द इनोसंट्स (Les Innocents) - निरागसता पाश दैवे

Submitted by भास्कराचार्य on 24 May, 2017 - 02:52

`प्लेग्राऊंड' बघितल्यावर मनात भावनांचा कल्लोळ खूप वाढला होता. काळोखाची जाणीव फार झाली, अशी भावना मनात दाटून आली होती. काहीतरी मनाला सुखावणारं आता बघायला मिळावं, असं सारखं वाटत होतं. सुदैवाने पुढच्या 'द इनोसंट्स'ने ती इच्छा बर्‍यापैकी पूर्ण केली.

'युद्धस्य कथा रम्या' वगैरे सगळं म्हणायला ठीक, पण प्रत्यक्षात ते वास्तव चांगलंच भयानक असतं. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे युद्धाच्या कथा मोठ्या तावातावाने सांगणारे, बढाया मारणारे बहुतांशी पुरूष असतात. अगदी हॉलीवूडमध्येही युद्धावर असलेले चांगले चित्रपट बहुतांशी पुरूष दिग्दर्शकांनी पुरूषांच्याच कथा सांगणारे बनवलेले आहेत. लिंकन ह्याला 'ऑफ द मेन बाय द मेन फॉर द मेन' म्हणाला असता. (जरी स्त्रिया हे चित्रपट बघत असल्या तरी.) खरं पाहता युद्धाचा प्रत्यक्ष मार पुरूषांना पारंपरिकरीत्या लागत असला, तरी ते होऊन गेल्यावर त्याचा बडगा स्त्रिया आणि मुलांवरच पडलेला असतो, हे सहज दिसतं. अगदी महाभारतातही हे तत्व अधोरेखित केलेलं आहे.

दिग्दर्शिका अ‍ॅनी फाँटेनचा 'द इनोसंट्स' ह्या सगळ्याला एका सत्यघटनेची कथा सांगत अगदी व्यवस्थित छेद देतो. हा चित्रपट संपूर्णपणे स्त्रियांचा आहे. ह्यात फक्त एक उल्लेखनीय म्हणता येईल असं पुरूषपात्र आहे, आणि तेसुद्धा कथेच्या अगदी कडेकडेने घिरट्या घालतं. कुठल्याही प्रकारच्या युद्धात स्त्रियांवर होणारे अत्याचार अवर्णनीय असतात. विजयी सैनिकांना बक्षिस म्हणून शत्रूपक्षाच्या स्त्रियांवर बलात्कार करण्याची सूट मानवजातीने खूप आधीपासून दिलेली आहे. मग ते अगदी धर्मासाठी खेळलं जाणारं युद्ध का असेना. 'द इनोसंट्स' अशीच एक खरी गोष्ट शिताफीने आणि मितकथनातून सांगतो.

दुसरं महायुद्ध संपून काही महिने उलटलेले आहेत. फ्रेंच रेड क्रॉस पोलंडमध्ये दोस्तराष्ट्रांनी व्यापलेल्या भागात कामात गढलं आहे. अशा वेळेस डॉक्टर मथिल्डच्या (लू डी लागं) दारी एक पोलिश नन धावतपळत चिंताग्रस्त अवस्थेत येऊन उभी ठाकते. कुठलीही दिरंगाई खपवून न घेणारी मथिल्ड आधी साशंक असते, पण रशियाव्याप्त भागातल्या ह्या फक्त स्त्रियांसाठी असलेल्या चर्चमध्ये गेल्यावर नन्सच्या सुरेल गीतांच्या पार्श्वभूमीवर उमटणार्‍या किंकाळ्यांमधून तिला लवकरच कळतं, की एक अत्यंत तरूण नन प्रसूतीच्या शेवटच्या अवस्थेत गर्भास जन्म देताना मरणकळा सहन करते आहे.

गर्भवती नन? `मेलीनं कुठे शेण खाल्लंय काय माहीत?' अशांसारख्या 'शेमिंग' उद्गारांची आपल्याला सवय. पण इथे रेव्हरंड मदर (अगाता कुलेझा) आणि तिची मदतनीस मारिया (अगाता बुझेक) आपल्याला शांतपणे सांगतात, की युद्धाच्या सरत्या महिन्यांत रशियन सैनिकांनी चर्चमध्ये घुसून ह्या निरागस नन्सवर निर्घृण अत्याचार केले. त्यांनी स्वतःचीही पोटे लपवलेली आहेत, पण ती मथिल्डपासून आणि नंतर जगापासूनही लपून राहणार नाहीत. रेव्हरंड मदरला नन्सच्या वाढलेल्या पोटांची लाज वाटत असते, पण त्यांना जो मानसिक त्रास भोगावा लागतोय, त्याला ती देवाची परीक्षा ह्या नावाखाली नजरेआड करत असते. खूप प्रयत्नांती ती मथिल्डला त्यांच्यावर उपचार करू द्यायला तयार होते, परंतु हे सगळं गुप्त राहिलं पाहिजे ज्या अटीवर.

ह्या सगळ्यात अजून एक गुंतागुंत म्हणजे मथिल्डला फ्रेंच भाग सोडून दुसर्‍यांची सुश्रूषा करण्यास परवानगी नसते. त्यामुळे तिला हे सगळं रात्रीच्या चादरीखाली करणं भाग आहे. म्हणजे त्याच रशियन्सच्या भागात रात्री एकट्या बाईने जीप चालवत जायचं. मध्येच रशियन्स पुन्हा चर्चमध्ये घुसायला लागले, की त्यांना पळवून लावायचा प्रयत्न करायचा. ह्याचे परिणाम तिलाही भोगावे लागतातच. शेवटी रेड क्रॉसची असली, तरी ती एक बाईच. अत्याचार तिच्याही माथी येतोच. हाही प्रसंग भयानक अंगावर येणारा आहे. ह्या नन्सच्या आणि मथिल्डच्या गोष्टीचं पुढे काय होतं, आणि मुलांचं काय होतं, त्यांना चर्चच्या प्रवाहात कसं सामावून घेतलं जातं का, हा वर म्हटल्याप्रमाणे दु:खद प्रसंगांनी भरलेला प्रवास असला, तरी खूप सकारात्मक अनुभव आहे, आणि तो प्रत्यक्ष घेणंच इष्ट.

अ‍ॅनी फाँटेनने हा सर्व कथाभाग मानवतेच्या मूल्यातून समर्थपणे हाताळला आहे. मथिल्ड स्वतः देवबिव मानत नाही. ती ह्या नन्सच्या भावनात्मक जगाला एक तर्कशुद्ध चौकट द्यायचा प्रयत्न करते, पण नंतर स्वतः त्यांच्या श्रद्धेचा मतितार्थ जाणायचा प्रयत्न करते, हे सगळं फार सुंदर दाखवलं आहे. एका प्रसंगात सगळ्या नन्स तिच्या मायेच्या छत्राखाली येत आहेत, ही `मदर मेरी'सारखी प्रतिमा तर कमाल आहे. तिथे जोरजोरात टाळ्या वाजवाव्याशा वाटल्या. ह्या सगळ्या नन्स त्यांच्या सारख्या युनिफॉर्ममुळे सुरवातीला अगदी एकसारख्या वाटतात, परंतु त्यांच्यातली प्रत्येकजण मातृत्वाच्या भावनेला वेगवेगळ्या तर्‍हेने आपलंसं करते, हा अनुभवही लाजवाब. मी पुरूष असल्याने मला ह्या सगळ्या भावनांचा पोत कधीच समजणार नाही. त्यामुळे 'तू आज मला एक वेगळाच अनुभव दिलास' असं म्हणून दिग्दर्शिकेचा हात हाती घ्यावासा वाटला. `देवावरची श्रद्धा' किंवा `श्रद्धेचे डचमळणे' हा अनुभव मात्र त्या सर्वांसाठी एकसमान आहे. `देवाने हे असं का होऊ दिलं असेल?' हा न सुटणारा प्रश्न कुठलाही निवाडा न करता मांडणे हे लेखक-दिग्दर्शिकेचे कौशल्य आहे. ``24 hours of doubt for 1 minute of hope'' असं मारिया एका प्रसंगात म्हणते, आणि मन थरारून उठतं.

लू डी लागंबद्दल काय लिहावं? चेहर्‍याच्या एखाद्या स्नायूच्या नुसत्या थरथरीने ती मनातलं बोलू शकते. साधं हसली, तरी ते आरस्पानी हास्य मनातलं काही अलगद दाखवून जातं. चार्ली चॅप्लिनच्या काही रोल्सची मला प्रकर्षाने आठवण झाली. नुसती भिवई वाकडी करून एक्सप्रेशन्स देण्यातला प्रकार. खरंच जबरदस्त! तिला पिफमध्ये ह्या चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेस पुरस्कार मिळाला. मी पाहिलेल्या चित्रपटांत तरी कोणी तिच्या जवळही येऊ शकत नाही, हे खरेच. तिच्या सहकारी डॉक्टरबरोबरचा रोमान्स - जे एक पुरूषपात्र आहे ते - हेसुद्धा एक खूप बोलके कथासूत्र आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटलं तिला बघून. त्याचबरोबर रेव्हरंड मदरची भूमिकादेखील आव्हानात्मक आहे आणि ती अगाता कुलेझाने काय वठवली आहे! बाळांचे जीव वाचवून शरमेच्या `सिनफुल' पापाचं धनी व्हायचं, की त्यांना मरू देण्याच्या पापाचं धनी व्हायचं ह्या ओझ्याखाली दबलेली मदर एक गुपित पोटात दडवून थंड आहे, ही सगळी ओढाताण तिने भयंकर परिणामकारकरीत्या दाखवली आहे. तीच गोष्ट ह्या दोघींमधल्या मारियाची. रेव्हरंड मदरचं ऐकायचं, की स्वतःच्या आतल्या आवाजाचं? परमात्म्याचा आवाज नक्की कुठला? हा तिच्यापुढचा यक्षप्रश्न. तो तिने व्यवस्थित पेलला आहे.

ह्याचबरोबर बर्फाच्छादित पोलंडमध्ये दिसणारी काळी-पांढरी पार्श्वभूमी ही नन्सच्या जगाबद्दलच्या `हे काळं आणि हे पांढरं' ह्या दृष्टिकोनाला अधोरेखित करते आणि ह्या `ग्रे' कथेला कोंदण चढवते. पार्श्वसंगीताचा अचूक वापर, त्या नन्सचं सुश्राव्य गाणं, हे परिस्थितीने त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाला वेगळीच किनार देतं. फ्रेम्सचा वापर आणि कॅमेर्‍याची स्थाने हे सगळं चित्रपटाला देखणं बनवतं. ते प्रत्यक्षच बघावं.

एकंदरीत श्रद्धा वगैरे सगळं ठीक, पण ही खंबीर असलेल्या स्त्रियांनी युद्धात वेळप्रसंगी एकमेकांना भक्कमपणे साथ देण्याची गोष्ट आहे, हे सर्वात महत्वाचं आणि जगावेगळं. ह्यासाठी हा चित्रपट जरूर बघावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख करून दिलीत चित्रपटाची.
मला इतर भाषेतले सिनेमे पहायला आवडत नाही, इंग्रजी सुद्धा मी खूप कमी पाहते.
पण अशा सिनेमांवर लिहिलेले लेख मला आवडतात ते मी आवर्जून वाचते.
सकाळ च्या रविवारच्या पुरवणीत पण असे लेख असतात.

सुंदर ओळख
बघितला पाहिजे हा चित्रपट

आवडलं.
सिनेमांवर खूप छान लिहिता तुम्ही!

थँक्स सगळ्यांना! Happy

श्री, चिनूक्सला कदाचित हे चित्रपट कुठे मिळतील ह्याविषयी माहिती असेल.

अतिशय सुंदर ओळख....
<<<< मी पुरूष असल्याने मला ह्या सगळ्या भावनांचा पोत कधीच समजणार नाही. त्यामुळे 'तू आज मला एक वेगळाच अनुभव दिलास' असं म्हणून दिग्दर्शिकेचा हात हाती घ्यावासा वाटला. >>>> हे वाक्य तर अप्रतिम...
मिळवून बघणार....

सुरेख लिहीलं आहे. सब्जेक्ट मॅटर बघता मला हा चित्रपट स्वतः बघणं अजिबात झेपणार नाही.

>> काहीतरी मनाला सुखावणारं आता बघायला मिळावं, असं सारखं वाटत होतं. सुदैवाने पुढच्या 'द इनोसंट्स'ने ती इच्छा बर्‍यापैकी पूर्ण केली.
हे मात्र कळलं नाही. किती डार्क विषय आहे चित्रपटाचा. त्या वन मिनीट ऑफ होप मध्ये कितीही सौंदर्य असलं तरी भोवतालचे २४ तास डार्क किंवा ग्रे. माझ्यासारख्यांची मनं त्याने सुखावतील असं वाटत नाही Happy

थँक्स एव्हरीवन! Happy

सशल, म्हटलं आहे त्याप्रमाणे काही प्रसंग डार्क आहेत, पण शेवट छान आहे, आणि त्यातून झळाळून निघालेली मथिल्ड विशेषत: फार भावून जाते. युद्धामध्ये होरपळलेल्या बायकांचे अंतरंग हा विषय घेणारा चित्रपटच एका अर्थी मेटा-पॉझिटीव्ह आहे, असेही म्हणता येईल. बेख्देल टेस्ट (https://en.wikipedia.org/wiki/Bechdel_test) ह्या चित्रपटात अर्थातच सहज पास होते. त्याही दृष्टीने म्हणत होतो.

तिचा तो डॉक्टर मित्र जुईश आहे हे कळल्यावरचा प्रसंगदेखील छान दाखवला आहे. त्यातल्या त्यात केलेला तो विनोद मला फार आवडला होता.
कॅथलिक नन्सना वाचवणारे दोघे: एक कम्युनिस्ट आणि एक जुईश ही आयरनी पण खासच वाटली.
मस्त परीक्षण लिहिले आहेस. पुन्हा सगळं डोळ्यासमोर उभं राहीलं!

उत्तम लिहिलं आहेस, भास्कराचार्य.

युद्ध, विध्वंस यांचा अनुभव घेतलेल्या देशांनी हे अनुभव ज्या विविध प्रकारे मोठ्या पडद्यावर आणले, ते विस्मयकारक आहे. युरप, इस्रायल-पॅलेस्ताईन, लेबनान, अफगाणिस्तान या देशांमधला विध्वंस आणि युद्धांमुळे झालेली अनेक प्रकारची वाताहत लोकांच्या मनांवर या चित्रपटांमुळे कायम कोरलेली राहते. भारताला युद्धांमधल्या विध्वंसाचा अनुभव नसल्यानं आणि हिंसा आपल्या सरावाची असल्यानं आपल्या युद्धांबद्दलच्या कल्पना फार्फार रोम्यांटिक आहेत. एकेकाळी 'दोन बॉम्ब टाकून संपवून टाका' म्हणणारा मी भानावर आलो त्याला हे चित्रपटही बरेच जबाबदार आहेत.

जबरदस्त......
अनेक धन्स..... भास्कराचार्य.....

मस्त लिहले आहे !
चर्च मध्ये अविवाहित स्त्रीयांची मुले त्यांची परवानगी नसताना परस्पर दत्तक दिली जायची याची सत्य करूण कहाणी सांगणारा "फिलोमेना" नावाचा सुंदर चित्रपट इतक्यात बघितला त्याची आठवण झाली.