"सिमी दी फर्स्ट कनव्हिक्शन इन इंडिया" पुस्तक परिचय

Submitted by चिंतामण पाटील on 8 August, 2017 - 06:33

राष्ट्रद्रोही सिमीचा पर्दाफाश करणारे पुस्तक

चिंतामण पाटील

काश्मीरमध्ये 2001 साली आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी 3 हल्लेखोर आतंकवाद्यांचा खात्मा केला. त्यापैकी एकाच्या खिशात जळगावचा फोन नंबर असलेली चिठ्ठी सापडल्यानंतर भारताविरुध्दच्या लढाईसाठी भारतातीलच मुस्लीम तरुणाईचा वापर पाकिस्तान करू लागल्याचे सत्य पुन्हा एकदा सिध्द झाले. या सगळया कटकारस्थानात सिमी ही विद्यार्थी संघटना सामील असून जळगाव हे तिचे केंद्र असल्याचे उजेडात आले. त्यानंतर जळगाव पोलिसांनी सिमीची पाळेमुळे खणून काढून दहशतवादी कारवायात सहभागींना कुठून कुठून शोधून काढले? भक्कम पुरावे कसे मांडले? येथपासून ते या दहशतवाद्यांना तुरुंगाच्या अंधारकोठडीची कशी वाट दाखवली, याची संदर्भासहित माहिती आपल्याला 'सिमी दी फर्स्ट कन्व्हिक्शन इन इंडिया' या पुस्तकात मिळते. सिमीसंदर्भातील बारीकसारीक तपशील, पोलीस तपास, न्यायालयीन कामकाज, सिमीशी संबंधितांच्या मुलाखती आदी किचकट विषय वाचनीय करून ते पुस्तकाच्या स्वरूपात वाचकांच्या हाती देण्याची किमया विजय वाघमारे यांनी केली आहे.

एकूण बारा प्रकरणांत पुस्तक विभागले गेले आहे. सिमीच्या स्थापनेचा इतिहास पहिल्या प्रकरणात आला आहे. जळगावात सिमीचा उदय होण्याची कारणे दुसऱ्या प्रकरणात आहेत. पोलीस तपास, प्रमुख आरोपींचे जबाब, अटकसंत्रानंतरची खळबळ, खटल्यातील साक्षीदार, जळगाव व नागपूर खटल्याचा निकाल, जळगावात शिरलेल्या दहशतवादी संघटना, सरकारी वकील, आरोपीचे वकील, पत्रकार व सरकारी साक्षीदार यांच्या मुलाखती, सिमीवर बंदी आणण्यास उपयुक्त ठरलेला, महत्त्वपूर्ण ठरलेला पोलीसांचा अहवाल आदी प्रकरणांतून विषयाचे गांभीर्य मांडण्यात विजय वाघमारे यशस्वी झाले आहेत.

पहिल्या प्रकरणात सिमीच्या स्थापनेचा वृत्तान्त मांडला आहे. त्यानुसार 'जमाते इस्लामी'ची विद्यार्थी संघटना एस.आय.ओ.चे पुनरुज्जीवन स्डुटंड इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाच्या (सिमीच्या) रूपात झाले. इस्लामचा प्रचार या हेतूने 1977 साली स्थापन झालेली ही संघटना जमात-ए-इस्लामी-ए-हिंदची विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली. इस्लामचा प्रचार करता करता या सर्व संघटना हिंदू व पाश्चात्त्य संस्कृतीबद्दल द्वेष पसरविण्याचे कामही करू लागल्या. त्यातूनच सिमीच्या माध्यमातून मुस्लीम तरुणांना दहशतवादाकडे ओढले जाऊ लागले. पुढे पुढे लष्कर-ए-तोयबा, हरकत-उल-जिहादी-इस्लामी (हुजी), माफिया डॉन यांच्याशी व पाकिस्तानी गुप्तचर संघटनेशी सिमीचे संबंधही उघड झाले होते. भारत हे मुस्लीम राष्ट्र व्हावे व जागतीक इस्लामीकरण करणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे सिमीने उघडपणे सांगितले होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रक्तरंजित संघर्ष करावा लागला तरी चालेल, असे सिमीचे सदस्य सांगतात.

अशी पार्श्वभूमी असलेल्या संघटनेला जळगावात स्थान कसे मिळाले? देशभरातील विविध ठिकाणच्या दहशतवादी कारवायांसाठी जळगावातल्या आपल्या समाजबांधवांचा वापर केला जातोय हे माहीत होऊनही काही जण मूक कसे राहिले? किंबहुना सिमीच्या कार्यक्रमांना प्रोत्साहित कसे केले? याची कबुली त्याच मंडळींनी कशी दिली, हे वाघमारेंनी या पुस्तकात सविस्तर दिले आहे.

सगळे आरोपी उच्चशिक्षित

शिक्षणाचा अभाव व बेरोजगारी यामुळे मुस्लीम तरुण दहशतवादाकडे वळतो, असे तथाकथित पुरोगामी सतत सांगत आले आहेत. परंतु या पुस्तकानुसार सिमीच्या माध्यमातून दहशतवादी कृत्यात सामील जळगावातील हे सगळे तरुण उच्चशिक्षित व चांगल्या पदावर नोकरी करीत होते.

प्रमुख आरोपींमधील आसिफखान बशीरखान हा 1991-92मध्ये जळगावच्या बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजीनियरिंगचा डिप्लोमा घेतलेला तरुण. शिक्षण संपल्याबरोबर त्याला शहरातच एका कंपनीत नोकरी लागली. सहा-सात महिन्यानंतर त्याला जळगावातीलच जैन उद्योग समूहात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्याचे वडीलही याच कंपनीत ट्रॅक्टर मेकॅनिक होते, तर आसिफचा भाऊ अजिजखान बी.ई. मेकॅनिकलपर्यंत शिकलेला. आसिफचा मार्गदर्शक शकील हन्नान डी.एड. होऊन जामनेर तालुक्यात जि.प.च्या उर्दू शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करणारा. सिमीच्या एक मास्टरमाइंड गुलजार वानी इलेक्ट्रॉनिक इंजीनियर व अलिगढ मुस्लीम विद्यापीठात पीएच.डी. करणारा. शेख रसूल शेख चाँद हा चोपडा येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेचा केंद्र प्रमुख होता. वकारुल हसन हा ऑरगॅनिक केमिस्ट्रीत पदव्युत्तर शिकून बी.एड. झाल्यानंतर एका माध्यमिक शाळेत शिक्षक असलेला सिमीचा अखिल भारतीय सेक्रेटरी होता. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यदेखील उच्चशिक्षित व नोकरी-व्यवसायात. याचाच अर्थ शिक्षणाचा अभाव नव्हता, इतरही आरोपी पदवीधर व नोकरी, व्यवसाय करणारे होते. भरपूर पगाराची नोकरी, डॉक्टर, शिक्षक, इंजीनियर अशा सन्माननीय पदांवर असूनही सिमीने या सगळयांना दहशतवादी कृत्यांसाठी तयार केले.

लोकल बाँबस्फोटात सिमीचा सहभाग

जळगावच्या अक्सानगर भागातील अक्सा मशीद सिमीच्या दहशतवादी कारवाईचे केंद्र होते, हा जळगावकरांसाठी धक्का होता. अक्सा मशिदीत नमाज पठणानंतर सिमीचा शहराध्यक्ष असलेला शकील हन्नान देशातील संवेदनशील मुद्दयांवर जिहाद करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करू लागला. दिल्लीत सिमीच्या प्रशिक्षण केंद्रातील इज्तेमात त्याने शरीफखान, सरफराजखान,खालीद असद, शेख सिद्दीक, शेख असिफ, शेख हनिफ, शेख इलियास, मुश्ताक शेख यांना पाठविले होते.अक्सा मशिदीत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमासाठी शकील हन्नान संचालक मंडळाकडे पत्र पाठवायचा. या सगळया मीटिंगमधून, कार्यक्रमांतून दहशतवादी घडविले जात असल्याचा मशिदीच्या संचालकांना थोडासाही संशय आला नाही, हे आश्चर्यच आहे. येथूनच मुंबईत 11 जुलै 2006 रोजी झालेल्या बाँबस्फोटासाठी आसिफ बशीरखान हा दहशतवादी तयार झाला, ही अक्साशी संबंधितांसाठी लाजिरवाणी बाब ठरली. या घटनेत 300हून अधिक निरपराधांचा बळी गेला होता.

मुंबईच्या स्फोटाप्रमाणेच नागपूरचे विश्व हिंदू परिषद कार्यालय उडवून लावायचा कट जळगावात शिजला होता. या सगळया कृत्यांमध्ये सहभागी सगळयांना सापळा लावून पोलिसांनी कसे पकडले, याचे अतिशय अचूक वर्णन या पुस्तकात करण्यात आले असून घटनाक्रम आपल्यासमोरच घडतो आहे असे वाटते.

पोलीस कारवाईचे जणू जिवंत प्रसारण

जळगावातला 'तो' फोन नंबर मिळाल्यानंतर आरोपींचा शोध लावण्यापासून ते त्यांना कोर्टासमोर उभे करून त्यांना शिक्षा होईपर्यंत पोलीस खात्यातील रामकृष्ण पाटील ह्या पोलीस कॉन्स्टेबलपासून ते डीवायएसपी सारंग आव्हाड, तपास अधिकारी सुभाष पटेल, राज्य गुप्तवार्ता विभागाचे तपास अधिकारी अनिल बोरसे व जिल्हा पोलीस अधीक्षक कुलवंतकुमार सिंग यांच्यापर्यंत सगळयांनी कशा हालचाली केल्या, हे अशा पध्दतीने शब्दबध्द केलेय की ते आपल्यासमोरच सगळे घडतेय असे वाटते.

ह्या खटल्याशी ज्याचा ज्याचा संबंध आला, त्याला आपली बाजू जशी न्यायालयात मांडायला मिळाली, तशीच संधी विजय वाघमारे यांनी या पुस्तकातदेखील दिली आहे. पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीला पुस्तकात पूर्ण न्याय दिला आहे. सगळया घटना-घडामोठी मांडताना कुठेही त्यांनी आपले मत पुढे केलेले नाही किंवा समाजात स्वत:ला प्रतिष्ठित समजणारे सिमीने उभ्या केलेल्या षड्यंत्रानुसार घडणाऱ्या घटनांकडे कसे डोळेझाक करीत होते, हेदेखील स्पष्टपणे मांडले आहे.

सिमीच्या राष्ट्रद्रोही कृत्यांचा पर्दाफाश करणाऱ्या खटल्याचे तंतोतंत वर्णन या पुस्तकाच्या माध्यमातून वाघमारे यांनी केले आहे.

हे पुस्तक म्हणजे दिशादर्शक दस्ताऐवज

जळगावातील सायंदैनिक साईमतचे कार्यकारी संपादक असलेल्या वाघमारे यांनी पुस्तकासाठी घेतलेली मेहनत त्यातील बारीकसारीक तपशिलांवरून आपल्या लक्षात येते. गेली दोन-अडीच वर्षे त्यांनी या खटल्याचा बारकाईने अभ्यास केला. मार्च महिन्याच्या अखेरीस अंतिम सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी पुस्तकरूपाने ते प्रकाशित करायचे ठरविले. वृत्तपत्रातले वार्तांकन आणि पुस्तक लिखाण यात फरक असतोच. काही बातम्यांमध्ये 'कळते'-'समजते'ने वेळ मारून नेली जाते. मात्र न्यायालयीन खटल्याचे वर्णन कसे निर्भेळ असावे यासाठी हे पुस्तक पत्रकारितेत काम करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.

वाघमारे यांनी हे पुस्तक लिहिण्याचे केलेले धाडस त्यांच्या धाडसी वृत्तीचे दर्शन घडविणारे आहे. कारण खटला उभा राहिला, न्यायनिवाडा झाला, व्हायची त्याला शिक्षा झाली की सगळे संपते. उरतात फक्त वृत्तपत्रातील बातम्यांतून शिळोप्याच्या गप्पा. मात्र हा खटला नि त्याच्याशी संबंधित लोकांच्या भूमिका पुस्तकरूपाने तयार करून एक कायमस्वरूपी दस्तऐवज वाघमारेंनी तयार केला आहे. त्यांचा हा दस्तऐवज सर्वच पातळयांवर बिनचूक असल्यामुळेच, दहशतवाद्यांमध्येच ज्यांची दहशत आहे असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.

जाता जाता एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जी हे पुस्तक वाचताना लक्षात आली. सिमीच्या दहशतवादी कारवायांतील सहभागापूर्वी कोणत्याही घटनेला पाकिस्तानचा हात म्हणून सरकार हात झटकून मोकळे व्हायचे. परंतु पाकिस्तान पुरस्कृत या दहशतवादी कारवायांमध्ये जळगावसारख्या धार्मिक सलोखा जोपासणाऱ्या शहरातील मुस्लीम तरुणांचा सहभाग दिसून आला. ह्याला कोणती मानसिकता म्हणावी? तुम्हाला कोणी तरी भडकवतोय आणि तुम्ही वापरले जाताय हे मुस्लीम तरुणांच्या आणि त्यांच्या पालकांच्या, समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्यांच्या कसे लक्षात येत नाही? किंवा लक्षात आले तरी कसे डोळेझाक करतात?

तपास यंत्रणांनी मेहनतीने खटला लढवून दोषींना कडक शासन कसे होईल याची तजवीज केली. तो सगळा वृत्तान्त या पुस्तकात चितारण्यात वाघमारे यशस्वी झाले आहेत. म्हणूनच 'सिमी दी फर्स्ट कन्व्हिक्शन इन इंडिया' हे पुस्तक नसून समाजासाठीचा 'आइना' आहे असे वाटते.
लेखक - विजय वाघमारे
प्रकाशक - अभिनव निर्माण प्रकाशन, पुणे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळे आरोपी उच्चशिक्षित
शिक्षणाचा अभाव व बेरोजगारी यामुळे मुस्लीम तरुण दहशतवादाकडे वळतो, असे तथाकथित पुरोगामी सतत सांगत आले आहेत. परंतु या पुस्तकानुसार सिमीच्या माध्यमातून दहशतवादी कृत्यात सामील जळगावातील हे सगळे तरुण उच्चशिक्षित व चांगल्या पदावर नोकरी करीत होते. >>>>> हे काय दर्शवते ??

या महत्वाच्या धाग्याकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नाही यातच सारे अाले !!!

खूपच सुरेख पुस्तक परिचय करून दिलात....

अनेक अाभार....

या महत्वाच्या धाग्याकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नाही यातच सारे अाले !!!
+1

तुमचे पुस्तक परिचय छान झाले आहे. पुस्तक इच्छायादीत टाकले आहे.
एवढी मेहनत घेऊन हे पुस्तक लिहिल्याबद्दल लेखकाचे व या लेखाबद्दल तुमचे कौतुक.
धन्यवाद.

ह्याला कोणती मानसिकता म्हणावी? तुम्हाला कोणी तरी भडकवतोय आणि तुम्ही वापरले जाताय हे मुस्लीम तरुणांच्या आणि त्यांच्या पालकांच्या, समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्यांच्या कसे लक्षात येत नाही? किंवा लक्षात आले तरी कसे डोळेझाक करतात?

>> ह्या प्रश्नांची काय उत्तरे आहेत?

तसेच सिमीला संपवणारे कोणते सरकार होते?

छान ओळख. सिमीबद्दल फार माहिती नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सोनियांचे निकटवर्तीय सलमान खुर्शीद सिमीचे वकील होते , बंदीच्या विरोधात केस लढवत होते असं आठवतंय. (भाजपाचे लोक त्या मुद्यावर भडकलेले असायचे.)

@vijaykulkarni,
1. Are you saying that, the SIMI was banned in the first place without "any" proof against it?
If not, why should anyone care to read about these system details ? We had proof against SIMI and hence it was banned. Thats it.

2. The article and the report both talks about implementation details. They both says that the way in wich the act and tribunals are implemented are not as per Democracy. Why do you think this has anything to do with SIMI alone? This can happen with any branch of the government and with any NGO?
Then why should anyone care to read about this artile to know more about other side of SIMI story?

3. Do you think repealing the Law and removing the ban on SIMI is the only solution to these irregularities in working and implementation of those Tribunals and Law respectively? If no, then that means the ban was correct. Then why should anyone care to read about this article at all?

If yes to any of above, please elaborate with proof and sources.

दुसरी बाजु ,
अफझल गुरुच्या फाशीबाबतीतही चिदंबरम साहेबांना फाशी दिल्या नंतर दुसरी बाजु आठवलेली होती !!

त्यामुळे ते आम्हाला नविन नाही !!!

विकु, ते आर्टिकल वाचले. त्यात रेफरन्स असलेला रिपोर्टही वाचायचा प्रयत्न केला. पण तो खूप क्लिष्ट आणि "लीगलीज" ने भरलेला आहे, सर्वसामान्य लोकांना सहज समजण्यासारखा नाही.

इव्हन त्या लिन्कमधल्या आर्टिकलचे नक्की काय मत आहे समजले नाही. मुळात काही देशद्रोह आस्तित्वातच नसताना खोटे आरोप लावले आहेत, की असंख्य खटले होउन सुद्धा एकही आरोप शाबीत झालेला नाही? म्हणजे मुळात निरपराध लोकांना गोवलेले आहे, की या बहुतांश लोकांनी कधीतरी काहीतरी देशविरोधी गुन्हे केलेले आहेत (चोरी वगैरे नव्हे), पण त्यावरचे खटले चालवताना सरकारने टेक्निकल चुका केल्या आहेत, किंवा अनेक ठिकाणी ओव्हररीच आहे? नक्की पॉइण्ट समजला नाही.

सुप्रीम कोर्टाने सुद्धा ट्रायब्यूनल ने एकदा रद्द केलेला बॅन परत लावला आहे. त्यावरून काहीतरी पाणी नक्कीच मुरत असावे.

तो लेख व लिंक मधला रिपोर्ट क्लिष्ट आहे हे खरेच.
मुळात ज्या यूएपीए चा आधार घेऊन सिमि वर बंदी घातली गेली व व ती वेळोवेळी रिन्यू केली गेली तो यूएपीए कायदा भयंकर आहे. माओवादी किंवा सिमि चे ( सिमि वर बंदी येण्यापूर्वी चे ) साहित्य घरात "सापडले" एवढ्या कारणावरूनही तुरुंगात टाकले जाऊ शकते. मध्य प्रदेश व छतीसगढ मध्ये अनेक केसेस आहेत. बिनायक सेन वगैरे. आनंद पटवर्धन यांच्या "जय भीम कॉमरेड" या माहितीपटात असलेले शीतल साठे व सचिन माळी हेही याच कायद्यानुसार आत होते ( शीतल साठे ला बाळंतपणासाठी जामीन मिळाला). हे दोघेही मूर्ख असतील पण जोपर्यंत त्यांच्यावर हिंसक कारवायाचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करू नये.

सिमि मला अजिबात आवडत नाही पण ड्यू प्रोसेस चा हक्क सर्वांनाच असावा व थॉट क्राईम वरून शिक्षा होऊ नये असे वाटते.

चांगला पुस्तक परिचय
पुस्तक कोणत्या भाषेत आहे? प्रकाशक कोण आहेत? ह्याचीही महिती द्याल का?

पुस्तक मराठीत आहे
अभिनव निर्माण प्रकाशन, पुणे
पुस्तकासाठी लेखकांशी संपर्क साधू शकता.
लेखक -विजय वाघमारे , जळगाव
संपर्क क्रमांक
८१८०९४९८५५

मुळात ज्या यूएपीए चा आधार घेऊन सिमि वर बंदी घातली गेली व व ती वेळोवेळी रिन्यू केली गेली तो यूएपीए कायदा भयंकर आहे.
>>
म्हणजे कोणताही सबळ पुरावा नसताना सिमिवर बंदी घातली व देशविधातक संस्थांवर अशी पुराव्याशिवायची बंदी घालता येईल अशी तरतुद या कायद्यात आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

माओवादी किंवा सिमि चे ( सिमि वर बंदी येण्यापूर्वी चे ) साहित्य घरात "सापडले" एवढ्या कारणावरूनही तुरुंगात टाकले जाऊ शकते. मध्य प्रदेश व छतीसगढ मध्ये अनेक केसेस आहेत.
>>
यावरुन हे कसे काय सिद्ध होते की सिमि निर्दोष होती व तिच्यावरील बंदीच मुळाच चुकीची होती? नुसते संबंध आहेत किंवा तसा संशया यावरुन कोणावर कारवाई होई नये हा मुद्दा फक्त भारतीय कायद्याच्या संबंधीत असायला हवा. कायद्यात अशा त्रुटी आहेत म्हणून सिमि व त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जे काही झाले ते सरसकट सगळेच चुकीचे हे कसे काय सिद्ध होते? याचा सिमिशी काहीच संबंध नाही. भारतीय कायद्यातल्या त्रुटी यावर तुम्ही नवा धागा का नाही काढत?

सिमि मला अजिबात आवडत नाही पण ड्यू प्रोसेस चा हक्क सर्वांनाच असावा व थॉट क्राईम वरून शिक्षा होऊ नये असे वाटते.
>>
याआधी घातलेलि बंदी ड्यु प्रोसेस शिवाय घातली असे तुम्हाला म्हणायचे आहे का? तसे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? मग तुम्ही कोर्टात अपील का नाही करत?