सुरांची नजर, की समज?

Submitted by मधु-रजनी on 18 July, 2017 - 19:11

कॉलेजमध्ये असतानाची गोष्टं, म्हणजे पंचवीस वर्ष उलटून गेली. खूप वाचायची आवड तेव्हाही होती. पु. ल. देशपांडे अतिशय आवडते लेखक. त्यांच्या सगळ्या पुस्तकांची पारायणं झालेली असली तरीसुद्धा त्यांनी लिहिलेलं किंवा त्यांच्याबद्दल काहीही लिहून आलेलं वाचायची ओढ असायची. तब्येत खालावत असूनही ते अधून-मधून लेखन करत होते. त्यांचे ‘कालनिर्णय’ कॅलेंडरच्या मागचे लेखसुद्धा हवेहवेसे वाटायचे. त्यावेळी त्यांच्याबद्दलच्या एका गोष्टीची आठवण अजूनही ताजी आहे.

शास्त्रीय गायक म्हणून संजीव अभ्यंकर तेव्हा हळूहळू लोकांना परिचित होऊ लागला होता. १९८५-८६ चा काळ. संजीवचं गाणं तेव्हा आवडलं होतं. त्यातून संजीव माझ्या वयाचा आणि पुण्यात राहणारा म्हणून त्याच्याबद्दल जास्तच कौतुक वाटायचं. ‘रविवार सकाळ’ वृत्तपत्रात संजीवबद्दल तेव्हा एक छान लेख आला होता. संजीव हा एक दैवी चमत्कार (child prodigy) असून अगदी सात-आठ वर्षाच्या वयापासून उत्तम गाणं आणि मैफिली करत असे असं त्या लेखातून कळलं. त्यात लिहिलं होतं की संजीवचं गाणं तो अकरा-बारा वर्षांचा असताना पु. लं. नी प्रथम ऐकलं आणि त्यांना ते अतिशय आवडलं. पु. ल. म्हणाले “अरे हा मुलगा तर सुरांची नजर घेऊन जन्माला आला आहे!”

हा लेख वाचल्यावर पु. लं. चा भक्त असणारा मी त्यांच्या “सुरांची नजर” ह्या शब्दांवर अडलो. “सुरांची नजर” हा शब्दप्रयोग अगदी पहिल्यांदाच वाचत होतो. “सुरांची नजर” कशी असू शकते? “सुरांची समज” असं म्हणायचं होतं का त्यांना? सूर हे ऐकण्याची गोष्ट आहे. म्हणून सूर ऐकायला समज असायला हवी, किंवा सूर ऐकायला कान असायला हवा. सूर हे दिसायची गोष्ट नसून ऐकायची गोष्ट आहे. “नजर” कशी असेल? बरं पु. ल. चुकायची शक्यता नाहीच. साक्षात सरस्वती त्यांच्यापुढे ज्ञान आणि शब्दभांडार घेऊन उभी असावी असं त्यांचं लेखन. त्यातून त्यांना संगीताची उत्तम समज. इतकी की ते स्वतः गायक, संगीतकार आणि हार्मोनियमवादक म्हणूनही प्रसिद्ध. मग वाटलं एखाद्यावेळी छपाईत चूक झाली असेल. हा प्रसंग अगदी नीट लक्षात राहिला.

त्यावेळी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नव्हतं. नाही म्हणायला मित्रांच्या आग्रहाखातर दोन-तीन वेळा सवाईला गेलो होतो. पण तेव्हा जास्त ओढ होती ती किशोर कुमार, लतादीदी, आर. डी. बर्मन आणि गुलज़ारचीच.

त्यानंतर बरीच वर्ष गेली. पदवीधर होऊन नोकरी सुरु झाली. मित्रमंडळ वाढत गेलं. दरम्यान सगळ्या प्रकारची गाणी ऐकण्याची चैन चालूच होती. अगदी अनुराधा पौडवाल-अरुण दातेंच्या “शुक्रतारा” भावगीतांपासून नंदू भेंडे, व्हॅम आणि फिल कॉलीन्सची रॉक-पॉप गाणीसुद्धा त्याच आवडीने ऐकत असू.

हळूहळू पु. लं. ची तब्येत ढासळत गेली आणि ते सगळ्यांना सोडून गेले. त्यांनी संगीत दिलेलं “माझे जीवन गाणे” हे गाणं तेव्हा जास्तच मनाला भिडून गेलं. हे गाणं भूप रागावर आधारित आहे अशी ज्ञानात नवीच भर पडली, आणि मग मात्र शास्त्रीय संगीत समजलं पाहिजे असं खूपच तीव्रतेनी वाटू लागलं!

वेळ आली की मार्ग सापडतो आणि गरज असते तेव्हा गुरु भेटतो असंच काहीसं झालं. पं. विश्वनाथ श्रीखंडे यांची अचानक ओळख झाली आणि त्यांच्याकडून शिकायला सुरुवात झाली. श्रीखंडे गुरुजी त्यावेळी त्यांच्या मुलीकडे उन्हाळ्यात रहायला येत तेव्हा शनिवारी किंवा रविवारी शिकणं सुरु झालं. एका उन्हाळ्यात साधारण आठ-दहा क्लास होत असत. हे चक्र दोन-तीन वर्ष चाललं. त्यातून सुरांची ओळख झाली. सूर जवळचे वाटायला लागले. भैरव, भूप, यमन, मालकंस वगैरे रागांचा परिचय झाला. शास्त्रीय संगीत अगदी चक्क आवडायला लागलं!

असं कधी आधी झालं नव्हतं. पूर्वी कोणी राजकीय पुढारी वारल्यावर दूरदर्शनवर शास्त्रीय संगीत लावून काही दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळायची पद्धत होती. जेवढा पुढारी मोठा तेवढा जास्त दिवस दुखवटा. रेडिओवरही हीच परिस्थिती. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळातले ते दिवस. छायागीत, क्रिकेट किंवा कार्टून बघायला मिळायचे नाहीत. म्हणून त्या राष्ट्रीय दुखवट्यांबद्दल आणि त्या अनुषंगानी शास्त्रीय संगीताबद्दल एक आढीच बसली होती. पण आता स्वतः शिकायला सुरुवात केली तेव्हा चित्रच पालटलं होतं. शास्त्रीय संगीत आवडायला लागलं होतं.

हिंदुस्थानी संगीताच्या वाढत्या आवडीमुळे मित्रही तसेच मिळत गेले. गाणं ऐकणंही खूप वाढलं. गाण्याबद्दल वाचन जाणून-बुजून होऊ लागलं. अगदी पं. भातखंडे बुवांची “हिंदुस्थानी संगीत पद्धती”चे प्रश्नोत्तर स्वरूपाचे खंड वाचण्यापर्यंत मजल गेली. गाण्याची तहान भागेनाशी झाली.

मधून-मधून “सुरांची नजर” या गोष्टीची आठवण मात्र येत असे, पण उलगडा होत नसे. आणि एक दिवस अचानक साक्षात्कार झाला!

आनंद भाटेच्या गाण्याची सुंदर मैफिल चालू होती. (आनंद इंजिनीअरिंग कॉलेजात मला एक वर्ष जुनियर आणि नंतर नोकरीलाही एकाच ठिकाणी म्हणून एकेरी उल्लेख.) चोखामेळ्याच्या अभंगाची फर्माईश झाली आणि आनंद “जोहार मायबाप जोहार” अतिशय सुंदर रंगवून म्हणायला लागला. राग विभासवर आधारित ही रचना फारच रंगली आणि एका बेसावध क्षणी अचानक बैरागीचे सूर ऐकू आले. श्रोते त्या अभिप्रेत नसलेल्या विलक्षण स्वरांनी सुखावून गेले. तबल्याच्या पाच-सहा आवर्तनांवर बैरागीच्या सुरांमध्ये संचार करून आनंद परत विभासवर स्थिर झाला. त्याचवेळी त्यानी हार्मोनियमच्या साथीदाराकडे एक आश्वासक कटाक्ष टाकला तोच सांगून गेला. आनंदला बैरागीचे सूर साक्षात दिसत असावेत.

विभासमध्ये अजिबात नसणारे पण बैरागीमध्ये असणारे शुद्ध मध्यम आणि कोमल निषाद त्याला अगदी सहजपणे कसे सापडले? तेही विभासचा पूर्ण महाल बांधून झालेला असताना? आणि तेच सूर त्यानी अतिशय सुंदर पद्धतीनी गाऊन “जोहार मायबाप जोहार”चा वेगळाच अनुभव कसा दिला?

बरं हे चुकून झालेलं नव्हतं. गायकाला त्यावेळी शब्दाचं, रागाचं, तालाचं, श्रोत्यांच्या विचारांचं आणि भजनातून उत्पन्न होणाऱ्या भक्तिरसाचं पूर्णपणे भान होतं. म्हणूनच वेगळे सूर या भजनात आणून तो आनंदानुभव देऊन ते भजन एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचं काम आनंदनी चार-पाच वेळा केलं. समक्ष बैठकीत हा साक्षात्कार झाला. गायकाला ते अदृश्य सूर अगदी लख्ख दिसत होते आणि तो ते दिव्यस्वरूप जाणून-बुजून प्रेक्षकांना दाखवत होता. गायकाचे हातवारेही असे होते की जणू काही तो सुरांना स्पर्श करत असावा.

ह्या अनुभवाला उपमाच द्यायची झाली तर ती तोकडी पडेल. आपल्या नेहेमीच्या जीवनातलं उदाहरण. कधीतरी अनुभव घेतला असेल. कच्छी दाबेलीचे पहिले घास खाताना मस्त मसाला पॅटीची तिखट आणि मसालेदार चव आपण एन्जॉय करत असतो. गरमागरम लुसलुशीत पाव आणि लोण्याचा खरपूस स्वाद ती मजा वाढवत असतो. त्यावेळी एकदम अनपेक्षितपणे डाळिंबाचे गोडआंबट, थोडेसे कडक आणि गार दाणे घासात येतात. ते कसे वाटतात? पूर्णतः वेगळी चव, पोत, तापमान आणि स्वाद असणाऱ्या डाळिंबाचे दाणे दाबेलीची मजा कमी न करता उलट जास्त वाढवतात. ही नवीन अनपेक्षित चव फारच मजा देऊन जाते. पुढचाच घास परत तिखट मसाल्याचा. दाबेलीत डाळिंबाचे दाणे टाकायचे जसं एखाद्याला सुचले तसंच काहीसं हे संगीतकार लोक करत असतात. पूर्णतः भिन्न गोष्टी एकत्र करून त्यातून काहीतरी विलक्षण नवीन अनुभव तयार करायचा, आणि तोही मूळ राग किंवा भाव अजिबात न बिघडवता.

असाच अनुभव नंतर मग बऱ्याच वेळा येत गेला. पंडिता वीणाताई सहस्रबुद्धेंचं “मतवारो बादल आयो” हे मीरा भजन ऐकताना त्यांना सुरांचं दर्शन होतंय असं वारंवार जाणवलं. (YouTube वर आहे. जरूर ऎका.) या भजनात अगदी सहजपणे पटदीप येतो. शिवरंजनी उभा राहतो. भीमपलासही दर्शन देऊन जातो. अनेक कसलेल्या कलाकारांनी असे सूर दाखवून दिले, आणि या अनुभवांमुळे पु. लं.चं बोलणं समजलं.

एवढंच नाही तर “गुण गाईन आवडी” मध्यल्या कुमार गंधर्व ह्यांच्या एका प्रसंगाचाही उलगडा झाला. दादरच्या मैफिलीत कुमारांनी भूप राग गाताना पाऊण तासानी वर्ज्य असणाऱ्या शुद्ध मध्यमाचा एक कण लावला. गातागाताच कुमार पु. लं. ना म्हणाले “भाई, काय करू? मघापासून हा शुद्ध मध्यम मला जरा आत घ्या, आत घ्या असा रिक्वेष्ट करायला लागलाय. भूपाच्या दरबारात त्याला प्रवेश नाही. पण फार गयावया करायला लागला. म्हंटलं येऊ द्या बिचाऱ्याला थोडा वेळ. किती वेळ बाहेर ठेवायचा? दोस्त आहे आपला!”

हा प्रसंग म्हणजे नक्की काय याचा अंदाज यायला लागला. समजायला अनेक वर्ष लागली, पण सुदैव असं की समजलं. हे ही कमी नाही. मनोमनी पटलं - श्रोत्यांना सुरांची "समज” असते पण कसलेल्या गायकाला मात्र सुरांची देवदत्त “नजर” असते. त्यांना सूर दिसत असतात!

जीवन ज्यांना कळलं अश्या दिग्गज व्यक्तींचं लिखाण सत्य आणि चिरंतन असतं. आपल्याला फक्त समजायला किंवा अनुभवायला हवं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच ! काही गोष्टींची अनुभुती शब्दबद्ध करणे फार्फार कठीण असते पण तुम्ही ते सहज साध्य केलेत.
मनापासून धन्यवाद ह्या लेखाकरता.

अरे वा! सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून छान वाटलं.
वाचनाला आणि प्रतिक्रिया लिहायला वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

काय सुरेल लिहिलंय... पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख ! “सुरांची नजर” हा शब्दप्रयोग पहिल्यांदाच ऐकला, पण >>>जीवन ज्यांना कळलं अश्या दिग्गज व्यक्तींचं लिखाण सत्य आणि चिरंतन असतं. आपल्याला फक्त समजायला किंवा अनुभवायला हवं.>>> हे अगदी पटलेच. Happy

खूप सुरेख जमलाय लेख. 'सुरांची नजर' ह चकवा देणारा विषय मस्तं मांडलाय.
वाह.. खरच मझा आया