आश्वलायनगृह्यसूत्रातील विवाहाचे प्रकार आणि समाजाची स्त्रीविषयक धारणा - २

Submitted by अतुल ठाकुर on 28 May, 2017 - 06:08

rukmini2.jpgआश्वलायनगृह्यसूत्र

ऋग्वेदाच्या आश्वलायनशाखेशी संबंधीत असलेले हे गृह्यसूत्र चार अध्यायात विभागले आहे. प्रत्येक अध्यायाचे विभाजन पुन्हा कांडिकांमध्ये केले आहे. पहिल्या अध्यायात चोविस, दुसर्या अध्यायत दहा, तिसर्या अध्यायात बारा, आणि चवथ्या अध्यायात नऊ कांडिका आहेत. पहिल्या अध्यायात गृह्यग्निशी संबंधित वैश्वदेव इत्यादी कर्म आणि विवाहापासून ते उपनयनापर्यंत सर्व संस्कारांचे वर्णन आहे. दुसर्या अध्यायात श्रवणा, आश्वयुजी अशी कर्म, अष्टका, अन्वष्टका श्राद्ध आणि गृहनिर्माण विधि यांचे विवेचन आहे. तिसर्या अध्यायात पंचमहायज्ञ, तर्पण, उपाकरण, प्रायश्चित्त आणि समावर्तन संस्कारांचे वर्णन आहे. चौथ्या अध्यायात अंत्येष्टी संस्कार, पार्वण श्राद्ध आणि शूलगवकर्म यांचे विवेचन आहे.

आश्वलायन गृह्यसूत्रातील विवाहाच्या काही प्रकारांचे वर्णन पुढे देण्यात येत आहे ज्यामुळे त्याकाळातील समाजाची स्त्रीविषयक धारणा कशा तर्हेची होती हे जाणण्यास मदत होईल. या सर्व विधींमध्ये क्वचितच काही ठिकाणी स्त्री विषयक स्पष्ट भाष्य केलेले आढळते त्यामुळे विवाहविधी आणि त्यांचे होऊ घातलेले परिणाम आणि त्यामुळे समाजात दृढमूल होऊ शकणार्या समजूती यांचे अनुमान करावे लागते.

विवाहाचे प्रकार

आश्वलायनसूत्रातील विवाहाचे प्रकार स्त्रीविषयक समाजाची धारणा समजून घेण्यासाठी उपयुक्ते वाटतात याची अनेक कारणे आहेत.सर्वप्रथम हा विवाह कशा तर्हेचा आहे याचे महत्त्व फार आहे. आणि त्यामुळे उत्पन्न झालेल्या संततीमुळे मात्यापित्याच्या किती पिढ्या पवित्र होतात हे तेथे स्पष्टपणे नमूद केले असल्याने विवाह हा निव्वळ अलिकडे समजण्यात येणार्या दोन जीवांचे मिलन इतकाच प्रकार नसून गृह्यसूत्रकाळी त्यामुळे निर्माण झालेली संतती माता आणि पित्याच्या भूतकालातील आणि भविष्यातील अनेक पिढ्यांचा उद्धार करते अशी समजूत आहे. यास्तव विवाह हे किती काळजीपूर्वक लावले जात असतील हे दिसून येते. जेथे अनेक पिढ्यांच्या उद्धाराचा विचार केला गेला आहे तेथे अशा विवाहात स्त्रीच्या मनाचा कितपत विचार केला गेला असेल याची शंका वाटते.

पहिला प्रकार ब्राह्म विवाह. यात कन्येचे सालंकृत दान करतो. मनुमतानूसार वेदांचे ज्ञान असलेल्या सदाचारी वराला स्वतः बोलावून, त्याची पूजा करून, वस्त्रे आभुष्णे देऊन वधु वर दोघांना अलंकृत करून हे कन्यादान करावयाचे आहे. दोन्ही ठिकाणी अलंकृत करण्याचा निर्देश आहे. हा हुंडा किंवा वरदक्षिणेचाच एक प्रकार वाटतो. अशा तर्हेच्या विवाहाने जी संतती त्या कन्येच्या ठिकाणे उत्पन्न होईल ती माता आणि पिता दोघांच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या बारा पिढ्या पवित्र करेल अशी ग्वाही आश्वलायन गृह्यसूत्राने दिली आहे.

या विवाहात जर वर वेदज्ञानी असेल तर तो बहुधा ब्राह्मण असण्याचीच शक्यता जास्त आहे. कदाचित क्षत्रियही असेल. अशा वराला हुंडा देऊन हे लग्न केल्यास बारा पिढ्यांचा उद्धार होतो अशी समजूत आहे. वरदक्षिणा देऊन बारा पिढ्यांच्या उद्धाराची हमी असेल तर कन्येच्या पसंती नापसंतीचा विचार कितपत होत असेल याची शंका वाटते.

दुसरा प्रकार दैव विवाहाचा आहे. त्यात यज्ञकर्मात प्रवृत्त झालेल्या ऋत्विजाला सालंकृत कन्यादान केले जाते. यातून उत्पन्न झालेल्या संततीमुळे पुढच्या मागच्या दहा पिढ्यांचा उद्धार होतो असे म्हटले आहे. वर ऋत्विज असेल तर तो पुन्हा ब्राह्मणच असण्याची शक्यता आहे. येथे फक्त कन्येलाच अलंकृत करण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे पुन्हा वरदक्षिणा आहेच. या विवाहात वर हा फारसे कष्ट न घेता विशिष्ट निकष लावून शोधता येतो. शिवाय त्याला अलंकृत करावे लागत नाही. त्यामुळे उद्धार होणार्या पिढ्यांपैकी ब्राह्मविवाहाच्या तुलनेत दोन पिढ्या कमी झालेल्या दिसतात. शिवाय येथे ऋत्विज वराचेच महत्त्व आहे त्यामुळे पुन्हा कन्येच्या पसंतीचा प्रश्न उद्भवत नसावा.

तिसर्या प्राजापत्य विवाहाबाबत आश्वलायनसूत्र फारसे काही सांगत नाही. "सह धर्मं चरत" असे म्हणून यात कन्येचे दान केले जाते आणि यामुळे जन्मलेली संतती पुढच्या मागच्या आठ पिढ्यांचा उद्धार करते. मात्र येथे वरदक्षिणेचा उल्लेख नाही. बहुधा त्यामुळेच येथे आधीच्या विवाहापेक्षा आणखी दोन पिढ्या कमी झालेल्या आहेत. चौथ्या आर्ष विवाहात कन्येच्या पित्याला दोन गायी देऊन कन्या ग्रहण केली जाते. या विवाहात उलटा प्रकार आहे. हे कुटुंब शेतकरी असण्याची शक्यता आहे कारण कन्या घरून आल्याने शेतकामाच्या बाबतीत झालेली हानी बहुधा दोन गायी देऊन भरून काढण्याचा प्रयत्न आहे. येथे सात पिढ्यांचा उद्धार सांगून आधीच्या विवाहापेक्षा एक पिढी कमी झाली आहे. प्राजापत्य किंवा आर्ष या दोन्ही विवाहात पुन्हा कन्येच्या पसंतीबद्दल काहीही म्हटले गेलेले नाही.

पुढचा गांधर्व विवाह हा पहिला आणि एकमेव विवाहाचा असा प्रकार आहे जेथे स्त्रीचे मन विचारात घेतले गेले आहे. परस्परांवर अनुरक्त झालेले स्त्रीपुरुष विवाह करतात. "त्वं मम भार्या भव, अहं तव भर्ता भवामि" असे म्हणून कन्येचे ग्रहण केले जाते. जेथे स्त्रीच्या मनाचा विचार केला गेला आहे तेथे पुढच्या मागच्या पिढ्यांच्या उद्धाराची शक्यता बहुधा संपलेली आहे. कारण या विवाहामुळे जी संतती निर्माण होते त्यामुळे कुणाच्याच उद्धाराचा उल्लेख केलेला नाही.
(क्रमशः)

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदू धर्म हि जगण्याची समृद्ध अडगळ आहे असे आपले माझे मत.हिंदू धर्मानुसार स्त्री ही दलितच,मग ती ब्राह्मणाची असो वा आणखी कुणी.