मिरवत बसले 'मी' पण नसते !

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 May, 2017 - 14:22

दु:खाचे जर शिंपण नसते
फुलले सौख्याचे क्षण नसते

शेजेवर ती जिवंत जळते
घरात जेव्हा सरपण नसते

काळाला का दूषण द्यावे
त्याच्यापाठी वणवण नसते ?

'लोपामुद्रा' झाले नाही
मिरवत बसले 'मी' पण नसते !

हिरा निपजला नसता वेडे
कोळश्यास जर दडपण नसते

डाग निघावा चारित्र्याचा
असले कुठले साबण नसते

कुठे लपवले असते त्याला
हृदयाला जर हे खण नसते

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users