पाऊलही उन्हाचे

Submitted by निशिकांत on 29 May, 2017 - 01:44

मी व्यर्थ स्वप्न बघतो अंधूक कवडशाचे
अद्याप वाजले ना पाऊलही उन्हाचे

का आरती करावी जाज्वल्य दैवताची?
मिळवीन मी प्रयत्ने भव्यत्व पर्वताचे

झोपे ससा अताही, ना जिद्द कासवाला
ध्येयास गाठण्याला, वशिले बघावयाचे

तोडून जंगले, ढग आम्हीच वांझ केले
मल्हार गाउनीही ना थेंब पावसाचे

मोठ्या घरात छोटी दिसतात माणसे अन्
छोट्या घरात सारे, मोठ्या किती मनाचे!

केसात माळलेली सुकती फुले परंतू
वेश्येस मजबुरीने असते फुलावयाचे

मोठ्या जरी निकामी झाल्यात आज नोटा
गांधीस खंत नाही, छदमी हसावयाचे

आयुष्य सर्व गेले ज्याचे नशेत बुडुनी
प्याले कशास देता त्यालाच सरबताचे?

मॉडर्न माय आहे "निशिकांत" नातवांची
ओव्या कुणी म्हणाव्या, कोणी दळावयाचे?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users