मैत्रीदिनाच्या निमित्ताने

Submitted by र।हुल on 6 August, 2017 - 13:46

आज दुपारी कितीतरी दिवसांनंतर.. खरंतर महिन्यांनंतर त्याचा फोन आला. मोबाईल कडे बघून क्षणभर वाटूनही गेलं,'उचलावा कि नाही?' पण नंतर मात्र मनानं स्वच्छपणे कौल दिला,'उचल असा.' आणि एक गोष्ट स्पष्ट झालीच; मनात खोलवर कुठंतरी एका कोपर्यामध्ये, आम्ही सोबतीनं घालविलेला काळ सुप्तपणे जागा बनवून होता. त्यामुळेच काही महीन्यांपुर्वी तिच्यावरून आमच्या दोघांत झालेल्या भांडणानंतर तयार झालेला अबोला आजच्या एका कॉलने संपवला. बराच वेळ आम्ही दोघं बोलत होतो आणि का नाही बोलणार? ज्युनिअर कॉलेजमध्ये असताना दोन वर्षं आम्ही दोघं जय-विरू प्रमाणे सोबतीनं वावरलेलो. त्या उनाड वयात मनाची, शरीराची आणि पर्यायाने जिवनाच्या पायाची घडण होत असताना जुळलेली आमची मैत्री पाच-सहा महिन्यांपूर्वी आमच्यात झालेल्या त्या क्षुल्लक भांडणापुढे कितीतरी उजवी होती. तरीही काही काळ आमच्या दोघांच्या मैत्रीवर भांडणाचं सावट पडून अबोला निर्माण झाला होता.
'स्मृती' आमची दोघांची ज्युनिअर कॉलेजमध्ये असताना बनलेली कॉमन मैत्रिण. सुंदर आणि आकर्षक.कोणालाही बघताच वेड लावेल अशी. तिघांचाच बनला-बनवलेला गृप. प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत तेव्हा शेअर केलेली फक्त एकच सोडून आणि ती म्हणजे एकमेकांप्रती मनात तयार झालेल्या नाजूक प्रेमभावना. माझं तिच्यावर जडलेलं मन.तिचा गौरवकडे असलेला ओढा आणि म्हणून मी माझ्या भावना कधीच गौर्यापुढे उघड केल्या नाहीत. गौरवला न सांगताही त्या समजल्या असाव्यात म्हणून त्यानंही त्याचं तिच्यात गुंतलेलं मन कधीच माझ्यासमोर मोकळं केलं नव्हतं.ती मात्र कायम कन्फ्यूज! राहुल की गौरव?

ज्युनिअर कॉलेज संपल्यानंतर आम्ही तिघं तिन वेगवेगळ्या दिशांनी गेलो. स्मृतीचा कल नेहेमीच मुलभूत संशोधन क्षेत्राकडे होता म्हणून तिनं चांगले मार्क्स मिळवल्यानंतरही मेडिकल वा इंजिनियरिंग कडे न जाता सायन्स ग्रेजुएशन करण्याचा निर्णय घेतला. आज एम एस्सी च्या शेवटच्या वर्षाला आहे. मी आणि गौरवनं वेगवेगळ्या शहरांतून इंजिनियरिंग केलं.
पाच महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. व्हेलेंटाईन डे च्या दिवशी स्मृतीने गौरव ला फोनवरून प्रपोज केलं आणि आमच्या तिघांच्या मैत्रीत दरी तयार झाली. एरवी गौरवच्या बाबतीत काहीही घडलं तरी सर्वाधिक रियेक्ट होणारा मी, नेहेमी त्याच्या पाठीमागे उभा राहणारा मी, त्याला सगळ्यात जास्त समजून घेणारा मी या गोष्टीनंतर त्याच्याशी भांडण करून खुपच वाईट वागलो. त्या दोघांवरही सरळ आरोप केला, 'तुम्ही अंधारात ठेवलं मला. माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेतला दोघांनी.' मनातलं तिच्यावरचं असलेलं सुप्त प्रेम भडास बनून खदखदत बोलण्यातून बाहेर पडलं होतं. ती तात्कालिक प्रतिक्रिया होती पण तिच्यामुळे सहा वर्षांच्या मैत्रीच्या नात्यानं कडवट वळण घेतलं होतं. जे घडतंय, घडवतोय ते चुकीचं आहे याची प्रत्यक्षाप्रत्यक्ष जाणिव असूनही स्वत:ला आवरू शकलो नव्हतो. गौरव न् माझ्यामधला वाद स्मृतीला कळल्यावर तिनं आमच्या तिघांमधील मैत्री टिकविण्यासाठीचा प्रयत्न म्हणून एक-दोन दिवसांनंतर फोन केले पण मी ते घेतले नव्हते. त्यानंतर तिचा मेसेज आलेला, 'भेटूयात का? गैरसमज दूर होतील.' अशा आशयाचा. पण मी उत्तर देणं जाणिवपूर्वक टाळलं होतं.सात-आठ दिवस तणावात काढल्यानंतर मी जरा शांत झालो होतो. बरंच काही चुकलंय अशी प्रखर जाणिव झाली पण माझ्यामते वेळ निघून गेलेली होती. तिघांची घट्ट मैत्री संपली हा निष्कर्ष माझा मीच काढून मोकळा झालो.

स्वत:च्याच मनाला खात मी त्या दोघांशी पुन्हा संपर्क नको या भावनेतून माझे मोबाइल नंबर्स बदलवून टाकले. एका सुंदर मैत्रीच्या प्रवासाला मीच माझ्या हाताने थांबवलं होतं.
हळूहळू तो सगळा विषयच मी मनातून काढून टाकण्याचा अपयशी प्रयत्न करत होतो. जे कधीही शक्य नव्हतं ते घडणार तरी कस? आयुष्याचा महत्वाचा भाग बनलेल्या लोकांना, त्यांच्या सोबतीच्या आठवणींना विसरणं कधीच शक्य नसतं हे कळत असूनही मी ते नाकारतच राहिलो.
....आणि आज अचानक गौरवचा फोन आला. त्याच्या स्वभाववैशिष्ट्यानुसार त्यानं अगदी अचुक टायमिंग साधत आज फ्रेंडशीप डे च्या निमित्ताने मला, माझा मुद्दामहून बदलवलेला फोन नंबर कुणाकडूनतरी मिळवत कॉल केला. मला माझी चुक कधीच उमगली होती पण मनाच्या कोतेपणामुळे मला आमच्या तिघांमध्ये निर्माण झालेली दरी आणि संवादाची पोकळी दुर कशी करावी हेच समजत नव्हतं त्यामुळे मी ती दरी, पोकळी अजुन कशी वाढेल असंच पाहिलं होतं. हे थांबविण्यासाठी तिघांपैकी कुणीतरी एकानं पुढाकार घेणं गरजेचं होतं. गौर्याने नेमकं हेच केलं. मीही निर्मळ मनानं त्याची माफी मागून, माफी मागण्यावरून त्याच्या भयंकर शिव्या खाल्यायेत. स्मृतीचा विषय निघताच त्यानं, 'तिला तुझ्या बरोबर बोलायचंय' सांगून मी तिला कॉल करावा म्हणून सुचवलं.गौरव बरोबरचा फोन बंद होताच मी स्मृती बरोबर फोन करून बोललो. आमच्या मध्ये निर्माण झालेले सगळे संशयाचे मळभ आजच्या संवादानं दुर झालेयेत. येत्या दिवाळीत तिघांनी भेटायचं ठरवलंय..आता कसं एकदम मोकळं मोकळं वाटत आहे, स्वच्छ आणि निरभ्र आकाशासारखं!

―₹!हुल / ६.८.१७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल्पनिक आहे की खरे आहे?
खरे असल्यास ईण्टरेस्टींग आहे. आणि मला आमचा एक त्रिकोण आठवला. पण जरासे वेगळे आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास. आम्ही दोन मित्र आणि ती एक मैत्रीण. कॉमन फ्रेंडस. पण त्यातही ती किंचित माझी चांगली मैत्रीण. पण मैत्रीणच. आणि मग एके दिवशी त्याने तिला प्रपोज केला... तिने फायनल एक्झाम संपेपर्यंत त्याच्याकडे वेळ मागितला... त्याने तिला अट घातली की तुझे उत्तर नाही असेल तर रुनम्याला हे समजले नाही पाहिजे की मी तुला प्रपोज केला...
ती हो म्हणाली. पण फायनल एक्झाम झायावर तिने मला हे सांगूनच माझ्याकडे माझे मत मागितले. मी मोठ्या आनंदाने तिला हिरवा झेंडा दाखवत ..... खरेच खूप खुश होतो मी त्या दिवशी. काही दिवसांनी मात्र वेगळेच घडले. त्याने तिला माझ्यापासून दूरच राहायला सांगितले. कारण कधीकाळी ज्यांना एका मुलामुलीची निखळ मैत्री समजत नाही त्यांनी मला तिच्यावरून चिडवून झालेले Happy

पुढेही बरीच स्टोरी आहे. पण पुन्हा कधीतरी ...