जग्गा जासूस आणि 'पण..'! (Jagga Jasoos - Hindi Movie)

Submitted by रसप on 18 July, 2017 - 03:06

jagga-jasoos-poster.jpg

खरं तर, 'जग्गा जासूस' पाहून ३-४ दिवस झाले. नक्की काय लिहावं, हा विचारच संपत नव्हता. किंवा माझं नक्की मत काय आहे, सिनेमा किती आवडला, किती नाही, हे ठरवताना माझाच गोंधळ उडत होता बहुतेक. Let's see.
मुळात, मी सिनेमा फक्त एका आणि एकाच कारणासाठी पाहिला होता.
'रणबीर कपूर'.
कुणी काहीही म्हणा, आपल्याला हा माणूस भारी आवडतो. Acting Skills, Looks, Screen Presence, Dancing Skills अश्या सगळ्याचं इतकं उत्तम मिश्रण सध्या तरी इतर कुणातच मला दिसत नाही. तसं म्हणायला, 'शाहीद कपूर'सुद्धा एक जबरदस्त पॅकेज आहे. म्हणून हे दोघे माझे सगळ्यात आवडते अ‍ॅक्टर्स किंवा स्टार्स - काय हवं ते म्हणा - आहेत.
तर, रणबीरचं काम अप्रतिम झालं आहे. बराचसा 'बर्फी'सारखा रोल आहे. त्याने तो त्याच ताकदीने केलाय. त्यामुळे मी ज्यासाठी सिनेमा पाहिला, ते मला नक्कीच मिळालं.
पण, रणबीरला कंसाच्या बाहेर काढलं तर कंसाच्या आत काय उरतं?

'जग्गा जासूस' हा अख्खा सिनेमा यमकायमकी आणि गाण्यांतून उलगडत जातो. This is really something different. सिनेमातून गाणी, संगीत पूर्णपणे हद्दपार करण्यात कलात्मकता मानणाऱ्या दिग्दर्शकांचा हा जमाना आहे. ह्या प्रवाहाच्या विरुद्ध कुणी एखादी संगीतिका बनवणं, हे एक खरोखर धाडसाचं काम आहे. ह्या धाडसाला मनापासून दाद द्यायला हवीच. दिलीच.
पण 'धाडस करायचं' म्हणून कुणी हत्तीला चड्डी घालत असतं का ?
आणि घालायचीच असेल तर काही तरी प्लानिंग तर करा, राव !
I mean, संगीतिका बनवायची होती ? उत्तम आयडिया ! पण त्यासाठी 'प्रीतम'च सापडतो ? फुकट काम करतो का तो ?
बरं, ठीक आहे, हरकत नाही. घेतला प्रीतम. पण मग त्याच्याकडून काम तरी करून घ्याल की नाही ? प्रेक्षकाच्या डोक्यावर तब्बल पावणे तीन तास बादल्या-बादल्या भरून म्युझिक ओतायचा प्लान आहे तुमचा. भिजला पाहिजे की थिजला पाहिजे ? की बधीर झाला पाहिजे ?
बेसिकली, स्वत:च्या एकसुऱ्या शैलीतून बाहेर पडून एकाच सिनेमासाठी २०-२२ गाणी देण्याची कुवत, तेव्हढा वेळ, पेशन्स आज कुणाकडे आहे, हा प्रश्न तरी तुम्हाला पडला का ?
आणि संगीतकाराकडून काम काढून घेईल असा चोखंदळ डायरेक्टर तरी कोण आहे आज ? एका गाण्यासाठी १०-१०, १२-१२ चाली नाकारणाऱ्या राज कपूरसारखा कुणी तरी आहे का सध्या ?

ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू, म्हणजे समजा जमवलंच एखाद्याने. खरोखर 'सुश्राव्य' म्हणता येईल असं म्युझिक कुणी दिलंच, तर ?
देणारा देईलही, पण....
ऐकणाऱ्या लोकांसाठी आत्ताच्या काळात 'म्युझिक' म्हणजे 'नॉईस' असं एक समीकरण झालं आहे. त्यात दणदणीत 'बीट्स' असले पाहिजेत. गाणारा/री तार सप्तकात उधळले पाहिजेत. गाणं ऐकताना लोकांचं हृदय तोंडात आलं पाहिजे आणि दोन कान सर्वांगाला व्यापून उरले पाहिजेत.
लोकांना 'खाना खा के दारू पी के चले गये' मध्ये 'बीट्स' आवडणार आहेत, 'गलती से मिस्टेक' मध्ये एनर्जी दिसणार आहे. हे सगळं गाणी बनवणाऱ्यालाही माहित आहेच ! त्यामुळे लोकांना जे आवडतं, तेच 'जग्गा जासूस' मध्ये दिलंय. पण लोकांना जे आवडतं, त्यालाच आता काही दर्जा राहिलेला नाही, तर जे दिलंय ते न आवडल्यास त्यात आश्चर्य काय ?

फार जुनी नावं नकोच. जरा नवीन-नवीनच घेऊ. म्हणजे नदीम-श्रवण, जतीन-ललित, आनंद-मिलिंद वगैरे. ह्यांचा काळ म्हणजे 'नॉस्टॅल्जिक नाईन्टीज'. अर्थात, तोसुद्धा फार काही सांगीतिक श्रीमंतीचा वगैरे नव्हता. पण तरी, तेव्हासुद्धा खूप मेलडी बेस्ड गाणी बनायची. 'साजन'सारख्या अस्सल व्यावसायिक टुकारपटाचं टायटलसुद्धा प्रचंड 'ठहराव'वालं कंपोजिशन होतं. आज सिनेमाचं टायटल किंवा मुख्य गाणं कोण असं बनवेल ? आणि बनवलं, तरी 'रटाळ' ठेक्यातला तो 'रडीयल'पणा कुणाला पचणार आहे ?
शाहरुखचे सिनेमे नेहमीच म्युझिकली श्रीमंत असायचे. पण अलीकडच्या काळात त्याला 'लुंगी डान्स' करताना पाहून आणि नंतर 'हॅप्पी न्यु इयर' वगैरेतल्या भंकस गाण्यांसोबत पाहून मी मनातल्या मनात सिनेसंगीताच्या फोटोला हार घातला होता. संपलं होतं ते माझ्यासाठी.

कडवट सत्य हे आहे की, चांगलं संगीत बनवायची नियत, कुवत आणि हिंमत आजच्या जमान्यातल्या कुठल्याही संगीतकारात किंवा दिग्दर्शक-निर्मात्यात नाहीय आणि चांगलं संगीत स्वीकारायची आवड, जाण आणि किंमत आजच्या प्रेक्षकालाही नाहीय !
'जग्गा जासूस' ने कंटाळा आणला नाही, त्याच्यातल्या 'उणे ड' दर्ज्याच्या सुमार संगीताने वात आणला.
एरव्ही मला रणबीरही आवडला, कतरिनाही जितकी जास्तीत जास्त आवडू शकते तितकी आवडली आणि प्रेझेन्टेशनही आवडलंच. व्हीएफएक्स मेजर गंडले असले, तरी बाकी सगळं टेक्निकली चांगलं वाटलं होतं.

पण म्युझिक ! तुमसे ना हो पायेगा !

हिंदी सिनेमात इथून पुढे बायोपिक, स्पोर्ट्सड्रामा, डॉक्यु-ड्रामा, थ्रिलर, कॉमेडी, सस्पेन्स, हॉरर, नॉयर-फॉयर काय म्हणाल ते सगळं काही बनेल एक वेळ, पण उत्तम 'म्युझिकल' ? तो मात्र कधीही बनू शकणार नाही. सिनेमाच्या शेवटी 'सीक्वल'चा संकेत दिला आहे. तोसुद्धा 'म्युझिकल'च असणार असेल तर अजून एक 'डिबॅकल' नक्कीच. कारण आपल्याकडे आता 'म्युझिकल' बनूच शकत नाही.
किसी माय के लाल में वोह दम नहीं रहा.

टॉपिक इज ओव्हर.

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/07/jagga-jasoos-hindi-movie_18.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी पिक्चर बघणार आहेच. Happy
मला गलती से मिस्टेक आणि उल्लू का पठ्ठा हि गाणी फार आवडली
विशेषतः कोरिओग्राफी तर लाजवाब आहे. बाकी पिक्चर बघितल्यावर कळतीलच
रणबीर बाबत सहमत..आणि कतरीना काय भारी दिसतेय Happy

{{{ कडवट सत्य हे आहे की, चांगलं संगीत बनवायची नियत, कुवत आणि हिंमत आजच्या जमान्यातल्या कुठल्याही संगीतकारात किंवा दिग्दर्शक-निर्मात्यात नाहीय आणि चांगलं संगीत स्वीकारायची आवड, जाण आणि किंमत आजच्या प्रेक्षकालाही नाहीय ! }}}

सांवरियां आणि मिर्झियां बद्दल आपले मत वाचायला उत्सुक आहे.

किसी माय के लाल में वोह दम नहीं रहा.
टॉपिक इज ओव्हर.>>> हे जरा अतिच वाटतय.,
Submitted by अंकु on 18 July, 2017 - 16:25

>>
तेच अपेक्षित आहे. Happy

सांवरियां आणि मिर्झियां बद्दल आपले मत वाचायला उत्सुक आहे.
Submitted by बिपीन चन्द्र हर... on 18 July, 2017 - 16:30

>> का हो ? चांगले होते की काय ! :-o

अरेच्चा! तुम्हाला नाही आवडले का? संगीतिका म्हणून मला बरेच बरे वाटले. मग यापेक्षा चांगले संगीतपट कुठले? थोडासा रुमानी हो जाए? हीर रांझा? नाही तर मग अजुनच मागच्या काळात जावं लागेल.

हा चित्रपट साडेचार वर्षांच्या मुलीबरोबर बघण्यासारखा आहे का? मागे तिने ट्रेलर पाहिलं तेव्हा तिला फनी वाटलं होतं. म्हणून तिच्याबरोबर बघायचा विचार आहे.

त्यामुळे लोकांना जे आवडतं, तेच 'जग्गा जासूस' मध्ये दिलंय. पण लोकांना जे आवडतं, त्यालाच आता काही दर्जा राहिलेला नाही, तर जे दिलंय ते न आवडल्यास त्यात आश्चर्य काय ?

हे वाचताना मेंदूला पीळ बसला. पण स्नॉबिश हुच्चभ्रूपणा हातचा धरल्यावर समीकरण सुटलं.

त्यामुळे लोकांना जे आवडतं, तेच 'जग्गा जासूस' मध्ये दिलंय. पण लोकांना जे आवडतं, त्यालाच आता काही दर्जा राहिलेला नाही, तर जे दिलंय ते न आवडल्यास त्यात आश्चर्य

शाहरुखचे सिनेमे नेहमीच म्युझिकली श्रीमंत असायचे. पण अलीकडच्या काळात त्याला 'लुंगी डान्स' करताना पाहून आणि नंतर 'हॅप्पी न्यु इयर' वगैरेतल्या भंकस गाण्यांसोबत पाहून मी मनातल्या मनात सिनेसंगीताच्या फोटोला हार घातला होता. संपलं होतं ते माझ्यासाठी.
>>>>>>>>>>>

अगदी अगदी ...
म्हणजे अगदी कालपरवाच हॅरी मेट सेजलची गाणी ऐकताना हा विचार माझ्या मनात आलेला की शाहरूखचा दर्जेदार संगीत असलेला गेला चित्रपट कोणता...
मागे मी सुद्धा एक धागा काढलेला की चित्रपट संगीताचा दर्जा घसरलाय.. आणि विशेष मेलडी संपलीय. आता तर मोठमोठ्या बॅनरच्या चित्रपटांत अरिजित सिंग गाईल अशी गाणी लिहिली जाताना बघून मी देखील मेलोडीच्या पेटीला खिळा ठोकलाय.. तरी मग सोनू आतून कुठूनतरी आवाज देतो.. अभी मुझमे कही बाकी थोडीसी है जिंदगी

अवांतर - ते कट्यार कलेजात घुसली नावाचा पिक्चर आलेला मागे ते संगीतिकाच होती ना. बरेच लोकांना उगाचच आम्हाला शास्त्रीय संगीत कळते हे दाखवायला आवडलेली त्यातली गाणी.

रसप, तुम्ही तर घाबरवूनच टाकलंत. पिक्चरची तिकीटं हातात असताना हा रिव्ह्यू वाचायचं धाडस केलंय मी. आता ओ काय करायचं Happy

आता तर मोठमोठ्या बॅनरच्या चित्रपटांत अरिजित सिंग गाईल अशी गाणी लिहिली जाताना बघून मी देखील मेलोडीच्या पेटीला खिळा ठोकलाय.. तरी मग सोनू आतून कुठूनतरी आवाज देतो.. अभी मुझमे कही बाकी थोडीसी है जिंदगी >>> क्या बात! अरिजितला प्लीज ब्रेक द्या. कंटाळवाणा झालाय त्याचा आवाज.

आता तर मोठमोठ्या बॅनरच्या चित्रपटांत अरिजित सिंग गाईल अशी गाणी लिहिली जाताना बघून मी देखील मेलोडीच्या पेटीला खिळा ठोकलाय.. तरी मग सोनू आतून कुठूनतरी आवाज देतो.. अभी मुझमे कही बाकी थोडीसी है जिंदगी >>>>>> शप्प्प्पथ ! तू कधीतरी एकदम लय भारी लिहीतोस रे !!!

कट्यार संगितीका नव्हती .. तो रेग्युलर पिक्चरच झाला . गाणी शास्त्रीय बाजाची होती. विषय संगीत होता . पण रेग्युलर पिक्चरच होता.

संगितीका म्हणजे संवादही यमके जुळवलेली पद्ये असलेली इ इ. जग्गा संगितिका केलाय. पहिला अर्धा

कडवट सत्य हे आहे की, चांगलं संगीत बनवायची नियत, कुवत आणि हिंमत आजच्या जमान्यातल्या कुठल्याही संगीतकारात किंवा दिग्दर्शक-निर्मात्यात नाहीय आणि चांगलं संगीत स्वीकारायची आवड, जाण आणि किंमत आजच्या प्रेक्षकालाही नाहीय ! + ++++ १

लोकांना जे आवडतं, तेच 'जग्गा जासूस' मध्ये दिलंय. पण लोकांना जे आवडतं, त्यालाच आता काही दर्जा राहिलेला नाही, तर जे दिलंय ते न आवडल्यास त्यात आश्चर्य काय +१०००००

कडवट सत्य हे आहे की, चांगलं संगीत बनवायची नियत, कुवत आणि हिंमत आजच्या जमान्यातल्या कुठल्याही संगीतकारात किंवा दिग्दर्शक-निर्मात्यात नाहीय आणि चांगलं संगीत स्वीकारायची आवड, जाण आणि किंमत आजच्या प्रेक्षकालाही नाहीय !+१०००००

आत्ता पाहून आली जबरदस्ती..
खुप ढापाढाप वाटली मला..रणबीर आवडता म्हणुन जमल नाही तर कठीण होतं..
हॉलीवुडचे काही म्युझिकल्स बघीतले आहे..
आपण प्रयत्न केलाय तो भारीच पण निदान जरा स्वतःच काही ठेवायला हवं होतं अस मला वाटते.. टिनटिन पासुन सगळे हॉलीपट अधिक आपले इतर सारे प्रयत्न एकत्र साधून बनवलेला वाटतोय..

तटी : हॉलीपटात बरेचदा अभिनेतेच त्यांच ते गातात..इथे दुसर्‍यांनी गायलय का? संवाद म्हणजे त्यांचे..?

पाहिला काल, आवडला.
रणबीर तर अफाट!
गाणी हल्ली चित्रपटात कमीच असलेली बरी वाटतात. पण यात एकही गाणे ऐकायला बघायला जीवावर आले नाही हे विशेष. दोन विशेष आवडली. एक ते गलतीसे मिस्टेक दोनेक वेळा ऐकल्याने माहीत होते. चित्रपटात रणबीर प्रेमात पडल्याच्या सिच्युएशनला असल्याने जास्त आवडले. ईतरवेळी उठून नाचलोही असतो, पण एकटाच गेलेलो बघायला. नंतर ते एक सब दारू पिके खाना खाके चले गये. हि लाईन आणखी काही दिवसांना डोक्यात असेल की नसेल माहीत नाही, पण कालपासून तोंडात मात्र आहे. गर्लफ्रेंडचा काल रात्री दिड वाजता फोन आला, काय रुनम्या, झाली का गटारी? ,,, मी म्हणालो, हो तर.. सब दारू पिके खाना खाके चले गये.. बस्स रामूकाका रह गये, बोलवू का Happy

चित्रपट खरेच एक वेगळा अनुभव देणारा होता, नेमके वर्णन करता येणार नाही, पण जे काही होते बघायला मजा आली. उत्तरार्धात मात्र ईंटरनॅशनल कांड दाखवायच्या नादात जरा गाडी सरकली असे वाटले. पण ठिक आहे, आफ्रिकेतील चित्रण छान वाटले. आणि मणिपूरमधील तर क्लास. त्या कारणासाठी चित्रपट थिएटरातच पाहिला याचे पैसे वसूल झाले.

कतरीनाच्या जागी कोणीतरी अभिनय करणारी असती तर दोघांमधील दृश्ये आणखी रंगतदार झाली असती. तिच्या भुमिकेला अभिनय करायला खूप वाव होता. दिसली मात्र ती नेहमीसारखीच अफाट, किंबहुना यात जरा जास्तच. त्यामुळे चालून गेले. तरी विचार करतोय, एखादी आलिया भट्ट भारी दिसली असती.

अवांतर - तो रणबीरचा बाप झालेला ईसम चला हवा येऊ द्या मधील त्या विदर्भ विदर्भ करणार्‍या कलाकारासारखा दिसतो ना? कि मलाच तसे वाटले..