परदेशातील चक्रधर.

Submitted by उदे on 23 June, 2017 - 01:25

परदेशातील चक्रधर. (भाग १)

सिंगापूर-मलेशियात छोटे-छोटे प्रवास असल्याने एकच गाडी करून एकाच चक्रधराबरोबर (ड्रायव्हरबरोबर) प्रवास करतोय असा प्रसंग आला नाही. मात्र,न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांवर प्रवास करताना, पूर्व आणि पश्चिम युरोपातील देशात फिरताना किंवा पूर्व-पश्चिम कॅनडा भटकताना एवढंच काय अलास्कावरील छोट्या छोट्या भूभागावरून भटकताना परदेशातील चक्रधरांचा सुखावह अनुभव आला. वेगवेगळ्या देशात,वेगवेगळ्या देशांचे चक्रधर आपापली वाहन चालवीत असताना,चौकस ज्ञान ,स्वच्छता,विनोदबुद्धी,समालोचन,भाषाप्रभुत्व,अशा अनेक गोष्टीत अनेक गुणांनीं कसे युक्त असायचे? नेहमीच्या व्यवहारात येणाऱ्या अनुभवाला कसे सामोरे जायचे?याचं अवलोकन करताना फारच मजा यायची. त्यांचं कौतुक वाटायचं!
IMG_8736.JPEG
न्यूझीलंडचा ' बॉब ' हा ६० वर्षांचा होता. घटस्फोटित होता. विनोदी शैलीत निवेदन करताना आपल्या खुसखुशीत निवेदनाने तो अल्पावधीतच सगळ्यांचा लाडका झाला. आम्ही जेंव्हा ख्राईस्टचर्चला प्रथम न्यूझीलंडच्या भूमीवर पाय ठेवला,तेंव्हा तिकडे नुकताच भूकंप होऊन गेला होता. त्या प्रसंगाच्या जखमाओल्या होत्या. तशाही परिस्थितीत बॉब म्हणाला,'तुम्ही आमचा देश बघायला आला आहात. तुम्हाला भूकंपाच्या दुःखी कहाण्या सांगून उदास कशाला करू?तर आपण न्यूझीलंडची सुंदर सफर करूया.' असं म्हणत न्यूझीलंडच्या दक्षिण बेटांवरची सहल त्याने आपल्या ओघवत्या वाणीने सुंदर करून सोडली होती.
IMG_8832.JPEG
त्यामानाने न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर ऑकलंड ला भेटलेल्या 'डॉन' नावाचा,८० वर्षांचा चक्रधर (ड्राइवर) भेटला तो फार कडक असा होता! त्याला आपल्या रथामध्ये (कोचमध्ये) जरासुद्धा काही पडलेलं,सांडलेलं चालायचं नाही.(ते खरंच बरोबर होतं!). वेळ पाळण्यात तत्पर असलेल्या डॉनला, भारतीय पर्यटकांशी कसं वागायचं? असा प्रश्न पडला की एका हाताची घडी घालून,दुसरा हात हनुवटीला लावून,तिसरीकडे तोंड करून फटकून उभा राही! ८० व्य वर्षीही डॉन आजोबा गाडी कशी चालवतात?या आमच्या प्रश्नावर त्याच उत्तर होतं,'मी ८०व्या वर्षीदेखील फिट आहे.आमच्याकडे दरवर्षी सर्व वाहन चालकांची कडक डॉक्टरी तपासणी होते. त्यात यशस्वी झालं की वाहन चालकाचा परवाना मिळतो. माझा अजून ५ वर्ष गाडी चालवायचा विचार आहे.'
IMG_8750.JPEG
आम्ही गाडीत बसलेले सर्वजण त्याचं हे वाक्य ऐकून थंड्गारच झालो. आपल्याकडे ६० व्य वर्षी निवृत्ती स्वीकारतात आणि मग निवृत्तीनंतरच जीवन सुरु होतं!
न्यूझीलंडमध्ये बॉब म्हणतो त्याप्रमाणे,'आमच्याकडे निवृत्तीचा विचार करायला वेळच नाही. जीवन जगण्यासाठी सुंदर निसर्ग अप्रतिम भवताल असला तरी जगण्यासाठी प्रचंड संघर्षदेखील करावा लागतो. दोन घास न्यूझीलंडमध्ये सहजी मिळत नाहीत. त्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात.'

बॉब आणि डॉन या साठीच्या आणि ऎशीच्या दोन टोकाच्या दोन व्यक्तिमत्वातील विरोधाभासदेखील तेवढाच टोकाचा होता. बॉब हसरा डॉन तुटक होता.
बॉब खुशालचेंडू डॉन करड्या शिस्तीचा होता. असो. या दोन्हीही चक्रधरांनी ४०-५० लोकांच्या बॅगा गाडीत ठेवण्या-काढण्याचं काम तर ईस्त्री घातलेल्या कपड्यात केलंच परंतु, भर थंडीत त्यानंतर आलेला घाम पुसून चाकावर बसल्या-बसल्या वेगवेगळ्या प्रांतांची माहिती पुरवण्याचं कामही चोख केलं.

गाडीत परतल्यावर सर्वजण थट्टेत आपसात बोलताना ऐकलं, 'आपला भारतच बरा बाबा. इकडे (न्यूझीलंडमध्ये) या आणि मर मर मरा. आणि शेवटपर्यंत कामाचं करत राहा. साठीनंतर आराम नको काय?'

परदेशी चक्रधरांबरोबर फिरताना आपल्यालाही आपल्या नकळत त्या भूभागाच्या २-४ गोष्टी सहज कळून जातात त्या अशा!!

परदेशातील चक्रधर (भाग-२)

आजवरच्या भटकंतीत चक्रधर टूर गाईडच्या रूपात केवळ न्यूझीलँडमध्येच पहायला मिळाला. यावेळच्या पूर्व युरोपच्या भटकंतीत ते चक्रधर केवळ चक्रधराच्याच भूमिकेत बघायला मिळाले. दिवसभराची गाडी चालवली कि काम खतम!!

ऑस्ट्रिया ते स्लोवाकिया अशी सोबत देणाऱ्या स्लोवाकियन यूरास्लाव्हला इंग्रजी येत नव्हतं. त्यामुळे आमच्या टूर लीडरची त्याच्याशी बोलताना तारांबळ उडे. अगदी घाईच्या क्षणी थोडक्यात सांगायच्या वेळी त्या दोघांमध्ये अगदी अटीतटीचा सामना होई. नंतर आलेल्या ऑस्ट्रियाच्या अँड्रयूजचीदेखील तीच अवस्था होती! आमच्या टूरच्या शेवटच्या दिवशी आम्हाला कळलं कि उद्या त्याचं लग्न आहे! गाडीतले सर्वजण त्याला म्हणाले,'अरे ,हे सोनेरी क्षण भावी पत्नीबरोबर घालावयाचे सोडून तू ईकडे काय करतोयस?' यावर अँड्रूज म्हणाला,'पोटासाठी करावं लागत!' ऐकणारे म्हणाले,'यांच्याकडेपण हीच परिस्थिती आहे?म्हंजे घरोघर मातीच्याच चुलीच की !! दुसरं काय?' परंतु एक मात्र होतं! दोघेहि निष्णात चक्रधर होते. लांबलचक 'सेट्रा' (तिला मर्सिडीजचं इंजिन आहे हे सांगायला आमचा टूर लीडर विसरायचा नाही!) चिंचोळ्या गल्लीतून चालवताना त्यांचं कसब उफाळून येई. बाकी युरोपात गाडी चालवायची म्हंजे आमच्या लीडरच्या भाषेत,'एकाच एक १०० स्पीडने सतत चालवत राहायचं. ते सुद्धा यांत्रिकी असल्याने,जीपिएस च्या साथीने मार्गक्रमणा करताना तुम्ही दमायची सुतराम शक्यता नाही.'

या जीपिएस वरून आठवलं. मागच्या पश्चिम यूरोपातील देशांची सफर करीत असताना एका इटालियन चक्रधराने पॅरिसवरून जी बस रेमटवली,ती थेट ब्रुसेल्सला(बेल्जियम) साडेतीन तासानंतरच थांबवली!परंतु थांबण्याच्या अगोदर योग्य थांबा न मिळाल्याने जीपिएस च्या आधारे शहरात गोल गोल फिरत राहिला. त्यावेळी बसमधील प्रवाशांना कधी एकदा हा थांबतो असं झालं होतं.

कॅनडात बान्फ-जास्पर-अल्बार्टा नेणारा दुसरा इटालियन चक्रधर मात्र धूर्त, हुशार होता. रस्त्यात अस्वलाचं दर्शन झाल्यावर सगळेजण एकदम ओरडले,'गाडी थांबव. ' तास तो माईकवरून हळूच म्हणाला,'ओरडू नका. अस्वल पळून जाईल. दुसरं म्हंजे मी गाडी हळू नेऊ शकतो. भर रस्त्यात थांबवू शकत नाही. काळजी करू नका. गप्प राहा. मी सांगेन तेंव्हा न बोलता फक्त बाहेर पहा.' त्याच्या या 'उपाययोजनेमुळे', आम्ही पुढे त्या सुप्रसिद्ध बान्फ-जास्पर-अल्बार्टा हायवेवर कॅनडातील वन्य जीवन अनायासे जवळून बघू शकलो!!

कॅनडातील टोरांटो मध्ये आमचा चक्रधर होता 'जनक'. तो भारतीय होता. १५ वर्ष कॅनडात होता. मुलाला भारतातून कॅनडात आणून स्वतः भारतात परतणार होता! सारं काही पोटासाठीच हे वैश्विक सत्य आपल्या पद्धतीने सांगणारा होता.

सर्वजण नाश्ता करीत असताना चक्रधर गाडीजवळ उभे असायचे आणि जेवण होऊन सर्व परतायच्या बेतात असताना त्यांना निवांत वेळ मिळायचा. त्यावेळी त्यांच्याशी टूर हा विषय सोडून बोलणं व्हायचं. त्यांना आणि मला दोघांनाही या प्रकाराने बरं वाटत असावं. कारण प्रत्येक चक्रधर काहीतरी विशेष सांगायचं,दाखवायचा,परिसराचं महत्व सांगायचं प्रयत्न करायचा.

भारतातील चक्रधर वैयक्तिक परिचयाचे असल्याने आणि दीर्घकाळ सोबती असल्याने मी त्यांना जिवलग समजतो. परंतु हे परिचित नसलेले परदेशी चक्रधरसुद्धा त्यांच्या जवळकीच्या वागणुकीने आपलेसे होतात. कधीकधी टूर संपल्यावर विसरून पुन्हा आठवण्यासाठी तर कधी त्यांचा फोटो इमेलवर टाकून हवे तेंव्हा जोडले जाण्यासाठी!

कसंहि का असेना, प्रत्येक चक्रधराशी काही दिवसांसाठी का असेना परंतु आपली साथ-सांगत असतेच ना.
आणि तेव्हढ्याश्या अल्पावधीत आपल्यालासुद्धा जीवनाचं वेगळं दर्शन होतंच ना!!

-----उदय ठाकूरदेसाई.
uthadesai.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख,
सगळे चक्रधर स्टाईल च्या बाबतीत अगदि पायलटशी स्पर्धा करत आहेत Happy

अतिशय छान लेख. आवडला.
आपल्याकडच्या एसटीच्या चक्रधरांवर एक लेख लिहा कुणीतरी, Happy

छानच

तुम्हा सर्वांचे आभार.
मामी, परफेक्ट हां! ई-मेल कॅनडा वाल्याला पाठवून झाला. असो.
तुम्ही सर्वांनी 'चक्रधर' हा भारतातल्या जिवलग चक्रधरांवर लिहिलेला लेख माझ्या 'उठादेसाई.कॉम' या वेबसाइटवर पाहिलात तर अर्थात आनंदच होईल.

मस्त लेख
सगळे चक्रधर स्टाईल च्या बाबतीत अगदि पायलटशी स्पर्धा करत आहेत << एकदा आमच्या लोकल बस मधला चक्रधर पायलट स्टाईल ने अनॉउसमेंट करत होता Happy