लोक काय म्हणतील ?

Submitted by कुमार१ on 18 May, 2017 - 21:25

आपले नुकसान कशाकशाने होऊ शकते? आळशीपणा, कामचुकार वृत्ती, लबाडी, अविचारी धाडस, स्वैरवर्तन, कमकुवतपणा .....अशा कितीतरी गोष्टी नुकसानीस कारणीभूत ठरतात. आपले नुकसान हे अनेक आघाड्यांवर होऊ शकते. जसे की आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक, सामाजिक, इत्यादी. नुकसान झाल्यावर आपण खडबडून जागे होतो. मग नुकसानीचे खापर दुसऱ्यावर फोडू पाहतो. नंतर आत्मपरीक्षण करतो. त्यातून स्वतःमध्ये काही बदल घडवतो आणि स्वतःला सुधारतो. पण, जर का सुधारणे आपल्याला जमले नाही तर मात्र आपली अवस्था केविलवाणी होते.

नुकसान करणाऱ्या वरील कारणांशिवाय अजून एक कारण आपल्या मनात दडून बसलेले असते. ते म्हणजे, आपल्याला आवडणारी पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारी एखादी कृती जर आपण करायची ठरवली, तर ‘लोक काय म्हणतील?’ ही मनातील निरर्थक भीती. समाजात अनेकांना या भीतीने ग्रासलेले असते.
ही भीती आपल्याला मनातील एखाद्या गोष्टीचा प्रयत्नही करू देत नाही. मग आपली अवस्था उमलण्याआधीच तोडून टाकलेल्या कळीसारखी होते. ही भीती आपल्याला चाकोरीबाहेरचा विचारही करू देत नाही आणि धोपटमार्गानेच जाण्यास भाग पाडते. मग बहुसंख्यांकांचे अनुकरण करीत आपण मळलेल्या वाटेनेच चालत राहतो. कालांतराने आपण असमाधानी असतो आणि तेव्हा आपले नुकसान आपणच करून घेतल्याचा आपल्याला साक्षात्कार होतो !

‘लोक काय म्हणतील’ या भीतीपोटी आपल्याला तीव्र इच्छा असलेल्या कितीतरी गोष्टी आपण मनातच दाबून ठेवतो आणि झुरत बसतो. आपल्या छोट्या-मोठ्या आवडीनिवडीपासून ते आयुष्यातील काही महत्वाचे निर्णय घेण्यापर्यंत ही भीती आपल्याला सतावते. या भीतीने पछाडलेली कितीतरी माणसे आपल्या अवतीभवती वावरत असतात. बघू या तर अशांपैकी काहींच्या मनात डोकावून.

शकुंतलाबाई आता बासष्ट वर्षांच्या आहेत. त्यांची सगळी हयात एका खेड्यात गेलेली आहे. जेमतेम दहा हजार वस्तीचे हे गाव. त्यांचे यजमान शंकरराव हे शेतकरी. या जोडप्याला दोन मुली व एक मुलगा. तिन्ही मुले तशी जिद्दीची. त्याच जोरावर तिघेही उच्चशिक्षित झाले आणि त्यानंतर चांगल्या नोकऱ्या पटकावून मोठ्या शहरात स्थलांतरित झाले. ते कालांतराने तेथे पूर्ण रुळले आणि आधुनिक जीवनशैलीशी समरस झाले. अर्थात आपल्या मूळ गावी राहिलेल्या आईवडीलांना भेटायला मात्र ते नियमित येतात. शकुंतलाबाईना आपल्या मुली व सून या आधुनिक पोशाखात बघताना सुरवातीस अवघडल्यासारखे होई. पण, कालांतराने ते सवयीचे झाले आणि हळूहळू त्याचे कौतुकही वाटू लागले.

बाईंची हयात फक्त नऊवारी साडी याच पोशाखात वावरून गेलेली. दिवसरात्र कायम साडीच अंगावर. ग्रामीण परंपरा व चालीरीतींचे इतके दडपण, की आपण कधी वेगळा पोशाख घालून पहावा हे मनातंही येऊ नये. पण, आता आपल्या मुलींना तऱ्हेतऱ्हेच्या आधुनिक पेहरावात पाहून त्यांना स्वतःच्या कपड्यांबाबतच्या कर्मठपणाची जाणीव होऊ लागली आहे. त्यांच्या मुलीसुद्धा त्यांना, ‘’ आई, अगं एकदा तरी तू पंजाबी ड्रेस घालून बघ, तू खूप छान दिसशील त्यात. मग आपण तुझा एक फोटो काढू’’ असे सुचवीत.
ते ऐकून बाईनाही वाटते की काय हरकत आहे आपण असा वेष एकदा तरी घालून बघायला? निदान तो आधी घरातल्या घरातच घालावा किंवा मुलीकडे शहरात गेल्यावर तरी घालून बघावा. पण छे! तो वेष घालू की नको हा विचार करण्यातच त्यांनी आतापर्यंत काही वर्षे घालवली आहेत. एवढ्या साध्या गोष्टीसाठी त्या किती विचार करत राहतात, ‘’खरंच, आपल्याला बरा दिसेल का तो? नवरा अन जख्ख म्हातारी सासू काय म्हणतील? तो वेष घालून आपण घराबाहेर पडायचे धाडस करू का?’’ वगैरे. घरात आणि बाहेर वेगवेगळ्या प्रसंगी तऱ्हेतऱ्हेचे पोशाख घालणाऱ्या त्यांच्या मुली व सुनेचा त्यांना खूप हेवा वाटतो. त्यांच्या म्हणण्याखातर निदान एकदा तरी तो वेष घालून पाहवा अशी तीव्र इच्छा त्याना होतीय. पण, अजून ती कृती काही त्यांच्याकडून होत नाही. याचे कारण एकच – ‘लोक काय म्हणतील’ ही त्यांच्या मनात घर करून बसलेली धास्ती!

योगेश हा एक महाविद्यालयीन तरुण आहे. परंतु, आत्मविश्वास गमावल्याने दिवसेंदिवस निराश होत चाललाय. त्याची कथा अशी आहे. त्याच्या शालेय जीवनात तो पुस्तकी अभ्यासात यथातथाच होता. पण अभ्यासेतर उपक्रमांमध्ये मात्र एकदम आघाडीवर. वक्तृत्व, नाटक आणि विविध खेळ यांत अगदी पारंगत. या कलागुणांच्या जोरावर त्याने स्पर्धांमध्ये कितीतरी पारितोषिके पटकावली आणि त्याचबरोबर उत्तम शरीर व व्यक्तिमत्व घडवले. शालेय जीवनाचे टप्पे पार करीत तो दहावी पास झाला – ७०% गुण मिळवून. आता शिक्षणाची पुढील शाखा निवडायची वेळ आली.
योगेशला मनापासून वाटे की आजूबाजूच्या अनेक मुलांप्रमाणे विज्ञान शाखेला जाऊन पुढे इंजिनीअर, डॉक्टर वा शास्त्रज्ञ होण्याचा त्याचा पिंड बिलकूल नाही. तेव्हा एखादी कलाशाखेतील पदवी ही केवळ एक मध्यमवर्गीय औपचारिकता म्हणून मिळवावी; पण त्याचबरोबर आपल्या अंगातील कला व क्रीडागुणांचा चांगला विकास करावा. त्यातून एक उत्तम करीअर घडवता येईल. समाजातील अनेक यशस्वी कलाकार व क्रीडापटू हे त्याचे आदर्श होते. आपणही त्यांच्यासारखे यशस्वी होऊन दाखवू असा जबर आत्मविश्वास त्याच्याकडे होता.

आता हे मनोगत त्याने पालकांपुढे बोलून दाखवले. त्यावर त्यांची प्रतिक्रिया एकदम नकारात्मक होती. आपला मुलगा विज्ञान शाखेला गेला नाही तर तो वाया जाणार, ही त्यांची ठाम समजूत. मग काय, त्याच्यावर जणू तोफांचा भडिमार सुरू झाला. ‘’कला शाखेच्या पदवीला कोण विचारते का आता? नाटकं करून अन खेळून पोट भरायची काय शाश्वती आहे का? विज्ञान शाखेत निदान अभ्यासू मुलांची संगत मिळते. नाहीतर कला शाखेत बहुतेक सगळे रिकामटेकडेच की. पुढे लग्नाच्या बाजारात काय किंमत राहणार तुझी’’....वगैरे. याउप्पर त्या पालकांच्या मनात जी खरी भीती होती ती म्हणजे, ‘’आणि हो, पुन्हा लोक काय म्हणतील? एवढा एकुलता एक मुलगा तुमचा, तुमची ऐपतही चांगली अन साधं विज्ञान शाखेला घालता आलं नाही तुम्हाला?’’

झाले, शेवटी याच आंतरिक भीतीपोटी योगेशवर विज्ञान शाखा निवडायची सक्ती झाली. पुढे दोन वर्षे तो कसाबसा पास झाला. तरी काय, त्यापुढची शिक्षणाची दिशासुद्धा पालकांनीच ठरवायची. त्यांचे त्याबाबतीतले विचारसुद्धा चाकोरीतले. ‘’अहो, बी.एस्सी. ला काय किंमत आहे आता? काहीही करून इंजिनीअर करायचे पोराला’’. मग काय, देणगी भरून योगेशचा इंजिनीअरिंगचा प्रवेश झाला. मनापासून खचलेल्या अवस्थेतच त्याने त्या कॉलेजात पाउल ठेवले. मग त्याचे अभ्यासात काय लक्ष लागणार? त्याचा परिणाम त्याच्या कलागुणांवरही झाला. आपल्या आयुष्याची चवच गेल्याची भावना त्याला कुरतडू लागली. शालेय जीवनात चैतन्याने मुसमुसणारा योगेश आता एक निर्विकार पुतळा भासू लागला. आताच्या परीक्षांमध्ये आपटी खात तो कसाबसा तिसऱ्या वर्षापर्यंत पोचलाय. पण, मनातून त्याला नैराश्याने पुरते ग्रासले आहे. त्याच्या पालकांनी त्याला अंतर्बाह्य समजून घेऊन त्याच्या कलाने त्याची जीवनदिशा ठरवायला हवी होती. निदान त्याला झेपण्यायोग्य अभ्यासशाखा निवडायला हवी होती. त्याऐवजी ‘लोक काय म्हणतील” या अनाठायी भीतीपोटी त्यांनी अट्टहासाने जे केले आहे त्यातून त्याचे कायमचे नुकसान झालेले आहे, असे राहून राहून वाटते.

विजयरावांची व्यथा विचार करण्याजोगी आहे. त्यांचे वय आता ५४ वर्षे. गेली ३० वर्षे ते खाजगी कंपन्यांमध्ये विविध अधिकारी पदांवर काम करताहेत. त्यांच्या कर्तबगारीवर ते आता एका कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक झाले आहेत. एकूणच त्यांची करीअर ही ताणतणाव, रोजचे १५ तास काम, बऱ्यापैकी देश-विदेशातील फिरती आणि उद्योगातील विविध संघर्ष यांनी भरलेली आहे. विजय तसे हरहुन्नरी आहेत. त्यांना वाचन, लेखन, गायन, वादन, पाककला, बागकाम अशा अनेक गोष्टींमध्ये रमायला आवडते. पण, सध्याच्या त्यांच्या जीवनशैलीत त्यांना या छंदांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही.

त्यांच्या पत्नी एका मोठ्या बँकेत अधिकारी आहेत. या जोडप्याला एकच मुलगी, जी आता लग्न होऊन सासरी सुखाने नांदते आहे. तेव्हा आता रूढ अर्थाने विजयरावांच्या डोक्यावर जबाबदाऱ्या अशा नाहीत. त्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. त्यामुळे आतापर्यंत सतत धावपळीचे आयुष्य जगलेल्या त्यांना आता खुणावू लागली आहे ती स्वतःची स्वेच्छानिवृत्ती. ताणतणावाच्या आयुष्याने त्यांना एव्हाना मधुमेह व उच्च रक्तदाब या व्याधी सप्रेम भेट म्हणून दिलेल्या आहेतच!

आतापर्यंतच्या आयुंष्यात आपण घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे फक्त काम आणि कामच करत आलो आहोत ही जाणीव त्यांना अस्वस्थ करते. आपले शिक्षण संपल्यानंतर आपण आपल्या विविध छंदांकडे लक्ष देऊ शकलेलो नाही याची त्यांना खंत आहे. आता असेच आयुष्य अजून काही वर्षे काढत राहिलो तर कदाचित या छंदांची आठवण सुद्धा राहणार नाही, असेही त्यांना वाटतेय. गेल्या काही वर्षांत त्यांच्या माहितीतील त्यांच्या वयोगटातील काही उच्चपदस्थ लोकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे आणि ते लोक आपापल्या छंदामध्ये बुडून गेलेले त्यांना दिसताहेत. गेले वर्षभर विजय आपल्या मुदतपूर्व निवृत्तीचा गांभीर्याने विचार करताहेत. पण अद्याप तो निर्णय काही घेऊ शकलेले नाहीत.

एकदा धीर करून त्यांनी हा विषय पत्नीजवळ काढला. तिला हे अनपेक्षित होते. त्यामुळे तिची प्रतिक्रिया नकारात्मक होती. ‘’ छे, छे, विजय काय बोलतो आहेस हे? आणि मीही अजून नोकरीत आहे. मग तू घरी एकटा बसून काय करणार? रिकामपणा वाईट हं. वेड लागेल तुला वेड! शिवाय लोक काय म्हणतील?
झालं, विजयरावांच्या कल्पनेला पहिला सुरुंग घरातूनच लागला. मग त्यांनी नातेवाईक आणि परिचितांशी चर्चा करून पाहिली. पण त्यांना दुजोरा देणारे कोणी भेटेना. एकंदरीत बहुतेकांचे सल्ले त्यांच्या बायकोप्रमाणेच. जसे की,
“अहो, नोकरी सोडून घरी बसणे म्हणजे अजून शारीरिक व मानसिक त्रासांना निमंत्रण’’,
“ आता निवृत्तीची कल्पना जुनाट झाली हो. जोपर्यंत आपल्यात ताकद आहे तोपर्यंत माणसाने नोकरी वा व्यवसायात गुंतून राहावे’’,
“अहो, एवढे उत्तम करीअर तुमचे. तुम्हाला काय तुमची कंपनी अजून दहा वर्षे नक्की ठेवेल. तेव्हा घ्या भरपूर कमावून. पैसा कितीही कमावला तरी कमीच पडतो’’.

तर काय, गेले सहा महिने अशा अनेक सल्लागारांनी विजयरावांना गोंधळवून टाकलेय आणि त्यांना निवृत्तीपासून परावृत्त करण्याचा जोरदार प्रयत्न केलाय. त्यामुळे ते पुरते गोंधळून गेलेत. स्वेच्छानिवृत्ती घेऊन मस्त कलंदर आयुष्य जगणाऱ्या लोकांचा त्यांना हेवा वाटतोय. आतापर्यंत भोगवादी आयुष्य पुरेपूर जगलेल्या विजयना आता एका शांत व समृद्ध जीवनाची ओढ लागली आहे. त्यांची खूप घालमेल होते आहे. एकदाचे धाडस करून आपणही आपल्या मनात असलेले सुंदर आयुष्य जगावे अशी उर्मी त्यांना होत आहे. पण मग ते अजून निर्णय का घेत नाहीत? कारण तेच – ‘लोक काय म्हणतील’ या आंतरिक कल्पनेचे त्यांच्या मानगुटीवर बसलेले भूत!

सलीम व रूपा यांच्या आयुष्यात तर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हे दोघेही कॉलेजच्या जीवनातले सहाध्यायी. दोघेही अभ्यासात हुशार आणि त्यांना गिर्यारोहणाची आवड. त्यातूनच त्यांची मैत्री जुळली आणि मग मैत्रीच्या एका टप्प्यावर प्रेम जडले. शारीरिक आकर्षणाबरोबरच त्यांनी एकमेकाला पूर्णपणे समजून उमजून केलेले हे प्रेम होते.
जन्माने जरी त्या दोघांना विशिष्ट ‘धर्म’ चिकटलेला असला तरी ते दोघेही त्या धर्माला न मानणारे आधुनिक विचारांचे आहेत. त्यांचा भिन्न धर्म हा त्यांच्या गाढ प्रेमाच्या आड यायचे काहीच कारण नव्हते. दोघांनीही शिक्षण संपेपर्यंत संयम राखला होता. नंतर दोघांनाही योगायोगाने एकाच कंपनीत नोकरी मिळाली. आता ते लग्नासाठी उतावीळ होते. त्यांनी तो मनोदय आपापल्या पालकांजवळ बोलून दाखवला मात्र आणि मग ...... दोन्ही घरांमध्ये जणू भूकंप झाला. दोन्हीकडे झडलेले संवाद जवळपास सारखेच होते. जसे की,
“अरे गाढवांनो, आपल्या समाजातील सगळी स्थळं काय संपून गेलीत की काय?’’,
“एकवेळ आंतरजातीय पर्यंत ठीक होते, पण हे काय भलतंच ठरवताय? लक्षात ठेवा, नंतर झेपणार नाही तुम्हाला’’,
“ आपले लोक काय म्हणतील याचा थोडा तरी विचार केला आहेत का तुम्ही? अरे, लोक शेण घालतील आमच्या तोंडात, शेण’’.

सलीम आणि रूपा या दोघांनाही आता कळून चुकले होते की एरव्ही मानवता आणि समानता यावर लंब्याचौड्या बाता करणारे त्यांचे पालक मनातून किती कर्मठ आहेत ते. मग काय, दोन्ही घरांमध्ये एकदम चित्रपटाला शोभेल असे वातावरण झाले. दोघांवरही सक्त पहारा, एकमेकाला भेटण्याची बंदी आणि रुपाला नोकरी सोडायला लावणे. यावर कडी म्हणजे, जर का दोघांनी पळून जाऊन लग्न केले तर त्याचे परिणाम गंभीर होतील अशी धमकी दिली गेली.

सलीम व रूपा दोघेही मनाने ‘निधर्मी’ आहेत. आंतरधर्मीय विवाह हा सामाजिक परीवर्तनातील एक महत्वाचा टप्पा आहे या विचाराने भारलेले आहेत. दोघांचे एकमेकावर खरेखुरे प्रेम आहे व ते मोडण्याची त्यांची अजिबात तयारी नाही. त्यांच्या पालकांनी हट्टीपणा सोडून या लग्नाला मान्यता द्यावी, असे त्यांचे मत आहे. पळून जाऊन लग्न करणे हा मार्ग त्यांना पसंत नाही. त्यांच्या लग्नाच्या बाबतीत का निर्माण झाली आहे ही गंभीर समस्या? कारण आहे तेच ते – ‘’लोक काय म्हणतील वा आपला ‘समाज’ काय म्हणेल” हा त्यांच्या पालकांच्या मनात ठाण मांडून बसलेला विचार!

शकुंतलाबाई, योगेश, विजयराव आणि सलीम-रूपा ही उदाहरणे नमुन्यादाखल दिलेली. अशा प्रकारची कितीतरी माणसे आणि त्यांच्या समस्या आपल्या अवतीभवती दिसून येतील. अशा समस्या निर्माण होण्यास समाजातील विविध स्तरांमध्ये असलेल्या परंपरा व चालीरीती कारणीभूत असतात. या परंपराचे अवास्तव स्तोम आपल्याला इतरांपेक्षा वेगळा विचार करण्यापासून रोखते. एखाद्याने उगाच धाडस करून फार वेगळे काही करू नये, यासाठी त्याच्या मनात ‘कोण काय म्हणेल’ची बीजे पेरली जातात.

समजा, एखाद्या परंपरेने उच्चशिक्षित अशा पांढरपेशा घराण्यातील एका तरुणाने “मी चरितार्थासाठी भाजी-विक्रीचा व्यवसाय सुरु करतो” असा विचार जरी बोलून दाखवला, तर त्याच्याकडे किती उपेक्षेने पाहिले जाते आणि त्याची खिल्ली उडवली जाते. अलीकडे काही जणांना तर परंपरेशी पूर्ण फारकत घेऊन आयुष्यातील धाडशी निर्णय घ्यायचे असतात जसे की, लग्नाविना सहजीवन, विवाहित जोडप्याने जाणीवपूर्वक विनापत्य राहणे किंवा एखाद्या अविवाहिताने एकल पालकत्व स्वीकारणे, इ. अशा वेळेस ‘लोक काय...’ या विचारास कठोरपणे बाजूला सारले तरच ते निर्णय अमलात येऊ शकतात.
एकूण काय, तर कोणी काय करावे, कसे वागावे, काय पेहराव करावा किंवा एकंदरीत आयुष्य कसे जगावे या बाबतीत समाजात एक प्रकारचा उच्च-नीच असा भेदभाव मुरलेला आहे. त्यातूनच ‘लोक काय...’ या नकारात्मक विचाराला जन्म दिला जातो.

मित्रहो, आपण तरी खरोखरच मुक्त आहोत का या खुळचट विचारापासून? आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधीना कधी एखादी चाकोरीबाहेरची किंवा जगावेगळी कृती करावीशी वाटते. त्यासाठी आपण अगदी आसुसलेले असतो. ती कृती आपल्या नेहमीच्या रटाळ जगण्यात एक असीम आनंद देईल, असे आपल्याला मनोमन वाटत असते. त्या कृतीचे जे काही परिणाम आपल्या आयुष्यावर होतील तेही स्वीकारण्याची आपली तयारी असते. पण, त्यासाठी पाउल उचलताना मात्र आपण अडखळतो. याची कारणे दोन. काहींच्या बाबतीत स्वतःच्या मनातच ‘लोक काय म्हणतील, हसतील का टिंगल करतील’ ही भीती असते. याउलट, काही जण निर्भयपणे एखादी कृती करायला उत्सुक असतात, पण त्यांचे आप्तस्वकीय त्यांच्यापुढे ‘लोक काय..’ चा बागुलबुवा उभा करून त्यांना त्या कृतीपासून परावृत्त करतात.

आता अशा परिस्थितीवर उपाय एकच – तो म्हणजे आपला निर्धार. ठामपणे स्वतःच्या मनाला बजावायचे, ‘’मला योग्य वाटते ते मी करणार. त्यावर लोकबिक काही म्हणत नसतात, आणि जे कोण म्हणणार असतील ते लोक गेले उडत!” मग आपल्याला हवे ते करून मोकळे व्हायचे. या आत्मविश्वासाने केलेली विचारपूर्वक कृती आपल्याला नक्कीच आनंद देईल.
****************************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पटले. लोक काय म्हणतील या भीतीने बरेच जण स्वतःचे आयुष्य खराब आणि निरस करुन घेतात.

चांगला लेख... मुद्दे पटले >> +११११

आपल्याला आवडणारी पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारी एखादी कृती जर आपण करायची ठरवली, तर ‘लोक काय म्हणतील?’ >>>१००% खरी परिस्थिती आहे ही...

अजून एक विचार करायला लावणारा लेख Happy
मनाचा निर्धार करायला किंवा व्हायला स्वतःबरोबर खूप काम करावे लागते. आपण जे करू त्याची जबाबदारी आणि त्या गोष्टीबद्दलचे संपूर्ण समाधान जर मनात असेल तर आपण कितीही मोठ्या मॉब चा सामना करू शकतो.
आपलं आयुष्य जगायचा आपल्याला पुर्ण अधिकार आहे तो ही आपल्या मनाप्रमाणे. बर्‍याच वेळेला आपल्या अवतीभवती जे मनाने कमकुवत (स्वतःचे निर्णय स्वतः न घेणारे किंवा त्यांच्या जबाबदारीची भीती वाटणारे लोक) आपल्याला ही नकळतपणे इन्सिक्युअर करत असतात. आपण आधीच अपराधी मनाने वावरत असतो आणि मन पाणथळ झालेले असते, त्यात अपराधीपणाचे बीज लगेच रुजते.

दक्षिणा, अभिप्रायाबद्दल आभार.
मनाचा निर्धार करायला किंवा व्हायला स्वतःबरोबर खूप काम करावे लागते >>> सहमत. 'निर्धार' हा उच्चारायला सोपा पण आचरणात आणायला मोठा कठीण शब्द आहे !

अगदी बरोबर लेख. आपल्या भिडस्तपणामुळे नुकसानच अधिक झालेले दिसले आहे. त्यापेक्षा जर मन खंबीर करून होणार्‍या परिणामांचा विचार करून लोक काय म्हणतील याला भीक न घालत निर्णय घेतला तर सफलताच मिळते !

एकदम पर्फेक्ट लिहीलंय. या 'लोक काय...' विचारावर अजूनही मात नाही करता आलेली खरंतर. पण ती करायला हवीच आता असं मनापासून वाटून गेलं.

आवडला लेख !

माझ्यासाठी हा प्रश्न कधीच नव्हता. लोकं काय म्हणतील याची भिती वाटण्याऐवजी मला नेहमीच उत्सुकता वाटते. अमुकतमुक जगावेगळे केले तर लोकं काय काय बोलतात ते अनुभवणे नैसर्गिकरीत्या माझ्याकडून एंजॉय होते. उद्या लोकं काही म्हणायचे बंद झाले तर मला करमणार नाही Happy

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
लोक काय...' विचारावर अजूनही मात नाही करता आलेली खरंतर. पण ती करायला हवीच आता असं मनापासून वाटून गेलं. >> मस्त. त्यासाठी जोरदार पाठिंबा व शुभेछा !

उद्या लोकं काही म्हणायचे बंद झाले तर मला करमणार नाही >> हे ही खासंच. Bw

छान लेख, पटला.

घरच्यांसोबत यावरुन माझे लहानपणापासून वाद व्हायचे. बऱ्याच गोष्टी मी लोक काय म्हणतील याला फाट्यावर मारुन केल्यात, करतो तरी बऱ्याच बाबतीत लोक काय म्हणतील हा विचार असतोच.

तसेच मला वाटते ते मानवी मनातील inhibition चा भाग आहे. ते पूर्णपणे काढुन टाकणे कदाचित योग्य होणार नाही. पण ते आपल्या मार्गातील अडथळाही असू नये.

मानव, आभारी आहे.
ते पूर्णपणे काढुन टाकणे कदाचित योग्य होणार नाही. पण ते आपल्या मार्गातील अडथळाही असू नये. >> बरोब्बर ! हा खरा कळीचा मुद्दा आहे.

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना हे किशोरकुमारचे अमर प्रेम मधील गाणे आठवले.

जेव्हा एखादी कृती हा समूहजीवनाचा भाग असतो व त्यात इतर लोकांचे मतही महत्वाचे असणे हा भाग असतो त्यावेळी गोची होते. लोकशाहीचा नियम लावून बहुसंख्यांना जे मान्य ते केले जाते. अनेकदा आपल्याला पटत नसलेल्या गोष्टी आपण आयुष्यात तडजोड म्हणुन स्वीकारतोच की! अन्यथा तुम्ही आयुष्याच्या उत्तरार्थात एकटे पडण्याचा धोका असतो. अगोदर कसा ताठ अन माणुसघाणा होता आता बघा कसा सरळ आलाय ही कॉमेंट आपण ऐकतोच की! न पटणार्‍या गोष्टी तुम्ही इतरांसाठी करता त्यावेळी तुमची लवचिकता ही दिसून येते. जगण्यासाठी लवचिकता ही हवीच. मोडेन पण वाकणार नाही हा बाणा नंतर त्रास देतो. त्यापेक्षा मोडणार नाही इतपतच वाकेन ही भुमिका घेतली तर बर असते. असो....

ते पूर्णपणे काढुन टाकणे कदाचित योग्य होणार नाही. पण ते आपल्या मार्गातील अडथळाही असू नये.>>>> पुर्णपणे सहमत

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना हे किशोरकुमारचे अमर प्रेम मधील गाणे आठवले. >>>>
मस्त गाणे ! आता लगेच तू-नळीवर जाउन ऐकतो..... Bw

चांगला लेख.
निदान त्याला झेपण्यायोग्य अभ्यासशाखा निवडायला हवी होती. त्याऐवजी ‘लोक काय म्हणतील” या अनाठायी भीतीपोटी त्यांनी अट्टहासाने जे केले आहे त्यातून त्याचे कायमचे नुकसान झालेले आहे, असे राहून राहून वाटते. >>. +१
सध्या शहरी पांढरपेशांत मुलांना इंजिनिअर करणे हे घाउक प्रमाणात दिसते.