टाईमलाईन.--- हिंदू ते निधर्मी होण्याची.

Submitted by सिंथेटिक जिनियस on 16 July, 2017 - 11:34

बाल्यावस्था( वय १० ते १३)------

धर्म .....प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.जगात म्हणे १०० पेक्षा जास्त धर्म आहेत. मला लहाणपणी सांगण्यात आले कि तू जन्माने हिंदू आहेस.हिंदू म्हणजे गणेशोत्सव काळात मोदक खाणारे असा माझा समज होता.पुढे दाढी वाढवणारे आणि टोपी घालणारे आपल्यापेक्षा वेगळे आहेत हे लक्षात यायला लागले.एकदा शाळेतून घरी येताना दोन तीन नग्न लोक काही गर्दीबरोबर चालत होते .ह्या लोकांचाही वेगळा धर्म आहे ही माहीती मित्राने पुरवली.

इयत्ता नववी---
इतिहासाच्या पुस्तकात आधुनिक मानवाचा जन्म माकडापासुन उत्क्रांत होऊन झाल्याचे कळले.होमो सेपियन्स हे आधुनिक मानव.आफ्रीकेत उत्क्रांत होऊन जगभर पसरले.

इयत्ता बारावी(विज्ञान शाखा)---
जग कुठल्या धर्म ग्रंथाचे आधारे चालत नाही.वेद,कुराण,बायबल हे कुठल्याही प्रकारे सत्य नाहीत हे वाचनावरुन कळाले.
वेदांमध्ये विज्ञान आहे,कुराणचा आदेश शेवटचा मानावा ,बायबलनुसार जग देवाने आठ दिवसात बनवले वगैरे गोष्टी लिहीणारे व सांगणारे बालबुद्धीचे आहेत हे लक्षात यायला लागले.
वाचन वाढत होते ,धर्म ही अफुची गोळी आहे हे कार्ल मार्क्सचे विधान मनोमन पटायला लागले .

२००१ --- ९/११ हल्ला--
ओसामा बिन लादेन या मुस्लिम दहशतवाद्याने अमेरीकेत हल्ला केला.हजारो लोक निष्प्राण.मुस्लिम दहशतवादाशी पहीली ओळख.कारण काय ,तर कुराणमध्ये काफीर संपवा असा संदेश आहे.हजारो वर्षापुर्वी लिहलेली बाडं, मग ते वेद असोत वा कुराण बायबल आजहि प्रचंड स्फोटक असल्याची जाणीव.

२००२गुजरात दंगल----
हिंदूनी भरलेली एक ट्रेन गोध्राजवळ मुस्लिम मॉबने जाळली.कारण काय तर ट्रेनमधले ते अयोध्येत राममंदिर बनवायला गेलेले कारसेवक होते.याची रिॲक्शन उमटली...हजारो मुसलमान घराबाहेर काढून मारण्यात आले.जाळण्यात आले.मुस्लिमबहुल भागात हिंदूंना मारण्यात आले.
आमचा केमिस्ट्रीचा पेपर पुढे ढकलण्यात आला व अभ्यासाला वेळ मिळाला.
हिंदू मरु देत वा मुस्लिम, वेळ मिळाल्याने आपला केमिस्ट्रीचा पेपर यामुळे नक्की सुटणार हा स्वार्थी विचार मनात आला.आपण निधर्मी होत आहोत याची पहील्यांदा झालेली जाणीव.

कॉलेज २००४--
फर्राट चर्चा घडवून आणायला लागलो.कॉलेज्च्या कट्ट्यावर नास्तिक निधर्मी अशी ओळख तयार झाली.चर्चांमध्ये तावतावाने भांडणाऱ्या मित्रांवरुन धर्म हा कॅन्सर कीती खोलवर रुजला आहे व माणसाची मती तो कशी हायजॅक करतो याचा अनुभव येत गेला.जग धर्ममुक्त झाले पाहीजे हा विचार बळावला.

२०१७ ,वय ३१----
Richard Dawkins foundation for reason and science शी संलग्न.धर्म या गोष्टीकड परतायची शक्यता शून्य.

टाईमलाईन समाप्त.

जग धर्ममुक्त झाले पाहीजे हा माझा विचार कसा बळावत गेला याची ही टाईमलाईन.
आपल्याला काय वाटते??
१. धर्म कालबाह्य झाले आहेत काय?
२.मुस्लिम दहशतवादाने जगभर मांडलेला हैदोस ,उगवता हिंदू दहशतवाद यावर जग धर्ममुक्त होणे हाच उपाय आहे काय?
३.तुमचा पाल्य निधर्मी विचारांचा व्हावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता?

प्रस्तुत लेख संस्थळाच्या नियमात बसत नसल्यास डिलिट करावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग हे सांगायला धर्म कशाला हवा? म्हणजे मानवतेच्या , नैतिकतेच्या दृष्टिकोनातून योग्य अयोग्य काय, हे मीच ठरवणार, तेवढी समज मला आहे; तर त्याल मी मानवता /नैतिकताच का म्हणून नये? धर्मच का म्हणावे? (धर्म = रिलिजन) >>>
आपण ज्याला मानवता/नैतिकता म्हणता आहात त्यालाचं पुर्वजांनी विस्तृत स्वरूपात धर्म म्हटलं असावं...आता नैतिकतेच्या ज्या निरनिराळ्या व्याख्या केल्या गेल्या असतिल त्यानुसार तो तो धर्म अस्तित्वात आला असेल...

<<< देव एखादा शाळाचालक आहे का , की जो फक्त त्याच्या शाळेत प्रवेश घेणार्‍यांचाच विचार करतो? >>>

उपमा चांगली आहे. जवळपास तसेच.
फक्त त्या शाळेत प्रवेश मिळणे अति कठीण. प्रवेश मिळाल्यावर चुका होणे त्याहून कठीण. अगदी प्रवेशपरीक्षा काय नि ती कशी द्यायची हे हि नक्की कुणाला माहित नसते.
त्यासाठी वेद, गीता, उपनिषदे, लिहीली. पण त्यातून समजायचे काय? ते उगाच पाठ करून परीक्षेला बसता येत नाही. भला गुरू मिळाला तर बरे.

महंत, बाबा, बुवा सतत प्रवचने करत हिंडत असतात. मग त्यांच्या नावाने लोक खूप पैसे देतात - पण ही शाळा तर पैसे देऊन प्रवेश मिळवण्यासारखी नाही.

तरीहि "समजणे" हे स्वतंत्र विचार करण्यानेच होते, एरवी नुसते पाठांतर, नि पोपटपंची. म्हणूनच त्याच शाळेत, त्याच शिक्षकांच्या हाताखाली शिकलेले लोक आयुष्यभर साधे आयुष्य जगतात तर काही जण आईनस्टाइन, बिल गेट्स, महात्मा गांधी, सानेगुरुजी, बाबा आमटे बनतात,
दैनंदिन व्यवहार करता करता दिवसाकाठी थोडे क्षण वेगळे काढून विचार करण्याची सवय लावावी. निदान उद्या काय करायचे, कुठल्या क्रमाने, कसे, मधेच काही अनपेक्षित आले तर काय करायचे याचा विचार करून ठेवला, तर दुसर्‍या दिवशी कामाचा त्रास कमी होईल नि इतर गोष्टींचा विचार करायला वेळ मिळेल.

खरे तर ज्या तत्वज्ञानात हे सगळे म्हंटले आहे त्याच तत्वज्ञानात असेहि म्हंटले आहे की ते जे काय आहे ते कुणालाच समजत नाही. ज्याला ते समजले असे वाटते त्याला तर नक्कीच नाही. नि ज्याला ते समजले नाही असे वाटते त्याची निदान सुरुवात तरी आहे समजायला.

तर हे सगळे मायबोली वाचून समजणार नाही, त्यासाठी बराच वेळ नि परिश्रम लागतात.

समजा माझा कोण्या सर्वश्रेष्ठ शक्तीवर विश्वास आहे. पण ही शक्ती वेगवेगळ्या धर्मांनी सांगितलेले कोणतेही रूप घेत नाही.

>>>>>

यांच विचारातून नवीन धर्माचा ऊदय होतो Happy

मग तुम्ही ती सर्वश्रेष्ठ व्यक्ती कशी असेल याचे आपले नियम बनवणार आणि अनुयायी मिळवणार. धर्मसंस्थापक बनणार.

मुळात या जगात आपल्याला किंवा कोणालाच न उमगलेली एखादी अज्ञात सर्वश्रेष्ठ शक्ती अस्तित्वात आहे हा विचारच आपल्याला या गर्तेत ओढतो.

<हिंदू तत्वज्ञानात एकच देव आहे व तो फक्त श्रद्धा पूर्वक स्मरण करणार्याकडेच लक्ष देतो, बाकी कुणाहिकडे नाही. कुणाची श्रद्धा नसेल, ते मानत नसतील तर त्या देवाचे काहीहि बिघडत नाही. तो तुम्हाला शिक्षा वगैरे काही करणार नाही.>

मग मी तो साधू वाण्याला शिक्षा करणार्‍या देवाची कहाणी वाचत होतो ते कुठून आले ?

हिंदू मरु देत वा मुस्लिम, वेळ मिळाल्याने आपला केमिस्ट्रीचा पेपर यामुळे नक्की सुटणार हा स्वार्थी विचार मनात आला.आपण निधर्मी होत आहोत याची पहील्यांदा झालेली जाणीव.
>>>
स्वार्थासाठी निधर्मी होउ शकता, तर एक दिवस स्वार्थासाठी एखादा धर्म ही स्विकारु शकता.

खुपच वरवरचा उथळ लेख! एकदम सिन्थेटिक

@टवने सर,निधर्मी बरोबर नास्तिकही होत जाणे ही simultaneousप्रोसेस आहे.तर,हो.मि नास्तिकही आहे.

साधारणतः पहिले दोन अवतार प्राणी होते त्यामुळे पहिले हिंदू धर्मात अतिरेकी नव्हते हिंदू अतिरेक्यांची सुरुवात बाळ वामन पासूनच झाली आहे हो.
बाळ वामन हा पहिला हिंदू दहशदवादी असावा. नई काय आहे त्याने मारला ना बाली राजाला ? नंतर तर काय जो अवतार झाला तो तर मारताच सुटला राव. बिच्चारा हिंदू धर्म. सगळेच हिंदू अतिरेकी!!!!

मग मी तो साधू वाण्याला शिक्षा करणार्‍या देवाची कहाणी वाचत होतो ते कुठून आले ?

त्यातच धर्माचे तत्वज्ञानाचे सार आले असे समजत असाल तर तुमच्यासाठी तेच खरे.

नुसते तत्वज्ञान ऐकून रोजचे जीवन कसे जगावे हे कळत नाही, त्यासाठी बरेच इतर साहित्य निर्माण झाले. मी त्याबद्दल बोलत नाहीये.
निरनिराळ्या तत्वज्ञानात मनुष्य कशासाठी जगला म्हणजे त्याच्या आयुष्याचे सार्थक होईल हे लिहीले आहे. त्यासाठी निरनिराळ्या धर्मात रोजचे जीवन कसे जगावे हे सांगितले आहे.

हिंदू धर्म ज्याला म्हणतात त्यामागे तत्वज्ञान काय, त्यात काय सांगितले आहे ते कसे प्राप्त करावे याबद्दल विचार व वाचन मी सुरु केले. त्यात आस्तिकता, नास्तिकता असे काही आढळले नाही. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे.
त्यात हे श्रद्धेबद्दल वाचले. ते लिहीले, ते आचरणात आणणे मला तरी शक्य होईल असे वाटत नाही.
हे सर्व तत्वज्ञान मला फार भारी पडले, पण काही काही गोष्टी एकूण जीवनातच मनःशांति देतील, जीवन आनंददायक करतील असे वाटल्याने मी त्यांचा जास्त अभ्यास केला. नि आता त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो आहे. जीवन आनंददायक होत आहे.
हिंदू धर्माबद्दल लहानपणापासून खूप काही काही ऐकले, वाचले होते म्हणून वाटले की त्या धर्मातलेच कळण्याची काही आशा आहे. ह्या धर्माबद्दल काहीहि माहिती नाही अश्या ज्यू, ख्रिश्चन, मुसलमान इ. धर्माचा अभ्यास दूरच.

त्यातच धर्माचे तत्वज्ञानाचे सार आले असे समजत असाल तर तुमच्यासाठी तेच खरे. >> सगळे सार आले नसेल पण जो धर्म सामान्य लोक अवलंबतात त्यात ही कहाणी फार महत्त्वाची आहे असे तुम्हाला वाटत नाही का ? तुम्ही स्वतः तत्त्वज्ञान वाचून , अभ्यास करून निर्णय घेता, पण जी सर्वसामान्य जनता आहे त्यापैकी किती लोकं असे मूळ तत्त्वज्ञाव वाचत असतील किंवा त्याचा अभ्यास करत असतील ? आणि तत्त्वज्ञान म्हणजे नक्की कुठले - ते सुद्धा स्पष्ट करा की ? शैव की वैष्णव ? की नुसता वैदीक धर्म ? की द्वैत की अद्वैत ?

<<<तत्त्वज्ञान म्हणजे नक्की कुठले - ते सुद्धा स्पष्ट करा की ? शैव की वैष्णव ? की नुसता वैदीक धर्म ? की द्वैत की अद्वैत ?>>>
मी धर्म व तत्वज्ञान यात फरक मानतो.
द्वैत, अद्वैत, शैव, वैष्णव, वैदिक की पारंपारिक हे सर्व माझ्या बुद्धीपलीकडील आहे.
माझ्या माहितीप्रमाणे हिंदू तत्वज्ञानात पुनर्जन्म, कर्म, मोक्ष इ. संकल्पना आहेत.
त्या तत्वज्ञानुसार रोजच्या जीवनात कसे वागावे हे सांगणारा धर्म. तो अर्थातच, कालपरत्वे, परिस्थिती परत्वे, गुणकर्म विभागशः बदलणार. अनेक सत्पुरुषांनी स्वतः विचार करून इतरांच्या कल्याणासाठी धर्म, व्रतवैकल्ये, आचरण या संबंधी अनेक नियम बनवले. त्या नियमांनुसार इहलोकी सुख व परलोकी गति मिळेल असे सांगितले. त्यात साहजिकच परस्परविरोधी विधाने आली, त्याच्या निरुपणात वरील वाद निर्माण झाले. ते वाद माझ्या बुद्धीपलीकडे.
तर मला या सगळ्यात काही स्वारस्य वाटले नाही.
श्रद्धेबद्दल जे लिहीले आहे, त्यातले मला काय समजले ते लिहीले.
परलोक, तेथील गति बद्दल मला काही उत्सुकता नाही. पण इहलोकी मात्र सुख, समाधान, आनंददायी जीवन असावे अशी तीव्र इच्छा होती नि आहे.
तर कुठला धर्म (रोजच्या जीवनात वागण्याचे नियम) पाळायचा? एक हिंदू म्हणतात तो धर्म लहानपणापासून ऐकत आलो आहे. त्यात धागाकर्त्याने लिहील्याप्रमाणे मलाहि अनुभव आले. पण हिंदू धर्म नाही तर कुठला? मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू धर्माचे बरेच लोक जवळून पाहिले, त्याहि धर्मांचा काही उपयोग होईल असे वाटले नाही - त्यांचा अभ्यासच नाही, नि करायची इच्छाहि नाही.
मग गीता, उपनिषदे वाचून, स्वतः विचार केल्यावर मला जे समजले त्याने मा़झे मन शांत झाले, जीवन सुखी होईल असे वाटू लागले. असे उमगले की उगाच धर्म, तत्वज्ञान नास्तिक, आस्तिक, धार्मिक, निधर्मी या सगळ्या कल्पना व्यर्थ आहेत.

तर ही सुखाची मला गवसलेली गुरुकिल्ली कोणती? ते मी सांगीनच, पण त्यासाठी मला कुणि बुवा, बाबा बनवून पोत्याने पैसे दिले तर ते मनासारखे उपभोगून मग मी सांगेन.

मुळात धर्म आणि परमेश्वर या दोन गोष्टींचा तसा परस्पर काहीच संबंध नाही. धर्म ही समूहजिवनाच्या गरजेतून निर्माण झालेली बाब असून आस्तिक असणे वा परमेश्वराला माणने ही सर्वस्वी व्यक्तीगत बाब आहे. तुम्ही निधर्मी होत गेलात तर चांगलच आहे... पण त्यातून परमेश्वराचं अस्तित्व नाकारत गेलात असा अर्थ निघत नाही. त्या मुळे धर्म सोडलात काय किंवा धरलात काय तसा गुणात्मक फरक पडत नसतोच मुळी. हो पण परमेश्वरावरचा विश्वास असणे/नसणे (आस्तिक्/नास्तिक) यामुळे जरुर फरक पडतो. त्यावर माझे दोन शब्द...

२०१७ ,वय ३१---->> पिक्चर अभी बाक है.....
मुख्यत्वे माणसाचा प्रवास दोन प्रकारे होत असतो.
१) परमेश्वरवादाकडून प्रयत्नवादाकडे
२) प्रयत्नवादाकडून परमेश्वरवादाकडे

ऐन तारुण्यात माणसाचा मनगटावर जरा जास्तच भरवसा असतो. त्यामुळे तो परमेश्वरवाद नाकारुन प्रयत्नवादावर सगळी मदार टेकवतो. पण ४० शी येतायेता सोबतीने बरेच अनुभवही येतात. यातून मग (काही सन्माननीय अपवाद सोडून) प्रयत्नवादाचा व घडणा-या घटनांचा तार्कीक ताळमेळ तसा नसतोच हे लक्षात येत जाते. हे वारंवार घडू लागले की तर्कावर घासून घेण्याची वृत्ती हळूहळू मावळत जाते. अन तिथून सुरु होतो एक नवा प्रवास तो म्हणजे "प्रयत्नवाद ते परमेश्वरवाद" हा प्रवास सगळ्यांच्याच नशिबी असतो असे नाही. पण बहुतांशाच्या नशिबी असतो एवढे नक्की. तुम्ही त्यातले आहात की नाही हे कळायला ४०चा टप्पा पार करावा लागेल. तोपर्यंत आपल्या आजच्या अनुभवात आणि तर्कात बराच फेरफार झालेला असेल.
सन २०२७ मध्ये तुम्ही स्वतः एकदा या विषयावर चिंतन करुन बघा. तेंव्हाही आजच्या सारखे वाटते की वेगळे वाटते त्यावरुन ठरवा तुम्ही २०१७ मध्ये कसे होतात. बाकी सन्माननीय गटातले निघालात तर... जियो...!!!!

तत्वज्ञानात देव, परमात्मा वगैरे कल्पना आहेत त्यात तो देव व परमात्मा हा स्वतःहून जगात लुडबूड करत नाही. तो फक्त श्रद्धेने किंवा गीतेत सांगितलेल्या मार्गांनी प्राप्त होतो.
हे सगळे सामान्य जनांना कसे कळावे म्हणून मग प्रचंड मोठ्या प्रमाणावर इतर साहित्य निर्मिती झाली.
स्वतः विचार करून लिहिणार्‍या लोकांचे एकमेकाशी पटतेच असे नाही. पटत असले तरी ते कुठल्या स्तरावर? कुणि परब्रह्म म्हणतात, कुणि ईश्वर म्हणतात, कुणि परमात्मा म्हणतात. या तीन संज्ञा वेगळ्या आहेत असे काही जणांना वाटते. प्रत्यक्ष लिहिणार्‍या लोकांच्या मनात त्याबद्दल भेद नसतात, कारण कल्पना तीच, मांडणी वेगळी वेगळी - लोकांपर्यंत पोचवण्यासाठी.
कुठुन का होइना, नीट वागा ही इच्छा. स्वतःला विचार करता येत नसेल तर हे सगळे वाचून ज्याला जे पटेल त्याने तो मार्ग अनुसरावा. नुसते सांगून जमत नसेल तर पैसा, सुख यांची लालूच दा़खवून, नाहीतर भीति घालून. साम, दाम (सुख), दंड या पैकी कुठल्याहि मार्गाने.
लिहिणार्‍यांना माहित असते, पूजा करून पैसे मिळत नाहीत, ते फक्त घाम गाळून किंवा अक्कलहुषारीनेच मिळतात, पण पूजा केल्याने जर मन स्थिर झाले तर ते सर्व नीट करायला जमेल.
किंवा भीती घालून. लिहिणार्‍यांना हेहि माहित असते की अशी काही शिक्षा नसते, पण घाबरून का होईना, नीट मार्गावर लागा. तो मार्ग कुणाला पूजा करून मिळेल, कुणाला नुसत्या नामस्मरणाने दिसेल तर कुणाला कसा.

अहो, हजारो वर्षे झाली, लोक समजण्याचा प्रयत्न करताहेत, अजून इतर कुठल्याहि तत्वज्ञानाचा भारतात एव्हढा अभ्यास झाला नसेल, ग्रीक, आले, शक, हूण आले, मुसलमान आले, ख्रिश्चन आले, लोक अजून आपले याच तत्वज्ञानात गुंतलेले. काहीतरी तर अर्थ असेल त्यात.
त्यातूनहि विचार करून समजले किंवा पटले नाही तर काय होणार आहे?
काही नाही.
मला समजले तर नाहीच, पटले पण नाही. मी अजून आहेच.
मला जे पाहिजे ते मी करतोच. पण सगळे वाचून, समजण्याचा प्रयत्न करून. उगीचच दोन दिवसांच्या अनुभवावरून नाही.

एका मित्राने मला भारी प्रश्न टाकला होता.... "तू प्रयत्नांवर विश्वास ठेवतो, लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी भूमिका ठेवतो -त्यातून तुला यशही मिळतं, पण असं प्रयत्नांती यश मिळणे तुझ्या नशिबात लिहिलं असेल तर...?"

अनेकांना कठोर प्रयत्नांनंतर यश मिळत नाही, प्रचंड हुशार-मेहनती असून योग्य तो न्याय मिळत नाही. ज्यांना यश-न्याय मिळत नाही त्यांनी मेहनत केली नाही असा काही प्रमेय आहे का?
-----------
मी दैववादी नाही, पण 'केवळ' परिश्रम केल्याने यश-पैसा-किर्ती लाभते असे नसते. संधी आल्यावर प्रयत्नवाद कामात येतो, की प्रयत्नवादाने संधी निर्माण होतात हा सनातन प्रश्न आहे. पण अपयश पचवू न शकणारे, त्या अपयशाच्या मानेवर पाय देऊन भक्कम उभे राहू न शकणारे आपली मनशांती देवाच्या इच्छेत शोधतात असे वाटते.

----------
तारुण्यात रग असते, म्हातारपणात अनुभव. तरी वयाचा आणि आस्तिक-नास्तिकतेचा संबंध नाही.

धर्म हा ईश्वरावर आधारित असतो. चमत्कार त्याचा गाभा असतो. ईश्वर नाकारणे ही थर्म नाकारण्याची पहिली पायरी आहे. नास्तिक सर्वसामान्य माणुस हा निरुपद्रवी असतो. मात्र आस्तिक सर्वसामान्य माणुस हा वरकरणी निरुपद्रवि वाटत असला तरी धार्मिक उन्मादाच्या, विवादाच्या काळात तो हिंसक होउ शकतो.

<<<पण अपयश पचवू न शकणारे, त्या अपयशाच्या मानेवर पाय देऊन भक्कम उभे राहू न शकणारे आपली मनशांती देवाच्या इच्छेत शोधतात असे वाटते.>>>
अगदी बरोब्बर. स्वतःच्या अपयशाचे खापर दुसर्‍या कुणाच्या तरी डोक्यावर फोडायचे. देव बरा. इतर कुणाचे नाव घेतले तर भांडणे.
जे झाले त्याची करणे देता आली नाहीत तर देवाचे नाव घेऊन मोकळे व्हावे. चांगले, वाईट, सगळ्याला तोच जबाबदार.
अगदी काम न करताहि, "देवाची इच्छाच नाही" म्हंटले की आळशीपणा करायला मोकळे.
जसे व्यायामासाठी ट्रेडमिल आणायची नि नंतर फक्त कपडे टांगायला त्याचा उपयोग करायचा तसे त्या सगळ्या तत्वज्ञानातील देवाचे करायचे. सग्गळे सोप्पे. फुक्कट चर्चा, वादविवाद, डोक्याला ताप कशाला?
इहलोकी सुख व परलोकी गति ही सुद्धा देवाच्या इच्छेने!! तुम्ही नास्तिक असला तरी ते पण देवाच्या इच्छेनेच.

१)धर्म कालबाह्य झाले आहेत काय?>>>>>>>>>>>
प्रतयेक धर्मातील काही रूढी आणि प्रथा कालबाह्य होतात धर्म कालबाह्य होत नाही. वेळोवेळी त्या त्या धर्मातील
साधू ,महात्मे,विचारवंत कालबाह्य गोष्टी दूर करून लोकांना पुन्हा धर्मा चे शुद्ध स्वरूप दाखवतात उदा गाडगेबाबा

२).मुस्लिम दहशतवादाने जगभर मांडलेला हैदोस ,उगवता हिंदू दहशतवाद यावर जग धर्ममुक्त होणे हाच उपाय आहे काय? >>>>>>>>>>>>>>>
हिंदू किंवा मुसलमान किंवा कोणत्या धर्माच्या लोकांनी स्वतःच्या धर्माचे पालन केल्यास प्रेम वाढेल,दहशतवाद कमी होईल,धर्म पासून दूर गेल्यास मात्र हजारो समस्या उद्भवतील यात शंका नाही
द्वेष करा दंगली करा असा कुठलाही धर्म सांगत नाही

१)मुस्लिम धर्मातील एक विदेही स्त्री संत (पुणेस्थित )हजरत बाबाजान शंकर महाराजांना आई मानत असत
२)विदर्भातील एक मुस्लिम संत ताजुद्दीन बाबा गजानन महाराजांचे अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेत असत
३)जैतुनबी नावाची एका मुस्लिम स्त्रीने वारकरी संप्रदाय मध्ये फार मोठे नाव प्राप्त केले आहे .ह्या स्त्री ने हिंदू लोकां सोबत अनेक वर्षे वारी केली,पांडुरंगाची भक्ती केली
४)Jeffrey Kagel उर्फ कृष्ण दास हि व्यक्ती ६०/७० च्या दशकात अमेरिका सोडून नीम करोली बाबांच्या मार्गदर्शना खाली ईश्वर दर्शन करण्या साठी भारतात आली. हनुमान आणि जीजस एकच आहेत असे नीम करोली बाबा म्हणाले तेव्हा हि व्यक्ती थक्क झाली . (कृष्ण दास या व्यक्ती बद्दल सर्च करून पाहिलेत तर तुम्हीही थक्क व्हाल )

धर्माच्या शिवणुकीचा आणि दंगली करण्याचा काडीमात्र सम्बंध नाही हे स्पष्ट करण्यासाठी वरील चार उदाहरणे पुरेशी आहेते असे मला वाटते .

३)तुमचा पाल्य निधर्मी विचारांचा व्हावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता?>>>>>>>>>>>निधर्मी होण्यापेक्षा धर्माचे पालन करूनच माणूस सुखी होतो मग तो भले जगातल्या कोणत्याही धर्माचे पालन करो

Pages