Submitted by निशिकांत on 15 May, 2017 - 02:00
चेहरा लाऊन नकली, चेहरा लपवीत जगलो
अन् जसा होतो तयाच्या नेमका विपरीत जगलो
नवपिढीला अडचणीचा वाटल्यावर , निश्चयाने
सोडली बैठक घराची, मागच्या पडवीत जगलो
सातही हप्त्यातले दिन, आठवांचा त्रास तुझिया
आठवा उगवेल नक्की स्वप्न हे रुजवीत जगलो
तू दिलेल्या भळभळीचा छंद होता एवढा की
बैसली खपली कधी तर मी तिला उकरीत जगलो
त्या कधी मागे पुढे तर सोडुनी जाती अचानक
जीवनाच्या भरदुपारी सावल्या तुडवीत जगलो
मूर्तिकाराची कला जोपासली होती अशी की
ठोकरोनी भाग्य रेषा मी मला घडवीत जगलो
चूक माझी की तुझी? हा गौणही पण प्रश्न नव्हता
तो गुन्हा माझाच होता सारखे पटवीत जगलो
स्वर्ग मरणोत्तर मिळावा आस इतकी तिव्र होती !
पाप ना व्हावे म्हणॉनी नेहमी भयभीत जगलो
वावडे "निशिकांत"ला का देवतांच्या मंदिरांचे?
अंतरीच्या विठ्ठलाशी तार मी जुळवीत जगलो
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा