परिस्थिती बघ आजूबाजूला जी आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 July, 2017 - 01:30

पिशवीमध्ये एकच पालेभाजी आहे
निघून गेल्या दिवसांची सय ताजी आहे

झाड जुने वठलेले परसामधे उभे हे
जणू बैसली गोष्टी सांगत आजी आहे

नाव गाव अस्तित्व स्वतःचे त्यागुन येते
विलीन होण्या समुद्रात ती ऱाजी आहे

कल्पनेतले इमले सुंदर असतिलसुध्दा !
परिस्थिती बघ आजूबाजूला जी आहे

कालकालवर जे जे माझे अवगुण ठरले
त्याच गुणांवर आज मारली बाजी आहे

अजून नाही पुरते फटफटलेले येथे
दिवसावरती रात्रीची नाराजी आहे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users