आश्वलायनगृह्यसूत्रातील विवाहाचे प्रकार आणि समाजाची स्त्रीविषयक धारणा - १

Submitted by अतुल ठाकुर on 26 May, 2017 - 10:16

rukmini2.jpg

समाजाचा अभ्यास करताना त्या समाजातील धार्मिक चालीरिती, सामाजिक नीतिनियम, समाजातील स्त्रिला देण्यात येणारी वागणूक अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी समाजाला दृष्टी देणारे ग्रंथ हे अनेक साधनांमधले एक महत्त्वाचे साधन असते. भारतीय समाजात वेद आणि वेदांशी संबंधित वाङमय हे नेहेमीच अशा तर्हेच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे साधन बनून राहिले आहेत. प्राचिन वाङमयातील गृह्यसूत्रे हे गृहस्थाश्रमात केल्या जाणार्या चालीरितींचे, पाळण्याची शिफारीस केलेल्या नियमांचे सविस्तरपणे वर्णन करणारे ग्रंथ असल्याने त्यांचा अभ्यास स्त्रीपुरुष नातेसंबंधावर प्रकाश पाडण्यास सहाय्यभूत होईल अशी प्रस्तूत लेखकाची धारणा आहे. प्राचिन चालीरितींचा उगम नक्की कशात आहे हे जनसामान्यांना माहित नसते. कदाचित त्यांना ते तसे माहित असण्याची आवश्यकतादेखिल नसते. मात्र परंपरेने झिरपत आलेल्या विचारांचा जबरदस्त परिणाम समाजात आजदेखील जाणवतो.

प्राचिन वाङमयाचा अभ्यास करताना तत्कालिन समाजाची स्त्रीविषयक धारणा काय होती याचादेखील अंदाज बांधता येतो. मात्र ही धारणा योग्य की अयोग्य याबद्दल कसलिही टिप्पणी लगेच करणे योग्य होणार नाही. याचे कारण अनेक रुढी आणि चालीरिती विशिष्ट कालात बलवत्तर झालेल्या आढळतात. त्यामागे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक कारणे असतात. उदा. वरदक्षिणा घेण्याच्या या काळातदेखिल विवाह करताना वधूच्या वडीलांना काही रक्कम देण्याची पद्धत भिल्ल समाजासारख्या काही आदिवासी समाजात आजही आहे. कारण एक मुलगी घराबाहेर पतीकडे गेली म्हणजे शेतावर काम करणारी एक व्यक्ती कमी झाली. त्याची भरपाई म्हणून ही रक्कम मुलीच्या वडिलांना द्यावी लागते. त्यामुळे दरवेळी आजच्या काळाच्या चष्म्यातून जुन्या चालीरितींकडे पाहून त्यांचे मूल्यमापन करता येणार नाही.
येथे आश्वलायनगृह्यसूत्र हे अभ्यासासाठी घेतले आहे. पुढे जाण्याआधी गृह्यसूत्रे आणि विशेषतः आश्वलायनगृह्यसूत्राची माहिती करून घेणे योग्य होईल.

गृह्यसूत्रे

वेदवाङमयाचा प्रवास वेदसंहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे असा झाला आहे. ब्राह्मण, आरण्यकाच्या काळात सूत्रबद्ध रचनेला सुरुवात झाली. सुटसुटीत आणि लक्षात ठेवण्यास सोपी अशी सूत्ररचना करणे हे मौखिक परंपरेत जे वाङमय सुरक्षित ठेवले जाते तेथे साहजिकच म्हटले पाहिजे. मात्र सूत्रबद्ध रचनेने विषयात अनेकदा दुर्बोधताही आली आणि त्यातील अर्थ मोकळा करण्यासाठी त्या विषयातील विद्वानांना त्यावर भाष्य करावे लागले. वेदाचा अर्थ समजण्यासाठी वेदांचाच भाग असणारे असे वेदांग साहित्य निर्माण झाले. मॅकडॉनाल्डने वेदांगाला सूत्रशेलीत लिहिलेले वैदिक साहित्य म्हटले आहे. जे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द आणि ज्योतिष या सहा भागात विभागले आहे. येथे अभ्यासास घेतलेल्या आश्वलायनगृह्यसूत्राचा समावेश कल्प या वेदांगात होतो. कल्प या वेदांगात वेदातील कर्मकांड, क्रिया, माणसाच्या आयुष्यातील जन्म, मृत्यु, विवाह इत्यादी घटनांशी संबंधित आचार, चालीरिती, वैयक्तिक आयुष्यात माणसाने कसे वागवे याचे नियम, स्वधर्म याचा उहापोह केलेला आढळतो.

विषयाच्या दृष्टीने कल्प हे चार प्रकारात विभागलेले आढळते. १. श्रौतसूत्र २. गृह्यसूत्र ३. धर्मसूत्र ४. शुल्बसूत्र
यज्ञाचे तात्त्विक विवेचन श्रौतसूत्रात आढळते. धार्मिक कृत्ये, यज्ञादी आचार, संस्कार यांची चर्चा श्रौतसूत्रात केलेली दिसते. यात चौदा यज्ञाचे सविस्तर वर्णन केले आहे. याशिवाय अनेक अशा यज्ञांचे वर्णन आहे जे जवळपास वर्षभर चालतात. यज्ञीय प्रक्रियेची व्याख्या करण्याच्या दृष्टीने श्रौतसूत्रांचे महत्त्व अपार आहे. सामाजिक चालीरितींचा उगम धर्मसूत्रांमध्ये आढळतो. हिंदू कायद्याचा उल्लेखदेखिल येथे आहे. समाजातील निरनिराळ्या जातींमधील नातेसंबंधांचा उहापोह यात केला आहे. तर यज्ञवेदीच्या निर्माणासाठी आवश्यक असलेल्या तंत्राची चर्चा शूल्बसूत्रामध्ये आहे. भुमितीची सुरुवात शुल्बसूत्रांमध्ये असल्याचे सांगितले जाते.

मॅक्समूलरने गृह्यसूत्रांचा काळ ई.स्.पू ६०० ते २०० असा मानला आहे. गृह्यसूत्र ही गृहस्थधर्माशी संबंधीत आचारांची चर्चा करतात. पत्नीबरोबर घरात राहून केल्या जाणार्या धार्मिक कृत्यांचे विवेचन गृह्यसूत्रात आहे. गृहस्थाच्या लौकिक जीवनात केली जाणारी धार्मिक कृत्ये, गृह्याग्निशी संबंधित संस्कार, येथे वर्णिली आहेत. यामुळे प्राचिन भारतातील कौटुंबिक जीवनाचा एक स्पष्ट आलेख आपल्याला मिळतो. सध्या उपलब्ध गृह्यसूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

ऋग्वेदाची गृह्यसूत्रे - १. आश्वलायनगृह्यसूत्र २. शांखायन्गृह्यसूत्र ३. कौषितकगृह्यसूत्र
शुक्लयजुर्वेदाची गृह्यसूत्रे - १. पारस्करगृह्यसूत्र
कृष्णयजुर्वेदाची गृह्यसूत्रे - १. बौधायनगृह्यसूत्र २. आपस्तंभगृह्यसूत्र ३. भारद्वाजगृह्यसूत्र ४. हिरण्यकेशीगृह्यसूत्र ५. मानवगृह्यसूत्र ६. काठकगृह्यसूत्र ७. वाराहगृह्यसूत्र
सामवेदाची गृह्यसूत्रे - १. गोभिलगृह्यसूत्र २. खदिरगृह्यसूत्र ३. जैमिनीयगृह्यसूत्र
अथर्ववेदाची गृह्यसूत्रे - १. कौशिकगृह्यसूत्रे

सर्वसाधारण गृह्यसूत्रांची थोडक्यात ओळख करून घेतल्यावर आता येथे संदर्भासाठी घेतलेल्या आश्वलायनगृह्यसूत्राची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
(क्रमशः)

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users