लिहिणाऱ्याने लिहीत जावे.....

Submitted by संजय मेहेंदळे on 18 July, 2017 - 13:16

(विंदांची अर्थातच क्षमा मागून......)
लिहिणाऱ्याने लिहीत जावे
वाचणाऱ्याने वाचत जावे
.
गाथा एकदा वाचून पाहावी
ओवी एकतरी वागून पाहावी
दासांकडून बोध घ्यावा
श्लोक मनाचा म्हणून पाहावा
.
ऍगाथा कडून मिस्टरी घ्यावी
पेरी मॅसनला दाद द्यावी
नावात काय आहे?.... नित्य वदावे
शेक्सपिअरचे तर सारेच घ्यावे
.
पवारांचं 'बलुतं' घ्यावं,
नेमाड्यांची 'कोसला' व्हावं
जाधवांचा 'बाप' घ्यावा....
जमलं तर वेशीबाहेरचा
गाव सारा कुशीत घ्यावा
.
नटसम्राट, मृत्युंजय, श्रीमानयोगी....
नावे तरी किती घ्यावी
लिहिणाऱ्यांचे हात हजारो
झोळी आपली आपणच भरावी
.
लिहिणाऱ्याने लिहीत जावे
वाचणाऱ्याने वाचत जावे
वाचता वाचता एक दिवस
लिहिणाऱ्याचे पेन घ्यावे
................
अगदीच काही नाही तर
फेसबुकावर पान लिहावे
.
- संजय

Group content visibility: 
Use group defaults

☺️