पुन्हा एकदा हिमाचल..

Submitted by वर्षू. on 5 May, 2017 - 23:43

अस्पर्श हिमाचल भाग १ http://www.maayboli.com/node/62270

अस्पर्श हिमाचल भाग २ http://www.maayboli.com/node/62271

अस्पर्श हिमाचल च्या मागील भागांतून तुम्ही माझ्याबरोबर फिरला आहात.. या वर्षाच्या एप्रिल मधे ही आम्ही पुन्हा हिमाचल मधेच जायचं ठरवलं कारण तेथील काही भागांबद्दल खूप उत्सुकता होती ,तेथील अनुभव घ्यायचे राहिले होते.
यावेळी मुंबई- दिल्ली- धरमसाला- कुल्लू असा प्रवास न करता मुंबई हून विमानाने चंदीगढ गाठले व तेथून अगोदरच बुक केलेल्या टॅक्सी ने सहा तासात कुल्लू ला मित्राकडे पोचलो.
तिथे थोडे दिवस निसर्गाच्या, जुन्या मित्रांच्या सान्निध्यात घालवल्यावर ठरवल्या प्रमाणे मलाना या रहस्यमयी आणी प्राचीन खेडेगावात जायचा दिवस नक्की केला.
मलाना बद्दल थोडेसे.. कुल्लू वॅली च्या उत्तर पूर्वेकडे असलेल्या पार्वती दरी च्या एका किनार्‍यावरील माळना नाल्यात , समुद्रसपाटी पासून ८७०० फूट उंचावर
चंद्रखणी आणी देवटिब्बा शिखरांच्या छायेत वसलेले हे एकमेव गाव संपूर्ण दुनियेपासून वेगळं आहे. शिवावर अमर्याद श्रद्धा करणार्‍या मलाणा लोकांचे दैवत जामलू ऋषी आहेत . पुराणात जामलू ऋषिंचा उल्लेख आढळून येतो. हे गाव वसवून तिथे जगातील पहिली लोकशाही त्यांनीच स्थापित केली असे हे लोक मानतात. प्रत्येक गोष्टीचा न्यायनिवाडा हे ऋषिच करतात.
तसेही हिमाचलातील दीर्घ वास्तव्यामधे अनेकदा लोकल्स च्या संपर्कात आल्याने त्यांच्या संस्कृतीची बर्‍यापैकी जवळून ओळख झाली. कुठे घर बांधायचे पासून, लग्न कधी,कोणाबरोबर करावे, प्रवास , इतर कार्यांकरता शुभ मुहुर्त शोधणे, प्रत्येक प्रकारच्या शारीरिक, नैसर्गिक , मानसिक
अडचणींवर उपाय शोधण्याचे काम त्या त्या खेड्याचे , कुटुंबाचे दैवत यांच्यावरच सोपवलेले असते. मलाना सोडून इतर भागात दैवताची पालखी घरी आणली जाते. पालखी उचलण्याचे काम गावातील मंडळी आनंदाने स्वीकारतात. मग ज्याने आपल्या घरी देवताना आमंत्रण दिले अस्ते तो आपला प्रश्न विचारतो. उत्तर होकार असेल तर पालखी पुढे जाते व देवता चा त्या गोष्टीला नकार असेल तर पालखी मागे जाते. पालखी वाहणारे आणी प्रेक्षक क्लेमच करतात कि हे सर्व आपोआप होते म्हणून.
पण मलानात , जामलू ऋषि ,पुजार्‍याच्या अंगात येऊन निवाडा करतात असे मानले जाते.
भारतीय न्यायव्यवस्थेच्या अगदी विपरीत इथली न्यायव्यवस्था आहे जिचे अत्यंत श्रद्धेने पालन केले जाते. कोणत्याही तंट्याचा निकाल त्या त्या मनुष्याच्या मालकीच्या मेंढी द्वारे केला जातो. दोन्ही मेंढ्यांच्या पुढच्या एका पायाला अर्ध्या इंचाचा कट देऊन आत विष भरण्यात येते. नंतर जखम सुई दोर्‍याने शिवून टाकतात. ज्या व्यक्ती च्या मेंढी चा मृत्यू अगोदर होईल त्या व्यक्तीच्या विरुद्ध निकाल लागतो.
अश्या या अजब खेड्यात फिरताना एक गोष्ट अतिशय कटाक्षाने पाळावी लागते . इथे कोणत्याही मलाना व्यक्ती, त्यांचे घर, वस्तू, जामलू ऋषिंचे देऊळ, त्याच्या आसपासच्या शिळा, दगड इ. ना स्पर्श निषिद्ध आहे. चुकून जरी स्पर्श झाला तरी ३५०० रुपयांचा घसघशीत दंड आहे. बाकी त्यांच्याशी गप्पा मारण्यावर निर्बंध नाही. त्यांच्या हातचे जेवण ही( घराबाहेर बसून) जेवायला हरकत नाही. पाहुण्यांकरता जेवणा स्वैपाकाची भांडी वेगळी असतात. हे लोकं हिंदी बर्‍यापैकी बोलतात व समजतात . मात्र आपसांत फक्त कांशी भाषा बोलतात जी आपल्याला ओ च्या ठो अज्जिबात समजत नाही. रूल प्रमाणे त्यांच्या भाषेचे शब्द ही बाहेरच्यांनी उच्चारायचे नाहीत , दंड भरावा लागतो.
इतकी पवित्रता , शुद्धता पाळणार्‍या लोकांचं पाण्याशी मात्र वैर वाटलं . वैयक्तिक शुचितेबद्दल भारीच औदासिन्य दिसून आलं . पर्वत शिखरांतून निरंतर वाहात येणारे नैसर्गिक शुद्ध पाण्याचे झरे २४ तास वाहात असता , ही लोकं फक्त सणासुदीलाच आंघोळ करतात असे कळले. Happy असो,
मलाना आपल्या विचित्र पद्धतींमुळे तर ओळखला जातोच परंतु अजून ही एका अश्याच विचित्र कारणामुळे परदेशातील लोकं इथे धाव घेत असतात. इथल्या रिमोट जंगलांतून आपोआप पैदा होत असलेले , दर्जेदार हशीश.
पूर्वीच्या काळात येथील लोकं cannabis च्या पानांचा उपयोग वैद्यकीय कारणांसाठी करत , कालांतराने यापासून
दर्जेदार चरस बनवण्याची कला त्यांनी आत्मसात केली.
१९९४ आणी १९९६ मधे The HIGH TIMES Cannabis Cup या मासिकाने ,'मलाना क्रीम' ला सर्वोत्कृष्ट हशीश घोषित केले. तर अश्या या मोहक निसर्गसौंदर्य लाभलेल्या जादूभरल्या दरीत अत्यंत कठीण असे चढ आणी डेंजरस उतार पार करून येणारे विदेशी बॅकपॅकर्स इथे दिसले तर
आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
मलाना बरोबरच, दुनी च्या चेत या उंचावरच्या खेड्यालाही परत भेट दिली. केवळ २४ घरांची वस्ती आणी सगळ्यांच्या घरावरच्या पाटीवर बीपीएल लिहिलेले.. सगळे काही स्टँडर्ड गरीबी रेषे खालील वाटले नाहीत पण एकूण लाईफ अत्यंत कष्टपूर्ण . कोणत्याही सुविधा म्हणाव्या तश्या उपलब्ध नाहीत. १२ महिने थंडी , हिवाळ्यात तर बर्फवृष्टी ठरलेलीच, तेंव्हा ४,५ महिने बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. त्यावेळी तरूण लोकं
रानकोंबड्यांची शिकार करायला निघतात . नशिबाने एखादा मिळाला तर ठीक नाहीतर घर च्या शेतीत उगवलेले पोटापुरते राजमा , चवळी वर संपूर्ण हिवाळा गुजराण करायची.
इथे तशीही भाज्यांची मारामारच असते. आत्ता हिरव्या मटारांचा सीझन होता . गारा पडल्या तर या पिकाचाही भरोसा नाहीसा होतो. दिवसभर दूरवर असलेल्या शेतांत इथे राहणारे लोकं काबाडकष्ट करत असतात.
आम्ही गेलो तेंव्हा दुनी च्या आई ने अत्यंत चविष्ट राजमा , भात आणी मलका दाल ने आमचे स्वागत केले. वरून भेट म्हणून तीन प्रकारचे राजमे आणी घरच्या गाई च्या तुपाची भलीमोठी बरणी पॅक करून दिली . त्यांच्या कष्टाला आणी दिलदारीला मनापासून सलाम केला मी.
यावेळी हिमाचल चे स्टेट फ्लॉवर म्हणून ख्याति पावलेल्या बरास फुलांचेही दर्शन घडले. अत्यंत उंचावर ,जंगलात, दुर्गम पहाडांत , कठीण जागी उगवणारी ही फुले हिमाचलात इतर भागात कधीच दिसणार नाहीत. रानावनात हिंडून ही लोकं फुलं गोळा करतात. ती उन्हात सुकवून, त्यापासून जूस बनविणार्‍या लोकल कंपनीला विकतात. त्यांतून काही किडुक मिडुक पैसा मिळतो.
आधी हिमाचबद्दल बरंच डीटेल मधे लिहिल्याने आता आवरतं घेते.. अ‍ॅबरप्ट वाटलं तरी Happy

https://goo.gl/photos/72pMW3poQr4tfV6e6

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती छान माहिती मिळाली .
प्रवास वर्णनाचा हातखंडा आहे .
अपेक्षा खूप उंचाववतात , लिही समग्र
लिही.

धन्यवाद..फोटो दिसत आहेत का शशांक >>>>>> त्या लिंकवर क्लिक केले तर दिस्ताहेत...... लेखामध्ये दिसत नाहीयेत....

हो ना दिलेल्या लिंक वरच क्लिक करायचंय..
या मलाना ट्रेक वर मी एकटीच गेले होते. खतरनाक रस्ता, ड़ेंजरस वळणं , ओळखी चा ड़्रायवर असल्याने काही वाटलं नाही

तुझे आधीचेही लेख वाचून काढले .नवीन रंजक माहिती मिळाली.नुकताच एक कलीग हिमाचल प्रदेश मध्ये जाऊन आला .त्यानेही त्याचे हशिश बद्दलचे अनुभव सांगितलेत.एकंदरीत एकीकडे अमाप निसर्ग सौंदर्य तर दुसरीकडे हि नशा. कठीण आहे Sad

छान लिहिलंय, एका देशातच काय काय वेगळ्या आणि चमत्कारिक रूढी, रीती आपल्या. हवं तर सावकाश वेळ मिळाला की थोडं अजून सविस्तर लिही ना, सुंदर ओघ आहे लेखनाला.

वर्षूताई, मस्त लिहिलं आहेस.
काल जपानमधल्या पर्यटनस्थळांवरची एक डॉक्युमेंटरी बघत होतो, तेंव्हा तुझी आठवण आली होती. कारण त्यातल्या त्या टूरिस्टदेवीचा फिरण्याचा उत्साह आणि सांगायची स्टाईल तुझ्यासारखी वाटत होती. Lol

दुनी बद्दल उत्सुकता वाटून आधीचे भाग चाळले तेंव्हा संदर्भ कळला. आधीचे भागही वाचतो आता.

@ गजानन..अरे हिमाचल हून परत आल्यावर चार दिवसात चायना ला निघायचे होते.. म्हणून जरा अ‍ॅबरप्ट झालाय हा भाग.. सध्या नॉर्थचायना ला एक महिना+ आहे..नॉर्थ मधे खूप काही बघणेबल आहे पण इथेही लोकल्स मधे मिसळून त्यांचे जीवन जवळून अनुभवयाला आवडतं मला.
so busy roaming about, exploring new gullies and catching up with old Chinese friends !!!