बाहुबली आणि दर्जा!

Submitted by नानाकळा on 9 May, 2017 - 05:06

बाहुबली बद्दल बर्‍याच लोकांनी प्रतिकूल मत व्यक्त केले. प्रत्येकाच्या मताचा आदर आहे, आवड निवड ह्या निरातिशय वैयक्तिक बाबी आहेत. काही आक्षेपांबद्दल थोडं बोलावंसं वाटतं. मी कोणाची बाजू घेत नाही फक्त माझं मत मांडतो.

राजामौली हा एक चोर डायरेक्टर आहे. अनेक चित्रपटांमधून अनेक गोष्टी त्याने उचलल्या आहेत व आपल्या चित्रपटात वापरल्या आहेत. त्याच्या बाहुबली चित्रपटात इतका खर्च करुन हॉलिवूड लेवलचे स्पेशल इफेक्ट्स नाहीत. वगैरे.

पहिल्याछूट जो मुद्दा आहे की राजामौली हा मासेस साठी सिनेमा बनवणारा दिग्दर्शक आहे. मास-डिरेक्टर लोक खरेच कौतुकास्पद असतात. कारण पिटातल्या प्रे़क्षकांना काय आवडेल हे त्यांना अचूक माहिती असतं. ते कसं मांडलं पाहिजे हे त्यांना कळतं. सुभाष घई, करण जोहर, यश चोप्रा, रोहित शेट्टी, अब्बास मस्तान, मनमोहन देसाई, रवि जाधव, इंद्रकुमार, राजकुमार संतोषी, इत्यादी लोक माझ्यालेखी ग्रेट आहेत. त्यांना भारतीय प्रेक्षकांची नस माहित आहे. चकल्या पाडल्यासारखे ते एकामागोमाग हिट चित्रपट देतात. देतात म्हणजे त्यांचे चित्रपट हिट होतात. चित्रपट त्यांच्या नावाने ओळखले जातात. ही एक अचिवमेंट आहे. कोणी काहीही म्हणो. शेवटी गल्ला जमवणे धंद्यातले सर्वात महत्त्वाचे उद्दिष्टं, ते ही लोकं शुअरशॉट क्लिक करतात.

इतर ऑफ-बिट दिग्दर्शक, ज्यांचे चित्रपट समजायला थोडं डोकं लागतं, वाचन-चिंतन, मनन लागतं, प्रे़क्षक प्रगल्भ लागतो. चित्रपट ही एक कला म्हटली तर कलेच्या अनुषंगाने यांची कामे उत्तम असतात, रामू, अनुराग, नीरज पांडे, मधुर भांडारकर, ओमप्रकाश मेहरा, विशाल भारद्वाज, इत्यादी लोक निवडून निवडून उत्तम कला सादर करतात, गल्ला जमवता येइलच याची गारंटी नसते. पण कलेच्या उत्तमतेमुळे यांची नावं आदराने घेतली जातात. इन्टेलेक्चुअलांचा सिनेमा काढणारे हे लोक, पैसा कमावतीलच असे नाही.

राजामौलीसारखे लोक भेळ बनवणारे असतात, उत्तम घटक शोधून निवडून आणतात, प्रमाण ठरवतात, कृती स्वतःची असते. हे सर्व पिटातल्या पासून ते बॉक्सातल्या प्रेक्षकापर्यंत सर्वांना आवडेल अशा पद्धतीने भेळ बनवून सादर करतात. यांचा जास्तीत जास्त जोर जास्तीत जास्त पैसा देणार्‍या पिटातल्या अ‍ॅवरेज बुद्धिमत्ता असलेल्या, आपलं जग विसरुन दोन घटका करमणूक शोधणार्‍या, जास्ती डोक्याला ताण न देणार्‍या ग्राहकांवर असतो. या ग्राहकाने मुळातच ट्रॉय, ३००, इन्टरस्टेलार, ग्लॅडियेटर, अवतार, मॅट्रिक्स यासारखे सिनेमे पाहिलेलेच नसतात, ती त्यांची टेस्ट नसते, पोहोचही नसते. (मी स्वतः आर्टस्कूलमध्ये येइपर्यंत हॉलिवूड चित्रपट, अ‍ॅनिमेशन चित्रपट माहित नव्हते, गरजही नव्हती, पैसा तर नव्हताच. इंग्रजी चित्रपट म्हणजे फक्त 'ते' एवढाच पूर्वग्रह) त्यामुळे या अशा चित्रपटांमधल्या काही गोष्टी राजामौली उचलतो आणि दाखवतो. देजावू फिलिंग या ग्राहकांना येत नाही.

आता या पिटातल्या मास ग्राहकांनी ओरिजीनल आयडीयांसाठी ओरिजनल हॉलिवूड, इन्टरनॅशनल सिनेमे पाहायचे म्हटले तर त्यांना झेपणार नाही. कारण मॅट्रिक्स मध्ये निओ ज्या पद्धतीने शेकडो लोकांना एका झटक्यात हवेत उडवतो, ते दृष्य डोळ्याचे पारणे फिटवणारे असले तरी त्यामागचे लॉजिक समजायला चित्रपटाची कथ समजली पाहिजे, डायलॉग्स समजले पाहिजेत. तेव्हा इन्टेलेक्चुअल प्रेक्षकाचं पूर्ण समाधान होतं. पण मासेस ला फक्त एका झटक्यात शेकडो फेकल्या जाण्याचं दृष्य अपील होतं. तेवढं पुरेसं असतं. राजामौली तेवढं उचलतो.

मग राजामौली स्वतः अशा कल्पना निर्माण करुन का लढवत नाही? देअर कम्स कमर्शियलिज्म ऑफ इन्डियन सिनेमा. मास-डिरेक्टर गल्ला भरण्यासाठी जबाबदार असतात, प्रोव्हन कन्सेप्ट्स वापरण्यत रिस्क कमी असते. म्हणून निर्लज्जपणे वापरल्या जातात. इथे संपूर्ण सिनेमे फ्रेमटूफ्रेम कॉपी केले गेलेले आहेत ते त्यामुळेच. यामध्ये धोका कमी, धंदा जास्त असतो.

स्पेश्यल इफेक्ट्स बद्दल.
भारतीय चित्रपटांचे बजेट हॉलिवूडच्या तुलनेने कमीच असते. कोणत्याही उत्तम हॉलिवूड -चित्रपटाचे बजेट आरामात हजार कोटीच्या वर जाते, तेही केवळ दोन तासाच्या. 'कुंग फू पांडा' या अ‍ॅनिमेशनपटाचे बजेट आहे साडेचार हजार कोटी रुपये, 'टॅन्ग्लड' या डिस्नेपटाचे बजेट १८०० कोटी, इन्टरस्टेलारचे बजेट पावणेपाच हजार कोटी. ह्या महाकाय बजेटच्या चित्रपटांच्या समोर आपले बाहुबलीचे साडेपाच तासांच्या (दोन्ही मिळुन) कामाचे बजेट आहे साडेचारशे कोटी. ह्यात काय मर्यादा येतात? काय संधी असतात? हॉलिवूडमध्ये एखाद्या चित्रपटासाठी अमुक एक स्पेशल इफेक्ट, उपलब्ध सॉफ्टवेअर, मशिन मधून मिळत नसेल तर त्यासाठी खास सॉफ्टवेअर, मशिन तयार केल्या जातात, त्यासाठी अमाप पैसा खर्च केला जातो. कलाकारांचे लुक्स, वेशभूषा, मेकपवर, रिसर्चवर प्रचंड खर्च केला जातो. टेक्नॉलॉजी, सेट्सवर, आणि इतर प्रत्येक गोष्टीवर भारतीयांच्या तुलनेत काहीच्याकाही पैसा खर्च केला जातो. त्यासोबत त्याला मार्केटींगचं पाठबळ असतं. हजारो स्क्रिन्स उपलब्ध असतात, किती धंदा होऊ शकतो याची गणितं काढलेली असतात त्यानुसारच चित्रपटांचे बजेट अप्रूव होतात. हेच इकडे भारतातही होतं. किती धंदा होईल तितक्या प्रमाणात बजेट उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी निर्मात्याची.

साडेचारशे कोटी पाच तासाला, म्हणजे तासाला १०० कोटीच्या आतच. हे पाहून मला तर म्हणावेसे वाटते, "इत्ते पैसे में इत्ताइच मिलेगा" एवढ्या कमी बजेटमध्ये जे काही स्पेशल इफेक्ट दाखवलेत ते भारीच म्हणायला पाहिजेत. त्यातून राजामौलीचे व्हिजन किती ग्रॅण्ड आहे ते दिसून येतं. भव्यतेने भारलेला पडदा, प्रत्येक दृष्य त्याचीच साक्ष आहे. पण जे काही असेल ते व्हिजन प्रत्यक्षात उतरवायला प्रचंड पैसा लागतो. चित्रपट निर्मिती हे तंत्र आहे. तंत्राला उत्तम करण्यासाठी पैसा लागतोच लागतो. मी तर म्हणेन बाहुबली हा अंडरबजेट चित्रपट आहे.

इन्टेलेक्चुअल भारतीय प्रेक्षकांना बाहुबलीच्या दर्जाबद्दल कुरकुरण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण त्यांनी त्यापेक्षा फार पुढचं पाहिलेलं असतं. पण राजामौलीने तुमच्यासाठी नाही बनवला चित्रपट हे एवढे फक्त ध्यानात ठेवा. तुलना करु नका. तुलनाच करायची असेल तर इतके पॅरामिटर्स आहेत की शेवटी तुम्हीच कबूल कराल की जे राजामौली ने केलं ते अतिशय बेस्ट आहे.

माझे मतः
माझ्यालेखी दर्जेदार चित्रपट म्हणजे जो तुम्हाला खिळवून ठेवतो, गुंतवून ठेवतो, विचार करायला देत नाही, तुमच्या वेळेचा पूर्ण मोबदला वसूल करुन देतो. चित्रपटात कोणत्याही क्षणी जर तुम्ही कथेपासून डिस्कनेक्ट झालात तिथे दिग्दर्शक नापास झाला असे मी मानतो. बाहुबली दोन मी पाहिला नाही, पहिला पाहिला, थिएटरमध्ये जाऊन. पहिल्यात कथा अशी नाहीच, पण तेव्हाही तो आवडला होता. ट्रॉय माझा फेवरिट आहे, सेविंग प्रायवेट रायन, ग्लॅडियेटर, ३००, जुरासिक पार्क, इन्टरस्टेलार, असे सगळे गाजलेले चित्रपट मला आवडतात, त्याचबरोबर बाहुबलीही आवडतो, धमालही आवडतो, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा पण आवडतो. हे चित्रपट कधीही लागले तर बघू शकतो. एकाशी दुसर्‍याची तुलना करत नाही. माझे मनोरंजन होतंय का एवढे बघतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बरोबर आहे साहेब. करण जोहर तर मार्केटींग पण उत्तम करतो. ये दिल है मुश्किल सारखा सिनेमा चालवुन दाखवायचा हे काही खायचे काम नाही Happy

100% सहमत.
इतके मुद्देसुद आणि सविस्तरपणे सगळे मांडल्याने लेख आवडला आणि पुर्णपणे पटला सुध्दा.

कुठलेही स्पेशल इफेक्ट्स बघायचे असतील तर तुमच्याकडे चित्रपट गृहातील मोठ्यापडद्या शिवाय दुसरा पर्याय नाही. आजकाल ५.५ इंची मोबाईलवर असे चित्रपट बघून मत प्रदर्शित करणे हे खरतर स्पेशल इफेक्ट्स बनवणार्‍यांचा अपमानच असे मी मानतो.
अवतार हा चित्रपट बनवण्यासाठी जेम्स यांनी तब्बल ५ वर्ष निव्वळ त्या इफेक्ट्साठी लागणार्‍या कॅमेरा तयार करण्यावर खर्च केली. हा मॅडनेस कुठल्या ही पैशात तोलला जाऊ शकत नाही. "अवतार" चित्रपटात जेम्स ने एक नविन ग्रह त्यावरचे प्राणी, झाडं, किटक, इ. सगळेच नव्याने बनवले होते. त्यासाठी अफाट कल्पनाशक्ती खर्च झाली असेल ज्याची मोजदाद नाही. नुसते रात्री जमिनीवरच्या गवतावर पाय ठेवले की गवत प्रकाशमान होते. हे पडद्यावर दाखवण्याआधी ती कल्पना सुचने महत्त्वाचे आहे. त्यानंतर ती कल्पना तंत्रज्ञान वापरून लोकांकडून पडद्यावर साकारणे हे अतिउच्च पातळीवरचे कार्य आहे. जेम्स ने तर सगळी सृष्टीची नव्याने मांडणी केली होती.

बाहुबली १ चे स्पेशल इफेक्ट्स अफाट होते. संपुर्ण माहेश्मती त्यातील राजवाडा, अतिप्रचंड उंचावरून कोसळणारा धबधबा, तमन्नाचे सौंदर्य, शिवाडूची तिच्यासाठी जी उडी मारतो, शिवगामीचा दुथडी वाहणार्‍या नदीमधे उभे राहून हातात बाळ पकडून असलेले दृष्य, शिवाडूचे राजमहल मधे आग लावून पळणे (यात पळतानाचा भाग थोडा गंडला आहे) , शिवाडूचे राजकुमार भद्राचे मुंडके उडवणे, इ. दृष्यांमधले स्पेशल इफेक्ट्स अफाट अचंभित करणारे होते. इतक्या उच्चपातळीवरचे स्पेशल इफेक्ट्स भारतीय चित्रपटात पहिल्यांदा वापरले होते. (रोबोट, रावन इ. चित्रपटात सुध्दा वापरले होते परंतू रजनिकांतसरांच्या समोर कुणाचे स्पेशल इफेक्ट्स कडे जास्त लक्ष गेलेच नाही उलट हे असे त्यांच्या चित्रपटात असतेच म्हणून जवळपास दुर्लक्ष करंण्यात आले होते)

बाहुबली २ मधे कथेच्या फ्लो कडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. सगळा रोख बाहुबली आणि भल्लालदेव यांच्यातील संघर्षावर केंद्रीत करण्यात आला. कधी एकदाची दोघांची लढाई चालू करतो असे राजामौलीला झाले होते असे वाटू लागले आहे. भल्लालदेवाचे देवसेनावर प्रेम नव्हते. निव्वळ अमरेंद्रला दुखावण्यासाठी तीची तो मागणी करतो. यावरून "तु मला नाकारले होते, वगैरे" असे भल्लालदेवाचे संवाद खड्यासारखे वाटतात. पहिल्या चित्रपटात जेव्हा देवसेना ला कैदेत दाखवले होते तेव्हा वाटले की प्रेमाचा त्रिकोण वगैरे असेल आणि देवसेनाने स्वयंवरात भल्लालदेवाला जाहीरपणे नाकारून त्याला दुखावले होते. त्यामुळे तिचावर राग भल्लालदेवाला येऊन अमरेंद्रच्या मरणानंतर तिला जिवंत ठेवून मरणयातना देण्याकरीता कैदखान्यात टाकले. परंतू असे दुसर्‍या भागात काहीच दाखवले नाही. त्यामुळे देवसेनेला कैदखान्यात ठेवण्यामागे काहीच ठोस कारण प्रेक्षकांसमोर आले नाही. तिचा नवरा मारला, तिची सासू मारली , तिचे मुल सुध्दा त्याने मारले, मग असे कोणते कारण होते ? याचा उलगडा राजामौली करत नाही. बहुदा त्यागोष्टीकडे त्याचे पटकथा लिहिताना लक्ष गेले नसावे. "बस देवसेनेला कैदेत ठेवायचे, आणि मग तिचा मुलगा अचानक कुठून तरी येऊन तिची सुटका करणार" एवढ्या ओळीत देवसेनेची कथा पहिल्या भागात लिहिली होती. जी दुसरा भाग बघताना प्रचंड जाणवते.

लेख लिहिण्यामागची भावना आवडली
पण उद्देश पटला नाही.

लेखानुसार हा चित्रपट मासेस साठी बनवला गेला आहे.
आणि त्यांनी हजार करोडचा गल्ला जमवून आपल्या पसंतीची पावती दिली आहेच.

मग ज्या लोकांसाठी हा चित्रपट बनवला गेला नाही त्यांना हा चित्रपट तुम्हाला नेमका का आवडला नाही आणि तुम्हाला न आवडूनही का चांगला आहे हे सांगण्याचा अट्टाहास कश्याला Happy

मला हॉलिवुडशी केली जाणारी तुलना पटलेली नाही. व तेच इथे मांडले आहे. चांगला वाईट ह्या सापेक्ष कल्पना आहेत.

बाहुबलीची हॉलिवूडच्या चित्रपटांशी तुलना करुन एक प्रकारे खिल्ली उडवत आहेत, मासेस ला इतका निर्बुद्ध चित्रपट कसा आवडू शकतो वगैरे टिप्पणी करुन आपण कसे उच्चअभिरुचीसंपन्न, दुनियेच्या लेटेस्ट ट्रेन्डसोबत अपडेटेड असतो, वगैरे शोबाजी चालली आहे त्याबद्दलची प्रस्तुत लेख ही माझी प्रतिक्रिया आहे.

लेखाच्या शेवटी मी जे म्हटलंय तो सार आहे, पटलं तर घ्या, नैतो सोडून द्या. मला किशोरी आमोणकरही आवडतात आणि अलका याज्ञिकही आणि रेश्मा सोनावणेही. क्रिस्तोफर नोलन, सुभाष घई आणि कांती शाहसुद्धा. प्रत्येक प्रकारात काहीतरी उत्तम असतं. ते मला आवडतं. त्याची दुसर्‍याशी तुलना केलीच पाहिजे असे नाही.

एक उदाहरण देतो. apocalypto हा मेल गिब्सनचा चित्रपट भन्नाट आवडला, जबरा रिसर्च, दिग्दर्शन, अ‍ॅक्टिंग आणि सर्वच अगदी भारी. त्यानंतर दोन वर्षांनी १०००० बीसी हाही एक बिग बजेट चित्रपट बघितला. दोघांच्याही कथावस्तू सारख्याच, बजेटही सारखाच. पण १०के बीसी फारच म्हणजे फारच बोअर झाला मला. मी त्याची प्लॅनेट एम मधून डिवीडी विकत आणून बघितला होता. अपेक्षा होती की apocalypto सदृश्य मनोरंजन होईल. नाही झाले.

दुसरे उदाहरणः बाहुबली एक च्या वेळेसच पुली नावाचा साधारण तशाच पोशाखी, अमरचित्रकथा छाप चित्रपट आला, त्यात श्रीदेवी आणि शृती हसन होत्या. महाबोअरिंग आणि पांचट होता तो. मगधीरा वरुन प्रेरणा घेऊन बनवलेला वाटला.

आता दोन्ही उदाहरणातून असे दिसते की तुलना होऊ शकते ती कुठेतरी साम्य असलेल्या गोष्टींमध्ये. बाहुबलीबद्दल काही आवडलं नसेल तर बोलणे साहजिक आहे, पैसे मोजलेत तर ग्राहक म्हणून हक्क आहे. पण ही हॉलिवूडी तुलना करुन रिडिक्युल करणे पटले नाही म्हणून अशा काही लोकांसाठी परिस्थिती विषद केली आहे. तुलनेसाठी पॅरामिटर्स पडताळून बघा. उगाच हॉलिवूड किती ग्रेट आणि भारतीय सिनेमा किती मागे असल्या टिप्पण्या देण्याआधी थोडासा विचार करा. अर्थात हे माझे मत, कुणाला पसंत असो वा नसो. जसा लोकांना टिका करण्याचा अधिकार आहे तसा मला टिकेतला फोलपणा मांडण्याचाही.

आता दोन्ही उदाहरणातून असे दिसते की तुलना होऊ शकते ती कुठेतरी साम्य असलेल्या गोष्टींमध्ये.
>>>>>

एक्झॅक्टली !
म्हणूनच स्पेशल ईफेक्ट या साम्याच्या आधारावर हॉलीवूडी सिनेमांसोबत तुलना होतेय Happy

तुम्ही दाखवत आहात ते फरक झाले, ते जुळ्या भावंडांमध्येही असतात, म्हणून काय जगात कोणत्याही दोन गोष्टींची आपसात तुलना करूच नये काय.

एखादी मास साठी बनवली गेलेली कलाकृती ज्याला आवडत नाही तो आपण क्लास असल्याचा आव आणत असतो हे एक पटकन मांडले जाणारे गृहीतक Happy

ही खालची आपलीच पोस्ट Happy
>>><<
बाहुबलीची हॉलिवूडच्या चित्रपटांशी तुलना करुन एक प्रकारे खिल्ली उडवत आहेत, मासेस ला इतका निर्बुद्ध चित्रपट कसा आवडू शकतो वगैरे टिप्पणी करुन आपण कसे उच्चअभिरुचीसंपन्न, दुनियेच्या लेटेस्ट ट्रेन्डसोबत अपडेटेड असतो, वगैरे शोबाजी चालली आहे त्याबद्दलची प्रस्तुत लेख ही माझी प्रतिक्रिया आहे.
>>>><>>

हॉलीवूडशी तुलना का होतेय हे मी दिलेय. कारण स्पेशल ईफेक्ट !.
जेव्हा तुम्ही अशी एखादी गोष्ट करता जी जगात कुठेतरी कोणीतरी आधी केलीय तर तिच्याशी तुलना होणारच. तुम्ही त्यासाठी तयार राहायला हवे.

आणि त्या नंतर तुम्ही लिहिलेले.., "" आपण कसे उच्चअभिरुचीसंपन्न, दुनियेच्या लेटेस्ट ट्रेन्डसोबत अपडेटेड असतो, वगैरे शोबाजी "" .... तर हे आपण मांडलेले गृहीतक आहे जे चुकीचे आहे जे मी वरच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.

मी स्वत: हॉलीवूडशी तुलना केली नाही कारण मी मला न समजणारया भाषेतील चित्रपट बघतच नाही. तरीही मला बाहुबली हा बालिश चित्रपटच वाटला.

मी तो दोन कारणांसाठी बघितला

1) गर्लफ्रेंड

2) मला त्यावर सोशलसाईटवर आणि मित्रांमध्ये चर्चा करता यावी. आणि तिकाटाचे पैसे वसूल झाल्याचे समाधान मिळेपर्यंत मी ती करणारच Happy

नानाकळा, लेख माझ्यासाठीच वैयक्तिक का असावा.. पुन्हा आपलीच पोस्ट देतो,
<<<<<<जसा लोकांना टिका करण्याचा अधिकार आहे तसा मला टिकेतला फोलपणा मांडण्याचाही.>>>>> Happy

ऋन्मेष तू बाहुबली एक बद्दल बोलतोयस की २ बद्दल? नानाकळांनी दुसरा भाग बघितलाच नाहीय्ये!

माझ्या परिचयाच्या अभिरुचीवाल्या, फक्त हॉलिवूडचे सिनेमे पाहणाऱ्या, स्वतः भारतीय चित्रपटसृष्टीत समांतर सिनेमात कार्यरत असलेल्या अशा अनेकांनी बाहुबली खास करून आत्ता आलेला दुसरा भाग आवडल्याचे सांगितले आहे. एक खर्या अर्थाने भारतीय असलेला चित्रपट हाएस्ट ग्रॉसर एव्हर ठरला याचं सर्वच कौतुक करत आहेत.
त्यामुळे मुळात बाहुबली फक्त मासेस साठी आहे, क्लास नाही हे गृहितकच तुमचं चूक वाटतंय. अर्थात मीही तुमच्याप्रमाणेच दुसरा भाग अजून बघितला नाहीये पण जे वाचलं ऐकलं त्यावरून हे मत बनवलं आहे.

सनव,

खालची दोन वाक्ये लेखात आहेत.

१. राजामौलीसारखे लोक भेळ बनवणारे असतात, उत्तम घटक शोधून निवडून आणतात, प्रमाण ठरवतात, कृती स्वतःची असते. हे सर्व पिटातल्या पासून ते बॉक्सातल्या प्रेक्षकापर्यंत सर्वांना आवडेल अशा पद्धतीने भेळ बनवून सादर करतात.

२. यांचा जास्तीत जास्त जोर जास्तीत जास्त पैसा देणार्‍या पिटातल्या अ‍ॅवरेज बुद्धिमत्ता असलेल्या, आपलं जग विसरुन दोन घटका करमणूक शोधणार्‍या, जास्ती डोक्याला ताण न देणार्‍या ग्राहकांवर असतो

तुमच्या संपर्कातल्या उच्च अभिरुची वाल्या लोकांना आवडल्याचं कारण पहिल्या वाक्यात आहे. तर हायेस्ट ग्रॉसर ठरल्याचं कारण दुसर्‍या वाक्यात आहे.

इतिहास घडवणारे घडवतात... आमच्यासारखे फक्त चर्चा करतात. >> यात इतिहास स्वतःच्या मर्जीप्रमाने बदलून लिहिणारे सुध्दा असतात Wink Light 1

इन्टरस्टेलारचे बजेट पावणेपाच हजार कोटी.>>>>
बाकि ठिक आहे पण बजेट चे आकडे चुकले आहेत. ह्याचे बजेट १६० मिलिअन डॉलर म्हणजे १०००-११०० कोटि होते.

तसेच कुंगफु पांडाचे

त्यामुळे मुळात बाहुबली फक्त मासेस साठी आहे, क्लास नाही हे गृहितकच तुमचं चूक वाटतंय. 
>>>>>>>

हे माझ्यासाठी असेल तर हे माझे गृहीतक नाहीये Happy
किंबहुना मी मासेस क्लासेस असे भेद करत नाही.
बाहुबली गल्लाभरू सिनेमा होता. माझे पैसे वसूल झाले असे मला वाटले नाही. ईतके सोपे आहे हे.