दर्भाची स्वप्ने

Submitted by santosh watpade on 17 July, 2017 - 00:28

लोळतात मातीवरती कोणाची ओली वसने
ते कोण कुडाच्या मागे लावण्य झाकुनी बसले
पावले रुंद बांधावर सांडली कुणाची नकळत
अलवार झाकली ज्यांनी दर्भांची हळवी स्वप्ने...

दारात ओणवी आई पाजते स्तनांना पाणी
थिजलेल्या एरंडाला लेकरे बांधली तान्ही
पापणीत आयुष्याचे टांगले रिकामे शिंके
चवदार नाळ तुटलेली न्यायला यायचे कोणी...

अंधार व्हायच्या आधी पेटली चुलीची तिरडी
कोपर्‍यात सटवाईने दाबली भुकेची नरडी
अडलेल्या गर्भवतीच्या किंचाळ्या जाळामध्ये
खाटेवर म्लानपणाने चाळवते उदास हिरडी...

एखादा व्रण कळवळतो फिरताना नांगरपाळ्या
गालांच्या ओट्यावरती गतजन्माच्या पागोळ्या
आडोसा बघतो वाकुन जोहार कुणाचा झाला
पाऊस मारुनी गेला का दारावर आरोळ्या...

-- संतोष वाटपाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा....
सविस्तर सांगतो मी कवितेचा अर्थ....कुठे कळवू

फारच सुंदर कविता.
संतोषजी मी तुमच्या कवितांचा चाहता आहे. त्या नुसत्याच अर्थपूर्ण नसतात तर गुणगुणाव्याश्या वाटतात आणि मला गेय कवितांचे पहिल्यापासून आकर्षण आहे. कविता वृत्तबद्ध करण्यामागची तुमची मेहनत दिसून येते.

तुमची चूक दाखवायची माझी योग्यता नाही. पण मस्त मेजवानी झाल्यावर दातात काडी अडकल्यासारख्या या ओळी मला अस्वस्थ करताहेत एखादी मात्रा कमी पडतेय म्हणून
गालांच्या ओट्यावरती गतजन्माच्या पागोळ्या
गालांच्या ओट्यावरती गतजन्मांच्या पागोळ्या जास्त मीटरमधे फीट बसेल असे वाटतेय. (न्मां)

पाऊस मारुनी गेला का दारावर आरोळ्या... ही ओळ तर खूप जास्त बोचतेय
पाऊस मारुनी गेला का दारावरती आरोळ्या... असे जमू शकेल का?

चूकभूल देणेघेणे

अपडेट
मी आता पुन्हा एकदा मोठ्याने म्हणून पाहिली आणि आता तितकी बोचली नाही. विशेष "मारूनी गेला " थोडे लांबवले तर मीटरमधे बसले. पण बाकी इतर सगळे शब्द जसे पटपट उलगडत मात्रेत बसत गेले तशा या ओळी पहिल्याच भेटीत जाणवल्या नाही म्हणून मुद्दाम तुम्हाला लिहावे वाटले.