आगपेटीतील काडी पेट घेताना

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 August, 2017 - 15:33

कोंबली हातात होती नोट येताना
आश्रमामध्ये तिला सोडून देताना

काल बाजारात होता पाहिला वेडा
लावला होता तगादा... प्रेम घेता ना ?

पाहिले आहे तिचा मी धूर होताना
आगपेटीतील काडी पेट घेताना

ह्यातला प्रत्येकजण रस्त्यास चुकलेला
त्यातला निर्ढावलेला तोच नेता ना ?

घुटमळत पायात होती कोडगी इच्छा
ठोकरीसरशी उडवली मीच येताना

ही नकोशी वाटते जवळीक तुमच्याशी
जवळच्यान्नो दूरच्या दुनियेत नेता ना ?

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users