देवदर्शन : भाग २

Submitted by फूल on 23 June, 2017 - 08:51

भाग १: http://www.maayboli.com/node/62892

काही माणसांच्या चेहऱ्यावर कश्या खूप काही अनुभवल्याच्या स्पष्ट खूणा असतात तश्याच खूणा काही घरांवरही असतात... तसंच दिसत होतं हे घर... खूप काही चांगलं-वाईट घडून गेलंय असं सांगणारं.... मोरीतला नळ गळका होता... दरवाजे करकरत होते... पण पितळी लोटी, कोपऱ्यातला बंब स्वच्छ घासून चकचकीत केलेला होता... न्हाणीघरातली फारशी सुद्धा सोडा घालून घासलेली दिसत होती...

मी स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी मांडलेल्या पाटावर बसले... मावशींची लगबग बघण्यासारखी होती... काहीसं गुणगुणत भरभर काम करणं चालू होतं... पातेल्यांचा, ढवळण्याचा, पावलांचा कसलाही आवज येत नव्हता... नाही म्हणायला हातातल्या बांगड्यांची किणकिण तेवढी ऐकू येत होती... त्यांच्या गुणगुणण्याला हातातल्या बांगड्या तालच देत होत्या जणू... जुनी पितळ्याची भांडी-कुंडी अगदी लख्खं घासलेली होती...

सगळ्यांचा चहा आणि खाणं घेऊन आम्ही दोघी बाहेर आलो... लग्नाच्याच गप्पा सुरू होत्या... कोण कोण आलं मग कोण कोण नाही त्याची उजळणी झाली...
मी त्यांना आमच्या लग्नाचा अल्बम दाखवला... आणि म्हटलं..,“तुम्ही यायला हवं होतंत... आईंनी तुम्हाला खूप मिस केलं”
तशी म्हणाल्या... “इथला पसारा बघायलीस नव्हे?... घरातली मांजरं, नाही म्हणायला थोडी शेत जमीन आहे... गडी माणसं येत्यात, शिवाय दुकान... हे सगळं सोडून कुठं जायला नको वाटतंय... सत्तरी गाठली की या मावशीबाईनं... आता कुठं जातीस बाई? रोजचं उरकना... आणि सगळ्यात महत्त्वाचं... मला अभिसारखंच मावशी म्हण... अहो मावशी म्हणजे फार परकं वाटतंय बाई...”
“कश्याला आता सांभाळायचा हा पसारा...?” अभि म्हणाला... “मुंबईला येणं लांबची गोष्टं... ही दोन दिवस इथल्या इथे कोल्हापुरात अज्याकडे पण रहायला जात नाही...” त्यावर मावशी नुसतंच हसल्या... फोटो बघता बघता आम्हा दोघांचं तोंडभरून कौतुक करून झालं... धाकट्या बहिणीची आणि जावई बापूंची म्हणजेच अभिच्या आई-बाबांची आस्थेने विचारपूस करून झाली... तास-दीड तास गप्पांमध्ये कसा निघून गेला कुणालाच कळलं नाही...

घराला लागूनच मागच्या बाजूला किराणामालाचं दुकान होतं... कुणी गिऱ्हाईक आलंच तर अभि उठून ते बघत होता... मावशीना किंमत विचारून पैसे घेत होता... गिऱ्हाईक तसं किरकोळ होतं... पण दुकान चालू ठेवलेलं दिसत होतं...
“काय गिऱ्हाईक कोण नसतंय आजकाल पण दुपारच्या वेळात काही बाही घ्यायला बायका आल्या की तेवढंच माझ्या म्हातारीचा जीव रमतोय... म्हणून ठेवलंय चालू.... अज्या नाहीतर त्याची बायको कोणतरी सामान आणून टाकतात आठवड्याला एकदा... तेवढाच विरंगुळा...”

रात्री स्वयंपाक अगदी सात्त्विक आणि चविष्ट होता... अभिच्या आवडीचं तर होतंच सगळं... पण मला आवडतात म्हणून खास भरली वांगी केली होती... आधीच आईना विचारलं होतं म्हणे त्यांनी.. मला खरंच भरून आलं... अभिला आणि मला नाव घेऊन घास भरवायचा आग्रह झाला... अभिने मेथीच्या भाजीला प्रीती जुळवून टाकली... मीही लग्नात घेतलेलाच उखाणा घेतला...

मग अभिची आज्जी उखाणे, जात्यावरच्या ओव्या कश्या छान रचायची याची एक गंमत गोष्टं त्यांनी सांगितली... मंदामावशीच्या लग्नात त्यांच्यासाठी ५-६ उखाणे आज्जीने रचून लिहून ठेवले... त्यांच्या ते पाचही उखाणे लक्षात होते... आणि त्यांनी पाचही घेऊन दाखवले... मला गम्मत वाटली... अभि त्यांना अजून उकसवत होता... “मावशी तो चंद्र भेटी रोहिणीला तो घे नं...” अभिने हे पुराण अनेकदा ऐकलंय हे कळत होतं...
“या सगळ्या पोरांचे पाठ झालेत उखाणे...” मावशी माझ्याकडे बघून म्हणाल्या.
“पण उपयोग काय सगळे बायकांचे... आमच्या लग्नात आम्हाला एकही उपयोगी पडला नाही...” अभि म्हणाला... भरपूर हश्या आणि गप्पा... भरपूर जेवलो दोघं... गप्पा संपतच नव्हत्या...

माझ्या घरच्यांची, माझ्या नोकरीचीही आवर्जून चौकशी केली... “तिकडे ऑस्ट्रेलियात गेल्यावरहि नोकरी शोध आणि करत रहा, स्वत:च्या पायावर उभी लेक दोन्ही कुळं सक्षम करती गं...”

मावशींचं व्यक्तिमत्त्व अतिशय लोभस होतं हे सांगायला नकोच... दुकानात येणाऱ्या बायकांशी मैत्रीच्या नात्याने बोलणं, माझ्याशी थोडं वडिलकीच्या नात्याने, अभिशी पोटच्या मुलासारखं बोलणं सगळं वेगवेगळ्या स्तरांवर चालू होतं... पण त्या सगळ्यात अतिशय सहजता होती... मला खात्री आहे प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडत होता... किंवा ते सगळे त्यांच्या प्रेमात अगोदरच पडले होते मी नव्याने पडत होते...

रात्री अभिच्या बालपणीच्या गोष्टी मावशींच्या तोंडून ऐकायला मस्त वाटत होतं... आम्ही घराच्या गच्चीत चटया टाकून गप्पा मारत बसलो होतो... मस्त टिपूर चांदणं पडलं होतं... बागेतल्या रातराणीचा दरवळ धुंद करत होता... सगळं वातावरणच मोहून टाकणारं होतं... ते चंदेरी क्षण त्या रातराणीच्या सुगंधासकट मनाच्या कुपीत जपून ठेवलेत मी आजही...

मावशींचं गोष्टीवेल्हाळ बोलणं, बोलताना त्यांचे मोठे होणारे डोळे, भराभर बदलणारे चेहऱ्यावरचे हावभाव, मध्येच मोत्यांच्या माळेतला एक एक मोती सांडावा तसं फुटणारं त्यांचं खुदूखुदू हसू, आवाजातला मोजका चढउतार आणि भाषेतला कोल्हापूरी लहेजा... सगळंच लोभस, काळजाचा ठाव घेणारं...

“या मन्याच्या लहानपणी, मे महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये सगळ्या घरभर ही मूलं नुसती भरून उरायची... जिकडं जावं तिकडं मोठ्या मोठ्या डोळ्यांचे गुलाब फुलल्यागत व्हायचं बाई... स्वयंपाक, जेवणावळी एवढ्या की बाईचं पाऊल स्वयंपाकघरातून बाहेर पडूच नये... मला तर बाई स्वप्नं पडल्यागत व्हायचं... मुलांची हौस-मौज भागवायची... देवाचं काम गं ते... सगळ्यांच्या नशिबी नसतोय बर हा पुण्य योग.. आमच्या आईची सुद्धा हीच पुण्याई ओसंडून व्हायली... तीच पुण्याई आम्हाला आणि तुम्हालासुद्धा पुरून उरंल एवढी मोप शिल्लक आहे...”

वेडं म्हणायचं की शहाणं या बोलण्याला...? काही वेड्या गोष्टी अश्या वेड्या क्षणांच कोंदण घेऊन आल्या की आपोआपच शहाण्या वाटतात नै...? त्यांच्या सोबतीला गावातलीच एक कमळाबाई म्हणून कोणी रोज रात्री झोपायला येत असे... ती आली आणि आम्ही गच्चीतून खाली आलो...
“आज कशाला बोलावलंस कमळाक्काला? आज आम्ही आहोत की सोबतीला तुझ्या...” अभिने गच्चीतून खाली येताना विचारलं...
“हं.. त्यांना लागती व्हय माझी सोबत? मलाच याव वाटतंय हिथं...” कमळाबाई हसून म्हणाल्या...
“अरे तुमच्या लग्नाच्यावेळी बरं नव्हतं नं मला... तेव्हापासून अज्याने हिला सोबतीला ठेवलंय माझ्या... आता तिला लळा लागलाय... नको म्हटलं तरी येती... नवरा दारू पिऊन गेला... मुलं बाळं नाहीत.. पापं... रात्री तिच्या घरात एकटं झोपायचं ती इथं येऊन झोपती...”
“लई हाधार हाये बगा मावशींचा...” कमळाबाईहि कृतज्ञतेने म्हणाल्या..

मला आणि अभिला झोपायला निराळी खोली देऊ केली... त्यांचीच झोपायची खोली... सुंदर सजवली होती... नवीन पडदे, त्यांनी स्वत: हाताने भरलेल्या बेडशीट्स, कोपऱ्यात टेबलावर एक पितळी फुलदाणी होती, त्यात बागेतली शेवंतीची फुलं... पितळी लोटी भांडं.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोलीत भरून उरलेला अस्सल मोगऱ्याच्या अत्तराचा सुगंध...

दुसऱ्या दिवशी पहाटे जरा लवकरच जाग आली... अभि गाढ झोपला होता... मस्त थंडी पडली होती.. असंच झोपून राहावं असं वाटलं पण देवघरातून घंटेची किणकीण ऐकू आली म्हणून उठले...

बाहेर अंधुकसा प्रकाश होता...मावशींची पूजा चालू होती... कुठलंसं भजन गुणगुणत अगदी बारीक आवाजात घंटा किणकिणत होती... देवघरातले देव, देवाची भांडी, घंटा, समई, निरंजन सगळं चकचकीत घासलेलं होतं... हे सगळंच त्या निरांजनाच्या प्रकाशात लखलखत होतं... मावशी पुन्हा एकदा तेजस्वी दिसू लागल्या... अश्या ब्राह्मीमुहूर्ताचं आपलं असं एक तेज असतं असं नेहमी वाटतं मला... आणि त्यात मावशीचं तेज अपूर्व होतं... त्या प्रकाशात त्यांचं साधं सुती लुगडंही रेशमी असल्यागत लखलखत होतं... त्यांची एकमनाने चाललेली पूजा बघत मी तशीच थिजल्यासारखी उभी होते... माझ्यामागे अभि कधी येऊन उभा राहिला कळलंच नाही...

क्रमशः

भाग ३ : http://www.maayboli.com/node/62900

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान