स्फुटलेखन - कवितेचा आधार

Submitted by बेफ़िकीर on 26 April, 2017 - 12:24

स्फुटलेखन - कवितेचा आधार
======================

वास्तवाचा खराटा घेतला
दोन तांबे काल्पनिक अश्रू ओतले
खराखरा साफ केलं मन
यमकं गटारात गेली

तरी काही जळमटं राहिलीच
दु:खांच्या उदात्तीकरणांची,
वृत्तात बसलेली!!!!
वृत्तीच्या फडक्याने झटकली ती

नको होती झटकायला,
कारण....

काही पुटं दिसली त्यामुळे
टाळ्या, वाहवा, इर्शाद, मुकर्ररची वगैरे!
काढली तीही
आशयाच्या घासणीने

तर धक्काच बसला
खाली होते अनेक थर
पुरस्कारांचे
मानधनांचे
शाली, श्रीफळ, सन्मानचिन्हांचे

मग काय?
तुझ्या अपेक्षांचे उलथ्ने घेतले
कराकरा घासून काढले सगळे
मस्त दिसले वाहून जाताना

वाटले,
आता हे मन तुला बहाल करून टाकावे

पण....
त्यात होत्या ना माझ्या....
इच्छा, अपेक्षा, फॅन्टसीज वगैरे
ज्या मला इथपर्यंत घेऊन आल्या होत्या....

मग मन तिथेच टाकले मी
आणि परत यायला निघालो
मधेच लक्षात आले
तुला मी नको होतो
माझे मन हवे होते
पुन्हा धावलो मागे

पण मन सापडले नाही
मनाच्या मनात नव्हते
पुन्हा निरागस व्हावे असे!!!!

आता ना कालचा ना आजचा....
चालतोय का बघ!!!!

पण एक कळले,
आता कवितेची गरज नाही राहिली!!!!

सत्याला,
कवितेचा आधार लागतच नाही....

कवितेचा आधार लागतो म्हणजे....

.... आपण सत्य स्वीकारत नसतो!!!!

========================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त