या कामशिल्पांचं करायचं काय?

Submitted by वरदा on 19 June, 2017 - 10:25

खरं तर धागा काढण्याएवढं मटेरियल या विषयात नाही, फक्त वादंग तयार करायचं सामर्थ्य आहे. पण राहावलं नाही म्हणून काढते आहे. मी कुठल्याही एका राजकीय विचारसरणीचं अथवा पक्षाचं समर्थन करत नाही. पण टोकाचे विचार करणारे सगळ्याच पक्षांमध्ये असतात, त्यातून मोठे आणि छोटे कुणीच राजकारणी, नेते सुटत नाहीत एवढंच मला म्हणायचं आहे.

खजुराहो च्या प्रसिद्ध मंदिरांपाशी कामसूत्र विकलं जातं यावरून सध्या सगळीकडे तावातावाने चर्चा चालू आहे. आपली संस्कृती, इतिहास याची अर्धवट, भगव्या चष्मातून माहिती व छ्द्मज्ञान (pseudo-knowledge) असलेल्या काही माथेफिरूंनी या सर्वावर बंदी घालावी असं आग्रहाने सुचवलं आहे (त्यांना शक्य असेल तर शक्तीचा वापर करूनही अंमलात आणायचा प्रयत्न करतील, कुणी सांगावे?).... गेल्या तीनचार वर्षांमध्ये आपल्या संस्कृती आणि इतिहासाविषयी लोकपातळीवर छद्मज्ञान पद्धतशीरपणे पसरवलं जात आहे ते फार चिंताजनक आहे.

पण खजुराहो बिचारं कायमच वादाच्या भोवर्‍यात असतं. त्याविषयी नाराजी दर्शवणार्‍यांमधे सध्याचे उजव्या विचारसरणीचेच कशाला, खुद्द गांधीजींचाही समावेश होता. गांधीजी या मंदिरांच्या पूर्णतया विरोधी होते. त्यांच्या मते ही मंदिरं परत मातीच्या ढिगार्‍यात झाकून टाकणेच जास्त योग्य होते. अखेर रवींद्रनाथ टागोरांना यात मध्ये पडून ही मंदिरे आपली आपला राष्ट्रीय वारसा आहेत हे गांधीजींना ठामपणे सांगावं लागलं होतं...
तेव्हा टू सेट द रेकॉर्ड स्ट्रेट - आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत हे कधीच मोकळेपणे मान्य करता आलेले नाही. जसा बहुसंख्येने समाज तसेच त्यांचे नेते.
मात्र खजुराहो हे एकमेव कामशिल्पे असलेले मंदिर नाही. आठव्या नवव्या शतकानंतर उभारल्या गेलेल्या बहुसंख्य मंदिरांमधे कमी-जास्त प्रमाणात कामशिल्पं कोरली जायची. अगदी वेरूळच्या कैलासातही कामशिल्पे आहेत.

तेव्हा आपला सामाजिक दांभिकपणा आणि त्याहूनही ढोंगी नीतीमत्तेची आवरणे बाजूला करून जेव्हा आपण हे मान्य करू तेव्हा सुदिन!!

त.टी. - यावर नेहेमीच्या यशस्वी उखाळ्यापाखाळ्या काढणे, वचावचा भांडणं करणे असं न होता चर्चा झाली तर खूप बरं होईल. तसं चर्चा करण्यासारखंही यात फारसं काही नाही. पण इतरत्र कुठे पोस्ट केली असती तर कदाचित कुणाच्या लक्षात आली नसती. म्हणून इथे वेगळं लिहिलं. तेव्हा वाचा, पोस्ट लिहिलीच पाहिजे असं काही नाही. पण विसरून जाऊ नका Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आमचे कडे जाळण्यासाठी ग्रंथ मिळतील
कामसूत्र चंदन आवृत्ती- 1,00,000/-
कामसुत्र साग आवृत्ती-50,000/-
कामसूत्र बाभूळ आवृत्ती-25000/-
कामसूत्र आंबा आवृत्ती -25000/-
कामसूत्र लिंब आवृत्ती-25000/-
कामसूत्र बदरी आवृत्ती 25000/-

मनुस्मृती चंदन आवृत्ती- 5,00,000/-
मनुस्मृती साग आवृत्ती-3,00,000/-
मनुस्मृती बाभूळ आवृत्ती-100000/-
मनुस्मृती आंबा आवृत्ती -100000/-
मनुस्मृती लिंब आवृत्ती-100000/-
मनुस्मृती बदरी आवृत्ती 100000/-

अन्य ग्रंथांच्या आवृत्या मागणीनुसार पुरवल्या जातील. जास्तीत जास्त खरेदी करुन आपापल्या निष्ठा सिद्ध करा.

ब्रिगेडी लोकांचे अनुनायी खरंच वाचन अभ्यास करतात का माहिती नाही. फोडा झोडा आज्ञा पाळणे एवढंच पाळतात.
-----------------
खजुराहोत कामशिल्पे पाचटक्क्यांहून कमी आहेत. तर कोणार्कला खूप आणि अधिक चांगली आहेत. पद्मनाभ स्वामि मंदिर प्रदक्षिणा मार्गावर मोठमोठी योगासने आहेत. त्या शिल्पांजवळच स्थानिक अम्मा मावश्या शांतपणे गप्पा मारत बसलेल्या दिसतात. या तीनही ठिकाणी जाऊन आलो आहोत. गाईड लोक उगाचच चऱ्हाट लावून माहिती सांगत असतात. पण इतर शिल्पे खूप सुंदर आहेत. त्यासाठी नक्की जा.

खजुराहोतला यज्ञवराह केवळ अप्रतिम आहे. तुटकंफुटकं काहीही नाही. फ्री स्टँडिंग.

कामशिल्पांमागील उद्देश हा आहे कि जर हि कामशिल्पे पाहून तुमच्या मनात वासना निर्माण होत असेल तर तुम्ही मंदिरात प्रवेश करू नका. मंदिरात प्रवेश करताना मन शुद्ध असावं हा मुख्य उद्देश आहे.

उदात्त विचार. बोकलत.
-----------------

कामशिल्पांची भीती वाटत असेल तर त्यांनीही पाहू नयेत.

Pages