मॉम - श्रीदेवीचा ओव्हरडोस (Movie Review - Mom)

Submitted by रसप on 8 July, 2017 - 02:15

'आई' हा प्रत्येकासाठीच एक हळवा कोपरा असतो. इतका हळवा की केवळ आईसाठी लिहिलेल्या आहेत म्हणून 'आई म्हणजे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं' असल्या यमकायमकीसुद्धा खूप भारी वाटत असतात किंवा केवळ आईविषयी आहे म्हणून अनेक सिनेमातली बाष्कळ गाणी आणि सपक संवादही टाळ्या घेऊन जातात. उदा. - 'कुछ कुछ होता हैं' मध्ये आईविना असलेल्या लहान मुलीला शाळेत 'आई'वर बोलायला सांगितल्यावर बाबा शाहरुखने केलेली ओव्हर अ‍ॅक्टिंग.
हा हळवा कोपरा हेरून असेल किंवा नकळतही असेल, पण श्रीदेवीसारख्या सामान्य वकुबाच्या अभिनेत्रीने तिच्या करियरच्या सेकंड इनिंगची सुरुवात करताना पहिल्या सिनेमात एका आईची भूमिका केली होती. अर्थात, त्या भूमिकेला इतरही काही कंगोरे होते आणि as the say, the movie had its heart at the right place.
पण 'मॉम'......
Well, I doubt !

'मॉम' मध्ये अख्ख्या सिनेमाभर श्रीदेवी, श्रीदेवी आणि श्रीदेवीच आहे. तिचा रोल फक्त 'ऑथर बॅक्ड'च नाही तर 'ऑथर सॅक्ड' (हे असं-असं लिही, नाही तर सॅक करू, असं धमकावल्यासारखा) आहे. तुम्ही जर तिचे मनस्वी चाहते असाल, तर ठीक. अदरवाईज, हे असह्य आहे ! कारण वर्षानुवर्षं हिंदी सिनेमात काम करूनही श्रीदेवीला हेमा मालिनीप्रमाणेच अजूनही नीट हिंदी बोलता येतच नाही. 'घर' ऐवजी 'गर' वगैरे गलिच्छ उच्चार आणि जोडीला अति-अभिनयाचा डोस मिळतो !
नवाझुद्दिन सिद्दिकीसारखा सध्याच्या सिनेजगतातला 'डार्क हॉर्स' सिनेमात उगाच आहे. त्याचा बदललेला गेट-अपसुद्धा उगाच आहे. कदाचित त्या रोलमध्ये काही दम नसल्याने थोडा तरी हायलाईट व्हावा ह्यासाठीचा तो केविलवाणा प्रयत्न असावा. त्याने तो जसा आहे त्याच गेटअप मध्ये रंगवलेले पोलिस ऑफिसर्स 'कहानी' आणि 'रईस'मध्ये दाद घेऊन गेले होते. इथला त्याचा रोल एका खाजगी 'डिटेक्टिव्ह'चा आहे. ज्या एनर्जीने त्याने खान आणि मजमुदार साकारले होते, तीच एनर्जी इथेही दिसू शकली असती, पण दाखवायचीच नव्हती. सिनेमाभर फक्त श्रीदेवीला दाखवायचं होतं, म्हणून घालवला वाया !
तीच कथा अक्षय खन्नाची.
त्याचा पोलीस ऑफिसरसुद्धा एक दमदार कॅरेक्टर होऊ शकलं असतं.
नकारात्मक भूमिकेत 'अभिमन्यू सिंग' हा अजून एक तगडा अभिनेता आहे. त्याला तर समोर येऊच दिलं नाहीय !
अदनान सिद्दिकी आणि सजल अली, ह्या दोन पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेतल्याबद्दल निर्मात्यांनी 'सैनिक फंडा'ला देणगी दिली असावीच. त्यांच्यावर इतका खर्च झाल्यावर तरी त्यांच्यात जाणवलेल्या अभिनय क्षमतेचा पूर्ण वापर करून घ्यायला हवा होता ! त्यांचे तर रोल्सही दमदार होते. पण नाही..
ह्या सगळ्या चांगल्या अभिनेत्यांना जर थोडं जरी फुटेज मिळालं, तर ते श्रीदेवीला पूर्णपणे झाकोळूनच टाकतील ह्याची पूर्ण जाणीव बोनी कपूरला असणारच. हा सिनेमा 'श्रीदेवी'चा, 'श्रीदेवी'साठी, 'श्रीदेवी'नेच (नवऱ्याने) बनवलेला आहे, मग बाकी कुणाला वरचढ होण्याची संधीच कशी देणार ? घालवलं सगळ्यांना वाया !

बरं..
ए.आर. रहमानचं संगीत आहे. निदान ते तरी वाजवून घ्यावं ! तेही नाही ! 'ओ सोना तेरे लिये..' अगदी लक्षात राहणारं गाणं आहे. बाकी कुठेही काहीच स्कोप नाही.

Sridevi.jpg

मग सिनेमा आहे तरी काय ?
ट्रेलरवरून हे स्पष्ट समजून येतं की ही एका आईने घेतलेल्या सूडनाट्याची कहाणी आहे. तर श्रीदेवीच्या मुलीवर बलात्कार होतो. श्रीदेवीच्या मुलीला कायद्याने न्याय मिळत नाही. श्रीदेवी त्याचा बदला घेते.
काय ? असंच एक सूडनाट्य वर्षाच्या सुरुवातीला आपण 'काबिल'मध्ये पाहिलं होतं ? ही ! आणि त्याच्या बाष्कळपणावर बऱ्याच जणांनी भरपूर तोंडसुखही घेऊन झालं होतं. पण 'मॉम' आईविषयी आहे. बाष्कळपणात कुठेही कमी नसला, तरी काय झालं ! हं... जे काही दाखवलं आहे, तेच सगळं जर सिनेमातल्या बापाने केलं असतं, तर वेगळा विचार करता आला असता ! कारण बाप हे फक्त एक नाव असतं आणि ते कुठलंही गजबजलेलं गाव नसतं ! Lol

अर्थात, काही बाबी उल्लेखनीय नक्कीच आहेत. त्या सगळ्या पूर्वार्धातच मात्र.
सामुहिक बलात्कार, हिंसा दाखवताना कुठलाही भडकपणा टाळला आहे, हे विशेष. गाडीत बलात्कार होत असताना गाडीचं नुसतं एका संथ गतीने फिरत राहताना दाखवणं, प्रचंड बोलकं आहे. सर्व जन एकानंतर एक राउंड घेत आहेत, हे त्या गाडीच्या राउंड्सवरून दाखवलं आहे. तसंच सहनशक्तीचा कडेलोट होतो आहे हे दाखवण्यासाठी पाण्याच्या फिल्टर खाली भरणारी बाटली ओव्हरफ्लो होताना दाखवणंही खूप सूचक ! पूर्वार्धात, एका शिक्षिकेचा तिच्या विद्यार्थ्यांसोबतचं नातं, मुलीसोबतचे ताणलेले संबंध अश्या सगळ्या बाबीसुद्धा खूप छान दाखवल्या आहेत. त्यासाठी दिग्दर्शक 'रवी उड्यावर'ना दाद देऊच ! खरं तर हा पूर्वार्ध, अपेक्षा खूप वाढवतो. असं वाटतं की, पुढचा भाग नेहमीचा मालमसाला नसेल. पण तसं होत नाही. सगळं काही अगदीच अपेक्षित वळणांनी जातं.

संवाद, थरार, परफॉर्मन्स, अ‍ॅक्शन, संगीत सगळ्याच बाबतींत 'अजून भरपूर काही तरी हवं होतं', ही भावना सिनेमाभर वाटत राहते. अगदीच फुसका व फसका क्लायमॅक्स तर तिला अजून तीव्र करतो.
मला स्वत:ला श्रीदेवी फारशी आवडतही नाही आणि नावडतही नाही, त्यामुळे तिचं काम फसलं तर फसेना का ! पण वाईट वाटलं नवाझुद्दीन आणि अक्षय खन्नासाठी. नवाझुद्दिनला असे फुटकळ रोल आता तरी करायला लागू नये. आज त्याची मार्केट व्हॅल्यू श्रीदेवीपेक्षा तरी किती तरी पट जास्त आहे. अक्षय खन्नाचं करियर कधी पुनरुज्जीवित होणार आहे कुणास ठाऊक ! एका चांगल्या अभिनेत्याची उमेदीची वर्षं निरर्थक सहाय्यक भूमिकांत वाया जात आहेत. होपफुली, त्यालाही हे जाणवत असावं.

अखेरीस, बऱ्यापैकी दमदार पूर्वार्ध ह्या एका जमेच्या बाजूवर श्रीदेवीचा भडक अभिनय, फुसका बार नाट्य, वाया घालवलेले इतर अनेक चांगले कलाकार, अळणी संवाद वगैरे अनेक कमजोर बाजूंना पेलता येणार असेल, तर 'मॉम' एकदा पाहू शकता !

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2017/07/movie-review-mom.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्मम्म... श्रीदेवीने उच्चारांवर मेहनत घेतली नाही तरी आवाजावर तरी घ्यायला हवी, निदान ह्या पर्वात तरी... हेमावैम. इंग्लिश विंग्लिश सारख्या सुंदर चित्रपटातही तिचे ते सदमा टाईप केकाटे बोलणे खटकलेले.

बाकी ती खरेच चांगली अभिनेत्री आहे. सर्वांना योग्य तितके फुटेज देऊन चित्रपट अजून चांगला बनवता आला असता.

तुमच्या लेखात कुठे उल्लेख आढळला नाही पण श्रीदेवी 'सावत्र' आईच्या भूमिकेत आहे ना? 'सावत्र' आईने मुलीवर झालेल्या अत्याचारांचा बदला घेणे ही काहीशी नवीन बाब वाटते.

एवढे हिंदी चित्रपट करून सुद्धा नीट हिंदी बोलता येत नाही म्हणजे कहर आहे. चला हवा येऊ दया मध्ये पण हे जाणवले. मराठी अभिनेत्री याबाबतीत सजग आणि मेहनती असतात. लीड रोल नसला तरीही त्या भाषेवर मेहनत घेतात.

श्रीदेवीसारख्या सामान्य वकुबाच्या अभिनेत्रीने

>>>>>
तुम्ही माधुरी फेन का हो? श्रीदेवी टॉप ची अभिनेत्री होती, आणि अकटिंग मध्ये ती कोणालापान बिट करते...

चरप्स, श्रीदेवी टॉपची स्टार होती असे म्हणा. ती अभिनेत्री म्हणूनही चांगली होती पण कोणाला पण बिट करण्याइतपत कुवत दाखवण्याची संधी असलेले रोल्स तेव्हा तिला मिळाले नाहीत. जे रोल्स मिळत होते त्यांची मागणी वेगळी होती व श्री ती मागणी पुरेपूर पूर्ण करत होती इतकेच.

ती अभिनेत्री म्हणूनही चांगली होती पण कोणाला पण बिट करण्याइतपत कुवत दाखवण्याची संधी असलेले रोल्स तेव्हा तिला मिळाले नाहीत>> एक्दम चुक! तिला भरपुर सन्धी मिळाल्या ज्यात तिने तिच्या कुवतिप्रमाणे बर काम केल आहे जस सद्मा,चालबाज्,चान्दणी,लम्हे इत्यादी.
बाकी तिला डायलॉग अजिबात बोलता येत आणि हिन्दी तर अजिबात नाही, इतकी वर्ष या इन्डस्ट्रित राहुन ती मात्र अतिअलिप्त असल्यासारखी वाटते नॉट पार्ट ऑफ हिन्दी मुव्हीज, मलाही ती विषेश कधीही आवडली नाही.

प्राजक्ता, मीही ती चांगली अभिनेत्री म्हणतेय की... पण सगळ्यांना बिट करेल अशी भूमिका त्या लिस्तीत नाहीय, ना तिला कधी मिळाली. त्या सगळ्या भूमिका ठीक ठाक होत्या, ज्या तिनेही तशाच केल्या. खूप ताकदीची म्हणता येईल अशी भूमिका त्यात नाहीय. तिचा सदमा हल्लीच परत पाहिला तेव्हा 6 वर्षाच्या मुलीच्या भूमिकेत ती खूप सामान्य वाटली. तिच्यासमोर कमल जास्त ताकदवान वाटला..तो जास्त लक्षात राहिला, अगदी तो शेवटचा सिन वगळताही..

तिचा सदमा हल्लीच परत पाहिला तेव्हा 6 वर्षाच्या मुलीच्या भूमिकेत ती खूप सामान्य वाटली. तिच्यासमोर कमल जास्त ताकदवान वाटला..तो जास्त लक्षात राहिला, अगदी तो शेवटचा सिन वगळताही..>>> पुर्ण सहमत ! वि आर ऑन सेम पेज!

आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ. म्हणजे अमूक इतकी वर्षे काम केली की त्याला ज्येष्ठ "अभिनेता" म्हणायचं फॅड नव्हतं. कितीही वर्षे इंडस्ट्रीत काढली तरी प्रदीपकुमार, विश्वजीत हे ठोकळे म्हणूनच संबोधले गेले. इतकंच काय धर्मेंद्रलाही कधी कुणी अभिनेता (अपवाद ऋषिकेश मुकर्जींचे सत्यकाम, चुपके चुपके हे चित्रपट) म्हणून ओळखलं नाही. तो पडद्यावर रडायला लागला की थेटरमध्ये पब्लिक हसत सुटायचं. त्याच्या नाचण्याविषयी तर काही बोलायची सोयच नाही.

आता जमाना बदलला. अजय देवगणला अभिनय येत नाही हे त्याच्या पहिल्या चित्रपटापासून सगळे समीक्षक बेंबीच्या देठापासून बोंबलत सांगत होते. अचानक काही वर्षांनी तो ज्येष्ठ अभिनेता म्हणून गणला जाऊ लागला (बहुदा जख्म पासून). अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांचीही तीच तर्‍हा. हे फक्त देमार फायटर म्हणून आले. ताडमाड उंची, उड्या मारणे आणि मारामारी करणे हेच यांचे उद्योग. पण काही वर्षं घालविल्यावर नवीन पोरं इंडस्ट्रीत आली आणि यांना सर सर म्हणू लागली. या नव्या पोरांच्या फालतूगिरीपुढे मग या त्यांच्या सरांचा अभिनय ग्रेट वाटू लागला.

श्रीदेवीचा हा तीनशेवा चित्रपट. तिला तर या हिशेबाने अभिनय सम्राज्ञीच म्हणायला हवे.

राजेंद्रकुमार अ‍ॅड करा वरच्या लिस्टमध्ये. श्रीदेवी हि स्त्री कलाकारांमधली राजेंद्रकुमार आहे. हे कलाकार कितीहि चांगली भुमिका असली तरी ओझे वाहायचंच (पाट्या टाकणे, हमाली इ.) काम करतात. त्यांचे पिक्चर्स फक्त सहकलाकार, गाणी वगैरे वर तरुन गेलेल आहेत. श्रीदेवीचा सदमा मधला अभिनय तर अभिनयाच्या शाळेत केस स्टडी म्हणुन शिकवला जात असेल - असा करु नये म्हणुन... Happy

अभिनय म्हणजेच सारे काही नसते.
हिरो / हिरोईन मटेरीअलचा तो केवळ एक हिस्सा असतो.
बाकी श्रीदेवी माझ्या आवडीची नव्हतीच.
किंबहुना जेवढी पुर्ण कारकिर्दीत वाटली नव्हती तेवढी ईंग्लिश विंग्लिशमध्ये बरी वाटली.
त्या दिवशी चला हवा येऊ द्या मध्ये आलेली. या वयातही आखीव रेखीव सुंदर वाटते या गोष्टीचे मात्र कौतुक आहे.
वर कोणीतरी सद्माचा उल्लेख केला आहे. त्यात ती आणि तो कमल हसन दोघांनी बोअर केले होते. हिने अंडर अ‍ॅक्टींग करून आणि त्याने ओवर अ‍ॅक्टींग करून. शेवटचा ती ट्रेनने जातानाचा सीन तर अशक्य त्रासदायक होता, अति झाले आणि हसू आले तसे हसलोही मी Happy
बाकी माधुरी आली आणि श्रीदेवीची विकेट पडली.. जे होणारच होते