देवदर्शन : भाग १

Submitted by फूल on 22 June, 2017 - 22:06

लहानपणी ऐकलेल्या गोष्टीतल्यासारखं लग्नं झालं माझं... एक दूर देशीचा राजकुमार घोड्यावर बसून येतो आणि राजकन्येला आपल्याबरोबर घेऊन जातो तसं काहीसं... माझाही NRI नवरा अभि.. असाच घोड्यावर बसल्यासारखा १५ दिवसांची सुट्टी काढून आला आणि १५ दिवसात लग्नं आणि हनिमून उरकून परत निघूनही गेला... राजकुमारीच्या परदेशातील entry साठी visa आवश्यक असल्याने सहा महिन्यांनी नवरा परत येणार आणि तोवर विझाचे सोपस्कार उरकून मला घेऊन जाणार असं ठरलं... शिवाय सहा महिन्यांनी तो थोडी जास्त म्हणजे ४ आठवड्यांची सुट्टी काढून येणार होता.. त्यामुळे अभिच्या मते जरा निवांतपणा होता... हे मी सासूबाईना सांगितलं तर म्हणाल्या...

“४ आठवडे... कप्पाळ निवांतपणा...!! रोज २ मित्रांना भेटला तरी ४ आठवडेच काय महिने कमी पडतील.. शिवाय त्याची खरेदी... सिनेमे... बाहेरचं कुठलं कुठलं काय काय खाणं... नातेवाईक तुम्हा दोघांना जोडीने बोलावतायत ते आणखी वेगळंच... आणि हो.. तुमच्या लग्नानंतर देवदर्शन राहिलंय त्यामुळे कोल्हापूरला जायचंय... तिकडे तो मंदाताईकडे दोन दिवस तरी राहून येणारच...”

माझं आणि अभिचं रीतसर ठरवून लग्नं झालेलं... लग्नाआधी फोनवर, skypeवर काय बोललो असू आणि मग हनिमूनला काय झाली तीच ओळख म्हणायची... फोनवर रोज तसं पुष्कळ बोलणं होत होतं पण ते काही खरं नाही... एखादा माणूस आणि विशेषत: नवरा एकत्र राहिल्याशिवाय संपूर्ण कसा कळणार...? त्यामुळे त्या ४ आठवड्यात रात्रं थोडी नी सोंगं फार होणार हे सासूबाईंनी सांगितल्यावर कळलं मला...

आणि एकदाचा अभि आला... पहिले १५ दिवस कसे गेले कळलंच नाही... रोज बाहेर पडत होतो... कुठे कुठे खाणं, फिरणं, खरेदी, नातेवाईक, मित्र- मैत्रिणी असला सगळा नुसता धबडका सुरू होता... अभि पुष्कळ वेळ माझ्याबरोबर घालवत होता पण तरी खूप गोष्टी अजून करायच्या राहिल्या आहेत असं सारखं वाटत होतं... त्यात त्याने शेवटच्या आठवड्यात चार दिवस कोल्हापूरला राहून यायचं असं ठरवलं... खरंतर दोन दिवसात देवीचं दर्शन घेऊन येता आलं असतं... चार दिवस तिथे रहायचं म्हणजे सगळा आठवडा तिथेच जाणार... पण त्याला त्याच्या आजोळच्या घरी मंदामावशींकडे रहायचं होतं... अरे आपण परत जाऊ की रहायला कधीतरी असं बरंच काही मी सुचवून बघितलं...

त्यावर अभि म्हणाला, “मला तुला मंदामावशीकडे घेऊन जायचंच आहे... परत ती कधी भेटेल? आपण कधी भारतात येऊ?.. माहित नाही... ती आपल्या लग्नाला आली नव्हती... बरं नव्हतं तिला… but you know… she really means a lot to me… you should meet her…” आता असं म्हटल्यावर माझा नाईलाज झाला... शिवाय मीही विचार केला... कितीही म्हटलं तर दोन-तीन भेटीत आणि बरंचसं फोनवरच बोलून ओळख झालेल्या मुलाशी आपण लग्न केलंय... ही एक चांगली संधी आहे त्याच्या आजोळी जाऊन त्याच्या मावशीकडून त्याच्याबद्दल जाणून घ्यायची...

मंदामावशी म्हणजे माझ्या सासूबाईंची मोठी बहिण... त्यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी म्हणजे आता सत्तरीच्या तरी असतील त्या... ही एकूण ३ भावंडं... मंदा मावशी मोठ्या, सासूबाई दुसऱ्या आणि तिसरे राम मामा... त्यातले राम मामा चार वर्षांपूर्वीच वारले... मामांचा मुलगा अजय... अज्या... तोही कोल्हापूरातच राहतो... अज्या कोल्हापूर शहरात राहतो आणि मंदामावशी शेतावरच्या वाड्यात... मंदामावशींचा टापटीपपणा, स्वच्छता , झटपट आणि चोख काम करण्याची पद्धत, हातची चव या सगळ्याबद्दल लग्नं झाल्यास सासूबाईंकडून खूप ऐकून होते...

अभिसुद्धा आजोळच्या घराबद्दलं नेहमीच भरभरून बोलायचा... पूर्वी त्याचे आज्जी-आजोबा, मामा असे सगळे तिथं रहायचे... त्यांच्या सुट्टीतल्या गंमती जमती... सगळी मुलं एकत्र जमल्यावर घरात चालणारा गोंधळ... आज्जीचं आज्जीसुलभ दह्या-दुधाचं सात्विक कौतुक... विहिरीतल्या अंघोळी, फस्त केलेल्या आंब्याच्या टोपल्याच्या-टोपल्या, भूईमूगाच्या शेंगांची पोती... हे सगळं अभिकडून ऐकताना असं वाटायचं त्याचं बालपण तो पुन्हा एकदा जगतोय... त्यात मला आजोळ असं नाहीच... सगळं काय ते मुंबापुरीतच... त्यामुळे अभिचं बोलणं मला अगदी गोष्टीतल्यासारखंच वाटायचं... आता एवढं सगळं ऐकल्यावर मला त्या घराबद्दल उत्सुकता न रहाती तरच नवल... त्यामुळे मलाही ते घर आणि मावशी दोघांनाही बघायची उत्सुकता होतीच... शिवाय मला काही प्रश्नही होते त्यांच्याबद्दल... की त्या एकट्याच का राहतात? त्यांचं लग्नं नाही का झालं? लग्गेच कसं विचारायचं सगळं म्हणून मी काही विचारलं नव्हतं... कळेल हळू हळू म्हणून गप्प होते...

ठरल्याप्रमाणे महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि घरी जायला निघालो... सांजावत आलं होतं.. मूळ शहरापासून तसं दूर होतं हे घर... छान सुखादसा गारवा हवेत होता... अभि गाडी चालवत होता... मला मस्त वाटत होतं... मधून मधून तो काही काही दाखवतही होता... रेल्वे गेट, टेंबलाईचं देऊळ, पुणे-बंगलोर हायवे... हायवे जसा मागे टाकला तसं दोन्ही बाजूला शेतं, वाटेत गुऱ्हाळं, रसवंती गृहं सारखी दिसत होती...

मग मूळ डांबरी रस्ता सोडून गाडी एका कच्च्या रस्त्याला आत वळली.. वाट अरुंद आणि नागमोडी... मला अजूनच छान वाटायला लागलं... सगळं कसं अगदी गोष्टीतल्यासारखं... नुकताच पाऊस पडून गेलेला म्हणून सगळीकडे हिरवळ दिसत होती... २-३ मिनिटातच एका जुनाट घरासमोर गाडी उभी राहिली...

बाहेर झाड-झाडोरा एवढा फोफावला होता की आतलं घर दिसतंच नव्हतं... बाग सगळी अस्ताव्यस्त वाढली होती... अभिने वर्णन केलेली सगळी झाडं दिसत होती पण अनेक वर्षं बागेवरनं कुणाचा हात फिरला नव्हता असं लग्गेच लक्षात आलं... पेरू, तूतीची झाडं, पारिजात, रातराणी, कुंपणावर चढलेली बोगन वेल, त्याखालोखाल कुंपणालगत लावलेली मेंदीची झाडं... सगळं होतं... पण थोडं रानटीच वाढलेलं...

मधोमध अंगणातली तुळस मात्र या सगळ्या पसाऱ्यातही अगदी डौलात उभी दिसत होती... तिच्या कट्ट्यावर दिवादेखील होता... दरवाज्याशी सडा घालून रांगोळी घातलेली दिसली... रांगोळी अतिशय रेखीव होती... उगाच दोन फुलं आणि एक पान चितारलेलं... पण तो चितारणारा हात अनुभवी होता हे मात्र नक्की... हळद-कुंकू वाहिलेलं होतं रांगोळीला...

माझं सहज वर लक्ष गेलं तर दोन-चार पायऱ्या आणि मग दरवाजाची चौकट होती... तीही जुनीच... दाराला कधीकाळी बांधलेलं झेंडूच्या फुलांचं तोरण सुकून गेलं होतं.. आणि त्या सुकलेल्या तोरणाखाली मंदामावशी प्रसन्न हासत उभ्या होत्या... कपाळाजवळ, कानाजवळ किंचित पांढूरलेले केस, केसाला तेल लावून व्यवस्थित घातलेला आंबाडा, कपाळावरचं मोठ्ठं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, गव्हाळ पण किंचित गौरवर्णाकडे झुकणारा रंग, चेहऱ्यावर पडलेल्या अनुभवी सुरकुत्या, बऱ्यापैकी उंच आणि सडपातळ बांधा, चापून चोपून नेसलेली साधीच सुती साडी, पिनअप न करता मोकळाच सोडलेला पदर... आणि हातात आम्हाला ओवाळण्यासाठी घेतलेलं चांदीचं तबक या सगळ्यासह त्यांच्या एकूणच मूर्तीतून मार्दव ओतप्रोत ओसंडून वाहात होतं... आम्हा दोघांना जोडीने बघून त्या भयंकर सुखावल्या होत्या...

मी त्यांच्याकडे पहात तशीच उभी राहिले... सूर्य मावळतीला झुकला होता... सगळा आसमंत संधीप्रकाशात न्हाला होता... ही वेळा खरंतर काळीज कातर होण्याची पण का कोण जाणे काही माणसांना बघून उगाचच सुखावल्यासारखं वाटतं, आतला मिणमिणता चैतन्याचा दिवा वात जराशी पुढे सरकवून पुन्हा तेवता केल्यासारखं वाटतं... तसलं काहीसं झालं मला...

“अरे मन्या काय बघायलास आसा वर घेऊन ये की तिला... ” अतिशय मंजूळ, मऊ स्वर कानी पडला... अभिने आणि मी चपला काढल्या आणि त्यांच्या समोर जाऊन उभे राहिलो... त्या संधीप्रकाशात ते निरांजनासहित ताम्हण अधिकच लख्खं दिसत होतं... निरांजनाचा प्रकाश स्वच्छ घासलेल्या चांदीच्या ताम्हणावर परावर्तीत होऊन मावशींच्या चेहऱ्यावर पडला होता... मावशींचा चेहरा अधिकच तेज:पुंज दिसला मला... त्यांनी आम्हाला ओवाळलं, पायावर ऊनपाणी घातलं, भाकर तुकडा ओवाळून दाराबाहेर टाकला... आणि “उजव्या पायानं आत या... काय?” पुन्हा तसाच गोड आवाज...

आम्ही घरात गेलो आणि जोडीने मावशींच्या पाया पडलो...
“इष्टपुत्रा सौभाग्यवती भव... मन्या इष्टपुत्रा म्हणायलेय... ऐकलंस काय... नाहीतर चुकीचं कायतरी ऐकशीला आणि आठ मुलं झाली म्हणून मला दुषणं लावशीला...”
आम्ही सगळेच खळखळून हसलो... मंदामावशी तर अगदी जोंधळे सांडल्यासारखं हसल्या... मलाहि गम्मत वाटली...
“कसकाय झाला प्रवास...? नवी नवरी थकून गेली काय माझी..? हा तुमचा दुसरा हनिमून काय रे? आणि ऑस्ट्रेलियाला गेल्यावर काय हनिमूनच हनिमून...” अभि पुन्हा हसायला लागला... मला थोडं लाजल्यासारखं झालं... मावशी मात्र तोंडाशी पदर धरून मनसोक्त खुदूखुदू हसल्या...
“चला हात-पाय धूवा चला... जावा... आणि वीणेला फोन करून टाक रे पोचल्याचा... नाहीतर ती तिकडं काळजी करत बसल...”

अभि सासूबाईशी फोनवर बोलत तसाच बाहेर लवंडला... आणि मावशी मला मोरी दाखवायला घेऊन गेल्या... सगळ्याच घरावर गतकाळाच्या वैभवाच्या खूणा होत्या पण त्यातलं नावालादेखील काही शिल्लक नसावं असंहि जाणवत होतं... वाड्यातल्या बऱ्याच खोल्या मावशींनी बंदच करून ठेवल्या होत्या... अभिने मला याची आधीच कल्पना दिली होती... केवळ एक न्हाणीघर, नवीन बांधून घेतलेलं western toilet, मावशींची झोपायची खोली, स्वयंपाकघर आणि पुढची खोली एवढंच वापरात ठेवलं होतं... पण भिंतीवर उंचावरची कोळिष्टकं वगळता या वापरातल्या खोल्या अतिशय स्वच्छ आणि टापटीप होत्या... तिथे एखाद्या मंदिरात शिरल्यासारखं पवित्र, शांत, प्रसन्न वाटत होतं...

क्रमशः

भाग २ : http://www.maayboli.com/node/62899

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

फुल,
तुमची लेखन शैली साधी सरळ खुप छान वाटते. छान च जमली आहे क था असं वाटतंय.

फक्त - त्यांच्या एकूणच मूर्तीतून मार्दव ओतप्रोत ओसंडून वाहात होतं - ह्यातला ' मार्दव' शब्द थोडा अयोग्य वाटला. स्त्री साठी हा शब्द मला वाटते वापरत नाहीत. मर्द (पुरुष) आणि मार्दव हे योग्य वाटते. कृप या तपासून पहा.
बाकी पुलेशु.