जागतिक दिन

Submitted by अतुलअस्मिता on 9 July, 2017 - 09:48

गेल्या रविवारी जागतिक श्वानदिन होता. दिनू जरा अंमळ उशिरानेच उठला होता. शनिवारी रात्रीच कुठल्यातरी जागतिक शिरा स्पर्धेमध्ये सर्वोत्तम शिऱ्याची निवड करण्याच्या निकषांवर अभ्यास करून त्याचा सारांश निदान शंभर समव्यसनी अशा ओळखीच्या व बिनओळखींच्या व्यक्तींना त्यांच्या व्हात्साप्प्वर निरोप पाठवून पाठवून बोटांची झीज झाल्यामुळे त्यांची आग होत असल्याच्या कारणास्तव त्याचा जरा जास्तच वेळ डोळा लागला होता. तरीसुद्धा डोळा उघडल्याबरोबर त्याने आपण सूर्योदयाशी स्पर्धा जिंकली आहे याची खात्री करून घेतली होती. सहजपणे व सराईतपणे निमिषार्धात त्याने आपला मोबाईल हातात घेऊन रोजच्या सवयीप्रमाणे चुटकीभराच्या आत व्हात्साप उघडले. पण आज एक दुर्दैवी दिन आपल्या नशिबात आहे आणि आपण उठण्यापूर्वीच तब्बल नऊ जणांनी सर्वांना ‘सुप्रभात’ संदेश पाठवल्याचे त्याच्या सूज्ञ डोळ्यांनी हेरल्यावर तो पाणावला. आता संपूर्ण रविवार जगून काढण्याचे तो उद्दिष्ट गमावून बसला होता. दिनू स्वतःवर खूप निराश झाला होता. अजून दुसरा डोळा झोपेतून संपूर्ण उघडण्याच्या आधीच निराशेचे सावट त्याच्या मेंदूची झडती घेत होते. स्वतःचा डोळा उघडण्यापूर्वी दुसराच कोणीतरी ‘सुप्रभात’ व्यक्त करणारा संदेश पाठवतो ही दिनूच्या दृष्टीने किरकोळ बाब नव्हती. कितीतरी खडतर तपश्चर्येनंतर प्रत्येकास सर्वप्रथम सुप्रभात चिंतण्याचे पुण्य त्याने अनेक वर्षे परिश्रम करून स्वबळावर व हिंमतीवर मिळवले होते. दिनूचे कित्येक परिचित तर त्याचा सुप्रभात चा संदेश हा जणू सकाळी उठण्याचा इशाराच मानून अगदी घडाळ्याचा गजर लावल्याप्रमाणे त्यावर विसंबून तोवर विश्वासाने शांत अशी समाधानाची झोप घेत असत. शेवटी महिनो न महिने जागवून दिनूने असा हा उपक्रम हाती घेऊन जिद्दीने त्यात यश मिळवले होते. दररोज प्रथम दर्शनी सुप्रभातचा संदेश पाठवण्याची व तोच दिवसातील प्रत्येकाचा सर्व प्रथम संदेश असण्याबाबतची दिनूची ख्याती इतकी होती की कधी कधी तर चक्क सूर्यनारायणाला देखील उगवण्याचे अगोदर दिनूच्या पापण्यांची उघडझाक झाली आहे का नाही याची खात्री करून घेण्याचा मोह होत असे. असा आपल्या ख्यातीला तडा बसणे दिनूला सहजासहजी मान्य होण्यासारखे नव्हते. पराभूतांची व्यथा व त्यांची दु:ख यातून खिन्नता व नैराश्य येणे हे अगदी स्वाभाविक होते. इतक्या सहजतेने दिनूचा पूर्वी कधीही पराभव झाला नव्हता.

दामू सावकार हा त्याच्या कंजूषपणावर खूप आत्माभिमान बाळगून असला तरी पावशेर मुरमुरे देताना एक मुरमुरा जास्तीचा नजरचुकीने ग्राहकाला गेल्याबद्दल त्याला आलेले नैराश्य मागे एकदा दिनूनेच दिवसभर त्याला विनोदी चुटकुल्यांचा खजिना वारंवार व दिवसभर पाठवून दामूच्या जीवनात नवचैतन्य आणण्यास मदत केली होती. राजाराम मास्तरांनी शाळेतून चोरून आणलेले खडू पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे त्यांच्या जगण्यातला व जीवनातला जो आत्मविश्वास कमी झाला होता तो परत मिळवून देण्यासाठी देखील दिनूच्याच सुप्रभात संदेशांनी मदत केली होती. दीपक शिंप्याने मागे कधीतरी उंदरांनी कापड कुरतडल्याचे दीप्तीबाईंना जरी खोटे स्पष्टीकरण देऊन त्यांचा राग शांत केला होता व त्याच कापडाची मग त्याने स्वत:च्या बायकोसाठी शिवलेली चोळी जेव्हा त्याच्या बायकोलाही लहान झाली, तेव्हा त्या सर्व चोरीच्या प्रसंगाने झालेल्या तळतळटामुळे आपण आता यापुढे खरेच सचोटीचा व्यवसाय करावा का आणि जर खरेच जर यापुढे सचोटीचा व्यवसाय करायचा असेल तर आपला मग उदरनिर्वाह कसा होईल या भीषण द्विधा मनस्थितीत असतानाच दिनूने त्याला दिवसभर असंख्य ‘चोर- पोलीस’ संदर्भातील ज्ञानवर्धक जीवन तत्वज्ञान समजावून देऊन परत प्रपंचात गुंगविले होते. शिवाय दीप्तीबाईंना ‘मनुष्य, माणुसकी, स्वभाव – एक गरज व निकड’ अशा अत्यंत क्लिष्ट विषयावर स्वामी गजानंदाचे व्याख्यान, कुणा एका इंग्रजी लेखकांची सुभाषिते व राजकीय नजरेतून टिपलेली व्यंगचित्रे अशा कितीतरी विविध विषयांवरील माहिती संकलित करून पाठवली होती. परिणामी दीप्तीबाईंनीच स्वखर्चाने नवीन चोळीचे कापड परत एकदा दीपक शिंप्याला घेऊन दिले होते. कुणाच्याही आयुष्यात आलेल्या सामान्य, तीव्र किंवा लघु-मध्यम अडचणींना वेळप्रसंगी तोंड कसे द्यावे याचे कुशल मार्गदर्शन दिनू करत असे. शेजारच्या तात्यांचा दिवटा असो व रोज संध्याकाळी वाचनालयातून रद्दी विकण्याच्या उद्देशाने केवळ फुकट मिळतोय म्हणून चोरून घरी वर्तमानपत्र आणणारे रघूकाका असोत; अशा सर्वांना अनंत अडचणीला तोंड देण्यासाठी प्रोत्साहनपर तत्वे, कविता, ओव्या, साहित्य, व्यंगचित्रे, व्याख्यान्याच्या ध्वनिफिती, दुर्मिळ छायाचित्रे, उस्फूर्त चैतन्य निर्माण होतील अशा बोधकथा, इतिहासाचे दाखले, पारंपारिक प्रपंचाची उदाहरणे, ताज्या घडामोडी, आंतरराष्ट्रीय बहुउद्योग, क्रीडा, साहित्य, जागतिक प्रदूषण, स्वास्थ्य, इत्यादी अनादि विषयांवरील कुणीही पूर्वी कधीही न वाचलेली माहिती संकलित करून ती सर्वप्रथम पाठवण्याचा अभिमान बाळगूनच दिनू आपला दिनक्रम ठरवत असे. तेंव्हा गेल्या रविवारी सकाळी दिनूच्या पापण्यांची उघडझाप होण्यापूर्वीच कोणीतरी सर्व जणांना सुप्रभातचे संदेश पाठवून दररोजचा दिनूचा मान हिरावून घेतल्याने, अनेकांना जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरलेला दिनू मात्र आज स्वतःच अडचणींच्या व निराशेच्या गर्तेत गोवला गेला. तरीदेखील अतिसंयमाने दिनूने आपला अर्धा डोळा पूर्ण उघडला.

दु:खी मनावर झालेले आघात विरण्यापूर्वीच दिनूला आपल्यावर अजून एक तीव्र असे संकट चालून आल्याची जाणीव झाली. कूस बदलून दुसरा डोळा अर्धा तरी उघडावा का या विचारासरशी त्याला आणखी काही इंगळ्या डसत असल्याचा भास झाला. अशा परिस्थितीत कूस बदलून दुसरा डोळा अर्धवट उघडण्यात वेळ घालवण्यापेक्षा आहे तो एकच डोळा पूर्ण उघडून त्वरित काही संदेशांची देवाणघेवाण करणे आज अगदी अनिवार्य आहे हे दिनूच्या चाणाक्ष मेंदूने ओळखले होते. परंतु आदल्या रात्री भेगाळलेल्या बोटांना झालेल्या जखमांनी तीव्र असा असहकार पुकारल्यामुळे त्याच्या रोजच्या चपळाईत एक दशसहस्त्रांश सेकंद उशीर झाला होता आणि जागतिक श्वानदिनाच्या शुभेच्छा सर्व परिचित – अपरिचितांना सर्वप्रथम पोचवण्याचे त्याचे परमभाग्य हुकून गेले होते. त्यामुळे संपूर्ण रविवार आता कसे जीवन जगावे असे वाटून जगण्याचे एक मुख्य वैशिष्ट्य हरवलेल्या दिनूने केवळ दांडग्या इच्छाशक्तीवर मात करून अशी घोडचूक पुन्हा कधीही न करता या पुढील जागतिक दिनाचा मुहूर्त कधी आहे हे शोध घेण्याचे जिद्दीने ठरवले.मनाची अस्वस्थता व मानसिक पडझड याची कशीबशी सांगड घालत आजचा दिवस मावळण्यापूर्वी कुणालाही माहित नसलेला जागतिक साजरा करावयाचा कुठला दिन आता पुन्हा कधी येणार आहे याचा शोध घेण्याचे व त्या संदर्भात त्या दिवसाची शास्त्रीय विश्लेषणात्मक विवेचने गोळा करण्याचे आव्हान एकमेव उघड्या असलेल्या डोळ्यांसमोर जेव्हा दिसू लागले तेव्हांच त्याने सर्व दु:खाला दूर सारून आपला दुसरा डोळा अर्धा उघडला. दुसरा डोळा पूर्ण उघडण्यापूर्वीच त्याच्या तल्लख अशा मेंदूने दिवसभरातील अभ्यासक्रमाच्या आवाहनांची पुनश्च उजळणी केली. कूस बदलून पलंगावरून खाली पाय ठेवण्याआधीच आपले दोन्ही डोळे आता संपूर्ण उघडले आहेत याचा पुरेपूर फायदा घेत प्रथम गुगलला पाचारण केले. जमिनीवर अर्धा पाय टेकताच त्याच्या डोळ्यांनी पुढील जागतिक दिनाची तारीख गुगलप्रमाणे कधी आहे याची नोंद घेऊन पुढील अभ्यासाच्या योजना कशा राबवायच्या ते ठरवले व त्यानंतरच दिनूने आपला एक पाय संपूर्णपणे जमिनीवर ठेवला. दुसरा पाय अर्धा जमिनीवर ठेवण्यापूर्वी पुढील जागतिक दिनाचे दिवशी प्रथम संदेश पाठवल्यामुळे आपले कसे कौतुक होऊ शकेल या सुखस्वप्नानी क्षणापूर्वी आलेले त्याचे नैराश्य दूर होऊन त्याच्यात चैतन्याची लहर उमटली. त्या सुखद लहरींवर स्वर होऊन दिनूने संपूर्ण उघड्या अशा दोन डोळ्यांनी झोपेतून उठून दोन संपूर्ण पायांवर उभे राहून त्या रविवारचा पहिला श्वास घेतला होता.

शेवटी नैराश्य झटकून व आळस संपूवून दिनक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या श्वानदिनाचा एकमेव अपवाद सोडला तर यापूर्वी आपण केलेल्या थोर कार्याची आठवण साक्षीला ठेवून नवीन तरतरीने दिनूने एका हाताने आपली डायरी उघडली. दुसऱ्या हाताने दिनू दातकांडीला पेस्ट लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. गेल्या वर्षी हयाच दिवशी त्याच्या दूरच्या मित्राच्या जवळच्या मामीला दंतचिकिस्तकाने कवळी लावून दिली होती. त्या मामीच्या शेजारणीने हि घटना रंगवून फेसबुक वर लिहिल्याने दिनूने या घटनेची त्याच्या डायरीत नोंद करून ठेवली होती. अशा ऐतिहासिक घटना दिनूच्या डायरीत न जातील तरच नवल. या घटनेचा पहिला वर्धापन दिन आज ३:४३ या शुभ मुहूर्तावर असल्याचेही दिनूची डायरी त्याला योग्य ती माहिती पुरवत होती. दिनूच्या मेंदूने मग या नोंदीच्या आधारावर लगेच कवळीचे महत्व, दंतकवळीचा उगम, दंतचिकित्सेचा इतिहास, कवळी बसवण्यामागील आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पार्श्वभूमी शिवाय कवळीचे विविध प्रकार, कवळीमुळे होणाऱ्या सोयी-गैरसोयी यांचे जागतिक चिंतन अशा कवळीशी निगडीत गोष्टींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. या घटनेशी संबधित अशी समाधानकारक माहिती मिळेपर्यंत दुसऱ्या हाताने दिनू आपल्या दातांवर जणू फड्याने आंगण झाडतोय या थाटात दातावर ब्रशने हल्ला करत होता.मिळालेल्या माहितीची वैधता आणि सत्यता तपासून पाहणे हे जरी गरजेचे नसले व पूर्णतःऐच्छिक असले तरी व्हात्साप वर सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या महामाहिती कोषातून त्याचे महत्व वाढवण्यासाठी कधी कधी हा वेळ वाया घालवावा लागतो असे दिनूला पूर्वानुभवावरून कळले होते.

चहासोबत सकाळी दररोजचे वर्तमानपत्र वाचणे हे दिनूच्या लेखी मागासलेपणाचे व बुरसटलेपणाचे लक्षण होते. सकाळी दारात पडलेले वर्तमानपत्र हे ताजे असते म्हणजेच त्यातील बातम्या हया अगदी नवीन असतात असा विश्वास बाळगणाऱ्या मंडळीवर दिनूचा खूप मोठा रोष होता.शेवटी वर्तमानपत्राची छपाई करण्यापूर्वी जी अखेरची बातमी पत्रकाराने लिहिताना ‘ताजी आहे’ म्हणून लिहिलेली असते तीच बातमी छापून सकाळपर्यंत एखाद्याच्या चहा टेबलावर येईपर्यंत प्रदीर्घ असा तीन-चार तासांचा कालावधी उलटून गेलेला असतो. तेंव्हा त्या तीन चार तासात शिळ्या झालेल्या बातम्यांना बहुसंख्य लोक अजूनही ताजे असे कसे संबोधू शकतात आणि अशा लोकांना मग पुढारलेल्या विचारसरणीचे म्हणताच येणार नाही याबद्दल दिनूला तिळमात्र संदेह नव्हता. खरे तर असे दररोज सकाळी उठून वर्तमानपत्र केवळ शिळ्या बातम्या बुबुळाखालून सरकवण्याच्या या असामाजिक प्रवृत्तीचा दिनूला खूप राग येत असे कारण अशा काही मूठभर जुन्या विचारसरणीच्या लोकांमुळेच दिनू सारख्यांचे कर्तृत्व जगासमोर येत नाही. नेमकी हीच प्रव्रत्ती खोडून काढण्यासाठी आणि सोबत त्याला व त्याच्या सारख्या कित्येक जाणकारांना त्यांच्या कर्तत्वाचे योग्य ते सामजिक श्रेय मिळवून देण्यासाठी अविश्रांत परिश्रम करून दिनूने व्हातसापच्या माध्यमातून एक प्रकारची चळवळच उभारली होती. यशाचा मार्ग हा अतिशय खडतर असतो असे दिनूला त्याच्या आजीने दहावीत दहाव्या वेळेस नापास झाल्यावर सांगितलेले पक्के लक्षात होते. सध्या चलनात असलेली परीक्षापद्धती व त्यातून निघणाऱ्या चुकीच्या सामाजिक निष्कर्षाविरुद्ध देखील दिनूचा लढा होता. जे ज्ञान पुस्तके वाचून आणि शालांत परिक्षेचा अभ्यास करून प्राप्त होऊच शकत नाही अशा ज्ञानाच्या ओढीमुळे त्याने आपले कार्य खूपच विस्तारले होते. या अशा दिव्य आणि विद्यापीठाने नेमलेल्या पुस्तकांच्या आवाक्याबाहेर असलेल्या ज्ञानाचा माहितीरुपाने सर्व सामान्य पदवी, द्विपदवीधरांपर्यंत व अतिसामान्य किंवा सुमार बुद्धिमत्ता असलेल्या समाजातील प्रत्येक सबळ, दुर्बळ घटकांपर्यंत प्रसार करण्याचा दिनूचा निर्धार होता. या उपक्रमात त्याची होत असलेली धडपड व सर्व समाजाला बुद्धिवादी करण्याचा उद्देश कौतुकास्पदच होता. अशा पार्श्वभूमीवर एखाद्या कुठल्या तरी जागतिक श्वान दिनाच्या गौरवाचा सर्वप्रथम संदेश पाठवण्याचा मान मात्र कोणीतरी दुसऱ्यानेच बळकावून घ्यावा यास त्याची उशीरा उठण्याची दिरंगाई जबाबदार होती. आजीने दहावी नापास झाल्यावर जास्त कष्ट करण्यास सांगितलेले उपदेश दिनूला आत्ताशी पटले. जास्त मेहनत व जास्त कष्ट करून त्याने दूरच्या मित्राच्या जवळच्या मामींची दंतकथा फुलवण्याचे ठरवले.

हल्ली प्रचलित असणाऱ्या दृश्य व श्राव्य अशा प्रसारमाध्यमांना समांतर असणारी यंत्रणा राबवणे हे निश्चितच खडतर असे आव्हान होते. ते निभावून नेण्याचा वसा घेतलेल्या दिनूने मग परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारणाऱ्या शिक्षणसंस्था व संस्कार करणाऱ्या अदृश्य समाजसंस्था या सर्वांसमोरच एक आव्हान उभे केले होते. तो सातत्याने पाठवत असलेल्या विविध विषयांच्या माहितीमुळे व जनजागृती संदेशामुळे सर्व सामान्यांच्या मनात अंधश्रद्धेची एक लाटच निर्माण होत होती. कधी सकाळी वर्तमानपत्रात एखाद्या व्यक्तीचे चांगल्या कामगिरीबद्दल कौतुक छापून आले असेल व नेमके त्याच वेळेस दिनूने जर त्याच व्यक्तीच्या कर्तृत्वाविषयी शंका व्यक्त करणारे संदेश पाठवले असतील तर लोकांना अंधश्रद्धेपोटी दिनूचीच बाजू खरी वाटत असे. दिनूने निर्माण केलेल्या या समांतर वृत्तसंस्थेविषयी असणारी आस्था मग सर्वसामान्य लोक अंगठे वर करून एका विशिष्ट व ठराविक अशा सांकेतिक चिन्हाच्या रूपाने आपली आवड, संमती कळवत असत. हे कुठल्याही गोष्टीला अंगठे वर करून पाठवण्याचे लोकांचे प्रमाण पहिले की निष्पाप अशा त्या वर्तमानपत्राची किंमत एका क्षणात कवडीशून्य होत असे. हे असे अनेक अंगठे दिनूला मात्र आपले ज्ञानवर्धन असेच पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देत असे. अशा परिस्थितीमध्ये संदेश प्रसारित करण्यापूर्वी दिनूने कटाक्षाने काही धडे आत्मसात केले होते. माहिती प्रसारित करण्यापूर्वी घेण्याच्या किरकोळ व घाऊक काळज्याचे त्याकडे एक काळजीपत्रक होते. शेवटी लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून एका अंधश्रद्धेचे आभासित जग निर्माण करण्यासाठी काळजीपत्रकानुसार वागणे अनिवार्य असते. हे काळजीपत्रकच तर त्याच्या यशाचे खरे रहस्य आहे. या काळजीपत्रकानुसार जर माहिती पाठवण्याचा उपक्रम हाती घेतला तरच ती माहिती वाचक स्वीकारतात असा दिनूचा ठाम अनुग्रह होता. या काळजीपत्रकाचे सतत अखंड असे नियमितपणे पारायण करावेच लागते. ध्वनीफिती व चित्रफिती या किती गुणोत्तरात व किती दिवसाच्या फरकाने कुठल्या समूहास कधी व केंव्हा पाठवाव्यात हे केवळ अनुभवाने शिकता येत असले तरी देखील दिनूच्या काळजीपत्रकात या बद्दल आवश्यक ती मार्गदर्शक तत्वे होती. लोकांची सर्वसामान्य अभिरुची ओळखूनच त्यांना तशा ध्वनीफिती, चलचित्रफिती पाठवण्याचा तो काळ आता कालबाह्य झाला होता. दिनूच्या मार्गदर्शक तत्वप्रणालीनुसार हे असे ध्वनीफिती वगैरे गोष्टी हाताळण्याची पद्धत खूप वेगळी होती.अभिरुची ओळखण्यापेक्षा अभिरुची घडवण्याकडे दिनूने प्रचंड लक्ष देऊन मेहनत केली होती. अतिशय लांबलचक असलेले संदेश किंवा खूप दीर्घ अशी माहिती कितीही उपयुक्त असली तरी त्या कडे फक्त दुर्लक्षच केले जाते. समाजाचा कुठलीही माहिती किंवा साहित्य खूप जास्त वेळ वाचू न शकण्याच्या मनोवृत्तीचाही दिनूने खूप सखोल अभ्यास केला होता. म्हणून वेळ पडलीच तर संपूर्ण रामायण किंवा समग्र संतसाहित्यगाथा केवळ एका परिच्छेदात नमूद करण्याचे सामर्थ्य त्याच्या लेखणीने मिळवले होते. परंतु, प्रत्येकच वेळेस लघुत्तम आख्यायिकाच लोकप्रिय होतील याची काहीही खात्री नसते. गणपती दूध पिऊ लागले तेव्हा रकाणे भरून लिहिणे महत्वाचे असते. सुप्रसिद्ध व्यक्ती दीर्घकाळ लघुशंकेस गेली तर त्याचे खुलासेवार रंजक असे विज्ञान खोलात शिरून त्या वर मग प्रदीर्घ असा प्रबंध सादर करण्याच्या क्लृप्त्यादेखील दिनूच्या या काळजीपत्रकाचाच भाग होता. एखाद्या संशोधकाला नोबेल पुरस्कार जरी मिळाला तरी त्या शास्त्रज्ञाविषयी कमीत कमी व पुरस्काराविषयी जास्तीत जास्त लिहिण्याची खबरदारी घेऊन दिनू वाचकांची अभिरुची पालटण्यावर जास्त भर देत होता. अगदीच क्लिष्ट असणारी प्रतिमायुक्त प्रतीकात्मक शार्दूलविक्रीडित वृत्तात लिहिलेली कविता जाणकार नेहमीच दुर्लक्षितात, म्हणून अशा जाणकार वर्गाकडे लक्ष देऊन कधी गद्याची फोडणी असलेले पद्य सादर करण्यात तर दिनूची मार्गदर्शिका खूपच उपयुक्त होती. सतत असे वेगवेगळे प्रयोग करून वाचकाची अभिरुची बदलण्याचे श्रेयही दिनूचेच होते.

अकराशे वर्षापूर्वी दिसलेल्या व दर अकराशे वर्षांनी एकदा दिसणाऱ्या एका अद्भुत ताऱ्याचा शोध लावून दिनूने खूपच समाजप्रबोधन केले होते. मानवी बुद्धीमतेच्या सीमा कितीही विस्तारल्या तरी अकराशे वर्षापूर्वीच्या घटनांचे स्मरण व त्याची सत्यता पडताळण्याचे सामर्थ्य कुणात असण्याची सुतरामही शक्यता नसल्याने ही माहिती अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. त्यानुसार इतरांनीही दर ४३८ वर्षांनी एकदा दिसणारा पक्षी, किंवा दर ५०० वर्षांनी प्राण्याची निर्माण होणारी नवीन जात किंवा कित्येक हजार युगांनी एकदाच आकाशात दिसणारा साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या छबीचा ढग यासारख्या तत्सम विषयांवर संशोधन सुरु ठेवून दिनूला या क्षेत्रातील अशा शोधकामांचा गुरु मानून बोध घेतला होता. कित्येकदा या दुर्मिळ घडणाऱ्या अनंत घटना वारंवारपणे घडू लागल्या की लोकप्रियतेला ओहोटी लागते आणि म्हणूनच अशा प्रकारच्या संशोधनाच्या परिसीमा आणि त्या योग्य वेळी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगण्या विषयीच्या सूचना दिनूच्या काळ्जीपत्रकाचाच एक सोनेरी भाग होता. हिरवे डोळे, सोनेरी चोच व मोरपंखी पिसे असलेला एक गुलाबी पक्षी एकदा दिनूला स्वप्नात दिसला होता. या पक्षाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी त्याने कित्येक नामांकित चित्रकारांना पाचारण करून त्या पक्षाचे वर्णनावरून चित्र काढून घेऊन तो स्वप्नातील दुर्मिळ असा खजिना प्रसिद्ध केल्यानंतर, कितीतरी निष्ठावंत व जातीचे संशोधक उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत तो पक्षी आजवर धुंडाळत आहेत. शोधाचे श्रेय मात्र दिनूने स्वतःच्या लेखी घेऊन असे दुर्मिळ संशोधन हुडकून प्रसिद्ध करण्याचा छंद मोठ्या व्यावसायिकतेने लोकप्रिय करून पुढच्या संशोधनासाठी खाद्य मिळावे या हेतूने रोज शांतपणे स्वप्नांची वाट पाहत समाधानाची झोप घेऊ लागला. अस्तित्वात नसलेल्या संकल्पनांना मूर्तरूप देऊन त्या कल्पनांचा विस्तार लोकमान्यतेच्या स्वीकारक्षमतेपर्यंत करण्याची कुशाग्रता आणि वेळ पडलीच तर लोकांच्या स्वीकार क्षमतेचा विस्तार करण्याची क्षमता असलेले चातुर्यप्रवीण लिखाण करण्यामागे दिनूचा हातखंडा होता.
काहीच सुचत नसेल तर बुद्धिवंतांना त्यांच्या प्रतिभेची शपथ घालून अधूनमधून त्यांना कोडी सोडवण्यात गुंतून ठेवण्याचे मार्गदर्शन देखील दिनूच्या काळजीपत्रकात होते. कोडी पाठवत असताना कोंडी कशी होईल यावर दीर्घविचार करणे गरजेचे असते. कोड्यांचे पुष्कळ गटप्रकारामध्ये वर्गीकरण होते. कधी हे वर्गीकरण वयोमानानुसार असते म्हणजे लहान शाळेकरी मुलांची कोडी, शब्द ओळखा स्पर्धा किंवा पदवीधरांसाठी सुलभ गणिताची कोडी. वृद्धांसाठी जोडया जुळवा वगैरे वगैरे. वयोमानाप्रमाणे वर्गीकरण झाल्यानंतर पुरुष विरुद्ध स्त्री असे वर्गीकरण करून कोडी बनवली जातात.स्त्रियांसाठी गाणी ओळखा, भाजींची नावे ओळखा , गायक ओळखा अशी अनोळखी ओळख शोधून काढण्यासाठीची काही कोडी असतात तर ओळख वर्गवारीत पुरुषांच्या गटासाठी देशाचे नाव ओळखा, गायकाचे नाव ओळखा वगैरे प्रकारांची कोडी कधी कधी पाठवावी लागतात. शब्दकोडी, चित्रकोडी, संख्यागणित कोडी, चित्रपट कोडी, चित्रगीत कोडी, संगीतकार कोडी, भाजी कोडी, भांडी कोडी, सोडवाच पाहू कोडी, सोडून दाखवाच पाहू कोडी, सरपटणारी कोडी, लंगडणारी कोडी, झगडणारी कोडी, बुध्यांक तपासणारी कोडी, स्मरणशक्ती तपासणारी कोडी, वाचन लिखाण (अर्थात व्हात्साप्प्वरील) कोडी, ऐतिहासिक कोडी, पाककृती कोडी, इत्यादी अनेक कोडयांचे योग्य असे वर्गीकरण करून ठेवावे लागते. या कोडयांचा संग्रह व त्यांचा साठा जितका अधिक असेल तितके उत्तम. एखाद्या तबलजीची गुणवत्ता ही त्याला अवगत असलेल्या उत्तोमोत्तम बंदिशीच्या संग्रहानुसार ज्याप्रमाणे केली जाते त्याप्रमाणेच दिनूसारख्यांचे भवितव्य व प्रतिष्ठा ही त्यांच्याजवळ असलेल्या विविध प्रकारच्या कोडयांच्या संग्रहावरून ओळखता येते.दिवसातल्या कुठल्या प्रहरी कुठले कोडे पाठवावे याचे तारतम्य बाळगण्याची सामान्य काळजी बरेच जण घेताना दिसत नाहीत. अगदी सकाळी किंवा दुपारी किमान बारा पर्यंत पाक पदार्थांची नावे ओळखण्याची कोडी जर पाठवली तर त्यास महिलावर्गाकडून त्यांचा तेव्हा खऱ्याखुऱ्या पाकशास्त्राची कोडी सोडवण्यात व्यर्थ वेळ जात असल्याने अपेक्षित तो प्रतिसाद मिळणे अवघड असते. परंतु हयाच नियमाचे कटाक्षाने पालन करणाऱ्यांवर निराशेची वेळदेखील दिनूने आगाऊपणे मनोविश्लेषण जाणून रविवारी सकाळी सकाळीच अशी कोडी महिलावर्गास पाठवून त्यांचा भरघोस असा प्रतिसाद मिळवून इतरांवर अनेकदा जळफळाटीची वेळही आणली आहे. तेव्हा एखाद्याने दिनूचे काळजीपत्रक जरी चोरले व त्यातल्या नियमांचे, मार्गदर्शक तत्वांचे संपूर्ण जरी पालन केले तरी यशाची हमी देता येत नाही. नियम जरी समजले तरी त्यातील अपवाद समजून घेण्यास अनुभवी शहाणपण लागते. कायदा समजल्यावरच त्यातल्या त्रुटी समजू शकतात. लोकांची मानसिकता समजली तरच मने बदलू शकतात. या सर्व मनोविश्लेषणासाठी लागणारी पार्श्वभूमी दिनूने परिश्रमाने निर्माण केली होती. नुसताच कोडयांचा रतीब टाकून स्वतःचा संग्रह श्रेष्ठ दाखवण्याच्या स्पर्धेत नेहमीच दिनूच्या कोडयांनी त्याचे प्रतिस्पर्धी मात खात असतात.

अष्टपैलू ज्ञानविज्ञान अशी नवीन संज्ञा दिनू उभी करू पाहतोय. हे अष्टपैलू ज्ञान अर्थातच कुठल्याही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञान आहे. विद्यापीठाचे अभ्यासक्रम हे साचेबद्ध व नियमबद्ध असतात. कुठल्या अभ्यासक्रमासाठी नेमके ज्ञान कुठले, कसे, किती वाटायचे याचा विद्यापीठाकडे नियोजनबद्ध आराखडा असतो. पाककृती शिकण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना फक्त पाककृतीच शिकवल्या जातात. तसेच शिवणकाम, सुतारकाम किंवा अन्य कुठलीही विशेष प्रतिभा गहण करणाऱ्याच्या मूळ हेतूत विद्यापीठीय शिक्षणाने बाधा येत नाही. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यास मंत्रपठण शिकवले जात नाही. कला आणि विज्ञान शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास सरकारी उत्पन्न करांबद्दल ज्ञान दिले जात नाही. मधुमेहावरील उपचार तर फक्त वैद्यकीय महाविद्यालयातच शिकवले जातात. अशा अनेक नानाविविध प्रकारच्या त्रुटी विद्यापीठीय शिक्षणात असल्याने आपल्या देशाची व समाजाची प्रगती खुंटून तिने एक मर्यादा गाठली आहे. जर सर्वांगीण विकास अपेक्षित असेल तर सर्वांगीण शिक्षणाची गरज असते. याच धर्तीवर दिनूची अष्टपैलू ज्ञानाची संज्ञा आधारित होती. अष्टपैलू ज्ञान विद्यापीठात प्रवेशासाठी कुठलीही प्राथमिक पात्रता प्रवेशपरीक्षा देण्याची गरज नाही. केवळ पात्रता परीक्षा नापास झाले म्हणून वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी किंवा कुठल्याही मर्जीनुसार ठरवलेल्या अभ्यासक्रमासाठी इच्छित शिक्षण संस्थेत प्रवेश न मिळाल्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना नैराश्य येते. या नैराश्यापुढे तरूण पिढी आपला आत्मविश्वास गमावून बसते. पुढील सामाजिक प्रगतीचा पायाच हा मुळी तरूण पिढीवर अवलंबून असल्याने आपला पाया मजबूत होत नाही आणि म्हणूनच देशाच्या विकासाची इमारत त्यावर खंबीरपणे उभी राहू शकत नाही. अशा विचारांच्या पुरस्कर्त्यांमध्ये दिनूचा आघाडीचा क्रमांक होता. केवळ शैक्षणिक पात्रता परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यामुळे कित्येक गरजू अशा विद्यार्थ्यांचा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील ज्ञान हस्तगत करण्याच्या महत्वकांक्षा अगदी धुळीत मिसळत होत्या. अशा गरजू व उत्साही विद्यार्थ्यांना त्यांचा ज्ञानवर्धनाचा हक्क मिळवून देण्यासाठीच दिनूने सुरूवात केलेल्या या चळवळीस भरघोस पाठिंबा मिळत होता व दिनूसारखे कित्येक स्वयंसुधारक मंडळी हा ज्ञानरथ देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ही तेजोमय ज्ञानज्योत लखलखत ठेवून ‘अष्टपैलू ज्ञान’ ही संज्ञा लोकप्रिय करत होती. पात्रतेस कुठलीही प्रवेशपरीक्षा नसली तरी अष्टपैलू ज्ञानविज्ञान या उपक्रमात सहभागी होण्यासाठी फक्त एका भ्रमणध्वनीची आवश्यकता असते. या मुक्त ज्ञानविज्ञान संकल्पनेत अष्टपैलू ज्ञान हस्तगत करण्यासाठी प्रत्यक्ष कुठलेही शुल्क नसले तरी जागतिक सांकेतिक स्थळांना भेट देण्यासाठी भ्रमणध्वनी उद्योजकांनी नेमून दिलेल्या नाममात्र किरकोळ रकमेचे भांडवल जरुरी असते.. जास्त व अधिकाधिक ज्ञान हवे असेल तर त्या प्रमाणात हे भांडवल वाढवावे लागते, बस्स एवढेच काय ते शुल्क. शेवटी मिळणारे ज्ञान हे कधीच देणाऱ्याच्या कुवतीवर अवलंबून नसते. देणाऱ्या गुरुजनांकडे नेहमीच ज्ञानाचा महासागर असतो; ते ज्ञान आत्मसात करण्याची प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व मेहनतीसोबत त्या ज्ञानाचे पारायण करण्यासाठी बहुतांश उपलब्ध असलेला आयुष्यातील बहुमूल्य वेळ ज्ञान ग्रहण करण्यात घालवावा लागतो. जितका जास्त वेळ तुम्ही या अष्टपैलू ज्ञानविज्ञानाच्या संपर्कात रहाल तितक्याच जास्त प्रमाणात तुमचे सर्वांगीण ज्ञान वाढण्याची शक्यता असते आणि तेवढाच भ्रमणध्वनीचा खर्चदेखील. एवढी जुजबी आर्थिक झळ सोसण्याची तयारी असल्यावर अष्टपैलू ज्ञानविज्ञान घेऊन तुमचे व्यक्तिमत्व अष्टपैलू करण्यासाठी हा ज्ञानयज्ञ अखंड तेवत असतो. विद्यापीठीय शुल्कांसमोर हे असे शुल्क अगदीच नगण्य असल्याने सूज्ञ पालक त्यांच्या पाल्यांना या अष्टपैलू ज्ञानसंकल्पात सहभागी होण्यासाठी फारसा विरोध करत नाहीत. किंबहुना बहुतांशी पालक तर ते स्वतः त्यांना गरज असताना याच दुष्ट अशा विद्यापीठीय परीक्षा पद्धतीमुळे त्यांच्या जुन्या हुकलेल्या संधी परत या माध्यमाने गवसत असल्याच्या आनंदापोटी स्वतःहूनच या अष्टपैलू ज्ञान संज्ञेचे पुरस्कर्ते बनतात व जेव्हा पालकच जास्तीत जास्त वेळ या मुक्त ज्ञानगंगेत घालवतात तेव्हा पाल्यांवर कुठलेही नियंत्रणवा बंधन उरत नाही.

या अष्टपैलू ज्ञान संकल्पनेला जशी कुठल्याही पात्रता प्रवेश परीक्षा पास होण्याची अट नाही तसेच कुठल्याही वयोमर्यादेची देखील अट नाही. यामुळे बहुसंख्य पालकवर्ग देखील अशा शिक्षासंज्ञेचा अनुयायी बनत आहे. ज्ञानाचे चौखुर वाटप अहोरात्र चालू असल्याकारणे फक्त ‘वेळ’ हाच एक ज्ञानी बनण्यामागे अडसर उरला आहे. अगदीच वयोवृद्ध अशी घरातील आजी-आजोबा अशा वडीलधाऱ्या मंडळींवर मात्र पुढच्या पिढीवर म्हणजेच नातवंडावर संस्कार करून त्यांना सामाजिक जाणिवांची ओळख करून देण्याची नैतिक जबाबदारी असते. लहानपणापासूनच कुठल्याही मुलाच्या जडणघडणीमध्ये त्याच्या आजी-आजोबांच्या सहवासाचा व त्यांनी केलेल्या संस्काराचा फार मोठा वाटा असतो. आजी-आजोबांना या त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची खूप जाणीव असते. जेव्हा अष्टपैलू ज्ञान संज्ञेत वयाच्या अटीची पात्रता नाही हे कळाले तेव्हा समस्त आजी आजोबांनी देखील हा ज्ञानरथ पुढे असाच वाहण्यासाठी मोलाची मदत करण्यास सुरुवात केली. वेळेची कमतरता व वेळेचा अभाव या अडसरींच्या पलीकडे जाऊन प्रतिकूल वयोमानावर मात करून लवकरात लवकर ज्ञान मिळवण्यासाठी आजी आजोबा संघटना झटू लागली. पृथ्वीवरील आपले कार्य संपून ईश्वराघरी जाण्यास जास्त कालावधी उरला नसल्याने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उर्वरित ज्ञान ग्रहण करण्यासाठी वयोवृद्धांची धडपड सुरु झाली. एवीतेवी देखील वयोमानाप्रमाणे रात्रीची झोप कमी झाली होतीच. तेव्हा रात्र सत्कारणी लावण्यासाठी आजी-आजोबा संघटना या अष्टपैलू ज्ञान संकल्पनेच्या मागे अगदी झपाटून लागली. त्यात आजीचा बटवा, मंत्रोपचार, सणांचे महत्व, धार्मिक रूढी, ऐतिहासिक परंपरा, मंदिरांची माहिती, देवाची महंती, शहरांचा विकासालेख, गेल्या शतकातील प्रगतीचा दशकानुसार आढावा, बदलत्या संस्कृती, अर्वाचीन व्यक्तीमत्वांचे प्राचीन उत्खणन, दुर्मिळ मैफिलींच्या आठवणी, निसर्गचक्रानुसार बदललेली विचारसरणी इत्यादी अनेक गोष्टीवर आजी आजोबा संघटनांनी प्रकाश टाकण्यास सुरुवात केली. या अशा ज्ञानाच्या पाझरणाऱ्या झऱ्याची कित्येक जणांना विद्यापीठीय शिक्षणात पीएच. डी. सारखी पदवी प्राप्त करण्यासाठी मदत होऊ लागली. आजी-आजोबांचा बहुतांश रात्रीचा वेळ स्वतःसाठी ज्ञान हस्तगत करण्यात तर दिवसाचा सर्व वेळ गरजूंना विविध विषयात मार्गदर्शन करण्यात जाऊ लागला.त्यामुळे दिनूच्या या अष्टपैलू ज्ञानसंज्ञेने आजी आजोबांचे त्यांच्या नातवंडांना रात्री गोष्टी सांगून किंवा लहानांवर गप्पागोष्टीमार्फत, संवादामार्फत संस्कार करण्याची पिढयांतर्गत चालू असलेली कौटुंबिक पद्धत कालबाह्य करून टाकली. आजी आजोबांना देखील या जबाबदारीतून मुक्त झाल्याकारणे आयुष्यातील उरलेला वेळ सत्कारणी लावण्यास दिनूच्या अष्टपैलू ज्ञानसंज्ञेने एक वेगळेच असे निमित्त मिळवून दिले.

या अशा अष्टपैलू ज्ञान विज्ञान संहितेत अगदी लहानात लहान पासून ते आबालवृद्धांपर्यंत ज्ञानसाधनेची गोडी निर्माण झाली. पुरातन काळातील कितीतरी पद्धती, परंपरा, रीतीरिवाज बदलण्यास ही ज्ञानसाधना कारणीभूत ठरली. परिपूर्ण नागरिक होऊन यशाची गुरुकिल्ली मिळवण्यासाठी समस्त जणांची धडपड चालू झाली होती. कुत्रा चावल्यावर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाय इथपासून ते अंतराळ क्षेत्रातील शेती या विविध विषयांवर विद्वत्तापूर्ण माहिती सहजपणे उपलब्ध होत होती. ही माहिती जमवून त्याचा सर्वत्र प्रसार करणारे दिनूसारखे जागरूक नागरिक म्हणजे तर या अष्टपैलू ज्ञानविज्ञान विद्यापीठाचे स्वयंघोषित असे अनभिषिक्त कुलगुरूच होते. समाजकंटकी मनोवृत्तीच्या काही जणांनी ह्यांना व्हात्साप्प व्यसनी असे उल्लेखून तुच्छ अवहेलना केली असली तरी दिनूच्या कार्याची महंती व लोकप्रियता या विघ्नसंतोषी लोकांना खुपत असल्याने ज्ञान विज्ञान प्रसाराची शपथ घेतल्याने दु:प्रचार होत असल्याची दिनूला खंत वाटत नव्हती. याच समाजकंटकांनी कधी काळी संतांचीही अशीच अवहेलना केली होती. या ज्ञान रथाच्या सेवार्थ वाहून घेतलेल्या आयुष्यास जर कोणी व्यसनी म्हणत असेल तर त्यांच्या व्यापक बुद्धीची दिनूला कीव करावीशी वाटे.

या अशा ज्ञानविज्ञान संहितेचे अनेक फायदे समाजाला होत होते. फसवणुकीच्या विविध प्रकारांवर आळा घालण्याच्या नवीन पद्धतींचे आकलन होत होते.कधी जर मधामध्ये गूळ मिसळला असेल तर तो कसा ओळखावा किंवा दुधात चुना मिसळला असेल तर ती भेसळ कशी पकडावी अशा अनंत प्रकारच्या माहितींनी लोकांना ज्ञान मिळत होते. या सर्वांचा फायदा चोरी करण्याच्या विविध पद्धती ठरवण्यामध्ये देखील होत होता. पूर्वी कुठल्याही रोगाला बरे करण्यासाठी सर्वसामान्य लोक वैद्यकीय सल्ला घेत असत.अष्टपैलू ज्ञानविज्ञान मोहिमेनंतर फक्त असामान्य लोक वैद्यकीय सल्ला घेतात उर्वरित सारे जण वैद्यकीय सल्ला देतात.सर्दी-पडसे पासून ते कर्करोगाची लक्षणे ओळखण्यापर्यंत व त्यावर योग्य उपचारपद्धतीचे मार्गदर्शन या अष्टपैलू ज्ञानसंहितेत मिळते.देश, विदेशातील रूढी व परंपरा, जागतिक आंतरराष्ट्रीय घटना, स्थानिक घडामोडी, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, वित्त, महसूल, संरक्षण, इतिहास, विज्ञान, मनोरंजन,साहित्य, क्रीडा, वाणिज्य,आधुनिक पेहराव पद्धत, आरोग्य, नियोजन, शेती, तंत्रज्ञान इत्यादी अनेक विषयांवरील कधीही न माहित असलेली माहिती संकलित करून लोकांना पाठवणे हा आता म्हणून दिनूचा छंद नाही, व्यवसाय नाही तर गरजेचा भाग बनला होता. कला, संगीत, वाड्मय या क्षेत्रामधील दिग्गज अशा प्रतिभावंतांनी दुर्लक्षित केलेल्या अप्रसिद्ध गोष्टींचा खुलासात्मक आढावा घेण्याच्या ध्यासापोटी कित्येक गुणीजणांनी आपले आयुष्य खर्ची केले आहे. परंतु या सर्व गोष्टी चुटकीसरशी मागेल त्यास हवे तेव्हा व हवे तितके उपलब्ध करून देण्याचा संकल्प मात्र दिनूसारख्या महात्म्यांनी सोडला होता. कुठल्याही क्षेत्रात अनेक जण असतील तर स्पर्धा निर्माण होते. तशीच एक वेगळी स्पर्धा दिनूच्या साम्राज्यातही निर्माण झाली होती.

कुठलाही संदेश सर्वप्रथम कोण पाठवू शकतो याबाबत ही तीव्र चढाओढ होती. कुठलीही माहिती ही विद्युल्ल्तेने जगाला पाठवणाऱ्यास सर्वश्रेष्ठ कुलगुरूचा जणू बहुमान मिळणार असतो असे समजून दिनू व त्याचे प्रतिस्पर्धी या मध्ये नकळतच एक स्पर्धा निर्माण झाली. लोकांना कुठूनही आलेली व कुठल्याही विषयावरची माहिती तत्परतेने पाठवण्यात मग कित्येक जणांना धन्यता वाटू लागली. एखाद्याने पाठवलेल्या माहितीस किंवा विनोदास किंवा चित्रास किंवा ध्वनीफितीस जितके जास्त संमतीदर्शक होकारार्थी अंगठयाची सांकेतिक खूण प्रत्युत्तर म्हणून पाठवतील तितकी त्या पाठवणाऱ्याची किंमत किंवा प्रतिष्ठा वाढू लागली. दिवसभरात जास्तीत जास्त अंगठे गोळा करण्याच्या इर्षेने कित्येक जण स्फूर्ती घेऊन हा ज्ञानचा महाकुंभ तेवत ठेवत होते अन यातून स्वतःचे वेगळे अस्तित्व टिकवण्यासाठी व प्रतिष्ठा, मानमरातब वाढवण्यासाठी दिनू दिवसरात्र इतरांपेक्षा अधिक खपत होता. या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचे असेल तर किंवा सदैव या क्षेत्राचा सम्राट असे गौरवून अष्टपैलू ज्ञानविद्यापीठाचे स्वयंघोषित महाकुलगुरुपद भूषवायचे असेल तर दिवसरात्र व्हात्साप्प वर उपलब्ध असणे अपरिहार्यच होते.इतर कोणाच्याही आधी सर्वांना सुप्रभात चिंतणे व सर्वात शेवटी शुभरात्री विषयी सुविचार व्यक्त करणे म्हणजेच दिवसातील पहिला शब्दही माझा अन शेवटचा शब्दही माझाच असण्यासाठी एक विचित्र धडपड सुरु झाली होती. या शर्यतीत कितीतरी दिवसांनी आज दिनूचा पराभव झाला होता. जागतिक श्वान दिनानिमित्त काही उपदेशात्मक विचार पाठवण्याच्या क्रमवारीतील नेहमीप्रमाणे मिळणारा पहिला क्रमांक हुकल्यामुळे जनजागृतीचे श्रेय आजच्या दिवसापुरते तरी दिनूला मिळणार नव्हते. अशा परिस्थितीत दूरच्या मित्राच्या जवळच्या मामींच्या दंतकवळीचा पहिला वर्धापन दिन अतिशय धडाक्यात साजरा करण्याचे दिनूने आधीच ठरवून टाकले होतेच. सकाळी सुचलेल्या विचारांच्या व्यतीरिक्त आणखी काही बहुमूल्य विचार दिनूला सुचू लागले. त्यानुसार कवळी बसवणाऱ्या त्या दंतचिकित्सकाला सर्वप्रथम अभिनंदनपर ई-पुष्पगुच्छ पाठवणे, दगडासारखे चणे व दगडासारखे दगड पदार्थ आयुष्यभर खाणाऱ्या मामांना या प्रथम वर्धापनदिना निमित्त मुलाखतीसाठी पाचारण करणे व नंतर कवळी बसवण्या मागील कौटुंबिक पार्श्वभूमीचा सर्व परिचितांना व कुटुंबियांना रहस्य उलगडा करणे, कवळीचे प्रकार, फायदे, तोटे, पूर्वी व नंतर असे अनुभव, कळकळ आणि कळवळ या ग्रंथाचे संकलन, कवळी या प्रकाराचा शोध आणि बोध अशा परिसंवादाची झलक, कवळीचे न उलगडलेले अनंत रंग, कवळीचे लपलेले पैलू आणि मामींचे हसरे, चावरे, दात फेंदारलेले, दात उगारलेले, दात सांडलेले, दात गिळलेले, दात दाखवलेले, दात खाल्लेले, दात बसवलेले व न बसवलेले प्रतिमाचित्र असे विविध प्रकार सर्व संबंधितांना पाठवून झाल्यावरच दिनूला सकाळचा पहिला चहाचा घोट दाताखालून घशामध्ये ढकलावासा वाटला.

शेजारी राहणाऱ्या, म्हणजे अगदीच शेजारी नाही, फक्त पाच जिल्हे दूर राहणाऱ्या त्याच्या आत्याबाई जेंव्हा तीर्थयात्रेस निघाल्या आहेत हे दिनूला कळले तेंव्हा कपातील चहा संपेपर्यंतच्या अल्प कालावधीत पार पाडावयाच्या किती तरी क्रियांनी दिनूचा मेंदू व्यापून गेला. ‘धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेट’ अशा विशेष वर्गीकरण करण्याच्या शिस्तबद्ध सवयीनुसार फावल्या वेळेत दिनूने खजिना पूर्वीच जमा करून ठेवला होता. एखादी प्रसिध्द व्यक्ती जर रुग्णालयात मृत्युशय्येवर असते तेंव्हा जसे पत्रकार आपला त्या व्यक्तीच्या चरित्राविषयीचा मजकूर तयार ठेवून तो मजकूर दु:खद निधनाची बातमी कळल्याच्या क्षणी प्रसिद्ध करतात तसे दिनूच्या खजिन्यात अशा अनेक ठरलेल्या प्रसिद्ध घटना प्रसंगी पाठवण्याच्या मजकुराची तपशीलवार यादी नेहमीच तयार असायची. अशा ऐन वेळेवर म्हणजे चहा संपेपर्यंत तीर्थक्षेत्रांबद्दलचे संदेश जर नव्याने निर्माण करायचे असतील तर दुपारपर्यंत देखील चहा संपूच शकणार नाही.शिवाय अशा तातडीच्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठीच फावल्या वेळात दिनूने विविध विषयांवरील माहिती पूर्व संकलित करून त्याच्या संग्रही ठेवली होती. अशा वेळीच त्याला या संग्रहाचा पुरेपूर फायदा होणार होता. प्रत्येक तीर्थक्षेत्राबद्दल त्याच्याकडे इतकी सविस्तर माहिती होती की आत्याबाई संपूर्ण प्रवासात इतर काहीही न करता म्हणजे न जेवता, न झोपता, न वेळ दवडता, देवदर्शन झाले की अहोरात्र वाचत बसल्या तरी परत आल्यावर किमान दोन तीन वर्षात देखील इतकी माहिती वाचून पूर्ण होणे हे शक्य होणार नाही. इथे संपूर्ण माहिती ही वाचक वाचेलच असे गृहीतच धरायचे नसते. (इथे निबंध लेखकाने मात्र तुम्ही हा निबंध पूर्ण वाचाल असे गृहीत धरले आहे) माहिती पाठवणे गरजेचे. माहिती त्वरित पाठवणे प्रतिष्ठेचे. माहिती सर्व प्रथम पाठवणे निकडीचे. भावना कळल्या तरी पुरे. काशीला जाताना प्रवासात अखंड रामनामाचा जप करण्याची प्रथा कालबाह्य ठरवून पौराणात्य धार्मिक तीर्थक्षेत्रावर संशोधनपूर्वक संकलित केलेली ऐतिहासिक बातमी वाचून संपवण्याचा प्रघात सुरु करण्याचे श्रेय देखील दिनूसारख्या समविचारी पिढीचेच!

जेंव्हा दिनूला खात्री पटली की दंतकवळी आख्यायिका आणि तीर्थक्षेत्र पुराण यामधून बाहेर सावरून पडण्यास वाचकास थोडा तरी कालावधी निश्चितच लागणार आहे तेंव्हा त्याने पुढील आकर्षक व अघोषित अशा नवीन जागतिक दिनाचा शोध घेण्यास सुरूवात केली. मातृदिन, पित्रदिन, पुत्रदिन, बंधुदिन वगैरे नातेसंबंध जोडणारे व नाते दर्शवणारे दिन जागतिकरित्या कितीतरी म्हणजे शेकडो वर्षांपासून साजरे होत असल्याने त्यात नवलाचे असे काहीच नव्हते. कालानुरुपे मनुष्याचा जसा जसा विकास होत गेला व समाज जसा जसा अष्टपैलू ज्ञानसंज्ञेच्या आहारी जाऊ लागला तसतसा नकळतच नवनवीन नात्यांचा देखील विकास होत गेला. पूर्वी न अनुभवलेली नवीन नाती जन्माला येऊ लागली. या नवीन जिव्हाळ्यातूनच नातीसंबंध साजऱ्या करणाऱ्या नवीन प्रकारच्या जागतिक दिनांची इतिहासात नोंद होत गेली.त्याप्रमाणे जागतिक शेजारधर्म, जागतिक पती पत्नी दिवस, (पती कुणाचा तरी आणि पत्नी कुणाची तरी) जागतिक पतिव्रता दिवस, जागतिक मेहुणा मेहुणी दिन, जागतिक चुलत सासरे दिन, जागतिक आते भाऊ बहीण संघटना शिवाय जागतिक दर्जावर मावस, आते, चुलत अशा समस्त दीर, नणंदा, भाऊ, बहीण, मावशी, काका, पुतणे, भाच्चे, मामा, सासू, सारे, आजी, पणजी, पणजोबा, यांचे स्वतंत्र असे जागतिक दिन साजरे करण्याची प्रथा सुरु केली गेली.

जागतिक दिनाची वर्गवारी केली तर नातेसंबध हा एक गट असला तरी स्वभाव वैशिष्टय आणि कलानिपुणता हा दुसरा गट असतो. स्वभाव वैशिष्टयानुसार बऱ्याच विविध प्रकारांचे जागतिक दिन साजरे होत असतात. त्यात जागतिक रागट दिन, हास्य दिन, मायाळू दिन, चिडचिड दिन, वसवस दिन, कटकट दिन, रडकुंडा दिन व जागतिक राक्षस दिन असे विविध स्वभाव वैशिष्टये गौरविली जातात. कलानिपुणतेला गौरवण्यासाठी जगातील प्रत्येक वाद्याचा आपला स्वतंत्र असा जागतिक दिन असतो. त्यातही तालवाद्ये व तंतूवाद्ये स्वतंत्रपणे आपआपला जागतिक दिन साजरा करतात. नृत्य, संगीत, साहित्य, क्रीडा या क्षेत्रातील महत्वाचे उपप्रकार लक्षात घेऊन नानाविविध जागतिक दिनांची निर्मिती केल्या गेली. जागतिक क्रीडा दिनात मात्र क्रिकेटचा समावेश न करता या खेळाची लोकप्रियता लक्षात घेऊन स्वतंत्रपणे जागतिक क्रिकेट दिनाची व्यवस्था केलेली आहे. ज्या प्रकाराची लोकमान्यता जास्त, ज्या प्रकाराची लोकप्रियता जास्त, ज्या कलेकडे सर्वसामान्य जनसमूहाचा ओढा असतो , ज्या कलेकडे लोकांचा अधिकोत्तम कल असतो, ज्या कलेबद्दल वर्षभर दुर्मिळ व तुटपुंज्या स्वरुपाची माहिती लोकांसमोर येते या निकषांवर जागतिक भाषा दिनांची घोषणा करण्यात आली. दुर्मिळात दुर्मिळ अशा भाषांचा गौरव करण्याच्या स्मरणार्थ जागतिक मराठी दिन वर्षातून एकदा तरी दिमाखाने साजरी करण्याची प्रथा सुरु झाली. या जागतिक मराठी दिना दिवशी आवर्जून सगळ्यांना मराठीचा प्रसार करण्याचे व मराठी भाषेची अवीट गोडी वर्णायचे आवाहन इंग्रजीत करण्यात येते. शेवटी मराठी भाषेचा जागतिक मराठी दिनानिमित्त गौरव होणे हे उद्दिष्ट असते. ते कृतीतून गाठण्यासाठीचा प्रयत्न किंवा अट्टाहास महत्वाचा नसतो तर इतर कुठल्याही परभाषेत किंवा सर्वांनाच अवगत असलेल्या इंग्रजी भाषेतून मराठी भाषेबद्दलचे गौरवोद्गार काढून जागतिक मराठी दिनानिमित्त भावना पोचवणे इष्ट ठरते. समाजात जनजागृती करण्याच्या दृष्टीने दैनंदिन जीवनातील किती तरी कृतींचा जागतिक दिन वर्गवारीत समावेश होण्यासाठी सतत धडाडीचा प्रयत्न सुरूच असतो. तरीदेखील त्यातील काही अति महत्वाच्या कृतींचा खास लोकग्रहास्तव जागतिक दिनामध्ये समवेश करण्यात आला. यामध्ये जागतिक निद्रा दिन, पाक दिन, नखे काढणे दिन, खोळी बदलणे दिन, बूटपोलिश दिन, खवैय्या दिन अशा प्रकारांना स्थान देऊन गौरव करण्यात आला. स्त्रियांसाठी पुरी भाजी दिन, पुरुषांसाठी भजी दिन साजरी करण्याची नवी प्रथा सुरु करण्यात आली.

पूर्वी घरोघरी सण साजरे केले जात. कालनिर्णय किंवा अशा तत्सम दिनदर्शिकेत लाल रंगानी सण ठळकपणे दाखवण्याची प्रथा अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. अशा दिवशी म्हणे लोकांना सरकार सुट्टी जाहीर करत असे. सुट्टीच्या दिवशी गोड धोड खाऊन सण साजरे केले जायचे. परंतु अशा सुट्ट्यांमुळे देशाचे उत्पादन घटू लागल्याने च्या सर्व सुट्ट्या काही वर्षापूर्वी बंद करण्यात आल्या. हल्ली दिनदर्शिकेत अशा सणांच्या ऐवजी जागतिक दिन दर्शविण्याचा परिपाठ सुरु केला गेला. सुट्टीत गोडधोड खाऊन सण साजरे करण्यापेक्षा एकमेकांना ठराविक अशा जागतिक दिनाच्या शुभेच्छा पाठवण्याचा प्रकार जन्माला आला. हल्लीसुद्धा सण साजरे होतात पण त्याचे स्वरूप सारे बदलले आहे. सणाच्या दिवशी पूर्वी पूजाअर्चा आटोपून देवदेवतांना पक्वान्नाचा नैवैद्य दाखवला जायचा. ही पद्धत आता कालबाह्य झाली आहे. सणाच्या ऐवजी साजरे केले जाणाऱ्या या जागतिक दिनादिवशी अष्टपैलू ज्ञानसंज्ञा विद्यापीठांना इतका ऊत येतो की हल्ली पूजेअर्चेऐवजी या अष्टपैलू ज्ञानसंज्ञा विद्यापीठाने पाठवलेले संदेश जास्तीत जास्त जणांना पाठवून पुण्य कमावले जाते. या सर्व भानगडीत व पळापळीत पूजाअर्चेस वेळ उरत नसल्याने केवळ आलेले संदेश त्या सणाची म्हणजेच त्या जागतिक दिनाची माहिती जमले तर वाचून किंवा पुढे इतरांना पाठवून पुण्यसंचय कमावण्यात धन्यता वाटू लागली. जेंव्हा पूजाअर्चेचे प्रयोजन उरले नाही तेंव्हा नैवेद्य प्रसाद दाखवण्यास निमित्त उरले नाही. तरीही जुनी संस्कृती जतन करण्यासाठी ई – माध्यमातून प्रसाद पाठवण्याची आप्तईष्ट मंडळींनी सुरुवात केली. या सर्व कारणांनी पक्वन्नावर मात्र अन्याय होऊ लागला. याच पार्श्वभूमीवर जागतिक पक्वान्न दिनाची एकदा सुरूवात झाली आणि गेल्या कित्येक वर्षात लक्षावधी कुटुंब जागतिक पक्वान्न दिनाचा आस्वाद घराबाहेर हॉटेलमध्ये जेवून मुक्त आनंद उपभोग घेतात. या सर्व जागतिक दिनाच्या दिवशी सर्वप्रथम संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीस विशेष मान मिळतो. अर्थात इतक्या साऱ्या जागतिक दिनाचे स्मरण ठेवणे सर्वसामान्यांच्या स्मरणशक्ती बाहेरील आवाक्यात असल्याने ते लक्षात ठेवून आजच्या जागतिक दिनाची सर्वप्रथम घोषणा करणाऱ्या व्यक्तीस अनन्यसाधारण अशी प्रतिष्ठा मिळते असा समज प्रचलित झाला.

अशी प्रतिष्ठा मिळाली की त्यांच्या ख्यातीसारखीच आपणही किर्ती मिळवावी अशी महत्वकांक्षा अनेकात निर्माण होते. तेंव्हा समाजकल्याणाच्या दृष्टीने व उदरनिर्वाहासाठी म्हणून दिनूने अशी ख्याती इतरांनाही मिळवून देण्यासाठी खाजगी शिकवणी वर्ग सुरु केले आहेत. अष्टपैलू ज्ञानविज्ञान संज्ञा विद्यापीठासाठी भावी कुलगुरू, प्राध्यापक यांची निर्मिती करण्याची प्राथमिक जबाबदारी देखील दिनूवर होतीच. शिवाय दिनूला मिळणाऱ्या तथाकथित प्रतिष्ठेमुळे हुरळून जाऊन त्याचे भविष्यात अनुकरण करून त्याच्यासारखेच भव्य महाकुलगुरूपद मिळवण्यास तरूण वर्गांमध्ये खूपच संघर्ष अन स्पर्धा निर्माण झाली होती. उत्तमोत्तम भावी महाकुलगुरू घडवण्याच्या अनुषंगाने दिनूने खाजगी असे शिकवणी वर्ग सुरु केले आहेत. नमुन्यादाखल अगदीच सुरुवातीचे सोप्पे व प्राथमिक स्वरूपाचे धडे गिरवू इच्छिणाऱ्यांसाठी दिनूच्या खाजगी शिकवणीवर्गाने उपलब्ध करून दिलेली काही मोजकीच ठळक आणि प्राथमिक गरजा भागवणारी मुख्य मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे आहेत. अर्थातच व्हात्साप्पवर ज्ञान पाठवण्यासाठी.

(१) तुमच्या माहितीतील कुणाचाही वाढदिवस आहे का? कुणाचाही चालेल. मित्र, नातेवाईक, आप्तस्वकीय, दूरच्या ओळखीचे, अप्रत्यक्ष ओळखीचे, कोणीही प्रसिद्ध वा अप्रसिद्ध खेळाडू, गायक, नट...किंवा शेजारच्यांच्या गोंडस कुत्रीचा वाढदिवस देखील चालेल. ज्या कुणाचा वाढदिवस असेल ती व्यक्ती, प्राणी प्रत्येकाच्या परिचयाची असणे मुळीच बंधनकारक नाही.
(२) वाढदिवस नसेल तर वर्धापन दिन, (कवळी बसवल्याचा वर्धापन दिन हे एक उदाहरण) लग्नाचा वाढदिवस, मुंजीचा वाढदिवस, आंब्याच्या वा नारळाच्या झाडाचा वाढदिवस, दूरचित्रवाणी संचाचा वर्धापन दिन, अथवा तत्सम कुठलाही वर्धापन दिन शोधा व त्या निमित्ताने तुमच्या शुभेच्छा आवर्जून व्यक्त करा.
(३) आज कुठला सण आहे का याचा शोध घ्या. अगदी मामुली अशा पौर्णिमा, अमावस्या, ग्रहण काहीही असले तरी ते कसे दुर्मिळ आहे याचे सचित्र वर्णन करा. सण भारतीयच हवा असे नाही. त्याला जातीचे बंधन सुद्धा नाही. कुठल्याही मर्यादा किंवा सीमा नाहीत. त्या सणाची उत्पत्ती, पूर्वेतिहास उगाळून काढा.
(४) बघा, आज कुठला मूड आहे ते तुमचा. त्यानुसार कधी साहित्य सेवा करा. तर कधी देशभक्तीपर कविता/ उतारे तर कधी गालिब चा उद्धार. वाङ्मयीन मूल्यांना फारसे महत्व नाही, काही तरी शब्दांकित करणे मात्र गरजेचे आहे.
(५) दिवसातल्या प्रत्येक प्रहराच्या शुभेच्छा तर नक्कीच पाठवाव्यात. जसे की शुभ पूर्व सकाळ, शुभ उत्तर सकाळ, शुभ दुपार, शुभ वामकुक्षी, शुभ संध्याकाळ, शुभ रात्र, वगैरे वगैरे.
(६) स्वतःचे वेगवेगळया दिनचर्येतील विविध कोनातून घेतलेले काही मोजके फोटो, नाहीच जमले तर अन्नपदार्थांचे, सासू सासऱ्यांचे, कबुतरांचे, कावळ्यांचे कोणाचे तरी फोटो नित्य नियमाने सतत पाठवत जावेत. त्याने सर्वांना खुशाली कळण्यास मदत होते. अधूनमधून, न्याहरीचे, जेवणाचे, फोटो सुद्धा पाठवत जावेत. बाहेरून एखाद्या वेळेस जर काही खाद्यपदार्थ आणला असेल तर आधी फोटो काढूनच मग देवाला नैवेद्य दाखवावा. लक्षात असू द्या की, जोपर्यंत प्रत्येकाला तुम्ही आज देवाची पूजा केली हे कळवत नाहीत तोवर प्रत्यक्ष देवालासुद्धा तुम्ही खरेच पूजा केलीत हे मान्य होणार नाही. तेव्हा कुठल्याही कार्यात जनसंमती व जनमान्यता आवश्यक असते हे मनात पक्के बिंबवून ठेवा. या मुळे कोणाचा रोष पत्करायची वेळ येणार नाही.
(७) विनोद हा जीवनावश्यक घटक आहे, तेव्हा विनोदाची अखंड निर्मिती करा. इथे हे आवर्जून सांगणे महत्वाचे आहे की विनोदाचा दर्जा हा अजिबात महत्वाचा नसून त्याची फक्त लांबी रुंदी व निर्मिती ही महत्वाची असते
(८) सद्य परिस्थिती मध्ये आदर्श आचरणशैली साठी योग्य ते मार्गदर्शन देखील तुम्ही ना चुकता दररोज करू शकता. त्यामध्ये धर्मवाद, समाजवाद, आणि इतर अनेक वादाचा मुक्त पणे समावेश करून अष्टपैलू ज्ञान संज्ञेच्या मार्फत सुसंवाद करू शकता. लक्षात ठेवा, इथे अंतराचे किंवा नात्याचे बंधन नाही. अगदी आतल्या खोलीतून नवरा मग बाहेरच्या खोलीत असलेल्या बायकोसोबत अष्टपैलू ज्ञान संज्ञेच्या माध्यमातून सुसंवाद करू शकतो किंवा सातासमुद्रा पलीकडे असलेल्या मित्रा ला उपदेश करू शकतो.
(९) एखादा जागतिक दिन, बालदिन, प्रौढदिन, कांदा लसून दिन, आरोग्य दिन, मातृत्व दिन, पितृत्व दिन, पुत्रत्व दिन, बहीण दिन, भाऊ दिन, बैल दिन (पूर्वीचा पोळा)आजी आजोबा दिन, मांजर दिन, वन्य प्राणी दिन, वन दिन, कुपोषित बालक दिन, प्रेमदिन, कला दिन, काळा गोरा दिन, स्वातंत्र्य दिन, पारतंत्र्य दिन, पर्जन्य दिन, अवकाश दिन, सावकाश दिन , लहान दिन, मोठा दिन, दीन दिन इत्यादी इत्यादी.
(१०) इतके सर्व लिहिण्या सारखे असूनही काही लोक इतके का आळशी असतात हे समजत नाही. प्रत्येक विचार हा स्वतःचाच असावा असा कुठलाही इथे अट्टाहास नसतो. जोवर कोणाचे ही आणि कुठलेही, कसेही काहीही विचार,किंवा कसेही काही ही फोटो, किंवा कुठलीतरी चलचित्रफित, किंवा कुठली तरी माहिती किंवा "कायपण" तुम्ही पाठवत नाहीत तोवर तुमचे या पृथ्वी वरचे अस्तित्वच जगाला अमान्य असते हे लक्षात घ्या.

सापडला! सापडला!!
नवीन विचार सापडला. गुगल वर तर अस्तित्वात असनाऱ्या जागतिक दिनाच्या नोंदी आहेत. परंतु, आपल्या मेंदूमध्ये तर नवीन जागतिक दिन सुचवण्याच्या अद्भुत कल्पना आहेत. पुढील जागतिक दिन हा नवीन कुठला तरी दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरु करणे जास्त प्रतिष्ठेचे ठरेल असा विचार दिनूला सुचला आणि यापूर्वी सकाळी चहा पिताना गुगल वरून ठरवलेल्या जुन्याच जागतिक दिनाऐवजी एक नवीनच जागतिक दिन हुडकून तो साजरे करण्याच्या कल्पनेने त्याचे डोळे चमकले. पुढील जागतिक दिन हा हल्ली खूपच दुर्मिळ होत असलेल्या “मूर्ख” जमातींच्या गौरवासाठी “जागतिक मूर्खता दिन” म्हणून साजरा करण्याची व अशी घोषणा सर्वांच्या आधी करण्याचे ठरवून टाकले. वरील निबंध हा जागतिक मूर्खता या दिवशी सर्व जणांना सर्वप्रथम पाठवण्याच्या उद्देशाने दिनूने त्वरित संकलित करून आपल्या बहुमूल्य अशा संग्रह समूहाच्या खजिन्यात जमा केला आणि तेंव्हाच सुटकेचा निश्वास सोडून स्वर्गातील देवांनीही दिनूला मग “जागतिक मूर्खता दिवस” यशस्वीपणे साजरा करण्यासाठी त्यांच्याही आगाऊ शुभेच्छा व्हात्साप्प द्वारे... चुकले चुकले, क्षमा असावी – अष्टपैलू ज्ञानविज्ञान संज्ञा विद्यापीठाच्या माध्यमातून कळवल्या!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults