लता आणि नातेवाईक

Submitted by बेफ़िकीर on 14 July, 2017 - 09:04

लताची समस्या अशी आहे. लताचा नवरा तीन वर्षांपूर्वी अती मद्यपानामुळे गेला. तिला एक मुलगा आहे जो आठवीत आहे. त्याचे नांव मदन! लता सासरी राहत नाही कारण सासरचे तिला नांदवत नाहीत. म्हणून ती पुण्यात आईजवळ राहते. लताचा भाऊ विवाहीत असून तो वेगळा राहतो व लताकडे लक्ष देत नाही. लताला तीन बहिणीही आहेत पण त्यातल्या दोघींचे नवरे असेच अती मद्यपानामुळे वारले. एक मेहुणा चांगला आहे व तो लताला मदत करतो. लता चार ते पाच घरची केर फरशीची कामे करून नऊ हजार रुपये महिना मिळवते त्यातील तीन हजार खोलीच्या भाड्यात जातात.

लताचा मुलगा मदन शिक्षणात विशेष प्रगती दाखवत नाही. त्याशिवाय तो वांड आहे. दंगा करत बसतो. आईचे ऐकत नाही. आजीचेही ऐकत नाही. अभ्यास करत नाही. परवाच शाळेत त्याचे काही मुलांशी इतके भांडण झाले की ती मुले काठी घेऊन त्याला मारायला धावली. हे कळल्यावर लताचा जीव दडपला. ती कामावर असते, घरी म्हातारी आई एकटी असते आणि मुलगा मदन असे काय काय विचित्रच करत असतो.

म्हणून लताने ठरवले की मदनला एखाद्या वसतीगृहात ठेवायचे जेथे त्याच्यावर चोवीस तास लक्ष ठेवले जाईल व अभ्यासातही त्याची प्रगती होईल. म्हणून शहराबाहेरील एका आश्रमशाळेत ती त्याला घेऊन गेली. तिला ती आश्रमशाळा आवडली. तेथे सतरा मुले व अठरा मुली असून व्यवस्था चांगली आहे. सर्व मुले मुली पाचवी ते दहावीमध्ये असून वसतीगृहाखालीच शाळा आहे. मुलांना दिवसातून चार वेळा व्यवस्थित आहारही मिळतो. पार लांबलांबून मुले व मुली येथे आलेली आहेत. पालक केव्हाही भेटायला येऊ शकतात. जवळच्या भागातून आलेल्या मुलांना पालक शनिवार, रविवार घरीही घेऊन जाऊ शकतात. प्रवेश फी फक्त पाचशे रुपये आहे व एकदा पाचशे रुपये दिल्यानंतर पुढे काहीही खर्च नाही. शाळेतर्फे वह्या, पुस्तके व इतर सर्व काही जागच्याजागीच मिळते. सर्व मुले व मुली अतिशय आनंदात राहत आहेत.

लताला आश्रमशाळा आवडली, तिच्या मेहुण्यालाही आवडली पण मुलगा काही तिथे जायला तयार नाही. मुलाने दुसर्‍या दिवशी घरात रडून गोंधळ घातला व लताच्याच अंगावर वस्तू फेकून मारल्या. आजीलाही मदन आवरत नाहीच. लताच्या मेहुण्याचे तर मदन ऐकतच नाही. मदनला जवळ घेऊन लताने खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला. तुझे वडील कश्यामुळे मेले, आपली परिस्थिती कशी आहे, तुझे शिक्षण किती महत्वाचे आहे, मी शनिवार रविवार तुला इकडे घेऊन येत जाईन असे सगळे सांगून पाहिले. पण मुलाच्या डोक्यात निराळाच विचार! त्याचे म्हणणे असे की आईला आपण डोईजड झालेलो असून आई आपल्याला कुठेतरी सोडून देत आहे.

लताच्या नकळत त्याने लताच्या सासूला फोन केला व सांगितले की आई त्याला कुठेतरी टाकून यायला निघाली आहे. सासू तरातरा गावाहून आली व लताशी भांडली. लताला म्हणाली की तुझा नवरा नाही म्हणजे तुझा मुलगा अनाथ आहे असे समजू नकोस. आम्ही त्याला सांभाळू. आता ह्या लताचा दीर खरे तर त्या मुलालाच काय पण लतालाही काहीही मदत करत नाही. इतकेच काय तिच्याकडे ढुंकून पाहतही नाही. तो, त्याची बायको आणि ही लताची सासू त्या मुलाला काय सांभाळणार? लताने परोपरीने सांगितले की मदनच्या चांगल्यासाठीच हा निर्णय ती घेत आहे. आश्रमात तर मुलीसुद्धा आहेत म्हणजे आश्रमाची शिस्त किती व्यवस्थित असेल ते बघा म्हणाली. पण अचानकच प्रकट झालेल्या सासूने अनावश्यक लुडबुड केली व सासू मदनला घेऊन गावी गेली. आता लता कामधंदे सोडून तिकडे जाऊ शकत नाही. तिला तिकडे जायलाच चार दिवस लागतील. मुलगा मदन मात्र आनंदाने ह्या आजीबरोबर गावी गेला. काही दिवसांनी ह्या मदनचा तिकडे छळ होऊ लागेल तेव्हा तो कसाबसा परत येईलही पण तोपर्यंत लताच्या आयुष्यात काही नवीन समस्या असतील ज्यामुळे कदाचित ती त्याला पुन्हा आश्रमशाळेत घेऊन जाऊ शकणार नाही.

लतासारख्या स्त्रिया संसार कसाबसा ओढताना अनेक चांगले व धडाडीचे निर्णय घेण्याच्या पात्ळीपर्यंत येतात पण एक तर निर्णय घेत तरी नाहीत किंवा घेऊ शकत तरी नाहीत. घेऊ शकत नाहीतचे उदाहरण वर पाहिलेच. पण घेत नाहीत ह्याचेही कारण सहसा हेच असते की घरातले, दारातले, शेजारपाजारचे, नात्यातले, ओळखणारे हे सगळेजण काय म्हणतील. केवळ लतासारख्याच नव्हे तर अगदी व्यवस्थित आर्थिक परिस्थिती असलेल्या, कर्तृत्ववान असलेल्या, उत्तम पदवी प्राप्त केलेल्या स्त्रियाही बरेचदा प्रत्यक्ष निर्णय घेण्यापूर्वी चारजणांशी बोलतात. त्यांच्या निर्णयाला दोन चारजणांनी पाठिंबा दर्शवला की मगच या निर्णय घेतात. त्यातही नवरा, सासू-सासरे, दीर - नणंदा, ह्यापैकी कोणी लक्ष देत नसल्यास वडील, भाऊ, गावातील एखादी महत्वाची व्यक्ती ह्यांच्याशी त्या खास चर्चा करतात. मध्यंतरी एका कार्यक्रमात एक स्त्री व्यासपिठावरून म्हणाली की माझ्या पतीच्या पाठिंब्यामुळेच आज मी हे करू शकले. वास्तविक पाहता त्या पतीने तिला काहीही मदत केलेली नव्हती, तो केवळ ती यशस्वी होऊ शकत आहे हे बघून तिचे ते काहीतरी वेगळे करणे मान्य करत होता इतकेच! त्यानंतर मला बोलायची संधी दिली गेली तेव्हा मी जाहीरपणेच म्हणालो की आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेचे श्रेय बायकांनी पतीला, सासरच्यांना देणे बंद केले पाहिजे. श्रेय देण्यासारखे असेल तेव्हा जरूर द्यावे पण नाही दिले तर आपल्याला पाठिंबा मिळणार नाही अशी भीती बाळगून श्रेय देण्यात अर्थ नाही. अनेक गावांमधील सरपंच स्त्रिया नामधारी असतात व निव्वळ शाली, हार, फुले स्वीकारण्यापुरत्या समारंभात येतात. औंधच्या एका अतिशय प्रतिष्ठित सोसायटीत असलेल्या एका प्रचंड बंगल्याची मालकीण अशीच दबावाखाली असते. घरातील प्रत्येकाचा नाश्ता झाल्याशिवाय तिला नाश्ता करण्याची परवानगी नाही. तिने तसे केले तर नवरा व मुले (ज्यात एक मुलगीही आहे) तिला दरडावतात. ही उदाहरणे आपली सहजच आठवली म्हणून लिहिली. पण प्रामुख्याने लतासारख्या कित्येक स्त्रिया योग्य धोरण आखू शकत असूनही पाठबळ मिळेल की नाही ह्या बाबीला घाबरून जी परिस्थिती आहे ती मान्य करतात.

आता हा मदन काय दिवे लावणार ते दिसतच आहे. त्याला शिक्षणात रस नाहीच. जेमतेम दहावी वगैरे होईल. जगाकडून टक्केटोणपे खाईल तेव्हा कसलेतरी काम करू लागेल. त्याचे वडील गेले ह्यातही दोष वडिलांचाच! पण सोसणार आहे लता! ह्याहीपेक्षा विदारक बरेच काही आहे जगात, पण हे अगदी समोरच घडले म्हणून लिहिले.

एखादी स्त्री आपल्या घराचे भले करू इच्छित असते, करण्यासाठी झटत असते ह्याकडे दुर्लक्ष करून, नको तेव्हा स्वतःच्या नात्याचा अधिकार लादून वाटोळे करणारे नातेवाईक फार आहेत. एरवी हे काडीचीही मदत करणार नाहीत. आधी नात्यांच्या जंजाळातून स्त्री बाहेर पडायला हवी असे वाटते.

===========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले.

आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेचे श्रेय बायकांनी पतीला, सासरच्यांना देणे बंद केले पाहिजे. श्रेय देण्यासारखे असेल तेव्हा जरूर द्यावे पण नाही दिले तर आपल्याला पाठिंबा मिळणार नाही अशी भीती बाळगून श्रेय देण्यात अर्थ नाही. >> +१.

आवडले
आधी नात्यांच्या जंजाळातून स्त्री बाहेर पडायला हवी असे वाटते.)((
इंटरेस्टिंग वाक्य. मनासारखा जोडीदार मिळत असल्यास ठीक, पण असा दारू पिणारा नवरा, त्याचे स्वार्थी कुटुंब, मुलगाही ऐकत नाही- या नात्यांच्य भानगडीत ती पडलीच नसती तर? आपल्याकडे कुठेतरी प्रचारच पद्धतशीर केला जातो की लग्न, मुलं, इतर नातेवाईक हे सर्व असलं तरच स्त्री सुखी होते. पण हे अनेकदा खरं नसतं. एकट्या राहणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीच्या मालक बनून सुखी आयुष्य जगत असतात. याउलट लतासारख्या स्त्रिया कायम तणावाखालीच असतात. शोषित व्यवस्थेत तू हौसेने स्वतःचं शोषण करून घे, त्यातच तुझं हित आहे या सांगण्यातील trap स्त्रिया कधी ओळखणार? आमची पुण्यातली कामवाली एकदा सांगत होती की मुलीचं लग्न माझ्यासारखं १३ -१४ व्या वर्षी नाही करणार. खूप शिकवणार. म्हटलं हे छान आहे. उशिरा लग्न झालं तरी चालेल इथपासून सुरुवात होऊन लग्नच झालं नाही तरी चालेल, मूल नसलं तरी चालेल, स्वावलम्बी असली की पुरे इथपर्यंत पालकांनीच यायला हवंय.

आधी नात्यांच्या जंजाळातून स्त्री बाहेर पडायला हवी असे वाटते. >>> +१

आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेचे श्रेय बायकांनी पतीला, सासरच्यांना देणे बंद केले पाहिजे. श्रेय देण्यासारखे असेल तेव्हा जरूर द्यावे पण नाही दिले तर आपल्याला पाठिंबा मिळणार नाही अशी भीती बाळगून श्रेय देण्यात अर्थ नाही.>>>> सहमत आहे.

पण पिंजराच कसा छान आणि सुरक्षित अहे. मोकळ्या आकाशात भरारी घेणे कसे अवघड आहे हे स्त्रियाच स्त्रियांना पटवून देत असताना मी पाहिले आहे. अगदी स्वतःच्या पायावर उभ्या असणार्‍या अर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असणार्‍या स्त्रिया ठामपणे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. कारण लहानपणापासून तसे ट्रेनिंगच मिळालेले नसते.

मुद्दा काय आहे ते कळले नाही. तुम्ही जे यशस्वी स्त्रियांबद्धल लिहिले आहे ते यशस्वी पुरुषांबद्धल ही खरे आहे. नवीन काय आहे ?
कुणालाच श्रेय उगाच द्यायचे नाही असे म्हणत असाल तर मुद्दा पटला.

बरेच दिबसांनी काही लिहीलेत तर आज काहीतरी बेफि टच वाचायला मिळेल असे वाटले .. पण तसे काही निघाले नाही.

बाकी चर्चेला विषय म्हणून छान आहे. दूर कश्याला जा.. आमच्या घरातच माफक प्रमाणात पुरुषप्रधान संस्कृती अनुभवली आहे. एक उदाहरण द्यायचे झाल्यास आईचा पगार वडिलांपेक्षा जास्त होता तेव्हाही माझा हट्ट पुर्ण करायला एखादी महागडी वस्तू घेताना वडिल काय निर्णय घेतात यावर ते ठरायचे.

मात्र नव्या पिढीत परीस्थिती बदलतेय. मला नाही वाटत उद्या माझी बायको पैसे खर्च करताना माझ्या मताचा फारसा विचार करेन.

अर्थात बदल हा होतच राहणार तरी या ईत्र तित्र पसरलेल्या भारत देशात कमालीचे वैविध्य आहे. बहुतांश ठिकाणची परिस्थिती अजूनही अवघडच आहे.

स्त्रियांना निर्णयस्वातंत्र्य मिळणे हीच स्त्रीपुरुषसमानतेची सर्वोच्च व्याख्या ठरावी.

लेख छान आहे, पटण्यासारखाच.

फक्त एक सांगावेसे वाटते की स्त्रिया जेव्हा त्यांच्या यशाचे श्रेय नवरा व सासरच्यांना देतात तेव्हा त्यांना अजून एक जास्तीची कटकट, वाद नको असतो, म्हणून त्या असत्य असले तरी तेच प्रिय असल्याने सर्व श्रेय देऊन प्रश्न मिटवतात. सर्व यशस्वी स्त्रियांच्या मुलाखतीत त्यांना सासरच्यांबद्दल बोलतं केलं नाही, पारंपरिक म्हणून गळ्यात मारलेला रोल ती अपेक्षेप्रमाणे पार पाडतेय की नाही याची चौकशी केली नाही तर मुलाखत घेणाऱ्याला पूर्ण पगार मिळत नसावा. त्यामुळे असले प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नातच अपेक्षित उत्तरही दडलेले असते. यापेक्षा काही वेगळे उत्तर दिले तर उगीच मनस्ताप. पुरुषांना असले प्रश्न सहसा विचारले जात नाहीत. सानिया मिर्जाला जो प्रश्न विचारला गेला तो विराट कोहलीला कोणीही विचारत नाही.

लोक काय म्हणतील या फसव्या पिंजऱ्यातून ज्या स्त्रिया व पुरुषही बाहेर पडु शकले त्यांनी स्वतःचे निर्णयस्वातंत्र स्वतःच कमावले. ह्या स्वातंत्र्याचा लाडू कोणी आयता हातात ठेवणारे नाही. तो आपला आपणच आधी आपल्या स्वतःशी व नंतर इतरांशी झगडून मिळवायचा असतो. आपल्या स्वतःशीचा लढा जास्त कठीण असतो, तिथे एकदा जिंकलात की बाकीचे लढे कितीही कठीण असले तरी जिंकता येतात.

मलाही वाटलेलं की लता मंगेशकरबद्दल काही आहे. असो. पण बायका नेहेमीच त्यागमूर्ती किंवा सोशिक असतात असेही नाही. सासरचे लोक अतिशय चांगले व पाठिंबा देणारे असूनही नेहेमी वाईट वागणा-या बायकाही असतात.

मी लता मंगेशकर असे समजून वाचायला आलो तर काहीतरी वेगळाच निघालं.
>>>>
+786
मला सुद्धा असेच वाटलेले. लता दीदी मंगेशकर आणि त्यांचे ईतर गायक नातेवाईक ... फक्त मी लिहायला आणि धाग्याला वेगळे वळण लागायला एकच गाठ पडायला नको म्हणून लिहिले नव्हते. आता दोघातिघांनी लिहिलेले बघून ईंच का पिण्च करायचा मोह आवरला नाही Happy

सासरचे लोक अतिशय चांगले व पाठिंबा देणारे असूनही नेहेमी वाईट वागणा-या बायकाही असतात. >>> अशी एक जण खुप जवळुन बघीतलीये

अगदी अप्पलपोटी अन स्वार्थी

सगळी माणसेच असतात हो. बाई म्हणजे त्यागमूर्ती व पुरुष म्हणजे ओरबाडणारा हे आपणच आपल्या डोक्यात फिक्स केलेय. समोरची व्यक्ती आपल्या कल्पनेप्रमाणेच वागेल कशावरून?

सगळी माणसेच असतात हो. बाई म्हणजे त्यागमूर्ती व पुरुष म्हणजे ओरबाडणारा हे आपणच आपल्या डोक्यात फिक्स केलेय. 
>>>>>>
प्लस सेव्हन एटी सिक्स!
फक्त बाईच्या शारीरीक दुर्बलतेचा फायदा उचलत तिचे मानसिक खच्चीकरण करून तिला या पुरुषप्रधान संस्कृतीत भरडले जाते ईतकेच.
जसे सगळीच माणसं तसे माणूस हा देखील जनावरच. बळी तो कान पिळी हे चालतेच. स्त्री सक्षमीकरण हाच उपाय. बाहेरून तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही. अपेक्षाही ठेवू नका.

लेख आवडला. पण हल्लि थोडे चित्र बदलायला लागले आहे असे दिसते आहे. सासरची मंडळी पाठींबा देताना दिसतात. पण तुमचा सल्लही नको आणि पाठिंबाही नको म्हणणार्या स्वतंत्र विचारांच्या स्त्रियाही बघायला मिळतात. पण कितीही शिकलेल्या असल्या तरी स्त्रियांची होणारी कुचंबणा थां बलेली दिसत नाही हे खरे आहे.

माझी एक जवळची मैत्रीण आजच रडत रडत मला सांगत होती ..दहा वर्षांनी मला मुल झाल त्यात मुलगा झाला सासूच त्याच्या वर खूप प्रेम घरातल्या आधीपासून बर्याच समस्या होत्या आम्ही दोघ नवरा बायको नोकरी करतो पण ह्या १० वर्षात पैसे साठवू शकलो नाही...आता हिला मुलाला सासू जवळ सोपवून कामाला जायचय सासूला सुरुवातीला समजावलं कि मला पाच वर्ष तरी नोकरी करण गरजेच आहे, बाळाचा कपडालत्ता त्याच औषध पाणी काही दिवसाने तो शाळेत जाईल त्यासाठी पैसे लागतील डोनेशन'साठी ...सासू ने तीला पटलय अस दाखवलं ...आणि नंतर एकदा नातवाशी गोड बोलताना "बाळा मम्मा ला कामाला जाव लागत..तुझ्यासाठी पैसे जम्वाय्चेत ...१० वर्ष मजा केली आता करतायेत सेविंग" अरेच्चा...काय बोलायचं ह्यावर....

.१० वर्ष मजा केली आता करतायेत सेविंग" अरेच्चा...काय बोलायचं ह्यावर....>>>>> त्याचवेळी आधीच्या समस्यांवर केलेला अथवा झालेला खरच बोलून दाखवावा.तरीही सासू बोलत राहिली तर एकतर येडं बोलतंय करावं (सोपं नाही ते) किंवा पाळणाघरात मूल ठेवावं.