जेम्सपूर

Submitted by उदे on 28 June, 2017 - 02:36

ठरवून काही वेगळं करायला जात नाही. तरीही आखीव कार्यक्रमात वेगळेपण असल्यामुळे असेल कदाचित; परंतु आमचे फिरण्याचे कार्यक्रम वेगळे होतात एवढ मात्र खरं; नाहीतर कुठे दार्जिलिंग सिक्कीमचा कार्यक्रम आणिकुठे जेम्सपूर ! काही संबंध आहे का ? पण नाही. असं घडलं खरं. आणि आम्ही आम्हाला माहित नसलेल्या, आम्हाला काय बऱ्याच जणांना माहित नसलेल्या जेम्सपूरला जाऊन आलो.

आम्ही जेंव्हा कलकत्ता दार्जिलिंग सिक्कीम हा दौरा करायचा ठरवला त्यावेळी मुक्त भटकंतीसाठी दोन दिवस आगे मागे मोकळे ठेवले होते. फक्त आमचा दार्जिलिंग मधला हॉटेल सिंक्लेअर मधला मुक्काम हा नक्की होता.बाकी ऐनवेळीच ठरवायचे होते. या वेळी दौऱ्यात आमच्या अतिशय जवळ असणार नंदिनी आत्मसिद्ध आणि हेमंत देसाई हे जेष्ठ पत्रकार आणि विद्वान लेखक दाम्पत्य सोबत होत. स्वातीने दार्जिलिंग मधील सिंक्लेअर हॉटेल ऑफिसतर्फे बुक केल्यामुळे, नंदिनीच्या बंगाली भाषेतल्या अभ्यासामुळे आणि बाबू मोशाय हे टोपणनाव केवळ लिखाणांतच नव्हे तर आमच्या दौऱ्यादरम्यान सार्थ करणाऱ्या हेमंत देसाईंमुळे आमचा १५ दिवसांचा दौरा अगदी स्वप्नवत होऊन गेला. बाबू मोशाय ऊर्फ हेमंत देसाईंनी सिनेजगतातल्या रंजक हकीकतीच केवळ सांगितल्या नाहीत तर देव आनंदच्या सुप्रसिद्ध चित्रपटातल्या लोकेशन्सवर आपसूक आम्ही गेल्यावर कुठल्या पात्राने कुठे बसून संवादफेक केली असेल व दृश्य चित्रित झालं असेल इतके बारीक तपशीलही ऐकायला मिळाले! असो.

आमच्या दौऱ्याची सुरुवात कलकत्त्यातल्या गरम आणि घामट वातावरणात सुरु झाली होती त्यामुळे २ दिवसांची मुक्त भटकंती नंतर करूया असं ठरवून आम्ही कलकत्त्यातून काढता पाय घेतला आणि दार्जिलिंग, सिक्कीमच्या थंड वातावरणात मोहक दौरा संपवून पुन्हा कलकत्याकडे परतू लागलो. मात्र पुन्हा कलकत्ता गाठायचं म्हटल्यावर दार्जिलिंगच्या थंडीतही आम्हाला घाम फुटला. न्यू जलपायगुरीवरून कलकत्त्याला परतायच्या प्रवासात आमचा सुंदरबन पाहायचा बेत शिजला ! उतरल्या उतरल्या महाराष्ट्रसदनात सामान टाकून हेमंत आणि मी पश्चिम बंगाल सरकारच्या पर्यटन खात्यात जाऊन पोहोचलो. तेथील पर्यटन खात्यात आम्हाला कळलं कि सुंदरबनला जायच्या टूर संपल्या आहेत! आम्ही तेथील अधिकाऱ्यांना आमच्या जवळची प्रेस कार्ड्स दाखवली आणि आम्हा चौघांसाठी सुन्देरबनचा खाजगी दौरा आखायची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. जास्तीचे पैसे द्यावे लागणार होते पण ते आम्हाला चालणार होते आणि अश्या रीतीने आम्ही तात्काळ आमच्याबरोबर थोडेसे सामान घेऊन सोनखालीच्या दिशेने खाजगी वाहनातून प्रवास करू लागलो. कारण सोनखाली वरूनच आम्हाला सुंदरबनला जाणारी बोट पकडायची होती. इथपर्यंत सगळंच स्वप्नवत घडलं होत ! पण बाहेरच वास्तव चटका देणारं होत. उन्हाळा होता म्हणून नव्हे, तर सर्वत्र गरिबीचं दर्शन होत असल्याने प्रवासादरम्यानच वास्तव जग दाहक होत गेलं.

कलकत्ता सोडल्यापासून तुम्ही अवघ्या ५ किमी वर आलात कि छोटी छोटी घरं, त्यांची विदीर्ण अवस्था, स्त्री पुरुषांची अर्धनग्न शरीरं, छातीच्या फासळ्या झालेल्या म्हाताऱ्याने रणरणत्या उन्हात सायकल रिक्षा चालवायचे केलेले प्रयत्न आजही डोळ्यासमोरून जात नाहीत. यावरून कुणालाही त्या वेळेच्या परिस्थितीचा अंदाज यावा. अडीच तीन तासांच्या प्रवासानंतर आम्ही सोनखाली या ठिकाणी जाऊन पोहोचलो. येथून सुंदरबनपर्यंतचा आमचा प्रवास बोटीने होणार होता. आणि इथेच जेम्सपूरची खरी कहाणी सुरु होते!!

आमची बोट सुरु झाली आणि लवकरच आमच्या लक्षात आलं कि आम्हाला एकमेकांशी बोलताना अति मोठ्याने बोलावं लागणार आहे! त्याच कारण असं कि त्या बोटीला तिकडे भटभटी म्हणतात आणि भटभटी एकदा सुरु झाली कि फक्त तीच बोलू शकते ! दुसरे नाहीत! त्यामुळे ऐका अर्थाने सर्वांना चूप करण्याची ताकद तिच्यात आहे !!!
IMG_8237.JPG
नाही म्हणायला रस्त्यावर सर्वत्र गुलमोहोर बहरला होता. त्यामुळे निसर्गाने जणू मायेची पाखर घालून सर्व परिसर शोभिवंत केला होता आणि आजूबाजूच्या बहरलेल्या झाडांवरच्या सुवासिक फुलांनीसुध्दा रम्य झूळूकेसोबत, प्रवाश्यांना, सुवासिक वर अनुभवायला द्यायचा जणू पण केला होता .
IMG_8238.JPG
अडीच तीन तासांच्या प्रवासानंतर आम्ही सोनखाली ठिकाणी जाऊन पोहोचलो. येथून सुंदरबन पर्यंतचा आमचा प्रवास बोटीने होणार होता. आणि इथेच जेम्सपूरची खरी कहाणी सुरु होते !!
IMG_8239.JPG

खारा गरम वारा, सर्वत्र खारफुटी, आणि किनार्याच्या दुतर्फा बायका मासेमारीसाठी गुडघाभर पाण्यात उतरलेल्या असतांना, वर काठांवर मात्र हुक्का किंवा दारू पीत बसलेले पतीदेव हे वारंवार दिसणार दृश्य भर समुद्रात बघणाऱ्यांच्या काळजाचं पाणी करून टाकत होतं .
IMG_8240.JPG
थोड्या वेळाने भटभटीच्या त्रासदायक सांगीतिक पार्श्वभूमीवर या एकसूरी प्रवासाचा कंटाळा यायला लागला ! आम्हा सर्वांचे चेहरे त्रासदायक व्हायला लागले. यात भर म्हणून कि काय, भटभटीतील तेल (डिझेल) संपायला आलं. आमच्या बोटीच्या नावाड्याने एका भूभागाकडे बोट वळवली आणि काळे मोठाले ड्रम्स घेऊन तो भूभाग यायची वाट पाहू लागला आणि तडक उडी मारायच्या पवित्र्यात भटभटीच्या टोकावर जाऊन उभा राहिला.
IMG_8245.JPG
खाडकन माझी तंद्री भंग पावली. मनात विचार आला, या नावाड्याबरोबर उतरून निदान हा भूभाग तरी पाहावा. मी उतरणार म्हटल्यावर एक एक करून सगळीच मंडळी भू भागावर उतरायला तयार झाली. आणि आम्ही उतरणार तेवढ्यात नावाड्याला म्हटलं कि या भूभागाचं काह नाव गाव आहे कि नाही ? तर म्हणाला जेम्सपूर !!
IMG_8242.JPG
आता भटभटीमधून भूभागावर पाय टाकताना आम्हाला काय माहिती ? कि आम्ही एका अप्रतिम प्रवासाच्या दिशेने वाटचाल करणार आहोत ते !! आणि सर्वजण आपापल्या विचारात असताना आम्ही जेम्सपूरच्या भूभागावर पाय ठेवला.
IMG_8243.JPG
उतरल्या उतरल्या सुरुवातीलाच एका कुंभाराचं घर दिसलं. आजूबाजूला सर्वत्र मातीच माती होती. तोंडावरच्या माशा सुध्दा न हाकावणारी ढीम्म बसलेली मुले, अठराविश्व दारिद्र्य दाखवणारी त्या मुलांच्या आई वडिलांची चेहरेपट्टी आणि देहबोली आणि आजूबाजूचं भर दुपारचं शुष्क वातावरण एकंदरीतच औदासिन्याच्या वातावरणात भर घालत होतं ! जेम्सपूरच पहिलं दर्शन हे असं होत.
IMG_8241.JPG
थोडं पुढे आलो तर गावंकुसाबाहेर असते तशी एक वेस दिसली. वेशीवर कुंभाराचं घर दिसलं. आजूबाजूला सर्वत्र मातीच माती होती. तोंडावरच्या माशा सुध्दा न हाकावणारी ढीम्म बसलेली मुले, अठराविश्व दारिद्र्य दाखवणारी त्या मुलांच्या आई वडिलांची चेहरेपट्टी आणि देहबोली आणि आजूबाजूचं भर दुपारचं शुष्क वातावरण एकंदरीतच औदासिन्याच्या वातावरणात भर घालत होतं ! जेम्सपूरच पहिलं दर्शन हे असं होत.

थोडं पुढे आलो तर गावंकुसाबाहेर असते तशी एक वेस दिसली. वेशीवर सुंदर कमान केली होती. आम्ही वेशीजवळ पोहोचताच सरपंचाची मुलगी आमचे पाय धुवायला सामोरी आली. आम्ही सारे दचकून, बिचकून ओशाळे होऊन बाजूला गेलो तर म्हणाली, "येथून पुढे गाव सुरु होतं . तुम्ही आमच्या गावाचे अतिथी आहात. आम्ही गावात येणाऱ्या सर्वांचेच पाय धुवून त्यांचे स्वागत करतो. हि येथील रीत आहे. तेव्हा आम्हाला अडवू नका. तुम्ही गावात या. आणि गावाच्या पूजेनिमित्त आज सर्वांनी जेवूनच जा."

मोठ्या अवघड परिस्थितीतून वाट काढत गावात गेलो तर तिथे एका तात्पुरता मंडप सजवलेला होता. आणि तिथे भजन चालू होत. मी कॅमेरा क्लिक करण्यासाठी बाहेर काढताच, तरुण भजनकर्त्याने ऐक सुंदर पोज देत आपलं गाणंच थांबवलं. मी क्लिक करत राहिलो. तो पोझेस देत राहिला. सर्व जमलेली मंडळी आमच्याकडे बघतच राहिली आणि त्या भजनी मंडळींच्या कार्यक्रमाचा अचानक वेगळाच नूर लागला.

या चमत्कारीक अवस्थेतून सुटका करण्यासाठीच जणू त्याठिकाणी सरपंचाची एंट्री झाली. त्यांनी सांगितलं, "माझ्या मुलीचं ४ दिवसांनी लग्न आहे. आज आमच्याकडे लग्नाअगोदर घालतात ती पूजा आहे. आमचं घर जवळच आहे. तिथे चला आणि जेवल्यावरच निघा."

आम्हा सर्वांना खरंच कमाल वाटली. अतिशय गरीब गाव. परंतु लोक आम्हाला अतिथींना- फुलासारखं जपतायत. जेवून जा म्हणतायत. आतिथ्याचा वर्षाव करतायत. खरं तर हे सर्व पटवून घेणं कठीण जात होतं. आम्ही नाही म्हटलं तरी बूंदीच्या लाडवांची बूंदी आणि पेलाभरून दूध प्यावच लागलं. अगदी बळे बळे !! सरपंचांना विचारलं, ईथल गावजीवन कसं आहे ? शाळा कॉलेज मधे मुले कशी जातात ? सरपंच म्हणाले, "खारफुटी आसपास असल्याने शेती होतच नाही; भरतीला तुम्ही पाहाल तर जेम्सपुर , गोसाबा, ऐक तरंगत बेट वाटतं एवढं पाणी भरतं. आजूबाजूच्या परिसरात ! शाळा जेमतेम चौथीपर्यंत आहे. पण ती सुध्दा कशिबशीच चालू आहे. गावातील लोक मध विकतात. मासेमारी करतात. कोंबड्या पाळतात. आणि अलीकडे कोलंबीचं उत्पादनही घेतात आणि गावाच्या सुरुवातीला तुम्ही कुंभाराची घरं पाहिलीत ना ? तिकडे वेगवेगळी मातीची भांडी बनविण्याची काम होतात. बाकी हे सर्व असच आहे." शेवटचं वाक्य बोलताना त्यांनी हलवलेले दोन्ही खाली हात बरंच काही बोलून गेले !

एकच बघायला मिळालं कि, सरपंच त्यातल्या त्यात बऱ्या आर्थिक परिस्थितीचा असल्याने त्यांच्याकडील सर्व मंडळीनी शरीरभर कपडे परिधान केलेली होती.अगदी छोटंसं गाव. त्यातही अठरा पगड राहणारी माणसं. त्या सगळ्यात त्यांनी जपलेले रीतिरिवाज, त्यांनी जपलेल्या श्रद्धा, त्यांची संस्कृती आणि छोटुकल्या जेम्सपूर च्या चोहोबाजुंच्या काठावर मंद मधुर नाद करीत डुचमळणार पाणी बघण्यातच अक्षरशः गुंग होऊन गेलो होतो!आमचा प्रमुख नावाडी जेम्सपुरला उतरला होता. थोडं डिझेल घ्यायला, परंतु आम्ही सर्वजण जेम्सपूरच दर्शन घेऊनच परतलो.आम्ही तसे तर सजनीखालीच्या टूरिस्ट लाँज मध्ये मुक्कामासाठीच चाललो होतो. वाटेत जेम्सपूर लागलं आणि आम्ही सर्वजण त्या वेगळ्याच वाटेवरच्या विलोभनीय, अविस्मरणीय दृश्यांनी स्तिमित होऊन गेलो.

आमच्या बोटीत आम्ही सर्वांनी पाय टाकल्यावर आमची बोट उर्फ भटभटी जेव्हा पुन्हा आवाज करू लागली, तेव्हा पुन्हा एकदा काही काळानंतर आमच्यापैकी सर्वजण चुप्प झाले. पुन्हा एकदा भटभटीच्या त्रासदायक सांगीतिक पार्श्वभूमीवर या एकसुरी प्रवासाचा कंटाळा यायला लागला आणि आम्ही सर्वजण कधी इकदा साजणीखाली येतंय त्याची वाट पाहू लागलो.

जेम्सपूर, सुंदरबनच्या प्रवासाची एक गंमत आहे. तो प्रवास करायला जेवढा कंटाळवाणा आहे तिथलं राहणं जेवढं उकाड्याचं आहे, तल्खली करणार आहे, तेवढ्याच तेथील गूढ गोष्टी, साहेबांच्या (वाघांच्या) गोष्टी , शिकाऱ्याच्या गोष्टी या आंनंददायी आणि उत्कंठा निर्माण करणाऱ्या आहेत.

जेम्सपूरच्या लोकांमधील गोडवा कशामुळे टिकून असेल ? जेम्सपूरला जेम्सपूर हे नाव कशामुळे पडलं असेल ? सुंदरबन मधल्या असंख्य बेटांचे आपसात व्यवहार कसे होत असतील? असे एक ना दोन सतराशे प्रश्न डोक्यात घेऊन आपण साजणीखालीच्या दिशेने प्रवास सुरु करतो.

अवघ्या दहा मिनिटात एक वळण येतं आपल्या डोळ्यासमोरच जेम्सपूर क्षणार्धात नजरेआड होत आणि मनाच्या कुपीत मात्र कायमच घर करून बसत !!

------- उदय ठाकूरदेसाई
uthadesai.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूपच नवखे आणी नॉट टूरिस्ट ओरिएंटेड ठिकाण..असं अचानक हाताशी आलं की खूप आनंद होतो.. तो आनंद तुमच्या लिखाणातून झळकतोय.
या जागेबद्दल च्या काही गूढ गोष्टी ही आवडतील वाचायला!!