मनात हलके झंकारावे

Submitted by निशिकांत on 20 July, 2017 - 23:22

मनात हलके झंकारावे

सप्तसुरांचे सुरेल गाणे मनात हलके झंकारावे
मैफिल माझी, तुला तरीही नजरकडांनी धुंडाळावे

तुझ्यासवे का वाटे ओल्या मातीलाही गंधाळावे?
नमी असोनी, काळजात का तू नसताना भेगाळावे?

पुरे जाहले थेर गुरूंचे आश्रम सारे गुंडाळावे
ज्ञान सांगती, स्त्रीस पाहता, आस जागते कवटाळावे

नका विचारू या वयातही असा कशाने पाय घसरला
झुळझुळ वाहे प्रेम तुझे; पण पात्राने का शेवाळावे?

तुझ्या सोबती सुवर्णक्षण हे जगता झालो धुंद एवढा!
जरा थबकुनी काळानेही या वळणावर रेंगाळावे

आयुष्याचे वस्त्र शोभते सुखदु:खाची किनार असता
आनंदाला मिठीत घ्यावे, वेदनेसही कुरवाळावे

मार्ग काढण्या संकटातुनी ज्याचा त्यानी यत्न करावा
संध्यापात्री पाणी घेउन व्यर्थ देव का खंगाळावे?

सीमोलंघन कुठे राहिले? विजय कोणता मिळवत असतो?
दसर्‍यादिवशी परंपरेने तरी पतीला ओवाळावे

लेखाजोखा आयुष्याचा सर्वज्ञानी विठूस ठावे
"निशिकांता" का माथा टेकुन दु:ख एवढे पाल्हाळावे?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह् मजा आ गया सवेरे सवेरे!
>>>आयुष्याचे वस्त्र शोभते सुखदु:खाची किनार असता
आनंदाला मिठीत घ्यावे, वेदनेसही कुरवाळावे>>>सुंदर!
>>>सीमोलंघन कुठे राहिले? विजय कोणता मिळवत असतो?
दसर्‍यादिवशी परंपरेने तरी पतीला ओवाळावे>>>एकाच वेळी वेग-वेगळे भाव झंकारणारा,गजब शेर!

सर, 'भेगाळावे' शेरात 'नमी' ऐवजी 'ओल' जमून येईल कदाचित!

सत्यजित,
मनापासून आभार आपले दिलखुलास प्रतिसादासाठी. आपला प्रतिसाद मला फार मोलाचा आणि उत्साह देणारा आहे. नमी ऐवजी ओल वापरण्याचा आपला सल्ला एकदम रास्त. वहीत बदल करतोय.