हिरवा हिरवा ओला श्रावण

Submitted by निशिकांत on 5 July, 2017 - 03:14

ग्रिष्म वावरे घरात माझ्या वांझोटे नभ फिरती वणवण
तुझ्या भोवती सखे नांदतो हिरवा हिरवा ओला श्रावण

समोर मी पण तुझा चेहरा कसे दावते विचित्र दर्पण?
सये एकटा धुंद मी, तुझ्या आठवणींची नसते चणचण

तुळसीपत्रे लाख ठेवली हलवायांच्या घरावरी पण
देव विचारी "पुण्य कमवण्या तुझे काय तू केले अर्पण?

शासनकर्ते जसे लागले लुटावयाला देश आपुला
दाद मागण्या कोठे जावे? शेत खाउनी बसले कुंपण

जिवंत असता पुसले नाही माय बिचारी मेल्यावरती
बनून श्रावण बाळ, उरकले क्रियाकर्म अन् क्षेत्री तर्पण

नका विचारू पुण्य कमवुनी किती बांधले कनवटीस म्या
चोविस घंटे पोट भराया राबराबतो जळतो कणकण

पुरे जाहले कौतुक आता रामाचे अन् वनवासाचे
माझे जीवनही वनवासी सभोवताली लाखो रावण

देवा भूवर धाडुन गंगा सोय पाहिली पाप्यांची तू
डुबकी घेता पाप धुवोनी गंगा त्यांचे करते रक्षण

ऐकुन प्रवचन नकोस लेखू कमी स्वतःला तू "निशिकांता"!
सांगतात जे तयास जमले कधीच नाही तसे आचरण

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users