परीकथा - भाग १४ - फेसबूक स्टेटस २.९ - २.१० वर्षे

Submitted by तुमचा अभिषेक on 27 May, 2017 - 01:27

२० नोव्हेंबर २०१६

आठवड्याभराचा खोकला म्हणून आमचे आईसक्रीम बंदच आहे. आज नेमके तिला सोबत मार्केटमध्ये घेऊन गेलो आणि सोलकढी घेण्याच्या निमित्ताने तिची नजर आईसक्रीम वर पडली. एवढ्या दिवसांचा आतला सुप्त शैतान जागा झाला. आणि त्या बॉम्बे टू गोवा मधील "पकौडा पकौडा" सारखे "आईसक्रीम आईसक्रीम" सुरू झाले. खोकला ताजा असल्याने विकत घेऊन देण्याचा प्रश्नच नव्हता. त्या नादात माझी सोलकढीही राहिली. तिला कसाबसा गुंडाळून तिथून निघालो. आणि तिथेच चुकलो. जेवढे तिला आवरायचा प्रयत्न करत होतो तेवढी ती जास्त दंगा घालू लागली. आईसक्रीमच्या दुकानापासून जसा लांब जाऊ लागलो तसा मला थडाथड लाथाबुक्यांचा प्रसाद मिळू लागला. मार्केटच्या गर्दीने परीस्थिती आणखी अवघड केली. मध्ये एके ठिकाणी थांबून तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो फोल गेला. त्या नादात आजूबाजूचे चारचौघे संशयाने बघू लागले. त्यातला एक जण जरा जास्तच न्याहाळायला लागला. माझी महिन्याभराची वाढलेली दाढी, काळाकुट्ट शर्ट, आणि सावळा रंग.... या सगळ्याच्या ओपोजिट गोरीपान परी.. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पुन्हा तिला उचलून घेतले आणि तिथून पुढे निघालो. तिचा दंगा चालूच होता. पुन्हा समजूत काढायला खाली ऊतरवले. बाजूला पाहिले तर मगासचा डिटेक्टिव्ह माणूस तिथून पन्नास पावले चालत आमच्या मागावर आलेला. जिथे आम्ही थांबलो तिथेच बाजूला उभा राहून आमच्याकडे संशयाने बघत होता. आता मात्र माझी सटकली. परीला खचकन जवळ ओढून घेतले. तिच्याकडे पाहून गोड हसलो. चल देतो तुला आईसक्रीम म्हणत पुन्हा तिला आईसक्रीमच्या दुकानाच्या दिशेने नेऊ लागलो. अर्थातच फसवले. पण तसे म्हणताच ती जरा शांत झाली. आणि अचानक हाच आपला बाप असल्याचे भाव तिच्या चेहरयावर दिसू लागले. कधीतरी गैरसमजातून फटके खाणार मी हे नक्की Happy

.
.

११ डिसेंबर २०१६

मारुतीचा शेंदूर तोंडाला फासला, नेलपॉलिशने हातपाय रंगवले, बाटलीतले तेल घेऊन हातापायाला चोळले, आईसक्रीम खाताना कपडे माखले. दिवसभरात तिला चारपाच वेळा धुतले, पाण्यानेही आणि धपाट्यांनीही. मग रात्री खेळताना बेडवर आपटली आणि रडत रडतच दिवसभराचा आम्हाला छळायचा कोटा पुर्ण करून झोपी गेली.

पण मध्येच रात्री जाग आली. मम्मा मम्मा तर नेहमीच करते, पण आज झोपेतच "पप्पा पप्पा" करत रडायला लागली. मी थोपटताच शांतपणे पुन्हा झोपून गेली. राग तरी कसा येणार या पोरीचा ..

.
.

१३ डिसेंबर २०१६

राणीबागेतले पेंग्विन दर्शन ..

काल परीला घेऊन एकटेच राणीबागेत जायचे ठरवले. मम्माच्याही आधी आम्ही दोघांनीच राणीबागेत आलेले नवीन पेंग्विन बघायचे असा साधारण प्लान होता. तसेच माझा गेले काही दिवसांचा आजार झटकायचा होता, आणि परीचेही दुपारी खेळताना जोरदार पडून झाले होते. तर दोघांनाही चेंज हवा होता. पण आयत्यावेळेला समजले की ईदचा जुलूस असल्याने अर्धे रस्ते बंद होते किंवा वन वे झाले होते. त्यामुळे परीला खांद्यावर टाकले आणि चालतच निघालो. माझ्या हातात परी आणि परीच्या हातात जोजो.. टेक्निकली मी दोन पोरींना उचलून चाललो होतो.
राणीबाग घराच्या जितक्या जवळ वाटते तितक्याही जवळ नाहीये हे समजले. आजारपणामुळे थकवा लवकर आल्याने अर्ध्या रस्त्यावर परीला विचारले, परी चालतेस का? तर म्हणाली, "अरे गाड्या आहेत ना.."
रस्त्यावर सैरावैरा पळू नये म्हणून आम्ही तिला गाड्यांची भिती घातली आहे. तर आता एवढे समजूतदारपणाचे वाक्य तिने स्वत: समोरून फेकल्यावर मला तिचा हा विश्वास तोडायचा नव्हता.
मध्ये रस्त्यात एके ठिकाणी तिला बकरी दिसली. राणीबाग आणि पेंग्विन राहिले बाजूला आधी आम्हाला तीच बघायची होती. अगदी तिच्या जवळ जाऊन निरीक्षण सुरू झाले. वाटले आता ईथेच टाईमपास होणार. पण ईतक्यात एक शिंगवाला बोकड ईकडून तिकडे धावत गेला. एवढा डेंजर होता की काळवीट म्हणून पिंजरयात टाकले असते तरी चालून गेले असते. त्याला बघून परीही घाबरली आणि आम्हाला तिथून सटकता आले.

पुढे एका रस्त्यावर जुलूस निमित्ताने मोफत सरबताचा स्टॉल लावला होता. तिथे माझे काळे कपडे, वाढलेली दाढी आणि कडेवरची गोरीपान परी बघून तुमचा अभिषेकला 'आपला अबू शेख' समजत परीसाठी बिस्कीटांचा पुडा ऑफर केला गेला. पण आम्ही आमचा स्टॉक सोबत घेतला असल्याने धन्यवाद बोलून पुढे निघालो.
थोड्यावेळाने परी खांद्यावरच झोपली आणि तिच्या हातातील जोजो कुठे पडली मलाही समजले नाही. तीन जण घरून निघालो होतो, फायनली दोन जण राणीबागेत पोहोचलो. बहुतेक जोजोच्या नशीबात पेंग्विनदर्शन नव्हते.

पाच रुपयांचे तिकीट काढले. मागच्यावेळी आलेलो तेव्हाही पाचच रुपये तिकीट होते. मायबाप सरकारने पेंग्विन दाखवायचे एक्स्ट्रा चार्ज लावले नाहीत हे बघून बरे वाटले. पण त्याचबरोबर पेंग्विन खरोखर आहेत का, अशीही शंका आली. तिकिटखिडकीवरच शंकानिरसन करणार होतो, पण त्याआधी बाग किती वाजता बंद होणार हा प्रश्न विचारून चुकलो होतो, आणि त्याचे समोरून ईतके जीवावर आल्यासारखे उत्तर आले होते की आता आणखी एखादा प्रश्न विचारल्यास उगाच एक्स्ट्रा चार्ज लावतील अशी भिती वाटली.
तर मग आत नेहमीची हरणं, काळवीटे, सांबर वगैरे डिअर फॅमिली बघून झाली. झोका, घसरगुंडी आणि गार्डनपासून मुद्दामच तिला लांबून नेले. कारण दुपारी झालेली जखम अजून ताजी होती.
एकीकडे माझा पेंग्विन शोधाचा कार्यक्रम चालू होता. दोघातिघांना विचारून झाले, पण एकानेही आशादायी उत्तर दिले नव्हते. एक जण उगाचच चार दिशांना बघत गोलाकार फिरला जणू काही पटकन कुठे दिसतेय का बघून मला सांगणार होता. तर एक जण म्हणाला, "है, पर दिखेंगे नही. बाहर नही आते है" .. ते ऐकून अस्वलासारखे गुहेतून किंवा उंदरासारखे बिळातून बाहेर येणारे पेंग्विन माझ्या डोळ्यासमोर नाचू लागले. एकाने मात्र जानेवारी के बाद चालू होगा असे विश्वासार्ह माहिती दिल्याच्या थाटात म्हटले आणि त्यानंतर मग मी कोणाला विचारायचे कष्ट घेतले नाहीत.
मधल्या काळात परीचे मातीत खेळणे, पक्ष्यांच्या एका रिकाम्या पडलेल्या पिंजरयात शिरून दंगा करणे, हातात काठी घेऊन काऊकब्बूंच्या मागे पळणे, कमळांच्या तलावात पाय भिजवण्याचा हट्ट धरणे वगैरे प्रकार चालू होते.

आणि अचानक एवढा वेळ ज्याला मी शोधत होतो तो पेंग्विन चक्क तिलाच दिसला. हातातली काठी नाचवत, कॉक कॉक करत (बहुधा त्याला ती कोंबडा समजली असावी) त्याच्या दिशेने सुसाट पळत सुटली. तिच्यामागोमाग मी सुद्धा पोहोचलो. आम्ही दोघे पेंग्विनच्या अगदी समोर उभे राहिलो. आणि मग मी तिला शिकवले. अग्ग कॉक कॉक काय, हा पेंग्विन आहे. 'माझा खाऊ मला द्या!' याचे समोरचे चोचीसारखे तोंड आहे ना, त्यात कचरा टाकायचा..
आता एखाद्या पक्ष्याच्या तोंडात कचरा टाकायचा ही नक्की चांगली शिकवण आहे की वाईट देव जाणे, पण तरी प्रात्यक्षिक दाखवायला म्हणून तिच्या हातातील काठी मी तिला त्यात टाकायला लावली.
पण...
"चल आता जाऊया" असे मी म्हणताच मला काठी टाकताना जी भिती वाटली होती तीच खरी ठरली..
"अरे माझी काठीssss .."

सार्वजनिक जागेत तिच्याशी पंगा घ्यावा ईतका मोठा अजून मी झालो नाहीये.
झक मारत त्या पेंग्विनच्या तोंडात हात टाकला आणि त्याच्या पोटातील काठी शोधून बाहेर काढली. आजूबाजुचे कोणी आमच्याकडे पाहतेय का हे नेहमीसारखेच जराही बघितले नाही. कारण जनाची लाज न बाळगणे हाच तिच्यासोबत फिरण्याचा उत्तम मार्ग असतो.
राणीबागेतील पेंग्विनदर्शन कधी खुले होणार आणि आम्ही कधी जाणार याची काही कल्पना नाही. पण जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा ते पेंग्विन बघून हा पेंग्विन नक्की आठवणार Happy

.
.

८ जनेवारी २०१७

स्पोर्टस डे !!

आमचा पहिलावहिला. वयवर्ष पावणेतीन आणि माझ्या कल्पनेपेक्षा भव्यदिव्य. माझ्यासाठी तरी त्या वयात छानपैकी रनिंग ट्रॅक आखेलेले एखादे भलेमोठे मैदान स्वप्नातच असावे. आजकालच्या मुलांच्या नशिबात असते. पण स्पोर्टस डे म्हणजे नुसतेच खेळ नव्हते, तर सोबत धमाल मस्ती, हातात चमचमणारे रंगीबेरंगी पॉम पॉम घेत फ्रेंण्डससोबत नाचणे, त्यासाठी दोन आठवड्यांची प्रॅक्टीस, सकाळी पावणेसहाच्या थंडीत उठून आधी स्कूलमध्ये आणि मग तिथून सर्वांसोबत बस मधून मैदानावर जाणे वगैरे बरेच काही होते. तिच्यासाठी नवीन ट्रॅक पॅन्ट, स्पोर्टस शूज घेताना, घरात तिच्यासह नाचाची आणि खेळाची प्रॅक्टीस करताना, जानेवारीच्या थंडीत, सुट्टीच्या दिवशी, तिच्याही आधी पावणेसहाला उठताना, तिला चीअर अप करायला तिच्याही आधी स्कूलच्या मैदानावर हजेरी लावताना, जवळपास तीन चारशे पोरांमध्ये आपलेही एक मूल खेळणार आहे या एकंदरीत कल्पनेनेच आम्हालाही आमचाच स्पोर्टस डे असल्यासारखे वाटत होते.

कसलीही स्पर्धा, इर्ष्या वा एकमेकांवर कुरघोडी करायची भावना नसलेल्या लहान मुलांच्या स्पर्धा बघणे हा एक कमालीचा अनुभव होता. पाच-सहा मुलांचे ग्रूप बनवत प्रत्येकाला त्याच्या वयानुसार एकेक खेळ दिला होता. प्रत्येक रनिंग ट्रॅकवर काही ना काही वाढून ठेवले होते. कोणाला बाटलीत रिबीन भरून पुढे पळायचे होते, तर कोणाला धावत जाऊन दोरीला मोजे लटकवायचे होते. कोणाला पाण्याने भरलेला ग्लास बॅलन्स करत चालायचे, तर कोणाला बेडूक उड्या मारत जायचे होते. कोणाला पायातले बूट बदलून पुढे जायचे होते, तर कोणाला अंगावर शर्ट चढवून धावायचे होते. म्हणायला रेस पण त्यात कुठलेही नंबर लागणार नव्हते. कोणी शिट्टीचा आवाज ऐकूनही जागेवरच थांबत होते, तर कोणी त्या आधीच पळत होते. कोणी आपले सोडून दुसर्‍याला मदत करायला धावत होते, तर कोणी ट्रॅक सोडून भलतीकडेच जात होते. कोणी टीचरचे ऐकत होते, तर कोणी आपल्याच मर्जीचे बादशाह होते. या सर्वात आमची दिवटी जी कोणाच्या बापाचे ऐकत नाही ती काय दिवे लावणार याची आम्हाला उत्सुकता होती. आणि मग लवकरच ती रेस सुरू झाली ज्यासाठी आम्ही सर्वात जास्त एक्सायटेड होतो.

कोणी कितीही म्हटले, की मुलांना स्पर्धेत उतरवून त्यांच्याकडून नेहमी पहिले यायची अपेक्षा ठेवू नका, तरी जेव्हा आपले मूल स्पर्धेत उतरते तेव्हा त्याने चांगली कामगिरी करावी अशी एक अपेक्षा मनात असतेच. त्यामुळे मनातच "परी, परी" असे चीअर अप केले गेले. गेम खूप सिंपल होता. रनिंग ट्रॅकच्या मध्यावर लहानमोठे बॉल ठेवले होते. धावत जाऊन त्यातील दोन मोठे बॉल उचलून पुढे रेस फिनिश करायची होती. एक दोन तीन, शिट्टी वाजताच सर्व मुले पळत सुटली. आमचीही निघाली. सर्वांच्या पुढे. बॉल उचलणार्‍यांमध्ये सर्वात पहिली. त्यापुढे तिच्यासाठी सोपे होते. घरी तिची प्रॅक्टीस पाहिलेली. दोन फूटबॉल सहजपणे कवेत घेत ती पळायची. ईतक्या सहज की मलाही वाकून तसे पटकन उचलणे जमायचे नाही. पण स्पर्धेत मात्र एवढ्या लहान मुलांना असे दोन मोठाले बॉल ऊचलून पळता येईल का अशी शंका वाटल्याने ते जाळीच्या पिशवीत ठेवले होते. जेणेकरून ती जाळीच हातात घेत पळणे सोपे जाईल. पण आमचे झाले भलतेच. ते बघून आम्ही बॉल उचलून त्या जाळीशी खेळत तिथेच थांबलो. कदाचित बॉल जाळीच्या बाहेर येतो का बघत असावी, वा कुठे प्राईज टॅग आहे का शोधत असावी. तिचे तिलाच ठाऊक. टीचर सर्व मुलांना बॉल उचलून पुढे पळायला सांगत होत्या, पण आम्ही तिथेच रमलो. बाकीचे सारे एकेक करत पोचलेही आणि आम्ही सावकाश आपली रेस पुर्ण करत आमच्या पहिल्यावहिल्या रेसमध्ये चक्क लास्ट आलो Happy

जर ती फर्स्ट आली असती तर आनंद झाला असता. जर ती सेकंड आली असती तर जरा चुटपुट लागली असती. जर ती थर्ड आली असती तर कदाचित चक्क वाईटही वाटले असते. पण तिचे लास्ट येणे आमचे अफाट मनोरंजन करून गेले. शर्यत राहिली आपल्या जागी, पोरगी बॉलशी खेळत अर्ध्यावरच उभी होती आणि आम्ही तिचे आईबाप ईथे तो क्षण हसून एंजॉय करत होतो. धावतानाचा तिचा आनंद रेकॉर्ड करायला विडिओ घेतला होता, त्यात सोबत आमचाही हा आनंद रेकॉर्ड झाला. लहान मुलांमध्ये आढळणारा हा गुण या सो कॉलड स्पर्धेच्या युगात कुठवर टिकणार हे ठाऊक नाही. पण आजचा दिवस, आमचा पहिला वहिला ‘स्पोर्टस डे’ मात्र कमालीचा अविस्मरणीय झाला होता Happy

.
.

१७ जानेवारी २०१७

आईबाप पोरांना जसे प्रेमाने नावं ठेवतात तसे पोरंही आईबापांना प्रेमाने नाव ठेवतात.
सध्या तिने मला ठेवलेले फेव्हरेट नाव आहे, "बॅड गर्ल पप्पा" .. दिवसभरात पंचवीस वेळा तरी या नावाने माझा उद्धार करून होतो.

काल रात्री झोपायच्या आधी आमचा बाथरूम राऊंड झाला. तिथे माझा नसलेला ब्लडप्रेशर नेहमीसारखाच हाय करून आम्ही बाहेर पडलो. तिला बाहेर खेचून काढताना नेहमीसारखेच माझे थोडेसे ओलसर दमट हात तिला लागले. त्यावरून तिने नेहमीसारखेच मी तिचे कपडे भिजवल्याचा आरोप करत दंगा घातला. बरं काही बोलावे तर तिच्याकडे नेहमी उलट उत्तर किंवा एखादे लॉजिकल आर्ग्युमेंट तयारच असते. अगदी नसले तरी तिला काही ना काही बोलायचेच असते. पण आज मात्र तिला कुठलीही संधी द्यायची नाही या आवेशातच मी तिच्यावर ओरडलो,

परी तू बॅड गर्ल आहेस. तू नेहमी बाथरूममध्ये दंगा घालतेस. मोठमोठ्याने ओरडतेस. घरात सगळीकडे पसारा करतेस. सगळीकडे पाणी सांडवतेस. शूज घालून घरभर फिरतेस. एवढी रात्र झाली तरी झोपत नाहीस. मम्मा पप्पांचे ऐकत नाहीस. तू बॅड गर्ल आहेस परी तू बॅड गर्ल आहेस....

आजवर अशी एकामागोमाग एक फायरींग करत मी बरेचदा समोरच्याची बोलती बंद केली आहे.
पण आज....
माझे बोलून संपते ना संपते तोच समोरून तेवढ्याच, किंबहुना त्यापेक्षा जास्त आवेशात बॅक फायरींग झाली.

पप्पा तू बॅड गर्ल आहेस. तू मला मारतोस. तू माझ्यावर ओरडतोस. तू मला घट्ट पकडतोस. तू माझे कपडे ओले करतोस. तू मला बाथरूममध्ये अंधारात बंद करतोस. तू मला दाढी लावतोस. बॅड गर्ल पप्पा, तू बॅड गर्ल आहेस..

माझी बोलती तर या विचारानेच बंद झाली की आज हे आहे, तर उद्या काय असेल ...

- बॅड गर्ल पप्पा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाऊ स्वीट ! Happy
छानच आहे परी Happy
लिहिलयं पण खूप मस्त...

मस्तच! Happy
स्पोर्टस् डे चा किस्सा भारी. Biggrin किती निरागस आहे ही. Happy

आयडी फोटो परीचाच आहे ना?? क्यूट आहे एकदम. Happy

छानच
गोड आहे परी
स्पोर्ट्स डे चा किस्सा भारी

हो निधी, तीच आहे .. मागे मराठी भाषादिनानिमित्त चिव चिव चिमणीत तिचा एक विडिओही शेअर केलेला. त्यात जरा छोटी होती.

रीया, पाथफाईंडर धन्यवाद..
फक्त तेवढे नको सांगूस, ते जमत नाही ही खंत आहेच, पटकन सुचले आणि डोक्यातले ते विचार विरायच्या आधी ईतर कामे सोडून लिहून काढले हे हल्ली जमत नसल्याने हळूहळू ते सुचणेच बंद झालेय .. स्टेज आहे एक लाईफची.. जाईल कधीतरी.. लिखाणाचा किडा कुठल्या ना कुठल्या रूपात जपला जातोय हे महत्वाचे Happy

तुमचे लेख वाचून माझ्या मुलीचे बालपण आठवतो
लिहायचा प्रयत्न करा. आम्हीपण नाॅस्ट्याल्जीक होतो.