बोल दो ना जरा

Submitted by सुबोध अनंत मेस्त्री on 18 May, 2017 - 21:55

"पप्पा, माझ्या खडशिंगड (मूळ नाव खरशिंगर पण ते सार्थकला अजून व्यवस्थित उच्चारता येत नाही) टीचर खूप मस्त शिकवतात. मारत पण नाही आम्हाला. मला भरपूर आवडतात या टीचर", एकदा सहज मी सार्थकला त्याच्या क्लास टीचरबद्दल विचारलं होत तेव्हा त्याच्याकडून हे उत्तर मिळालं होतं.

"आपण तुझ्या शेवटच्या पेपरच्या दिवशी बाईंना पत्र लिहू. त्यात तुला जे वाटत टीचरबद्दल ते लिही. टीचरना आवडेल सांगितलंस तर", मी त्याला सुचवलं. त्याने सुद्धा "चालेल" म्हणून होकार दिला.

सार्थकच पहिलीच वर्ष असल्याने त्याला पहिल्या दिवशी मी शाळेत घेऊन गेलो होतो व नेमकी फी रिसीट न्यायला विसरलो. त्या दिवशी बाईंची आणि माझी पहिली भेट झाली. 60 च्या घरात बाईचं वय असेल. डोळ्यावर चष्मा आणि अत्यंत साधं राहणीमान. कुठेच आधुनिकतेची जोड नाही. त्यांनी मला रिसीट शिवाय सार्थकला शाळेत बसविण्यास स्पष्ट नकार दिला. मी उद्या रिसीट पाठवतो सांगून पण त्या काही ऐकेनात.

"अहो अस कुणीही येऊन बसेल वर्गात. उद्या तुम्ही नका येऊ हवं तर. यांच्याकडे रिसीट पाठवून द्या झेरॉक्स कॉपी. मी बसवेन त्याला वर्गात", बाईंनी मला सुचवलं. एवढं विनवून ही ऐकत नाही म्हटल्यावर मी निघालो. माझं बाईंबद्दल मत काही चांगलं झालं नाही. सार्थकची यावर्षात खैर नाही असही वाटलं एक क्षण. आणि त्यातलीच उत्कंठा म्हणून मी त्याला क्लास टीचरबद्दल विचारलं होत.

पुढच्या एक दोन वेळेस पालक सभेच्या निमित्ताने सार्थकच्या वर्गात जाणं झालं होतं पण त्या दोन्ही वेळेस खरशिंगर बाई काहीच बोलत नव्हत्या. बाजूच्या वर्गातल्याच शिक्षिका सभा घेत होत्या. खरशिंगर बाई मला पहिल्या दिवशी वाटल्या तशा यावेळी मुळीच वाटल्या नाहीत. उलट अत्यंत शांत आणि साधं व्यक्तिमत्व. जितक्यास तितकं बोलणं. छोट्या मुलांची मोठी जबाबदारी असताना त्यांची शाळेच्या पहिल्या दिवशीची वागणूक ही योग्य होती हे विचारांती मला वाटलं.

सार्थकचा वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर 8 मार्चला होता. मीही कामाच्या गडबडीत लेटरच पूर्णपणे विसरून गेलो होतो. 8 तारखेलाच सकाळी आठवण झाली. शाळेत निघण्याची वेळ 11 ची आम्ही 9 वाजता पत्र लिहायला बसलो. सार्थकला टीचरबद्दल जे वाटत ते मी त्याला विचारलं आणि एका पेपरवर ते उतरवलं. नंतर सार्थकला तेच बघून एका पानावर लिहायला सांगितलं. पण मी पेनानेच लिहिणार या हट्टावर तो पेटला. सहसा पेन्सिलने लिहिताना त्याची होणारी खाडाखोड मला माहित होती. पेनाने पत्र होणार नाही म्हणून त्याला समजावलं पण तो ऐकत नव्हता. पहिल्या एक दोन वाक्यालाच होणारी खाडाखोड, त्यात वाया जाणारा वेळ, बाबांची शाळेचा वेळ जवळ येतेय म्हणून होणारी चिडचिड आणि "या सुबुला पण काही काम नाहीत. आता कशाला काढायचं लिहायला पत्र. यांच्यामुळे उगाच सार्थूवर चिडतात बाबा" असा आईचा एकंदरीत पवित्रा लक्षात घेऊन मीच आवरता हात घेतला.

त्याला सांगितलं, "आपण रिजल्टच्या दिवशी देऊ बाईंना पत्र. आता पूर्ण होणार नाही. शाळेची वेळ होत आली." नशीब त्यानं माझं ऐकलं नाहीतर त्या दिवशी बाबांचा मार खाऊनच तो पेपरला गेला असता

संध्याकाळी परत आल्यावर त्याने सांगितलं की शाळा 15 तारखेपर्यंत आहे. शाळेत उरलेल्या तोंडी परीक्षा आणि वाचनाच्या परीक्षा या वार्षिक परीक्षेनंतर घेण्याचं ठरलं होतं. आता बरा वेळ मिळाला होता. पुढचा दिवस रविवार होता पण साहेबांचा मूड नव्हता. पुन्हा एकदा सोमवारी शाळेच्या आधी 2 तास आम्ही बसलो. पण यावेळी त्याला पेन्सिलने पत्र लिहिण्यास कनविन्स करण्यात मला यश आलं होतं. एखादी स्पेलिंग चुकलीच तर लगेच खोडून दुसरी लिहिता येऊ शकत होती. पत्र तयार झालं आणि ते अस होत,

"प्रिय खरशिंगर बाई,

तुम्ही खूप छान शिकवता. तुम्ही खूप छान आहात. तुमच्यामुळे मी लिहायला व वाचायला शिकलो. तुम्ही मला खूप आवडता. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. तुम्ही पण मला विसरू नका.

तुमचाच,
सार्थक सुबोध मेस्त्री
इयत्ता-पहिली / ब"

"पप्पा. मी पत्र वाचताना माझी रेकॉर्डिंग कर आणि नेटवरून मम्मीला पाठव", अशी ऑर्डर देऊन माझ्याकडून ते करून सुद्धा घेतलं.

या पत्रात त्याला वाटतील त्या करेक्शन त्याने करून घेतल्या. बाईंना पत्र आठवणीने दे अस त्याला सुचवलं कारण अशा गोष्टीत तो लाजतो हे मला माहित होतं. 15 पर्यंत परिक्षा चालेल याची मला शंका होती. पण "शेवटच्या दिवशीच पत्र दे", हे माझं वाक्य त्याने लक्षात ठेवलं होतं. मी रोज त्याची कंपास उघडून बघायचो तर पत्र तसच. त्याच्या कंपासची अवस्था पाहून पत्र पेन्सिलने काळ होणार म्हणून मी मुद्दाम पत्र एका अधिक कोऱ्या पानात ठेवलं होतं. एका दिवशी मला पत्र सापडलं नाही आणि मला वाटलं की याने बाईंना दिल असेल. बाई काय म्हणाल्या म्हणून त्याला विचारलं तर त्याने पत्र अजून दिलंच नव्हतं. पुस्तकांच्या खाली दबलेल त्याच्या दप्तरातल पत्र मी बाहेर काढलं. मला खर तर चीड आली होती पण "त्याला अजून काय समजतंय?" म्हणून मी राग आतल्या आत दाबला. त्याला जवळ घेऊन समजावलं, की ज्या मेहनतीने आणि प्रेमाने त्याने हे पत्र लिहिलंय त्या पद्धतीने जपून ते बाईंपर्यंत पोहचल पण पाहिजे. त्याने मला जपून ठेवण्याचं प्रॉमिस केलं. 15 तारखेपर्यंत पत्र तसच होत. शेवटच्या दिवशी नेमकी स्कुल व्हॅन आली नाही आणि सार्थकला नेण्याआणण्याची जबाबदारी बाबांवर आली. तो द्यायला विसरेल म्हणून मी बाबांना पत्राची आठवण करून दिली. तो विसरलाच होता पण बाबा त्याला शाळा सुटल्यावर पुन्हा वर्गाकडे घेऊन गेले आणि त्याने बाईंना पत्र दिल. बाईंनी गडबडीत ते तेव्हा वाचलं नसावं.

आज रिजल्टच्या निमित्ताने मी त्याच्याबरोबरच शाळेत जाणार होतो पण तो काही यायला मागत नव्हता. सगळे प्रयत्न करून थकलो आणि मग जबरदस्ती करून फायदा नाही म्हणून मी एकटाच शाळेत गेलो. वर्गात बरीच मोठी मोठी मुलं सेल्फीज काढत उभी होती. शाळेचे माजी विद्यार्थी असणार हा अंदाज सहज बांधता येण्यासारखा होता. मी बाईंच्या टेबलजवळ गेलो.

"सार्थक मेस्त्री", मी नाव सांगितलं. बाईंनी रिजल्ट त्यांच्या टेबलवर ठेवलेल्या गठ्ठ्यातून काढला.

"पेढे घेऊन या. सार्थक पहिला आलाय", बाईंनी प्रसन्न मुद्रेने सांगितलं. तो पहिला येणार याचा अंदाज होताच पण बोर्डवर त्याच नाव बघून समाधान वाटलं.

"बाई फोटो घेऊ का बोर्डचे?", मी विचारल्यावर "हो घ्या की" म्हणून हसत बाईंनी परवानगी दिली.

मी 3-4 वेगवेगळ्या अँगल मधून बोर्डचे फोटो काढले. तोपर्यंत बाई दुसऱ्या पालकांना रिजल्ट देत होत्या.

"पत्र मिळालं का बाई सार्थकच ?", मी बाईंना उत्सुकतेपोटी विचारले.

"हो. आणि वाचून खूप बर वाटलं. जपून ठेवलय मी ते", बाईंनी कौतुकाने सांगितलं.

"तो तुमच्याबद्दल खूप काही सांगायचा. तो तुम्हाला सरळ येऊन बोलून दाखवणार नाही म्हणून मग त्याला पत्रच लिहायला सांगितलं. खूप लाजरा आहे तो", बाई बाकी सगळं सोडून माझं ऐकत होत्या.

"पाहिलीतल्या मुलाला याची जाण आहे हेच खूप मोठं आहे. लहान वयातच खूप हुशार आहे तो. हे बघा हे पण माझे जुने विद्यार्थी मला भेटायला आलेत. विद्यार्थ्यांनी आठवण ठेवली की आम्हाला दुसरं काही नको", त्या सेल्फीमग्न विद्यार्थ्यांकडे हात दाखवून बाई अभिमानाने सांगत होत्या.

"तुम्ही असणार का बाई सार्थकला पुढच्यावर्षी शिकवायला", मी कुतूहलाने विचारले. बाई थोडया थांबल्या आणि एक स्माईल देऊन म्हणाल्या,
"मी रिटायर्ड होतेय यावर्षी. हे माझं शेवटचं वर्ष होत", इतक्या वर्षांंची शाळेची सवय आणि विद्यार्थ्यांचा सहवास सुटणार या दुःखाची हलकी किनार त्यांच्या वाक्याला होती.

"तुमचा मोबाईल नंबर द्या बाई. मी सार्थकला फोन लावून देईन तुमच्याशी बोलायला. त्याला आवडेल", मी माझा मोबाईल खिशातून काढत म्हटलं. बाईंनी आनंदाने नंबर दिला आणि आवर्जून फोन करायला सांगितलं.

मी तिथून निघालो. दोन गोष्टींचा आनंद मनात होता. एक तर सार्थकचा यावर्षीही पहिला नंबर असण्याचा आणि बाईंच्या रिटायरमेंटच्या वर्षी त्यांना पहिलीच्या मुलाकडून कौतुकाचे शब्द असणारं पत्र गिफ्ट म्हणून मिळालं याचा. पत्र मेहनत वाया गेली नव्हती. इतराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची सुरुवात सार्थकने लिहिण्यावाचण्याच्या पहिल्याच वर्षी केली होती आणि शाळा सोडताना चिमुकल्या हातांची लेखणी बाईंच्या चेहऱ्यावर स्माईल सोडून गेली होती. शेवटी ज्यांचं आपल्या आयुष्यात योगदान आहे त्यांना ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्याच तोंडून ऐकायला आवडत आणि त्यांच्या योगदानाची त्यांना जाणीव करून देण हे आपलं कर्तव्य.

http://sahajsaral.blogspot.in/2017/05/grattitude.html?m=1
sahajsaral

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान!!
वेळीच व्यक्त होणे खूप गरजेचे! नंतर हळहळण्यात काही अर्थ नाही

मस्तच ...
सार्थकच अक्षरही खूप छान आहे.. Happy

फार सुंदर लिहीलय .
एक उगाचच विचारतेय... तुम्ही त्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलंय का ? पहिलीच्या मानानी मराठी अक्षर छान आहे आणि हल्ली मराठी माध्यमात कोणी घालत नाही म्हणून विचारतेय.

@मनीमोहोर

होय. तो मराठी माध्यमात शिकतो आहे. तो ज्या वातावरणात राहतो, आणि जी भाषा बोलतो त्यात शिक्षण त्यासाठी अधिक सोपं व्हावं म्हणून. मी कॉन्व्हेंट च्या विरोधात नाही पण फार पूर्वी एका क्लासेसमध्ये काही वर्षे सुपरवाईजिंग करत असताना मराठी आणि कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांच्या संस्कारामधला फरक खूप प्रकर्षाने जाणवला होता. त्यावेळीच ठरवलं होत की माझा मुलगा किंवा मुलगी मराठी माध्यमात शिकेल. त्याला कॉन्व्हेंट माध्यमात ठेवून इंग्लिश आणि नवीन नॉलेज देण्यापेक्षा मराठी माध्यमात ठेवून इंग्लिश आणि हवं ते नॉलेज देणं थोडं सोयीस्कर वाटलं. इंटर नॅशनलस्कुल मध्ये अभ्यासाचा प्रेशर देऊन त्याच बालपण हिरावून घेणही योग्य वाटत नव्हतं. आणि तुमचा हा प्रश्न उगाचच नाही तो अगदी योग्य आहे.

बाकी सर्व मायबोलीकर मित्र मैत्रिणीचे प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!

आपण विचार पूर्वक घेतलेल्या ह्या निर्णयाचं स्वागत आहे . सार्थक ला आणि तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा !

सार्थकच कौतुक वाटलं. त्याला खूप शुभेच्छा. त्याच्या ह्या कौतुकात तुमचापण मोठा वाटा आहे. पहिलितल्या मुलाच अक्षर काय सुरेख आहे.

तीन लेख सलग वाचले आपले, तिन्ही आवडले.. सहज आठवणीतल्या भूतकाळात घेऊन जाता आपण.. लिहीत राहा.. Happy

तुमच्यामुळे मी लिहायला वाचायला शिकलो हा पहिलीच्या मुलाचा विचार खरेच छान आहे