जागतिकिकरण - मराठी भाषेपुढील आव्हान

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

जागतिकिकरणामुळे जगभरात अनेक बदल होत आहेत. या बदलांचा परिणाम जसा आपल्या जीवनाच्या आर्थिक आणि सामाजिक अंगांवर होत आहे तसाच तो सांस्कृतिक अंगांवरही होत आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती या बदलांना कशी तोंड देते यावर तिचे भविष्य अवलंबून आहे.

जागतिकिकरणामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रातील लोकं मुंबई, पुणं, नागपूर सोडून अमेरीका, आस्ट्रेलिया, युरोपमध्ये पोटापाण्यासाठी गेली आहेत. खुद्द महाराष्ट्रामध्ये मुंबईसारखे शहर व्यापारी पेठ असल्याने इतर प्रांतातील लोकं येऊन स्थानिक झाली आहेत. आईवडील मुंबईत आणि मुलगा अथवा मुलगी हैद्राबाद/ बंगळुरुला किंवा आईवडील मुंबई/पुण्यात आणि मुलं अमेरीकेत अशी उदाहरणे आपल्याला आजच्या समाजात सर्रास दिसतात. इंग्रजी ही अभ्युदयाची दारं उघडणारी भाषा झाल्याने सर्व शिक्षण इंग्रजीत घेतलेली आणि मराठी साहित्यात पु.लं. शिवाय साहित्यिक माहिती नसलेली एक पिढी आपल्याला समाजात दिसते. मग अशा बदललेल्या काळात मराठी टिकवण्यासाठी आपण काय कले पाहिजे याचा विचार आपण या लेखात करणार आहोत.

१८ व्या आणि १९ व्या शतकात जेव्हा मराठे जेते होते तेव्हा त्यांनी आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा प्रसार आजच्या महाराष्ट्राबाहेर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू आदी प्रदेशात केला. तेथील मराठी संस्कृती आजही थोड्या प्रमाणात का होईना टिकून आहे. आजच्या युगात जेतेपणाची व्याख्या बदलली आहे. तलवारीच्या बळाऐवजी आर्थिक बळाला महत्व प्राप्त झालं आहे. म्हणूनच मराठी समाजाने आर्थिक प्रगती करुन घेणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा समाज समूह (आर्थिक वा इतर क्षेत्रात) लक्षणीय प्रगती करतो तेव्हा जगामध्ये या समाजसमूहाच्या संस्कृतीविषयी आदरभाव तयार होतो आणि त्याच्या भाषा-संस्कृती विषयी कुतूहल तयार होते. हे कुतूहल त्या संस्कृतीच्या प्रसारासाठी पोषक वातावरण तयार करते. उदाहरणार्थ जेव्हा ए. आर्. रेहेमान कोडॅक थिएटरच्या व्यासपिठावरुन तमिळ वाक्ये बोलतो तेव्हा तमिळ भाषा जगभरातील कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचलेली असते. अशा वेळी सर्व तामिळ माणसांचा उर अभिमानाने भरुन येणं साहजिकच आहे. मराठी माणसाने आपआपल्या क्षेत्रात नवी शिखरे पादाक्रांत करणं आवश्यक आहे. त्याने स्वतःचे उद्योग काढून ते यशस्वी करुन दाखवणे आवश्यक आहे. नोकऱ्या करणारे न बनता आपण नोकऱ्या देणारे बनलं पाहिजे. काळावर मात करण्यासाठी जेतेपदाची हि नवीन व्याख्या मराठी माणसाने नीट समजून घेणं आवश्यक आहे.

मराठी भाषेमध्ये सतत नवनिर्मिती होणं आवश्यक आहे. आपआल्या क्षेत्रातील यशस्वी माणसांनी आपलं संशोधन, आपले विचार मराठी भाषेत मांडणं आवश्यक आहे. या संदर्भात पु.ल. देशपांडे यांनी १९८७ साली न्यूजर्सीत केलेल्या भाषणात म्हटलं होतं - "ज्या भाषेत ज्ञानेश्वरांनी गीतेसारखं तत्वज्ञान सोप्या भाषेत मांडलं आहे, त्या पेक्षा कठीण असं काय आहे जे मराठीत मांडता येणार नाही? हवं तर मूळ इंग्रजी शब्द कायम ठेवून लिहा - थर्मामीटरला थर्मामीटरच म्हणा..." व्यवस्थापन आणि इतर नवीन उदयीत झालेल्या शास्त्रांतील अनेक नवीन पुस्तकांचं मराठीत भाषांतर करण्याविषयी पुलं बोलत होते. नुसती शास्त्रेच नव्हे तर नवीन प्रकारची साहित्य निर्मीतीही मराठीत होणे आवश्यक आहे. साहित्यात काळानुसार बदल होणं आवश्यक आहे. आजच्या बदललेल्या अभिरुचीनुसार नवीन पिढीला आवडेल अशा कविता, अशा कथा किंवा असे विषय साहित्यातून हाताळणं आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे तयार झालेली निर्मिती नवीन माध्यमांतून - इंटरनेट आणि दृक्-श्राव्य माध्यमातून - लोकांपुढे आणली पाहिजे. अनेक जुन्या पिढीच्या साहित्यीकांनी विश्व मराठी साहित्य संमेलनात माझ्यशी बोलताना नवीन माध्यमांबाबत साशंकता व्यक्त केली. इंटरनेटचा वापर बेकायदा नकला करण्यासाठी केला जाईल अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. अशा प्रकारे भिती बाळगून आपल्या भाषेला आणि साहित्याला कुंपण पडेल. मराठी भाषा जागतिकीकरणाच्या रेट्यासमोर टिकवायची असेल तर कुंपणे काढून सर्वप्रथम भाषेला मुक्त करावे लागेल. एखादी कलाकृती उत्तम असेल तर लोकं ती काहीही करुन मिळवतील हा आत्मविश्वास आजकालच्या जगात - जिथे मनोरंजनासाठी अनेक सोयीस्कर माध्यमे उपलब्ध आहेत - तिथे फोल आहे. काही पुरोगामी प्रकाशकांनी मात्र इंटरनेट आणि दृक्-श्राव्य मांध्यमांना आधीच आपलेसे केले आहे.
श्री. संजीव वैद्य यांनी श्रीपाद कृष्णांचे सुदाम्याचे पोहे आणि इतर काही पुस्तके ध्वनिमुद्रित आणि डिजाटल स्वरुपात उपलब्ध केली आहेत. ध्वनिमुद्रित केल्याने पुस्तके आता आपल्याला आयपॅाडवर ऐकता येणार आहेत. महाराष्ट्र सरकारनेही मराठी विश्वकोश जर इंटरनेटवरील मुक्त ज्ञानकोशावर - विकिपीडीयावर - उपलब्ध केला तर गुगलमध्ये मराठीत शोध घेणे सुकर होईल. जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगाला सामोरे जाण्यासाठी मराठी प्रकाशक, साहित्यीक, आणि सरकारने नवीन माध्यमांना आपलेसे करणे आवश्यक आहे. नवीन पीढीपुढे जर मराठी साहित्य नवीन माध्यमातून सहज उपलब्ध झाले तरच काळाचे हे आव्हान आपण समर्थपणे पेलु शकु.

विषय: 
प्रकार: 

चांगला लेख
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!