आंबेनळी – खेतोबासंगे भोरगिरीच्या वाटेवर……

Submitted by योगेश आहिरराव on 23 June, 2017 - 00:48

आंबेनळी – खेतोबासंगे भोरगिरीच्या वाटेवर……
खरेंतर हा ट्रेक जानेवारी २०१७ मध्ये केला. पण फोटोंची झालेली गफलत आणि अन्य काही कारणांमुळे हा लेख आत्ता पुर्ण झाला.
सकाळी सकाळी जामरूंग पोहचून एका दुकानाजवळ गाडी लावली अर्थातच दुकानदार काकांच्या सहकार्यामुळे गाडी सुखरूप आणि सुरक्षित त्यामुळे आता काही चिंता नव्हती. गेले काही महिन्यांपासून मी आणि झेनोश पटेल ठरवत असलेला प्लान या वेळी मात्र जमवून आला होता. सदाबहार अशा भीमाशंकर भागातील दोन सुंदर घाटवाटांनी त्याच भीमा नदीच्या खोर्यात वसलेल्या किल्ले भोरगिरीची सफर.
सकाळच्या आल्हाददायक वातावरणात तासाभरात चालत पाचखडक धनगरवाड्यात दाखल झालो. समोरच भीमाशंकराच्या गणेश घाट आणि शिडी घाटाचा पहारेकरी पदरगड खुपच जवळ भासत होता तर छोटेखानी नव्या जुण्या ट्रेकर्सचा फेव्हरेट असा कोथळीगड (पेठ) चा किल्ला बराच मागे पडला होता. सह्याद्रीचाअंदाजे तीन हजार फूट उंचीचा काळा पहाड प्रेमाने खुणावत होताच आम्ही सुध्दा भेटीला तेवढेच आतुर झालो होतो.
सह्याद्रीच्या कुशीतल्या या धनगरवाड्यापासून दोन घाटवाटा निघतात. पहिली उत्तरेच्या दांडाने वर जात पुढे एका घळीतून चढाई करत पदरगडाला वळसा घालून गणेशघाटाला मिळून भीमाशंकरला जाते. दुसरी आंबेनळी घाटाची वाट या वाटेने घाटावरच्या येळवली किंवा भोरगिरी मार्गे भीमाशंकर जाता येते. नियोजनानुसार आम्ही आंबेनळी घाटातूनच चढाई ठरवली होती.
पाचखडक धनगरवाडा सोडल्यानंतर सह्याद्रीच्या दिशेने मळलेल्या वाटेने वीस एक मिनिटे सरळ गेल्यावर उजवीकडच्या ओढ्यात वाट उतरली तसेच ओढ्यातले दगड धोंडे पार करत उजवीकडच्या घळीतून मुख्य आंबेनळी घाटाची चढाईची वाट होती. हळूहळू ओढ्यातून आणखी अर्धा तास चालत बरोब्बर उजवीकडून येणार्या त्या मुख्य आंबेनळीच्या नाळेपाशी आलो. वाट कसली चांगला मोठा ओढाच सरळसोट खाली उतरत होता बराचसा मार्ग दार्या घाटासारखा. सुरूवातीला मुख्य नाळेच्या उजव्या बाजूने चढाईचा मार्ग हे माहित होतेच. तिथेच थोडे आजुबाजूला झाडीतून मार्ग काढत मुख्य मळलेल्या पायवाटेला लागलो. इथपर्यंत येण्याची खुण म्हणजे धनगरवाडा सोडल्यापासून बरोब्बर पाऊण तासातच ही उजव्या बाजूची नाळ दिसते तिथूनच उजवीकडे झाडीतून वर चढणारी वाट शोधायची थोडं वर आल्यावर मागे वळून हि छोटी झाडीभरली नाळ विरूध्द दिशेला नजरेस पडते. अन्यथा गावातून माहितगार घेणे उचित ठरते कारण पाचखडक धनगरपाडा, रजपे किंवा येळवली अथवा खरपुड ला जाणारे क्वचितच कुणी या वाटेने ये जा करतात. मुख्य नाळेला डावीकडे ठेवून झाडीभरली वाट वर चढू लागली काही ठिकाणी खुपच अरूंद, घसारा खड्या चढणीच्या त्या निमुळत्या वाटेने चढाई. मुख्य आंबेनळीतला ओढा डावीकडे खुपच खोलवर भासत होता, काही ठिकाणी मोठ्ठाले प्रस्तर शिळा तसेच मधल्या डोहाची खोली पाहून धो धो पावसाळ्यात हे नक्की भयानक यात शंका नाही. आस्ते कदम पुढे सरकत जवळपास पदरगडाच्या पातळी ऐवढी ऊंची गाठली आता पुढची निम्म्याहून अधिक चढाई सरळसोट ६०-७० अंशातल्या दगडधोड्यांनी भरलेल्या आंबेनळीतूनच, पाठीमागे पदरगडाचे दर्शन खासच. नाळेतल्या मुख्य वाटेने चढाई त्यामुळेच पायावर आणि गुडघ्यांवर अतिरिक्त ताण जाणवत होता. ऐके ठिकाणी विश्रांती घेत सोबत आणलेले चिक्की, फळे, खजूर तोंडात टाकले. दोघेच असल्यामुळे निवांत कसली घाई नाही, चिंता नाही पुर्ण दिवस हाताशी आहे जिथे मनाला आवडेल तिथे बिन्धास्त रेंगाळायचे, आरामात जंगल अनुभवत ट्रेकची खऱी मजा घेत वाटचाल करत होतो. जसजसे वर जात होतो चढाई आणखी तीव्र आणि नाळ अरूंद होत गेली. वाटेत दम खात पाणी पिण्यासाठी थांबलो असताना, खांदा आणि मानेवर काहीतरी जाणवले बघितले तर माश्या त्यांची उठबस पाहून खऱतर धक्का बसला. हळूच मागे वळून कड्याकडे पाहिले तर एक आग्यामोहोळ लटकलेले दिसले. झेनोश थोडे अंतर पुढे होता त्याच्या अंगावर मात्र एकही माशी नव्हती. माश्या अंगावर बसल्यावर त्यांना डिचवू नये तसेच मारायचा तर अजिबात प्रयत्न करू नये अशाने ईतर सर्व माश्या अक्षरश: हल्ला करतात हे सर्व ऐकून माहित होते तेच आता अमंलात आणायचे होते. फुल बाह्यांचा शर्ट, फुल विजार तसेच मान सवयीनुसार रूमालाने झाकली होती आणि डोक्यावर टोपी हिच काय ती माझ्यासाठी जमेची बाजू होती. बघता बघता माश्यांची संख्या वाढू लागली, मनात एक वेगळीच भिती दाटून आली. भर जंगलातल्या अशा नाळेत आम्ही दोघेच त्यात मला काही झाले तर दूर दूर पर्यंत वस्ती नाही अशा आडनिड वाटेवर मदत मिळणे तर दूरच. भितीने दडपण वाढून घशाला कोरड पडली तसाच हालचाल न करता शांत बसून राहिलो. एक मात्र बरं होते की माश्या नाका डोळ्याजवळ घोंघावत नव्हत्या, त्या फक्त मानेवर आणि सॅकच्या वरच्या भागाजवळ तसेच डाव्या खांद्याच्या काही भागावर होत्या. फार वेळ त्याच अवस्थेत बसून रहाणे हि परवडणारे नव्हते, हिमंत एकटवून हळूहळू मान खाली घालून शक्य तितक्या सावधगिरीने नाळेतला चढ चढू लागलो. चढ आणि भिती यामुळे कोरड पडून तहान खुप लागत होती पण थांबून चालणार नव्हते. "थोडा ही बाकी है, we are very close to summit. Stay cool be relax" असं काहीतरी बोलून झेनोश धीर देत होता. अर्थात याहून अधिक तरी तो काय करणार. कुठला तरी विषय काढून माझे लक्ष गुंतवत पुढे जात होता. प्रचंड दडपणाखाली जवळपास पंधरावीस मिनिटे चढाई करत वाट किचिंत डावीकडे कारवीच्या विरळ जंगलात शिरली. आश्चर्य म्हणजे जसे कारवीच्या जंगलात शिरलो काय माहित पण सर्व माश्या वरचेवर आपोआप उडून गेल्या. हूशशश् एका मोठ्या संकटातून सुटलो.. थोडे आत जात एके ठिकाणी पाठीवरचे सगळे ओझे उतरवून खाली बसलो. पहिले म्हणजे भरभरून पाणी प्यायलो.
खऱच त्यावेळेची माझी मानसिक स्थिती सांगता येणे अवघड आहे पण अजुनही ते आठवले तरी अंगावर काटा येतो. आत्ता पर्यंत सह्याद्रीत भरपूर हिंडलो पण असे कधी घडले नाही. वाट चुकून वेळेच्या अभावी येणारे दडपण मग एक वेगळीच निराशा पण पुन्हा शांतपणे परिस्थिती हाताळून योग्य वाटेवर आल्यावर लगेच उत्साहाने जाणवलेला बदल. दरवेळी वेगवेगळ्या अनुभवाने भटकंती समृध्द होत गेली आणि अजुनही होतच आहे त्यात हा एक मोठा अनुभव. असो तर सह्याद्री कृपा अजून काय..
माश्या मानेवर आणि सॅकच्या वरच्या भागातच का बरं बसल्या याचा विचार करत असताना, सॅककडे एकटक पहात होतो. नीट बघितले तर वरच्या कप्प्याची झिप थोडी उघडी राहिली होती आणि नेमके याच कप्प्यात उरलेले चिक्कीचे व खजूराचे पाकीट होते. बहुतेक त्या गोड आकर्षणामुळे तर माश्या आल्या नसतील ???
थोड्या विश्रांती नंतर अवघ्या दहा मिनिटातच ती झाडीभरली वाट संपवून घाटमाथ्यावर दाखल झालो. वर पोहचताच चारही बाजूला नजर फिरवली दूर दूर पर्यंत मानवी वस्तीच्या खुणा नाही, मध्येच मोकळे पठार, थोडेफार जंगल आणि त्या जंगलाने वेढलेल्या टेकड्या. आंबेनळीतून वर आल्यावर डाव्या हाथाला ईशान्येला कमळजाई मंदिर आहे हे माहीत होते. त्या दिशेनुसार मधला छोटा जंगलपट्टा पार करून मोकळवनात आलो तसेच मळलेल्या वाटेने पुढे जात डावीकडे कमळजाई मंदिर दृष्टीस पडले. मंदिर तसे लहानच जवळ पाण्याची सोय नाही अन्यथा चारही बाजूंनी जंगलाने वेढलेल्या या मंदिरात मुक्कामाची मजाच वेगळी. मंदिराच्या पुढे थोड्या अंतरावर ट्रेकर्सचा प्रसिध्द लोणावळा भीमाशंकर हायवे लागला. उत्तरेकडे वळालो तर तासा दिडतासात भीमाशंकर. आम्ही त्याच वाटेने थोडे मागे जात डावीकडची जंगलात शिरणारी वाट पकडली, खाली दूरवर दरीत भीमा नदीचे कोरडे पात्र आणि एक छोटा पुल दिसत होता. मध्येच एके ठिकाणी थांबून घरातून आणलेला दुपारच्या जेवणाचा डबा संपवला. वेळ हाथाशी होताच आणि येरवळी गाव काही फार अंतरावर नव्हते मग अर्धा तास दुपारची झोप असा ठराव मंजूर झाला. सकाळपासूनची दमछाक, पोटभर जेवण आणि जंगलातला शुध्द ग्रीन ऑक्सिजन सहाजिकच एका तासानंतर जाग आली. पुढे दहा मिनिटांतच येळवळी गावात दाखल झालो. पंधरा वीस उंबर्यांचे हे अगदीच छोटे आणि आटोपशीर गाव अथवा वाडीच म्हणता येईल हवं तर. भीमाशंकर अभयारण्याच्या ऐन हद्दीत इथल्या ग्रामस्थांनी जंगलाचे चांगलेच संगोपन केले आहे. खंडू बाणेरे यांच्या घरी गेलो. खंडू दादा घरी नव्हते ते भीमाशंकरला वनौषधी विकायला जातात. आयुर्वेदिक जडी बुटी, वनौषधी या बद्दल त्यांचा खुप अनुभव आणि चांगला अभ्यास. अंगणात उभे होतो लगेच हाथपाय धुण्यासाठी पाण्याची बादली समोर, हाथ बुडवला तर चक्क गरम पाणी ! आता काय बोलावे ! दमलेले स्नायुंना त्या गरम पाण्याच्या शेकामुळे चांगलेच सुखावले. फ्रेश होई पर्यंत बाणेरे ताईंनी कळशीभर पाणी आणि कोरा चहा आणला. कसे आहे ना कसे आहे ना ! कोण कुठले ? नाव काय, गाव काय ? निव्वळ डोंगर भटकणारी जमात एवढी एकच ओळख. ह्याच विश्वासावर एवढे आदरातिथ्य नाहितर शहरात कुणाकडे पाणी मागायची मुश्कील. खऱच पण सह्याद्रीतल्या अश्या खेड्यापाड्यात माणुसकी, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा भरपुर मिळतो. तुमची फक्त वृत्ती स्वच्छ हवी आणि घेण्याची ताकत बसं बाकी काही नाही. विषय लांबत जाईल तर असो.. सायंकाळचे चार वाजत आले होते. भोरगिरी किल्ल्यावर मुक्कामाचे नियोजन होते. पण बाणेरे ताई म्हणाल्या, ‘आज मकरसंक्रातीची वर गर्दी असणार आणि काही लोकं मुक्कामी पण असू शकतील,त्यापेक्षा जाऊन या आणि इथेच मुक्काम करा.’ थोडा विचार केला नाहीतरी उद्या सकाळी पुन्हा भोरगिरी उतरून येळवळीत येऊन खेतोबाला निघायला एक तास सहज वाढतो. इथेच मुक्काम केला तर तो वेळ वाचवून आरामात निघता येईल. झेनोश ला हे सांगितले, सुरूवातीला गावात रहायला नको म्हणाला पण वेळेच्या बचतीमुळे तयार झाला. सुका खाऊ आणि पाण्याची बाटली घेऊन आम्ही निघणार इतक्यात आमचे संभाषण ऐकत एक व्यक्ति बाहेर आली.
नाव: ×××
xxx : ‘चला मी येतो तुमच्या सोबत तुम्हाला सगळ फिरवून आणतो.’
झेनोश : ‘नको, आम्ही जातो. रस्ता माहितीये’ (मोडक्या मराठीत)
xxx: ‘आवो जंगलामधी चुकणार तुम्ही’
झेनोश : ‘आमच्याकडे नक्शा आहे’
मी : ‘असु दे, जातो आम्ही काही होत नाही’.
xxx: ‘मी इथं कामासाठी आलो व्हतो, काम झालय. मी भोरगिरीतच रहातो. चला संगती गप्पा मारत जाऊ वाट हि दाखवतो आणि किल्ला पण.’
मग बाणेरे ताई मध्ये म्हणाल्या, ‘अरे ते नको म्हणताय तर कशाला उगीच पाठी पडतोया, ते काही चुकायचे नाही नेहमीची फिरणारी माणसं ती. जामरूंग हून कुणाला ही सोबत न घेता इथंपर्यंत आली आता कशाला चुकतील.’
xxx: (माझ्याकडे पहात थेट विषयाला हाथ घातला)
‘मी काय पैसे मागतोय व्हयं. आले तुम्ही जाऊ बोलत चालत. तुम्ही नाही बी दिले तरी चालेल. मी तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवणार, तुम्हाला आवडल्यावर तुम्ही थोडच मला तसं जाऊ देणार? स्वखुषीने काहीतरी देणारच ना’
हा तर जबरदस्तीचा सौदा होता, साहेब मागेच लागले होते. झेनोश तर पुढे चालू पडला होता, तुर्तास तरी सुटका नाही असं मनोमन बोलून चालू पडलो. येरवळी गावातून वाट उतरणीला लागते वाटेत दुसरी येळवळीची वाडी लागते तर डावीकडे दुरवर भीमाशंकर तिथला टॉवर सहज ओळखू आले. डावीकडे भीमानदीच्या कडेने वाट उतरु लागली. भोरगिरी भीमाशंकर मार्ग आडवा गेला. हल्लीच बांधलेल्या नवीन पुलावरून भोरगिरी गावात दाखल झालो. पुर्वी पुल नव्हता तेव्हा भर पावसात भीमा नदीचे पात्र ओलांडून येरवळीत येणे मुश्कील होत असे. गावात नव्याने बांधलेले कोटेश्वर महादेव मंदिर दिसले. तसे पाहिले तर भोरगिरी हा किल्ला पुर्वीच्या काळी कोकणातून भीमाशंकर परिसरातील देशावर खेड राजगुरूनगरकडे येणार्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त. गावातून भोरगिरी किल्ला त्यावरील गुहा आणि भगवा ध्वज यामुळे सहज लक्षात आला. xxx कॉमेंट्री ऐकत चालणे भाग होते. वाटेत गावातले येणारे जाणारे प्रत्येकाला हा भाऊ राम राम शाम तसेच काहीतरी इकडचे तिकडचे विषय घेऊन चर्चेला सुरूवात, मग आम्ही पुढे निघतोय तोच आवरते घेत आमच्यामागे परत हजर. अमुक शुटींग, तमुक हिरो, मग हि जागा ते फॉरेस्टवाले अशा विषयांची यादी वाढतच होती. झेनोश तर दुर्लक्ष करत पुढे पुढे पण मला ते काही जमेना, तरी मी किल्ल्याबद्दल गावाबद्दल असे काही विचारून वेळ मारून नेत असे. xxx भाऊ विषय फिरवण्यात भलतेच माहिर. पंधरा मिनिटातच शेवटच्या कातळकोरीव पायरांनी गुहेजवळ पोहचलो. गुहेत चार खांब आणि सुरूवातीलाच दोन्ही बाजूला पाण्याची टाक आहेत. मोठ्या गुहेत महादेवाची पिंड आणि नंदी, गावातल्या एक बाई सध्या इथे साफसफाई आणि दिवाबत्तीची सोय बघतात. बाजूच्या गुहेत देवीची मुर्ती आणि समोरच पाण्याचे टाके. पुढे टाके व गुहा डाव्या हाथाला ठेवत किल्याच्या माथ्यावर निघालो. वर येताच एक मोठे भुयारी टाके तसेच बाजूच्या कोरड्या टाक्यात एक विरगळ दिसली. तसेच वळसा घालत जात वाटेत खांब टाके आणि अनेक पाण्यानी भरलेली टाके दिसली. जवळपास गडप्रदक्षिणा करत मागे पडझड झालेल्या तटबंदी जवळ आलो. पुढची घसाराची बारीक पायवाटेने जुण्या उध्दवस्त दरवाज्यात आलो. इथूनच मागच्या वाटेने एक वाट निगडाळे मार्गे भीमाशंकरला जाते अशी माहिती xxx भाऊ ने दिली. दिशेप्रमाणे ते बरोबर होते. आम्ही त्या दरवाज्याकडच्या वाटेने खाली वळसा घेऊन गावाच्या वाटेवर आलो. पण एक गोष्ट मात्र खऱी xxx जरी अखंड बडबडे असले तरी या भागाची त्याला खडाऩखडा माहिती होती. भोरगिरी गावात आल्यावर त्यांचा निरोप घ्यावा आणि निघावे तर अपेक्षेप्रमाणे xxx भाऊची पैशासाठी विचारणा. मी ठराविक रक्कम दिली पण हे साहेब त्यावर नाखुष. मला पुन्हा घडले रामायण सांगून वाद घालायची मुळीच इच्छा नव्हती, आपसुक अंगावर आलेले हे प्रकरण होते. तरी मी मनाच्या इच्छेविरूध्द थोडे अजुन पैसे दिले. हेतू हाच की जाऊ दे कसे का असेना हा नाराज नको व्हायला.
मी: ‘चला आता येतो आम्ही’
xxx: ‘अरे थांबा पुढं जाऊन लगीच आलो.’
मी : ‘आता कशाला परत येताय तुम्ही, तुमचे घर आले ना. आम्ही जाऊ व्यवस्थित.’
xxx: ‘मी जरा लावून येतो मग जाऊ.’
हे वाक्य ऐकल्यावर माझी तळपायाची आग मस्तकात गेली, काय फालतु प्रकार हा. अक्षरश: राग आणि संतापाची भावना निर्माण झाली. आपण मदत आणि त्यांच्या सेवेचे मोल म्हणून थोडीफार पैशांची मदत करावी तर काही असे महाभाग ते पैसे व्यसनांवर खर्च करतात. घडला प्रकाराने मनात खुप वाईट वाटले, तसे पाहिले तर एक चांगला माणुस निव्वळ या व्यसनापायी वाया जाण्याच्या मार्गावर...काय बोलावे.
तसेही भटकंतीत काही वाड्या वस्त्यांवर असे अनुभव येतातच पण खऱच मनाला पार चटका लावून जातात. मी आणि झेनोश पुढचे काही मिनटं ऐकेमेकांशी काहीही न बोलताच चालत होतो. शेवटचा चढ चढून येळवळीच्या पहिल्या वाडीत आलो थोडे थांबून येरवळीत बाणेरेंच्या घरी पोहचताच सुर्यास्त होत आला होता.
थोडी आवराआवर करून सोबत आणलेल्या रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागलो. तोच खंडू बाणेरे बाहेर येत म्हणाले, "अहो हे काय करताय उगीच, आज सक्रांतीचा सण आहे. तुम्ही दोघं पाव्हणे थोडीच जड आहात मला." बरांच नकार देण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांच्या आग्रहापुढे नमते घ्यावेच लागले. गरमागरम पुरणपोळी सोबतीला गुळवणी आणि भात रस्सा असा मस्त मेनू. जेवण करून बाहेर चक्कर मारून येईस्तोर खंडू भाऊंनी आमचे आथंरूण तयार ठेवले होते ते पाहून चाटच पडलो. मी म्हणालो, आम्ही सर्व सोबत आणले आहे आम्ही बाहेर टेंट लावून झोपतो तुम्ही कशाला त्रास करून घेताय. त्यावर खंडू भाऊ म्हणाले, ‘मला माहितीये तुम्हा ट्रेकर लोकांच तुमच्याकडे सर्व साहित्य असते पण उगीच थंडीत बाहेर झोपण्यापेक्षा झोपा गप घरातच’. मग काय...
सकाळी लवकर उठून पहातो तर तोपर्यंत नाश्ता तयार, कशीतरी आमच्याकडची म्यागी संपवू तरी द्या असे म्हणत काढली आणि आम्ही एकत्र नाश्ता केला. खंडूभाऊंना भीमाशंकर निघायचे होते, आमचीही निघण्याची तयारी झालीच होती. अक्षरश: जड पावलांनी बाणेरे कुटुंबियांचा निरोप घेतला. भाऊंनी खेतोबाची वाट समजावून सांगितली दिशेप्रमाणे सरळ सुटलो. येळवळी गाव तसे एका टेकडीवर वसलेले आहे दोन्ही बाजूला उंच डोंगर तर दोन बाजूला वहाणारे पावसाळी मोठे ओढे. असाच एक ओढा पार करून समोरच्या टेपाडावर चढलो, मस्त झाडीतली वाट वर चढू लागली टिपिकल भीमाशंकर जंगल वाट. काही वेळात वर चढून वाट मोकळवनात आली आता त्या छोट्या पठाराच्या चारही बाजूला जंगल आणि मध्ये तो मोकळापट्टा. इथे बर्याच ढोरवाटा चुकवू पहात होत्या पण दिशेनुसार चालत होतो. पुन्हा वाट जंगलात शिरली काही वेळात बाहेर येत पश्चिम टोकावर धडकलो. सरळ रेषेत खेतोबाचे मंदिर काही दिसेना, जवळ गेल्यावर आणखी थोडे खाली उतरून सह्याद्रीच्या मुख्य पश्चिम कड्याचे पठार (क्रेस्ट लाईन) होते. तिथेच दक्षिणेकडे पांढरा रंगाचे खेतोबाचे मंदिर. खेतोबावर इथल्या आसपासच्या ग्रामस्थांची खुप श्रध्दा, गावातले लोकांमध्ये नवस बोलणे बळी देणे वगैरे. खेतोबा मंदिराच्यामागे तटावर उभे राहिलो उजवीकडे पदरगड, समोरच खाली हल्ली काही वर्षात प्रसिध्दी पावलेले सोलनपाडा धरण, दूरवर तुंगी आणि कोथळीगड तसेच वांद्रे नाखिंदा पठारावरच्या पवनचक्की.
वातावरण थोडे धुरकट असल्याने हवे तसे फोटो मिळाले नाही. एक एक संत्रे आणि खजुर खाऊन खेतोबा घाटातून उतरणीला लागलो. मंदिरापासून दक्षिणेकडे पाच मिनिटाच्या चालीवरच खेतोबा घाटाची सुरूवात आहे. चटकन मुळीच लक्षात येणार नाही अशी या वाटेची सुरूवात. मी पाहिलेल्या काही घाटवाटांपैकी या घाटवाटेचे हे खेतोबाचे दार मला खुपच आवडले. खेतोबा घाटाची सुरूवात मागे पदरगड.
दोन कातळांच्या बेचक्यातून वाट उतरणीला लागली. झाडीभरल्या वाटेने वळसा घेऊन वाट तिरकी उतरू लागली. थोडे अंतर उतरत नाहीत तोच एक गाववाला जोरजोरात पळत धापा टाकत वर आला. थांबवत विचारले, ‘काय झाले ? कुठून आलात ?’
कामतपाड्यातून आलोय, ‘माकड माकड,’ असे काहीतरी सांगू लागला. गाववालेच ते एकटे दुकटे नेहमीच अशा घाटवाटा येण्याजाण्यासाठी वापरतात. सोबत असते ना पाणी ना काही खाण्याचे सामान, आपल्यापेक्षा कमीत कमी वेळात ही लोकं या वाटा आरामात पार करून जातात. त्याला दोन मिनटे शांत बसवून पाणी पाजले मग विचारले, ‘काय झाले ते सांग ?’ त्याने खुलासा असा केला की वाटेत दोघा तिघा माकडांनी त्याची वाट अडवली, त्यावर आरडाओरडा करून हल्ला करू पहात होते. खऱतर जंगलात फिरताना सोबत किमान काठी ही असावीच, त्यात हा माणुस एकटा हाथात काहीच नाही मग अशावेळी भिती वाटणे सहाजिकच. आम्हालाही त्याने सांभाळून जावा माकडं लय डेंजर असा सल्ला दिला. गाववाला घाबरलेला मी तरी पहिल्यांदाच बघत होतो. त्यात माकडांचा त्रास म्हणजे वेगळीच उपाधी, हा अनुभव मी मांगी तुंगी, आजा पर्वत आणि रतनगडावर चांगलाच घेतला होता. त्यामुळे दोघे सावधगिरी बाळगतच उतरू लागलो. पुढे आणखी एक वळसा मारून वाट दाट जंगलात शिरली. सुरूवातीला पक्ष्यांची किलबिलाट तर काही ठिकाणी चक्क सकाळी सकाळी रातकिड्यांचा किररर आवाज. एक एक टप्प्यात उतरत जाणारी वाट आणि डावीकडे सरळसोट पाचसहाशे फुटांचा काळा ठिक्कर कातळकडा. काही अंतर पुढे जात वानरांच्या टोळीचे दरडावणे सुरू झाले. काही विशिष्ट अंतर राखून डाव्या कड्याजवळ तर काही ऊंच झाडांवर एका फांदीवरून दुसरीकडे असे उड्या मारत किंचाळत होते. दोघांजवळ सवयीप्रमाणे काठी होतीच तरीपण एकेमेकांमध्ये फारसे अंतर न ठेवता उतरत होतो. एका ठराविक टप्प्यानंतर वानरांचा त्रास नाहीसा झाला. कुत्र्यांचा जसा एखादा ठरलेला भाग असतो तसाच बहुधा या वानरांचा, त्या ठराविक टप्प्यात दादागिरी चालत असावी असेच काहितरी वाटून गेले. खेतोबाच्या मंदिरापासून निघून तास सव्वातासातच पदरात दाखल झालो. पदरातले मोठे जुणे महाकाय वृक्ष तर पार आभाळाला भिडू पहात होते. भर दिवसा पदरातल्या त्या टप्प्यात दाट जंगल पाहून सुखावलोच. तिथेच एका मोठ्या झाडाजवळ एक ब्रेक घेतला. सोबतचा सुका खाऊ आणि पाणी पिऊन पुन्हा ताजेतवाने होत पुढे चालू लागलो. हा पदर अगदी भीमाशंकरच्या पदरवाडी प्रमाणे जशी ती पदरवाडी तसे हे रानमळा. इथेच येरवळीतील कुणी बाणेरे पावसाळ्याच्या आसपास वस्तीला असतात. दुसरे म्हणजे जसा प्रकार भीमाशंकराच्या घाटांचा आहे अगदी तसाच प्रकार इथे आहे. जसे की पदरवाडीतून शिडी घाटाची आणि गणेश घाटाची दोन्ही वाटा नंतर खांडसला एकत्र येतात अगदी तशाच या रानमळ्याच्या पदरातून एक शिडीची वाट आणि दुसरी वाजंत्री घाटाची अशा दोन वाटा निघून खाली कामतपाड्यात एकत्र येतात. यात आणखी एक समान गोष्ट म्हणजे गणेश घाट आणि वाजंत्री घाट हे शिडीच्या वाटेच्या तुलनेत लांबचे व सहजसोपे मार्ग. कड्यात रोवलेल्या शिडींच्या आधारे कमीत कमी वेळात चढाई-उतराई करता येते पण भर पावसात आणि जास्त सामान सोबत असेल तर दुरची पण सुरक्षित वाट निवडावी हेच बेहत्तर.
वाजंत्रीघाटाची वाट सोडून शिडीच्या वाटेसाठी पदरातून सरळ पश्चिम टोकाजवळ आलो, वाट तशी मळलेली होती. सुरूवातीलाच खाली घसारायुक्त चिंचोळी वाट जात होती, त्याअलीकडे एका झाडावर भगवा झेंडा फडफडत होता. उजवीकडे कडा आणि डावीकडे दरी अश्या त्या वाटेवरून पहिल्या कातळटप्प्यात आलो नव्यानेच जी आय पाईपाच्या शिडीच्या सहाय्याने सावकाश उतरलो, पुढचा कातळटप्पा मात्र पाठीवरची माझी आणि झेनोशची सॅक दोराने खाली एका जागी सोडून मग आम्ही उतरलो. तसा किचिंत दृष्टीभय असलेला हा शंभर दिडशे फुटाचा कातळकडा सराईत ट्रेकरला मुळीच अवघड नाही. छोटासा एक्सोपज ट्रेव्हर्स पार करून तिसर्या शिडीने उतरत हे प्रकरण संपवले. आता कडा डावीकडे आणि उजवीकडे दरी छोट्या आडव्या पायवाटेने जामरूंग डोंगराच्या खिंडीत आलो. जामरूंग डोंगराला वळसा घालत, त्या सोंडेवरून मळलेल्या वाटेने पुढच्या अर्ध्या तासातच कामतपाड्यात पोहचलो. मागे वळून घाटमाथ्यावर पहातो तर खेतोबा मंदिर पुन्हा साद घालत होते. कामतपाडा ते जामरूंग अर्ध्या तासाची पायपीट करून दुपारी दोन वाजताच परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. गेल्या दोन दिवसात या दोन सुंदर वाटांनी दिलेला वेगवेगळा अनुभव यामुळे हा ट्रेक कायमस्वरूपी लक्षात रहाणार यात वादच नाही.

फोटो साठी हे पहा : http://ahireyogesh.blogspot.com/2017/06/ambenali-bhorgiri-khetoba.html

योगेश चंद्रकांत आहिरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की कुठून? पेठच्या आंबिवलीपुढे शेवटी जामरुख आहे तिथून वर गेलात काय भोरगिरीकडे? तिथे आहेत माकडं.
हातात काठी पाहिली तर माकडं चवताळतात हा अनुभव आहे. काठी नसावी

मस्त लिहिलंय
माश्यांच्या तावडीत सापडता सापडता वाचलात, नशीब वान आहात.
भोरगिरीहून भीमाशंकरला जाताना आम्हालाही सेम अस्साच एक बळंच गाईड /बेवडा भेटला होता.
मात्र आम्हाला त्यावेळी शेकरू दिसली तीच आठवण गडद आहे.

पेठच्या आंबिवलीपुढे शेवटी जामरुख आहे तिथून वर गेलात काय भोरगिरीकडे? >>> होय. जामरुख- पाचखडकपाडा- आंबेनळी घाट.

माश्यांच्या तावडीत सापडता सापडता वाचलात, नशीब वान आहात. >>>> होय हार्पेन बरोब्बर बोललात. अजुनही ते आठवले तरी अंगावर काटा येतो.