शोधेन नक्की

Submitted by निशिकांत on 31 July, 2017 - 01:05

सर्व मिथ्या सत्त्य मी शोधेन नक्की
त्यास मी सिंहासनी बसवेन नक्की

राख जमलेली तरी विसरू नका हे
सुप्त ठिणगी मी कधी पेटेन नक्की

वेष भगवा अन् खडावा घातल्या पण
मोह सुटला जर कधी सांगेन नक्की

चार दुर्वा वाहिल्यावर वाटते की
पुण्य केले स्वर्ग मी मिळवेन नक्की

रंजल्यांना अर्थमंत्री झूठ सांगे
योजना बनवून मी भेटेन नक्की

आसवे गाळीत जे जगतात त्यांना
गावयाला गीत मी शिकवेन नक्की

कैक वर्षे जाहली मी हेच म्हणतो
आज पीतो मी उद्या सोडेन नक्की

देव का नुसताच म्हणतो साधकांना?
भाव चरणी ठेव मी पावेन नक्की

फेसबुक प्रेमी म्हणे "निशिकांत" आता
ऑनलाइन गाठ मी बांधेन नक्की

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users