बहरलेला अनन्त.

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 20 July, 2017 - 06:45

बहरलेला अनन्त.

फेब्रुवारी महिन्याचा मध्यान्ह असावा बहुदा. अगदी नेहमीच्या लगबगीतच ती धावत होती. मोकळा रस्ता आणि दोन्ही बाजूला ५-६ मजली इमारतींच्या रांगा. फारशी वर्दळ नसायची त्या रस्त्यावर पण अगदी निर्मनुष्यही नव्हता.. इमारतींच्या आवारात लावलेल्या काही झाडांमुळे सावलीही असायची. तिची पावलं झपझप चालत असतानाच थोडीशी रेंगाळली. कुठल्यातरी बेधुंद सुवासाने ती थबकली, पण थांबणं म्हणजे "उशिरा" ला आमंत्रण आणि कदाचित थांबून देखील लगेचच तो सुगंध कुठला ? कशाचा ? ह्या प्रश्नांची उत्तर तिला सापडली नसती. ती तशीच रस्ता कापत पुढे चालू लागली, पण दरवळलेला तो सुगंध तिच्या मेंदूतून काही हटेना. जुन्या आठवणीतला, ओळखीचा सुवास... अन……...... आठवला... अनंताचा दरवळ होता तो... होच….नक्कीच तिथे अनंत फुलला होता... तिथे त्या झाडांच्या गर्दीत त्याचही एखाद झाड असणार..पण इतक्या महिन्यात कसा नाही आला? आपलंच लक्ष नव्हतं की हेच त्याच्या बहरण्याचे दिवस? आधी एकच प्रश्न होता आणि आता त्याची उकल सापडल्यावर पुढची प्रश्नांची शृंखला तिच्या डोक्यात दाटली. संध्याकाळी परतताना घेऊ शोध... तिने नवीन प्रश्नांना पूर्णविराम दिला...

संध्याकाळपर्यंतच्या पूर्ण दिवसात मात्र तिच्या मनात अन कृतीत अनंतच बहरला होता. बालपणाची सुवासिक आठवण.. चाळीतलं घर होतं त्यांचं, समोर मैदान अन मैदानाच्या सभोवती बहरलेली लहान मोठी झाड. छोटीशी बागच जणू. सदा बहरलेली तगर किंवा सदाफुली होतीच पण आज्जीला लागायची सुवासिक फुल पूजेला. आज्जीला नक्की सुवासिक फुलंच का लागायची? हा प्रश्न तिने कधी विचारला नाही कारण देवांबरोबर पूर्ण घरातच एक आल्हादायक, प्रसन्न सुगंध घुमायचा. ती अन तिचा दादा आणायचे मग; कधी मोगरा तर कधी शेवंती. मार्गशीर्ष मध्ये फुलणारी बकुळ नाहीतर केशरी दांड्याची पारिजातक... तिला मात्र शुभ्र अनंताचं फूल आवडायचं.

एके दिवशी तर तिने दादाला सांगून अनंताची जवळजवळ सगळीच फूल काढायला लावली... फुलांच्या परडीत सामावली नाही म्हणून तिने फ्रॉकाची ओंजळ केली होती आणि आज्जी कित्ती कित्ती रागे भरली होती. आत्ताही आठवलं तिला," असं आवडलं म्हणून सगळंच घ्यायचं नसतं... बघ कित्ती ओकंबोकं झालाय ते झाड, त्यातही जीव असतो.. बोलता नाही आलं म्हणून काय झालं... आपणच वाढवलंय ना ते, मग आपणच जपायलाही हवं. गरजेपुरतंच घ्यावं बाकीचं ठेवून द्यावं... " तेव्हा राग वाटला पण जीवनातला आनंद मंत्र होता तो.. आज समजलं तिला.

त्यानंतर आज्जी मात्र एकतरी अनंत पूजेतून राखून ठेवायची. कित्ती खुश व्हायचो आपण, लांबसडक केसांत माळलेलं ते फुल .. आता मात्र तसे केसही नाहीत, फ्याशनच्या नावाखाली उगाच कापले केस आपण ... पण आता केसात माळायला अनंताचा फुल तरी कुठाय...? त्या चाळीतून ब्लॉक मध्ये आलो अन सोसायटीत आईला जागाच नाही मिळाली सुगंधाचं झाड वाढवायला. चार पाच कुंड्यांमध्ये काय ते बागेचं सुख.

असं कस एकदम विसरूनच गेलो आपण अनंताला .. नाही नाही विसरलो असतो तर आज आठवला असता का तो पुन्हा? फक्त विस्मृतीत गेलेला हा सुगंध... कधी कोणत्या हारवाल्याकडेदेखील दिसलं नाही अनंताच फुल... चाफा, मोगरा, एखादं वेळी बकुळीचा गजरा देखील दिसायचा, पण माझ्या अनन्ताच्या नशिबी ते सुख नाही... हे कवी, लेखक पण प्राजक्ताचं किती कौतुक करतात पण ह्या गोऱ्या गोमट्या शुभ्र अनंतावर कधीच लिहीत नाहीत.. म्हणूनच विसरलो आपण...

विचारांच्या गर्दीत दिवस सरून गेलेला, ती परतीच्या वाटेवर फिरली होती... त्या झाडांजवळ येताच पुन्हा सुगंधाने मोहरली...जरा इथे तिथे डोकावतात तिची नजर गेली ... हो... अनंताच झाड..अहाहा ...ती फुलं... कित्ती उंचावर आहेत हि फुलं.. बहरलंय अगदी… जुन्या ओढीने कितीतरी वेळ ती फक्त त्या फुलांना डोळ्यांत साठवत होती... सुवासात बहरत ती भानावर आली. आपण एका आडरस्त्यावर, दुसऱ्याच कोणाच्या इमारतीसमोर उभ्या आहोत याची जाणीव झाली... तरी एखादं लपलेलं फुल तरी मिळेल या आशेने फांदी नी फांदी, पान नी पान शोधत राहिली... नाही सापडलं...पण एक आशेचा किरण दिसला... एक टप्पोरी कळी... घ्यावी का? पाण्यात फुलेल कि लगेच, अन सोबतीला पुन्हा आजी आठवली... "कळी म्हणजे झाडाचं लहान बाळ ग.. ते खुडायचं नाही कधी... त्यालाही फुलायचा हक्क दिलाय देवाने..." तिने हात मागे घेतला, उद्या घेऊ फुलल्यावर ... एक स्मित हास्य चेहऱ्यावर ठेऊन ती घराकडे वळली. चांगल्या आठवणींचा भूतकाळ वर्तमानात डोकावला की नवीन गवसलं काहीतरी असं भरभरून वाटतं.

दुसऱ्या दिवशी पाच-सात मिनिटं लवकरच निघाली ती.. झाडाजवळ येऊन थांबली.. कुठं होती ती कळी....अम्म्म...अरे फुललेलं फुल हवं ना ? का नाही दिसतंय.. इथंच होत.. ह्या फांदीवर.. नाही... हरवलं, पळवून नेलं कोणीतरी. माझ्या अगोदरच... हिरमुसली ती. रडवेली झाली. थोडा वेळ तिथेच थांबून ती निघाली तिथून. किती वेडं अन स्वार्थी असत ना आपलं मन. कालपर्यंत ह्याचा विसर पडला होता आणि आत्ता त्याने लगेच आपल्याला सापडून खुश करावं हि आपली इच्छा. असं कसं? अरे आपला नेहमीचाच रस्ता आहे.. आज-उद्या फार तर परवा एखादं फुल येईलच की आपल्या ओंजळीत. आशावादी राहावं... पुन्हा लहानपणीचे संस्कार स्मरले.

सकाळी जाताना अन संध्याकाळी परतताना त्या झाडाभोवती वेड्या आशेने घुटमळण्याचा तिचा नित्यक्रम झाला होता. कळी मात्र तिने कधीच उखडली नाही अन एके दिवशी पानांच्या मागे लपलेलं खुललेलं अनंताच फुल तिला दिसलं.. ती सुखावली... त्याला अलगद घेऊन तिथून निघत असतानाच अर्ध्या भिंती पलीकडे उभी असलेली एक वृद्ध स्त्री तिला दिसली... "आपली चोरी पकडली गेली... आपली आजी नाही का त्या मागच्या चाळीतील चैतू ला ओरडायची आपल्या झाडाची फुलं काढल्यावर,आत्ता ह्या आज्जी ओरडणार... " एकदमच नजरानजर झाल्याने तिथून पळ काढणं शक्यच नव्हतं. ती कसनुसं हसली अन निघणारच इतक्यात आजी म्हणाल्या, "थांब" तो जबरी आवाज किंवा गुन्ह्याची कबुली दोहोंपैकी एक कारण असावं, ती थांबली. त्या वृद्ध स्त्रीने गोड स्मित केलं आणि ती गांगरली. दोन्ही हातांची केलेली ओंजळ त्या आज्जीने तिच्यासमोर उघडली अन हि खुलून गेली... "तू घे" ... हि बघतच राहिली.. "दररोज बघते तुला ग्यालरीतून.. माझ्या माहेरी होत अनंताचं झाड..इथे नव्हतं तर ह्यांनी आणि मी मिळून हे लावलं...किती छान फुललंय ... आम्ही दोघांनी फुलवलंय .. आता हे नाहीत.. पण याच्या सोबतीने साठवणी आहेत.. माझ्याशिवाय कोण जाणणार अनंतावरच प्रेम? तुझ्यात दिसली तीच ओढ... म्हणून आज मुद्दाम उतरले खाली, गुढग्यांचा त्रास आहे ना म्हणून येत नव्हते पण आज आले... हि घे फुलं; खास ह्यांनी बनवलेल्या काठीच्या आकड्याने उतरवली आहेत खाली...पुन्हा आठवले तेच दिवस ..." त्या सुरकुतलेल्या ओंजळीत चार-पाच फुलं होती अनंताची...अन जुन्या आठवणीने न्हाऊन गेलेल्या त्या दोघी....ज्यांचे अनोळखी बंध सुगंधी गंधाने फुलले होते.

…. मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Anant.jpeg

छान लिहीलयं.
प्रकाश चित्र अनंताचं आहे का? कारण आमच्या कडे याला चटकचांदणी म्हणतात, अनंताची फुलं वेगळी असतात.
आणि या चटकचांदणीची फुलं रात्रीच कधीतरी उमलतात, माहेरी माझ्या बेडरूमच्या खिडकीजवळच याचं झाड होतं, रात्री मधेच सुगंध यायला सुरूवात होई.

छान लिहिलंय. आवडलं.
किट्टू, फोटोत अनंतच आहे. चटक चांदणीचे फूल कधी पाहिले नाही.

खूप छान, माझी ही लहानपणी ची आठवण ताजी झाली, आमच्या बिल्डिंग च्या कंपौंड मध्ये माझ्या बेडरूमच्या खिडकी समोर अनंताचे झाड होते, माझीही अशीच अवस्ता होत असे, आपण हेरून ठेवलेली कळी कोणी नेल्यास. खास करून गुरुवारी दत्तगुरूंना हे फुल अर्पण केले जात.
साधारण १४/१५ वर्षाची असताना, सुशोभीकरणासाठी आवारातील सगळी झाडे तोडली गेली, पार्किंग बनवली वगैरे Angry

धन्यवाद ... दिनकरा , mr.pandit, किट्टु२१ , सा ने, मॅगी , मेघा, स्वाती२ , krantiveer, राहुल .

किट्टु२१ चटक चांदणीची फुलं छोटुली असतात... Google वर पाहिलं.

राहुल रोप मिळतं विकत.

किट्टु२१ चटक चांदणीची फुलं छोटुली असतात... Google वर पाहिलं.> हो मी पण गुगलून बघितलं, आमच्या कडे त्या फुलांना अनंत म्हणतात. सगळंच उलट.

धन्यवाद ... Anu 25, सुमुक्ता , पाथफाईंडर, कऊ, मी मिनु

धन्यवाद अंकि..
फोटो गुगल वरून घेतलाय, फुल अन बाजूला कळी हा योगायोग दुर्मिळ...

खूप छान लिहिलंय !! माझ्या माहेरच्या अनंताची आठवण झाली. विहिरीजवळ शेवग्याच्या जोडीने उभा अनंत कळ्यांनी आणि फुलांनी भरगच्च असायचा ! परड्या भरभरून फुलं शाळा, कॉलेज, ट्रेनमधील मैत्रिणींसाठी आम्ही घेऊन जायचो. अनंताची फांदी देखील रुजते. पण फांद्या तशा नाजूक असतात. आमचा डोळा चुकवून घाईघाईने फुलं आणि कळ्या चोरणाऱ्यांकडून अनेकदा फांद्या तुटायच्या. आज ना ती विहीर आहे, ना शेवगा ना अनंत ! कवठी चाफा, लालभडक गेंदेदार डाळिंब, गुलाब, कोरांटी, तगर, डबल तगर, पांढरा- पिवळा सोनटक्का, डेलिया, झेनिया, मोगरा, मदनबाण, वेल मोगरा, वेडा मोगरा (हजारी मोगरा), लाल-गुलाबी-पिवळी-पांढरी जास्वंद, मांडवभर फुलणारी कृष्णकमळाची फुलं..... चाळीच्या खोलीत राहूनही हे वैभव भरभरून उपभोगलं होतं.... वडिलांच्या हातालाच जणू गुण होता.... नुसती फांदी खोचली तरी रुजणारच... झाडांचं, फुला-पानांचं खूप वेड होतं त्यांना... आणि ज्ञानही !! आता केवळ आठवणी... साधी तुळसही नाही माझ्याकडे...
धन्यवाद !! पुन्हा ते सारं आठवणीत जिवंत केल्याबद्दल !!

खूप छान लिहिलंय... मीही कुठे गेले आणि झाड, फुल, फुलांचा सुवास काहीही भेटले की पाय थांबतातच...

किट्टू, तुमचे बरोबर आहे, गोव्या-कोकणात याला चटकचांदणी म्हणतात व इथे ज्याला तगर म्हणतात त्याला तिथे अनंत म्हणतात. मीही पहिल्यांदा ही नवी नावे ऐकली तेव्हा चक्रावलेले. हे गार्डेनिया, ज्यात अनंत जाती आहेत. वरच्या फोटोतले फुल गोल दिसतेय. कोकणात जे फुलते ते चांदणीच्या आकारासारखे असते. ही फुले संध्याकाळी फुलतात. रात्रीच्या अंधारात काळ्या पार्श्वभुमीवर ही पांढरी शुभ्र फुले खरेच चांदणी सारखी चमचमतात. आणि वर तो मादक धुंद वास. नाव शोभते अगदी. असा फोटो मिळाला की नक्की देईन इथे.

Pages