं.......
पण त्याला माहिती नाहीये, त्याच्या आयुष्याच्या पुस्तकात आता एकच प्रकरण उरलंय....]

चकवा.........आयुष्याच्या वाटेवर!(समाप्त/सुरुवात)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे, तो हा मेल कधीच वाचू शकणार नव्हता..>>>>>>म्हणजे नक्की काय?
अनिकेतचा पण मृत्यू झाला का?

माझी मेहनत कमी झाली कारण आता पप्पांच्या बाईकने जाणार. >>>
हम्म...सृष्टिकडे चाललाय...बाईक ने!!
accident? the end??
पद्मसर, विचांरात टाकलंय....

मला तरी वाटतयं हे सगळं त्याला पडलेलं स्वप्न होतं. कथा जेथून सुरु झाली तेथेच येऊन संपले. चकवा हा प्रकारच असा असतो जेथून सुरु होतो तेथेच परत आणून सोडतो. मस्त आहे कथा. आवडली +++++१

स्वप्न नाहीये...

मी आता जातेय कायमची.....सर्वांसाठी! >>> सृष्टी गेली कायमची! पण तिने असा चकवा निर्माण केला, ज्यामुळे अनिकेतने तिच्यासोबत घालवलेले दिवस ती पुनःपुन्हा अनिकेतसोबत जगेल. आणि अनिकेत मात्र अशा पद्धतीने या सर्व घटना पुनःपुन्हा जगेल, जसं हे त्याच्याशी पहिल्यांदा घडतंय.

चांगली झालीय कथा अगदी शेवट माहितीय अस वाटत असताना चकवा दिलात पुलेशु
कथा संपेपर्यंत कथा आणि दिलेलं शीर्षक मध्ये संबंध लागेना आता प्रतिसाद वाचल्यावर कळलं.

स्वप्न नाहीये...
मी आता जातेय कायमची.....सर्वांसाठी! >>> सृष्टी गेली कायमची! पण तिने असा चकवा निर्माण केला, ज्यामुळे अनिकेतने तिच्यासोबत घालवलेले दिवस ती पुनःपुन्हा अनिकेतसोबत जगेल. आणि अनिकेत मात्र अशा पद्धतीने या सर्व घटना पुनःपुन्हा जगेल, जसं हे त्याच्याशी पहिल्यांदा घडतंय.

आता तुम्ही समजावल्यावर समजली.

Sundar

अप्रतिम कथा पद्म सर.
भारीच एकदम. शेवटी तुम्ही सगळ्या वाचकांना चकव्यातून चकमा दिलात.
अनिकेत च्या मनातला नात्याबद्दलचा संभ्रम फार छान उतरला आहे.
पुढील कथेच्या प्रतिक्षेत.