बाहुबली २ - The Conclusion

Submitted by समीरपाठक on 29 April, 2017 - 12:14

दक्षिण भारतीय चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा ते निर्विवादपणे नायक प्रधानच असतात. नायक प्रधान अन कहाणी असूनही कहाणीत नायकाच्या चारित्र्याला वेगळ्या उंचीवर सामान्यांच्या आवाक्याबाहेर पोचवणारे. अमोल पालकरांच्या छोटी सी बात सारखे हलके फुलके करमणूक प्रधान चित्रपट दक्षिण भारतात बनतात कि नाही दे जाणे. अर्थात "देव जाणे" कारण भाषा सीमा. तर हा भाग बाजूला ठेवू पण बाहुबली २ म्हणजे भारतीय किंबहुना दक्षिण भारतीय सिनेमा हा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचला असेच म्हणावे लागेल. एखादा हॉलिवूडचा सिनेमा ज्या शिताफीने कम्प्युटर ग्राफिक्सचा उपयोग करून सजलेला असतो, त्याला टक्कर देणारी कम्प्युटर ग्राफिक्सची करामत बाहुबली २ मध्ये आहे. जवळपास प्रत्येक फ्रेम मध्ये असणारी कम्प्युटर ग्राफिक्स ची करामत जेंव्हा तुम्हाला कोठेच ओळखू येत नाही पूर्ण वेळ, तेंव्हा निश्चितच अप्रतिम पातळीवर पोचलेला सिनेमा असे याचे वर्णन करावेच लागेल.

Bahubali-2.jpg

बाहुबली २ म्हणजे बाहुबली १ च्या कथेबरोबर होणारी तुलना हे अपेक्षितच आहे. पण लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या पटकथेबरोबर ज्या शिताफीने कथेची मांडणी केली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण बाहुबली २ हा कोठेही कहाणीसाठी बाहुबली १ वर अवलंबून वाटत नाही, जेथे आहे तेथे कहाणीचा संदर्भ संवादांच्या माध्यमातून बेमालूमपणे पडद्यावर उभा करण्यात आला आहे. जेणेकरून प्रेक्षकांना कोठेही "समजले नाही" असा फील येतच नाही.अडीचशे कोटींचे शब्दश: महाप्रचंड बजेट असलेल्या चित्रपटाकडून हे अपेक्षितही होतेच म्हणा.पण तरीही असं वाटण्याचं execution अप्रतिमरीत्या पडद्यावर केलेलं आहे हे नक्की. मागच्या बाहुबली १ मध्ये कटप्पा ने बाहुबलीला का मारलं याचा उल्लेख कमीत कमी या कथेत होईल असे वाटते पण नाही, कथेत/संवांदांत तो संदर्भ आहे पण तुटपुंजा आहे अगदी.

प्रभास चा बाहुबली, राणा दग्गुबत्तीचा बल्लालदेव अन सत्यराजचा कटप्पा हे नायक आणि अनुष्का शेट्टीची देवसेना या सगळ्या नायक नायिकांची कामगिरी उल्लेखनीय या सदरात मोडते. तमन्नाहि आहे काही प्रसंगात पण अगदी काहीच प्रसंगात. प्रभास ने ज्या कमांड ने बाहुबली (अमरेंद्र + महेंद्र) उभा केलेला आहे त्याला खरोखर तोड नाही. बल्लालदेवचा राजा बनण्याचा हव्यास, त्यासाठी तो करत असलेले षडयंत्र, कटप्पाची बाहुबलीला असलेली साथ इत्यादी इत्यादी विषयाबरहुकूम प्रसंगात प्रत्येक जण शोभून गेलेला आहे. अनुष्का शेट्टीही मुख्य नायिका आहे पण ती शब्दश: सुंदर दिसलेली आहे पूर्ण सिनेमात. अगदी शेवटच्या काही प्रसंगात तिचे म्हातारे दिसणे आवश्यक होते. पण ती कदाचित प्रयत्न करूनही म्हातारी दिसू शकलीच नाही.

प्रभास अन राणा दग्गुबत्ती हे दोघेही फिजिकली शब्दश: प्रचंड मेहनत घेत असल्याचे जाणवून देतात कैक प्रसंगात. तुलना करु नये पण आपला हिंदीतला अक्षय कुमार सोडून कोणीही करोडपती अभिनेता इतकी मेहनत घेऊ शकत नाही हे नक्की. आपली खानावळ जिम वगैरे करून "दाखवू" शकतात फिजिक पण ज्या मेहनतीची जाणीव प्रभास करवतो तसे हिंदीत कुणालाच शक्य नाही आणि मराठी तर कुठे स्पर्धेतही नाही करोडोंच्या. आपल्या मराठीला आता सैराटचीच पुण्याई शंभरएक वर्षे पुरेल आणखी..........

एस एस राजामौलीनचे दिग्दर्शन हे बाहुबली श्रुंखलेचे सगळ्यात मोठे यश. मान्य कि सगळे अभिनेते आपापल्या भूमिकांत शोभले पण अडीचशे कोटींच्या जहाजाचा कॅप्टनच कचखाऊ असता तर?? अडीचशे कोटींचा प्रोजेक्ट धुळीला मिळाला असता. पण एस एस राजामौलीचे खरोखर कौतुक. कारण त्यांनी दुसरा भाग असूनही प्रेक्षकांना कुठेही 'न समजल्याची' भावना येऊ दिली नाही. तीन तासांच्या चित्रपटांत प्रत्येक फ्रेम इंग्रजी शब्द आहे ना "लॅव्हिश" त्याप्रमाणे चित्रित केली. बाकीचे जाऊ देऊ देऊ डिटेल्स पण प्रभासची एंट्री हि खास असली पाहिजे हा एक उल्लेखनीय असा त्यांचा कटाक्ष. पहिल्या बाहुबलीत खांद्यावर शिवलिंग घेत त्याचे महत्व सांगत तर दुसऱ्या बाहुबलीत राजमातेची अग्नीला घेऊन जाण्याची कवायद सुरु असतानाची हत्तीच्या फायटिंग मधली एंट्री. मान्य कि या फायटिंगमधला बराचसा भाग हा कम्प्युटर ग्राफिक्स असावा. पण हा एंट्रीचा महत्वाचा भाग हा भरपूर मेहनत करून किंवा कम्प्युटर ग्राफिक्स असल्यास भरपूर पैसे खर्च करून चित्रित केल्यासारखा वाटतो. पहिल्या बाहुबलीत एंट्री नंतर पूर्ण चित्रपटभर प्रभास भरून राहिला होता. या त्याच्या 'भरून राहण्यात' त्याच्या एंट्रीचा महत्वाचा वाटा होता. तेच काम बाहुबली २ मध्येही त्याच्या एन्ट्रीमुळे घडते. या लहानश्या निरुपद्रवी पण अतिशय महत्वाच्या गोष्टीसाठी एस एस राजामौलीचे विशेष कौतुक.
एम एम करीम चे संगीत बाहुबली २ ला लाभलेले आहे. एम एम करीम मला जिस्म मधल्या 'आवरापन बंजारापन" या गाण्यामुळे आठवतात अन आवडतात. बाहुबली २ मध्ये एकदम छप्पर फाड के अत्युत्तम संगीत नाही. पण कमीही पडत नाही कुठेच.

अमरेंद्र बाहुबलीचा मुलगा महेंद्र बाहुबलीची एंट्री कथेत झालेली आहे. त्यामुळे बाहुबली ३ पुढच्या काही वर्षात पडद्यावर आल्यास आश्चर्य वाटायला नको. हॅरी पॉटर चे अनेक भाग, सगळे सारख्याच पात्रांचे पण कथेच्या नाविन्यामुळे आम्हीच भारतीय दर वेळेस डोक्यावर घ्यायचो. मग बाहुबलीची आणखीही भाग आले तर प्रेक्षकांनी स्वीकारण्यात काहीही हरकत नाही कारण टेक्निकली बाहुबली २ हा बाहुबली १ पेक्षा हाताळणीत सरस वाटला मला. म्हणजेच एस एस राजामौली अनुभवांतून शिकताहेत हे नक्की. कोणतीही खोट नसलेल्या बाहुबली २ ला मी पाच पैकी पाच (५*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा .
-समीर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

टेक्निकली बाहुबली २ हा बाहुबली १ पेक्षा हाताळणीत सरस वाटला मला.
>>>
अरे वा त्या परीक्षणातही हेच .. म्हणजे माझे ति चे पै वसूल होताहेत तर Happy

अप्रतिम, अफाट, भव्य सिनेमा. बाहुबलीच्या प्रेमकथेचे काही प्रसंग सोडले तर संपूर्ण सिनेमाभर (विचित्र डबिंगची गाणी वगळता) एकही प्रसंग चुकवू नये, असा वेग राखलाय. गाण्यांचं चित्रणही अतिसुंदर.. एक परिपूर्ण मसाला सिनेमा पाहिल्याचं समाधान मिळतं.

सर्वांत आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. बाहुबलीचा सेट, काही स्पेशल इफेक्टस, स्टारकास्ट आणि मार्केटिंग जबरदस्त आहे. त्याबद्दल त्याचं कौतुक आहे. एक प्रादेशिक सिनेमा जागतिक स्तरावर चर्चिला जातो यात कौतुक आहेच. पण सिनेमात अनेक 'Physics just died ' दृश्य आहेत. अनेक तर्क-विसंगत गोष्टी आहेत. ['GOT चालतं ना मग हे का नको' हा वाद या ठिकाणी घालू नये.. माझ्यामते GOT मध्ये सुद्धा अनेक पुरातन कथांचे संदर्भ सापडतात. असो...] मी कथानकाबद्दल लिहीत आहे जे कमकुवत आहे, किंबहुना अनेक गोष्टींची सरमिसळ आहे. त्यातही महाभारत हा मुख्य स्रोत आहे.

बिज्जलदेवच्या शारीरिक व्यंगामुळे त्याचा राज्याभिषेक न होता त्याच्या धाकट्या भावाचा, विक्रमदेवचा राज्याभिषेक होणं - धृतराष्ट्र आणि पंडू. धृतराष्ट्राचा आंधळेपणामुळे तो राजा न होता पंडू राजा होणं..

दोन भावांची सिंहासनासाठी भांडणं, एक भाऊ समाजप्रिय आणि दुसरा सत्ताप्रिय - पांडव आणि कौरव(अनुक्रमे)..

नदीच्या पाण्यातून बाळ वाहत येणं - कर्ण. कुमारी माता कुंतीने लोकलाजेस्तव बाळाला पाण्यात सोडून देणं..

वाहत आलेल्या बाळाचा सांभाळ एका वनवासी (क्षत्रिय कुळापेक्षा कनिष्ठ मानल्या गेलेल्या) जमातीने करणं - पुन्हा एकदा कर्ण. अधिरथ आणि राधा माता या सारथी कुलोत्पन्न दाम्पत्याकडून कर्णाचा सांभाळ होणं..

बाहुबलीच्या अनेक पराक्रमांमुळे पंचक्रोशीमध्ये त्याचा दबदबा निर्माण होणं - पुन्हा एकदा कर्णच.

शिवगामी पूजा करत असताना अमरेंद्र बाहुबलीने विंचू चावलेला असतानाही हसतमुख असणं - पुन्हा एकदा कर्णच. महेंद्र पर्वतावर परशुरामांकडून ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी गेलेला असताना गुरुची झोप मोडू नये म्हणून कर्णदेखील विंचू चावूनही गप्प राहतो. [तिथेच परशुरामांना खरं काय ते कळतं, असो.. तो आत्ताचा विषय नाही..]

भल्लालदेवने देवसेनला डांबून ठेवणं - रावणाने सीतेला अशोकवनात बंदी बनवणं..

भल्लादेवला उत्तोमोत्तम सैन्य मिळणं आणि तरीही अमरेंद्र बाहुबलीचा विजय होणं - कौरवांना श्रीकृष्णाची प्रचंड मोठी आणि कुशल सेना मिळणं तरीही पांडवांचा विजय होणं...

देवसेनेला सोडवायला आलेल्या बाहुबलीने माहिष्मतीमध्ये आग पेटवणं - सीतेची खुशाली विचारायला
आलेल्या हनुमानाने अशोकवन जाळून टाकणं...

कालकेय - पुराणकाळात वर्णन केलेले असुर. असुरांनी देवांना स्वर्गप्राप्तीसाठी त्रास देणं हे अनेक वेळा झालंय..

कटप्पाने बाहुबलीची खरी ओळख पटल्यावर त्याचा पाय आपल्या मस्तकी लावणं - बळीराजा आणि वामन अवतार. बळीराजाला जेव्हा वामन हा विष्णूअवतार आहे हे कळतं [तीन पावलं जमीन हवी ती गोष्ट] तेव्हा तो स्वतः नतमस्तक होतो आणि वामनाचा पाय आपल्या मस्तकी घेतो...

कटप्पा - पितामह भीष्म. राज्याप्रती आपली निष्ठा वाहिली असल्याने राजा चुकतोय हे कळूनही असहाय्य होणं..

देवसेना - 'मेरा बेटा मुझे लेने आयेगा.' राखी.. 'मेरे करन-अर्जुन आयेंगे.. मेरे बेटे आयेंगे...'

भल्लालदेव - दुर्योधन. सत्तेसाठी भावाचा काटा मोडण्यासाठी तयार असणं. (तो सैनिक जो कालकेयला राज्याची गुप्त माहिती पोहोचतो, त्याला पकडतानाचं दृश्य)
कालकेयच्या टोळीची अगम्य भाषा. GOT मधली डोथ्राकी भाषा

सध्यातरी एवढं आठवलं. माझा त्या सिनेमावर राग नाहीये. फक्त तो सिनेमा ओव्हररेटेड आहे असं म्हणणं आहे...
कसंय, महर्षी व्यासांनी एवढं कैच्या कै कल्पना करून लिहिलं आहे ना, नवीन येणाऱ्या अनेक history fictional stories कुठे ना कुठे तरी महाभारताशी जोडल्या जातात. यात लेखकांचा नाईलाज आहे. ते तरी काय करणार बिचारे...
-------------------------------------
कमतरता बाहुबलीच्या सौजन्य तन्मया पंचपोर-वझे

एखाद्याला चित्रपट आवडणे, बेहद्द आवडणे समजू शकतो, न आवडणेही समजू शकतो, पण दुसऱ्यांना बेहद्द आवडतंय याबद्दल काही लोक अशी चीड चीड का करतात?

ओवररेटेड म्हणे... असो.

समीर , आपण एकच सिनेमा पाहिला की नाही ? Happy
मला तरी स्पेशल इफेक्ट अतिशय फालतू वाटले.
स्पेशल इफेक्ट कमी ठेवा , पण ते खरे वाटले पाहिजेत.
विशेषतः तो कुंतल राज्यातील धरणाचा सीन तर अगदी बाळबोध स्पेशल इफेक्ट आहेत .

नानकळा +१
सिनेमा ग्रेटही नाही वा ओवररेटेडही नाही.

महाभारताबरोबर केलेली तुलना अनेक पातळ्यांवर चुक आहे.
कल्पना कोणा एकाची मालकी नसते. कॉपीराईट कल्पनेचे नसते. "मांडणी" आणि / किंवा "अंमलबजावणी" (एझीक्युशन) चे असते.

बळीराजाला जेव्हा वामन हा विष्णूअवतार आहे हे कळतं [तीन पावलं जमीन हवी ती गोष्ट] तेव्हा तो स्वतः नतमस्तक होतो आणि वामनाचा पाय आपल्या मस्तकी घेतो..

Proud
अगदी चूक आहे

नानकळा -
लोकशाही देश आहे हो, पुन्हा आपले स्वतंत्र मत ठेवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यात हे मत जगावेगळे असले तर तेवढेच बरे पडते...........

केदार जाधव -

आपण दोघेही व्यक्तिमत्व वेगळे आहे किनई? जे तुम्हाला ठीक वाटेल ते मलाही ठीक वाटलेच पाहिजे असे का? स्पेशल इफेक्ट्सच्या बाबतीत मला फारशी समज नसल्यामुळे मी जास्ती बोलणार नाही पण VFX इफेक्ट जास्तीत जास्ती ठिकाणी अत्युत्कृष्ट आहे हे निश्चितच सांगू शकेल. कुंतल राज्यातील धरणाचा सादर उल्लेखित सिन हा शेवटी होता, त्यामुळे तो निश्चितच दुर्लक्षित करता येईल. असो ........

मित्रा, हिंदी प्रेक्षकांना प्रभासची एवढी क्रेझ नसेल पण एस एस राजामौलीनचा सिनेमा आला तर उड्या पडतील त्यावर हे नक्की

रावण कोणाचा? शाहरुखचा कि अभिषेक बच्चनचा?  दोन्हीही बेकार होते.
>>>>>

रावण म्हटला की शाहरूखचाच. अभिषेक बच्वनचाही या नावाचा चित्रपट होता हे तर मी विसरूनच गेलेलो. किंबहुना अभिषेक हा अमिताभचा मुलगा नसता तर अभिषेक बच्चन म्हणून कोणी आहे हे देखील विसरून गेलो असतो Happy

हाहाहाहाहाहा, वडलांच्या प्रेमभंगामुळे वडलांनी त्याला ऐश्वर्या घडवली. नाहीतर भाईजान ला नाकारणं अशक्य होतं तिच्या लेव्हलवर

"किंबहुना अभिषेक हा अमिताभचा मुलगा नसता तर अभिषेक बच्चन म्हणून कोणी आहे हे देखील विसरून गेलो असतो" "वडलांच्या प्रेमभंगामुळे वडलांनी त्याला ऐश्वर्या घडवली. नाहीतर भाईजान ला नाकारणं अशक्य होतं तिच्या लेव्हलवर" - Happy Happy

मला आवड्ला ... पण पहिला जास्त चांगला असे वाटले, तरीही हा भागपण कुठेच कमी वाटत नाही.
फक्त शेवट खुप घाईत केल्यासारखा वाटला. बाहुबली मेल्यानंतर लगेच संपतो असे वाटले