नेटयुग

Submitted by सुबोध अनंत मेस्त्री on 12 June, 2017 - 03:41

सध्या नेटयुग जोरदार सुरु आहे. स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग आपल्या हाताच्या बोटावर आलं आहे. “काय तू व्हाट्सअप/ फेसबुकवर नाहीस? कुठल्या जगात वावरतो राव!.” म्हणजे व्हाट्सअप किंवा फेसबुकवर नसणं म्हणजे जगाच्या कितीतरी मागे असल्याचा एक समज निर्माण झालाय. एखादा इव्हेंट किंवा पिकनिकच सोडाच पण आता लोक कोणत्या हॉटेल मध्ये जेवतायत, कोणतं गाणं ऐकतायत कोणता पिक्चर बघतायत हे सुद्धा पोस्ट करतात. या आभासी जगात व्यक्ती विशेषतः मुलं हरवत चालली आहेत. आता इंटरनेटसुद्धा दिवसेंदिवस स्वस्त होत जाईल. बऱ्याच ठिकाणी डिजिटल इंडियाच्या उपक्रमाखाली वायफाय कनेक्शन लावले जातील आणि या आभासी जगाच्या कक्षा आणखी रूंदावतील. सकाळी झोपतुन उठल्या उठल्या लगेच आपण पहिले व्हाट्सअप चे मेसेजेस चेक करतो आणि मग आपल्या पुढच्या कामाला सुरुवात होते. त्यानंतरही काम करत असताना काही मिनिटांनी आपलं लक्ष या मोबाईल कडे जातंच आणि आपण आपल्या कामापासून वेगळे होतो. सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर झाला तर त्यासारखं प्रभावी माध्यम कोणतंच नाही. पण याचा गैरवापर होत असेल तर त्यासारखं घातकही काही नाही. तंत्रज्ञानाच्या वापराचं प्रमाण जितकं वाढलं आहे तितकंच सायबर क्राईमच प्रमाण गेल्या काही वर्षात वाढीस लागलं आहे. त्यातल्याच काही गोष्टीचा आढावा घेण्याचा प्रयत्न मी या लेखामार्फत केला आहे.

फेसबुक :

फेब्रुवारी 2004 ला फेसबुक ची स्थापना झाली आणि आज महिन्याला 170 करोड एवढे युजर फेसबुकचा नियमित वापर करतात. जगाशी संपर्कात राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे फेसबुक आहे.
Amol More sent you friend request. अरे देवा! अमोल? माझा शाळेतला अगदी जिवलग मित्र. शाळेनंतर त्याच्याशी माझा काहीच संपर्क नव्हता. तो मला फेसबुकवर सापडला. अमोलच नाही तर माझे असे कित्येक जुने मित्र ज्यांच्याशी माझा संपर्क तुटला होता ते फेसबुकच्या माध्यमातून माझ्या पुन्हा संपर्कात आले. कित्येक नवे मित्र तसेच व्यवसाय-नोकरीच्या संधी, नवनविन गोष्टीची माहिती फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते.
ही जरी फेसबुकची चांगली बाजू असली तरी त्याची एक दुसरी भयंकर बाजूदेखील आहे. दर मिनिटाला कमीत कमी 40 केसेस सायबर क्राईम अंतर्गत जगभरात फेसबुकच्या नावे रजिस्टर होत आल्या आहेत आणि हा आकडा येत्या वर्षांत वाढत राहणार आहे. फेसबुक मध्ये जास्तीत जास्त फसणारा वर्ग हा 12 ते 25 वयोगटातला आहे. काही उदाहरणे जी गेल्या काही वर्षात घडली आहेत ती पाहू.

1. श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी. शाळेमध्ये ही हुशार. एका मुलाने तिच्या फ़ेसबुकच्या प्रोफाइल फोटो वर अश्लील कमेंट टाकली म्हणून तिने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून जीव दिला.

2. कानकोण मध्ये राहणार्‍या एका दहावीतल्या मुलीचं फेसबुकवर चॅट करता करता मुंबईतल्या एका मुलावर प्रेम झालं. कारच्या बाजूला उभा राहून काढलेला फोटो त्याने प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला होता. मी व्यवसाय करतोय आणि चांगला सेटल आहे असं त्याने तिला भासवून दिलं. तिला लग्नाचं आमिष दाखवून मुंबईला बोलावून घेतलं. सकाळी शाळेच्या निमित्ताने ही मुलगी घराच्या बाहेर पडली आणि ट्रेन पकडून सरळ मुंबईला आली. हा तिला बान्द्रा स्टेशनला घ्यायला आला. तिथून तिला सरळ धारावी झोपडपट्टीमध्ये मित्राच्या घरी घेऊन गेला. 3 दिवस उपभोगून झाल्यावर तिला सांगितलं "तू आता घरी जा. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही". अशा परिस्थितीत त्या मुलीची काय अवस्था असेल? तिने आत्महत्येचा विचार नाही केला तर नवलच. पालकांची मनस्थिती काय झाली असेल?

3. मध्यप्रदेशमध्ये राहणाऱ्या एका मुलाचं असच चॅटप्रकरणातून एका 22 वर्षाच्या मुलीवर प्रेम झालं. दोघांनी भेटायचं ठरवलं. भेटल्यावर त्याला समजलं की आपण जिला मुलगी समजत होतो ती मुळात 44 वर्षाची एक बाई आहे आणि तिला 3 मुलं आहेत. त्याचा संताप अनावर झाला. त्याच्याकडे एक पिस्तूल होत. ते काढून त्याने तिला तिथेच गोळी घातली व स्वतःही गोळी घालून आत्महत्या केली.

4. एका सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलाचं एका मुलीवर प्रेम होत. काही कारणाने लग्न होऊ शकलं नाही. या मुलाने तिला लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवायला सांगितले पण तिने साफ नकार दिला. याने रागाच्या भरात तिचे फेसबुक वरचे सगळे फोटो डाउनलोड केले व त्यांना नग्न फोटोजच्या स्वरूपात रूपांतर करून एक वेगळा अकाउंट बनवला आणि त्या अकाउंटमध्ये तिचा नंबर टाकून दिला. लोक तिला कॉल गर्ल म्हणून सतत कॉल करायला लागले. तिने तक्रार केल्यावर सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या.

5. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या वेळी मुंबई बंद होती. तेव्हा पालघरमधल्या एका मुलीने फेसबुक वर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली व एका मुलीने ती लाईक केली. लोकांच्या भावना दुखावल्यामुळे दोघीनाही अटक करण्यात आली.

6. राजकारण्यावरून जोक्स बनवणे किंवा त्यांची व्यंगचित्र बनवून भ्रष्टाचाराबद्दल वाच्य करणे, आक्षेपार्ह कमेंट टाकणे अशा तर शेकडो केसेस मध्ये लोकांना जेल बघावं लागलं आहे.

7. " Enjoying holiday with whole family at Kerala", अशी फेसबुकवरची तुमची पोस्ट म्हणजे चोरांना आणि दरोडेखोरांना खुलं निमंत्रण असत. अशा पिकनिकला गेलेल्या फॅमिलीच्या घरी चोरीच्या कितीतरी केसेस दाखल झाल्या आहेत

8. आपल्या पत्नीच्या किवा प्रेयसीच्या आणि याउलट नवर्‍याच्या किंवा प्रियकरच्या फोटोला कोण लाइक करत आणि कमेंट करत यावरूनसुद्धा भांडण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलेली आहेत.

9. ‘आज माझ्या मुलीचा शाळेचा पहिला दिवस. एक बाप म्हणून मला तिचा किती अभिमान वाटतोय. या युनिफोर्म मध्ये किती सुंदर दिसतंय माझं पिल्लू! शाळा साडेतीनला सुटणार. शाळेत काय काय झालं हे पिल्लुच्या तोंडून ऐकायला पप्पा अतुरणार...feeling excited.’ अशी पोस्ट एखादा माणूस फेसबुकवर टाकतो. सोबत मुलीचा युनिफोर्ममधला सुंदर फोटो. त्याच्या हे लक्षात येत नाही कि फेक अकाउंट बनवून त्याचं फेसबुकवर मित्र झालेल्या इसमाने तो फोटो डाऊनलोड केला आहे आणि सौदी अरेबियामध्ये एका अरब करोडपतीला तो पाठवलादेखील. ‘वय ४ वर्ष. वर्ण गोरा. उंची साधारण ३.५ फुट. किमत ........डॉलर्स’.
बाप मुलीला घ्यायला ३.३० वाजता शाळेत येतो. ती सापडतच नाही. ‘तुमचा भाऊ आला होता. तुम्ही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहात असं सांगून घेऊन गेला.’ कोण भाऊ? कोण घेऊन गेलं? तुम्ही गोंधळून जाता. तुम्ही कल्पनादेखील करू शकत नाही की तुमच्या काळजाचा तुकडा, कोण्या अनोळखी व्यक्तीसोबत देश सोडून चाललाय...त्या अरबी माणसाने तिला विकत घेतलंय आणि आता ती परत कधीच तुमच्याकडे परतणार नाही...किती भयंकर आहे हे सगळं...

फेसबुक हे लोकांशी संपर्क साधण्याच उत्तम माध्यम असेल तरी ते वापरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

1. आपली कोणतीही गोपनीय माहिती, मग ती टेक्स्ट, व्हिडिओ, ऑडिओच्या माध्यमात फेसबुक वर ठेवू नका.

2. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट फेसबुक वर यायलाच पाहिजे असं नाही. ती झाल्यानंतर पण तुम्ही पोस्ट करू शकता. या खुल्या इंटरनेटच्या जगात कोण तुम्हाला फॉलो करत असेल तुम्ही अंदाज लावू शकत नाही.

3. शक्यतो, मुलींनी त्यांचे फोटो फेसबुकला टाकताना काळजी घ्यावी. ते फोटो शक्यतो आपल्या एकदम जवळच्या आणि खास ओळखीमधल्या व्यक्तींना दिसतील अशीच सेटिंग करावी. मुलींच्या फोटोजचा दुरुपयोग केलेल्याच्याही बऱ्याच केसेस आहेत.

4. फेसबुक केव्हाही सायबर कॅफे किवा अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणावरून वापरू नका. इथे असणार्‍या मशीन मध्ये बर्‍याच वेळेला वायरस असतात ज्याने तुमचे पासवर्ड हॅक होऊ शकतात व तुमच्या अकाऊंट मधून तुमच्या मित्रांना काही विचित्र पोस्ट जाऊ शकतात. हा प्रकार खूप प्रमाणात झाला आहे.

व्हाट्सअप :

अलीकडच्या काळात व्हाट्सअप एवढं फेमस झालंय कि त्याने SMS चा बिजनेस जवळजवळ फस्तच करून टाकला आहे. “काही असेल तर व्हाट्सअप कर असं आपण सहज म्हणून जातो”. आजच्या घडीला व्हाट्सअपवर वेगवेगळ्या देशातून करोडो युजर्स अँक्टिव्ह असतात. त्यात मोठमोठे उद्योजक, राजकारणी, सिनेस्टार्स आणि लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत विविध वयोगटातली वापरकर्ते आहेत. व्हाट्सअपने संवादाला एक वेगळंच स्वरूप दिलेलं आहे. व्हर्चुअल संवादात पूर्वी ‘याहू’सारखे मेसेंजर होतेच पण मोबाईलवर चॅट साठी इतकं सोपं आणि उपयुक्त अँप्लिकेशन नव्हतंच. त्यामुळे खूप कमी वेळात व्हाट्सप ने खूप प्रसिद्धी मिळवली. आता व्हाट्सप नसेल तर तो माणूस कालबाह्य समजला जातो. व्हाट्सप नंतर बऱ्याच अँप्लिकेशनने डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला पण लोकांची व्हाट्सप ची सवय ते मोडू शकले नाहीत. व्हाट्सपचा उपयोग बऱ्याच ठिकाणी चांगला होऊ शकतो जस की,
1. प्रत्यक्ष भासणारा पण अप्रत्यक्ष असा संवाद
2. फोटोज, व्हिडिओ, PDF सारखे डोक्यूमेन्ट सहज शेअर होतात ज्यामुळे बऱ्याच लोकांना विशेषतः उद्योजकांना फायदा होतो.
3. ग्रुपमुळे बऱ्याच लोकांशी एकत्र संवाद साधला जाऊ शकतो. विचारांची देवाण घेवाण होते. नवनवीन गोष्टी माहिती पडतात.
4. कोणतीही इंफॉर्मशन काही मिनिटांमध्ये जगापर्यंत सहज पोहचू शकते.
5. हरवलेली माणसे सापडतात
6. लोकांना कोणत्याही धोक्याची पूर्वसूचना देता येते आणि त्यामुळे त्यांना सावध करता येते.

जसे व्हाट्सप चे फायदे झालेत त्याचप्रमाणे तोटे ही खूप झाले आहेत.
1. चुकीची माहिती जगापर्यंत लगेच पोहचते. कोणतीही पोस्ट आल्यानंतर लोक सहसा ती पडताळून पाहत नाहीत आणि सहज फॉरवर्ड करून मोकळे होतात. या चुकीच्या मेसेजेचे ही काही प्रकार आहेत.
Ø एखाद्या व्यक्तिला रक्ताची गरज आहे असे बरेच मेसेज फिरतात. त्यात बर्‍याच वेळेला नंबर सुद्धा असतात. पण असे मेसेज काही वेळेला जुने असतात किवा चुकीचे असतात. आपण त्या नंबरवर कॉल न करता ते मेसेज फॉरवर्ड करण्यात पुण्य मानतो. अशीच गत हरवलेल्या व्यक्तींच्या फोटोबाबत पण होत असते.
Ø माणूस सर्वात जास्त घाबरतो तो देवाला. एखादा मेसेज येतो देवाच्या नावाने आणि तो मेसेज पुढे फॉरवर्ड करण्याची धमकीवजा सूचना असते आणि तस न केल्यास त्या 2-3 दिवसात काहीतरी वाईट बातमी मिळेल असे लिहिलेले असते. आणि लोक घाबरून ते मेसेज फॉरवर्ड करून पुण्य कमावतात. जणू काही देव, किती लोकांना मेसेज फॉरवर्ड केला जातोय याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवत असतो.
Ø ऑफरचे मेसेज तर भरभरून येत असतात. एखाद्या मोठ्या कंपनीच नाव घेऊन (जस की, अमेझॉन, फ्लिपकार्ट) धमाका सेल ऑफरच्या नावाखाली 799 रुपयात मोबाइल, टीव्ही किवा अशी कोणतीही महाग गोष्ट अशा आशयाचा मेसेज हा असतो. एक तर लोक त्या लिंक वर क्लिक करून स्वतच्या मोबाइल मध्ये वायरस तरी डाऊनलोड करतात किवा स्वतच्या मोबाइल मधली महत्वाची माहिती दुसर्‍याला देऊन तरी टाकतात. माझ्या “ऑफर नको रे बाबा” या आर्टिकल मध्ये हे मी सविस्तर मांडल होतं.
Ø एखादी मोठी व्यक्ति मृत पवल्याचे मेसेज तर वार्‍यासारखे पसरतात. एक सोप्पं लॉजिक लोकांना समजत नाही की जर एखादी प्रसिद्ध व्यक्ति मरण पावली तर ती बातमी न्यूज चॅनलला लगेच दाखवली जाते किवा गूगल वर पण लगेच समजते. पण लोक स्वता काही पडताळून न पाहता या दिग्गजांना त्यांच्या जिवंतपणी श्रद्धांजलि वाहत राहतात.
Ø एखादा फोटो किवा मेसेज जर 10 ग्रुपला फॉरवर्ड केला तर त्या मेसेज मधली दिसणारी इमेज किवा माहिती आपोआप बदलते असे मेसेज ही व्हाट्सअप वर फिरत राहतात. ज्यात काही तथ्य नाही.

2. पोर्न मेसेजेस किवा फोटोज, ऑडिओ क्लिप्स हे शेअर कारण व्हाट्सअप मुळे सहज शक्य झाल आहे आणि त्यामुळेच अगदी लहान वयोगाटाल्या मुलांनाही अशा गोष्टींचा वापर अगदी सहज मिळतो.
3. धर्माबद्दल तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, अपघातच्या पोस्ट, मर्डर क्लिप्स अशा नकारात्मक भावना आणणार्‍या बातम्या अथवा माहिती सहज नजरेखालून जात असते आणि कुठे न कुठे आपल्या सुप्त मनावर त्याचा खोलवर परिणाम होत असतो.
4. व्हाट्सअप सारख्या आभासी संवादामुळे प्रत्यक्ष संवाद खूप कमी होत चालला आहे. लोक प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा चॅट वर बोलण्यात जास्त धन्यता मानतात.
5. व्हाट्सअपचे मेसेज जर रात्री 2 किवा 3 नंतर डिलीट केले असतील तर ते आदल्या दिवशीच्या बॅकअप मध्ये राहतात व ते मेसेजेस कधीही रिस्टोर करता येतात. 2013 च्या एकाच वर्षात जवळ जवळ 5000 घटस्फोटाच्या केसेस व्हाट्सअप किवा फेसबुक मुळे दाखल झाल्या होत्या. पत्नीवर संशय किवा पतीवर संशय म्हणून मेसेजेस रिस्टोर करून त्यांचं बाहेर प्रकरण चालू आहे हे समजल्यामुळे यातल्या बर्‍याचशा केसेस झाल्या होत्या.
6. लोकांना व्हाट्सअपच व्यसन लागल आहे. मेसेज येवो न येवो, दर मिनिटाला आपोआप मोबाइल वर हात जातो आणि मेसेज चेक केला जातो. या प्रकारामुळे एखाद्या गोष्टीकडे एकाग्रता लावणे हे कठीण होऊन बसले आहे. विशेषता हा प्रकार कॉलेज च्या मुलांमध्ये जास्त पहिला जातो.

व्हाट्सअप वापरताना काही खालील गोष्टींची आवर्जून काळजी घेतली पाहिजे.

1. राजकीय वर्तुळाची खिल्ली उडवणारे किवा कुणाच्याही भावना दुखवणारे मेसेज फॉरवर्ड करू नका. त्याने तुम्हाला अटक ही होऊ शकते.
2. अनोळखी व्यक्तींशी सहसा जास्त वेळ बोलू नका आणि स्वतची कोणतीही सीक्रेट माहिती त्यांना शेअर करू नका
3. जर एखादी व्यक्ति तुम्हाला सतत कोणते न कोणते मेसेज पाठवत असेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीचे मेसेजेस नको असतील तर तुम्ही त्या व्यक्तीला ब्लॉक ही करू शकता जेणेकरून त्या व्यक्तीला तुमचे प्रोफाइल पिक्चर ही दिसणार नाही व त्याचे मेसेज ही तुम्हाला येणार नाहीत
4. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही मेसेज मधल्या फाइलला डाऊनलोड करू नका. त्या फाइलमधून तुमच्या मोबाइल मध्ये वायरस सुद्धा शिरू शकतो
5. व्हाट्सअप किवा कोणत्याही डिजिटल संवादामध्ये समोरच्या व्यक्तिला मग भले ती ओळखीची असेल, बँक डिटेल्स, पिन नंबर, क्रेडिट कार्ड नंबर अशी सीक्रेट माहिती पाठवू नका. हे कोणतेही संवाद कितपत सुरक्षित आहेत हे आपण सांगू शकत नाही.

ई-मेल्स
ईमेल ही सगळ्यांच्या नियमित वापरातली गोष्ट आहे. पण या ईमेल वरून सुद्धा बर्‍याच प्रकारचे फसवे प्रकार आतापर्यंत झाले आहेत.
1. तुमचा बँकेचा पासवर्ड एक्सपायर झाला आहे किवा तुमची माहिती बँकेच्या अकाऊंट मध्ये अपडेट करायची आहे अशा प्रकारचा बँकेतून आला आहे अस भासवणारा एखादा मेल तुम्हाला येतो आणि तुम्ही त्या लिंक वर क्लिक केलीत तर अगदी बँकेच्या वेबसाइटसारखी दिसणारी स्क्रीन तुमच्या समोर ओपन होते. त्यात तुमचा एटीएम कार्ड नंबर, यूजर आय डी पासवर्ड, पिन नंबर अशा गोष्टी विचारलेल्या असतात. तुम्ही ती माहिती बदलायची म्हणून सगळी माहिती टाकता आणि तुमची ती माहिती एखाद्या हॅकर कडे जाऊन पोहचते. तो हॅकर नंतर तीच माहिती वापरुन तुमचा बँक अकाऊंट रिकामी करू शकतो. अशाच गोष्टी फसव्या फोन कॉल मधून ही केल्या जातात. यातून वाचण्यासाठी फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा
Ø कोणतीही बँक तुम्हाला तुमची सीक्रेट इन्फॉर्मेशन फोनवर किवा इंटरनेट च्या माध्यमातून विचारात नाही. त्यामुळे असे मेल आले तर बँकेत फोन करून ते आधी कन्फर्म करा.
Ø कोणतीही व्यवहारासाठी वेबसाइट वापरताना, मग ती बँकेची असेल किवा ऑनलाइन शॉपिंगची, त्याच्या लिंक मध्ये http:// ऐवजी https:// आहे का ते पहा. हा (s) तुमची माहिती एनक्रिप्ट करून पुढे पाठवत असतो आणि त्यामुळे तुमचे व्यवहार सुरक्षितरित्या होत असतात. जर हा (s) नसेल तर कोणतेही व्यवहार तुम्ही त्या वेबसाइट वर करू नका.
2. तुमच्या ओळखीतल्याच एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला ईमेल येतो की, ते बाहेरगावी आहेत आणि त्यांचा फोन हरवला आहे. सध्या त्यांच्याकडे ईमेल शिवाय काहीच संवादाच साधन नाही व त्यांना सध्या पैशाची गरज आहे. मदत करू शकत असाल तर ईमेलला रीप्लाय करा वैगेरे. अशा वेळी आपण भावूक होऊन ईमेलला रीप्लाय करतो आणि जाळ्यात ओढले जातो. ही सुद्धा तुमच्या कडून पैसे काढण्याची एक युक्ति असू शकते कारण असे मेल त्या व्यक्तीच अकाऊंट हॅक करून सगळ्यांना पाठवलेले असतात. अशा वेळी एकदा त्या व्यक्तीचा फोन ट्राय करून खात्री करून घ्या आणि त्यांना या गोष्टीची कल्पना द्या.
3. ईमेलवरून किवा मोबाइलवर सुद्धा लॉटरीचे खूप मेसेजेस येतात त्यात तुम्ही कितीतरी करोडो रुपये जिंकला आहात अस सांगितलं जात. बक्षीस घेण्यासाठी या मेलला रीप्लाय करा असही सांगितलेलं असत. हे ईमेल सुद्धा पैसे तुमच्याकडून काढण्याच्या हिशोबानेच बनवलेले असतात. त्यामुळे अशा मेलला रीप्लाय न करणच नेहमी योग्य.

तंत्रज्ञान हे आपल्या सोईसाठी बनवले आहे. आपला जन्म तंत्रज्ञानासाठी झालेला नाही. त्यामुळे फेसबुक किंवा व्हाट्सअप चेक करण्याच्या दिवसभरातल्या वेळा ठरवा. उदाहरणार्थ सकाळी प्रवासात असताना, दुपारी जेवल्यानंतर, संध्याकाळी प्रवासात असताना वैगरे. एकदा ही सवय लागली कि कामाच्या मध्ये फेसबुक किंवा व्हाट्सअप चाळण्याचा मोह होणार नाही.
या गोष्टींचा वापर आपल्या सोई पुरताच बरा. आज नकळतपणे या गोष्टींना आपण आहारी जात आहोत. या माध्यमांद्वारे आपण लांब असलेल्या व्यक्तींशी संवाद साधत असतो आणि जवळ असलेल्या व्यक्ती हरवत चाललो आहे. म्हणतात ना फेसबुकवर २,५०० मित्र, व्हाट्सअपवर ४०० काँटॅकट्स पण जेव्हा आयसीयू मध्ये होतो तेव्हा बाहेर फक्त माझी बायको, मुलं आणि आई वडील होते...ज्यांनामी कधीच वेळ दिला नाही.

तंत्रज्ञान जितकं तुमचं आयूष्य सोप करतय तितकच त्याच्या चुकीच्या वापरणे ते घातक सुद्धा होऊ शकत. दैनंदिन जीवनात याचा वापर करताना आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे. या आर्टिकलच्या माध्यमातून मी महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याच काम केल आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल याबाबत शंका नाही.

जीवनरंग संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल नेहमी काही ना काही नवीन गोष्टीबद्दल माहिती दिली जाते. एखादया गोष्टीने कुणाचा फायदा होत नसेल तर नुकसान होण्यापासून बचाव व्हावा अशी अपेक्षा असते. ‘फेकून द्या कचरा, घरातला आणि मनातला’ या जीवनरंग प्रकाशनाच्या आगामी पुस्तकामधला हा एक छोटासा भाग होता. या आर्टिकलमुळे नक्कीच तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर तुमच्याकडून होईल ही अपेक्षा मी बाळगतो.
धन्यवाद!

- सुबोध अनंत मेस्त्री
9221250656

sahajsaral

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults