खांडववनदाह, महाभारतातील हत्याकांडाचे एक आकलन - ४

Submitted by अतुल ठाकुर on 24 April, 2017 - 23:43

1200px-Krishnarjunas_fight_with_Gods.jpg

कथनशास्त्रातील मालिका गुंफण्याच्या प्रकाराला Serialization म्हणतात. म्हणजे एका कथेतून दुसरी कथा निघत जाते. तसा प्रकार थोड्या प्रमाणात खांडववन कथेत आढळतो. खांडनवनात शांर्गी पक्ष्याची आणि मंदपाल ऋषींची एक उपकथा येऊन जाते. त्याचबरोबर मयासूराला अभयदान दिल्याने मयसभेच्या बांधणीचा संकल्प तेथेच निश्चित होतो. नागराज तक्षक वाचतो मात्र नाग लोकांचे पांडवांशी हाडवैर सुरु होते त्याचीही ठिणगी येथेच पडते. खांडववनात वाचलेला तक्षकाचा मुलगा अश्वसेन हा पुढे महाभारतयुद्धात अर्जुनाला मारण्याचा निकराचा परंतू अयशस्वी प्रयत्न करतो त्याची सुरुवातदेखिल खांडववन दाह कथेतच आहे. ज्या दुर्योधनाला द्रौपदीने मयसभेत पडल्यावरून हसल्याने महाभारत घडले असे म्हणतात ती मयसभा खांडववन दाहनातून निर्माण झाली आहे. कदाचित ती त्या जागीदेखिल बांधली गेली असेल. पुढे तक्षकाकडून घडलेला परीक्षिताचा मृत्युदेखिल खांडववन कथेशी जोडलेला आहे. त्यामुळे Serialization बरोबरच Cyclical कथनाचा प्रकार खांडववन कथेशी निगडीत असलेला दिसतो. महाभारताच्या अगदी सुरुवातीला घडणारे जनमेजयाचे सर्पसत्र, जेथे सर्पांचा संहार सुरु झाला आहे त्याचे बीज खांडववन दाह कथेत दडलेले दिसते.

Spacialization आणि Elasticity of Time हे कथनाचे दोन आणखि घटक या कथेत दिसतात. खांडववनदाहाची घटना यमुना किनार्‍यावर घडते. कारण हे वन यमुनाकिनार्‍यावर असल्याचा उल्लेख महाभारतात आहे. किंबहुना पांडवांना राज्याचा जो भाग मिळाला तोच यमुनेच्या आसपासचा प्रदेश होता असे म्हणतात. प्रदेशाच्या स्पष्ट उल्लेखामुळे कथेबद्दल विश्वसनीयता निर्माण होते. मात्र हा काल कुठला होता याबद्दल कसलिच माहिती मिळत नाही. इंद्र, वरुण आणि अग्नि या वेदातील देवतांचा सहभाग या कथेत आहे मात्र या देवता वेदातील आपले सामर्थ्य घेऊन उभ्या राहिलेल्या दिसत नाहीत तर त्यांचे जुने सामर्थ्य ओसरून त्यांना पुराणामध्ये आकार आणि देह प्राप्त झाले, त्यांना निरनिराळ्या कथा चिकटल्या त्यानंतरच्या काळातील या देवता दिसतात. त्यामुळे कालाचा अंदाज येत नाही. याचा एक परिणाम म्हणजे यांच्याशी निगडीत कथांना विशिष्ट कालाच्या मापात पारखता येत नाही. कुठल्या काळातील सामाजिक परिस्थितीत या घटना घडल्या त्याचा नक्की अंदाज येत नाही. सारे काही संदिग्ध राहते.

खर्‍या अर्थाने Improvisation म्हणता येईल ते रामानंद सागर यांच्या कृष्ण मालिकेत झाले. त्यात मूळात दाह दाखवलाच नाही. कृष्ण अर्जुनाला खांडववनातल्या पडक्या वास्तूत घेऊन येतो. सगळीकडे पडझड झालेली असते. वातावरण उदासवाणे असते. तेथे धन लपवलेले असते आणि त्याचे रक्षण तक्षक करीत असतो. तक्षकाचे रक्षण इंद्र करीत असतो. इंद्राचे आवाहन केल्यावर सर्व अडथळे दूर होतात. अर्जुनाला पाहून इंद्राला वडीलपणाचे भरते येते. पांडवांना अपार संपत्तीचा लाभ होतो. त्यातच अर्जुनाला रथ आणि धनुष्य प्राप्त होते. एखादा चमत्कार घडल्यासारखे पडझड झालेल्या जागेचे रुपांतर नवीन वास्तूत होते. अर्थातच ही सर्व भगवान श्रीकृष्णाची लीला असते. त्यामुळे कुणामध्येही कसलाच संघर्ष न घडता सर्वांचे भरलेले रांजण तसेच राहतात. कसलाच धक्का कुणाला लागत नाही. कसलाच संहार होत नाही त्यामुळे कुणाला दोष देण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. याला Improvisation म्हणावं की संपूर्ण नवनिर्मिती म्हणावी अशी शंका यावी अशा तर्‍हेचा अफाट बदल मूळ कथेत केलेला आहे. मात्र कथनशास्त्राच्या दृष्टीने हे Improvisation आहे.

रामानंद सागर जे करतात त्याचा मूळ स्रोत मला माहित नाही. आणि समजा जे कुणी ही घटना पहिल्याप्रथम पाहिल त्याला खांडववन जाळलं होतं असं काही कधीच कळणार नाही. कलाकाराच्या कलात्मक स्वातंत्र्याबद्दल बरंच बोललं जातं. या लेखाचा तो विषय नाही. पण Improvisation च्या निमित्ताने बोलावं लागेल कारण ते थेट या कलात्मक स्वातंत्र्याशी संबंधित आहे. मूळ महाभारतात जे नाहीच ते दाखवणे कितपत योग्य? या बाबत स्वातंत्र्य किती घ्यावं? कि संपूर्ण इतिहास उलटापालटा करावा? तो एपिसोड कुणी पाहिला तर असं काही हत्याकांड घडलं होतं, त्यात अत्यंत क्रौर्याने, निर्घृणपणे वनात राहणार्‍यांना ठार मारण्यात आलं होतं असं माहित होणारच नाही. मात्र बीआर चोप्रा यावर काही भाष्यच करीत नाहीत. त्यांचा "समय" दोन तीन वाक्यात खांडववनाची घटना गुंडाळून टाकतो. महाभारत मालिकेतील "समय" ही कल्पना मला तेव्हाही खुप आवडली होती. आजही आवडते. मात्र आपल्याला गैरसोयीच्या वाटतील अशा घटना टाळण्यासाठीदेखील त्याचा वापर करता येऊ शकतो हे त्यावेळी लक्षात आले नव्हते. वर सांगितलेले तथाकथित Improvisation चे दोन्ही प्रकार हे माझ्यामते दोषपूर्ण आहेत. एकात इतिहासच बदलून टाकला आहे तर दुसर्‍यात अनुल्लेखाने घटनेची धार काढून टाकली आहे. हे सारं कशासाठी? तर घडलेली घटना जशीच्यातशी सांगता येत नाही म्हणून.

Improvisation मुळे एखाद्या पात्राला काव्यगत न्याय देण्याचा प्रयत्न कवि करीत असतो. याचे अतिशय नावाजलेले उदाहरण भासाचे आहे. भासाने आपल्या नाटकांमध्ये कैकयी, कर्ण आणि दूर्योधन या साधारणपणे नकारात्मक ओळखल्या जाणार्‍या पात्रांना Improvisation च्या साहाय्याने न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

कथनशास्त्राच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे Interiorization ज्यामुळे कथेमागची कथा ओळखण्यास मदत होते. महाभारत कथेचा अर्थ लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. आपापली भाष्ये त्यावर लिहिली. अनेक ललित लेखकांनी त्यावर कथा, कादंबर्‍या, नाटके लिहिली. अजुनही लिहित आहेत आणि पुढेही लिहितील. हे सारे प्रकार Interiorization ओळखण्याचेच आहेत. दाजीशास्त्री पणशीकरांनी महाभारताचे संगती एक सूडाचा प्रवास म्हणून लावली. तर रणजीत देसाई आणि शिवाजी सावंतांसारख्या लेखकांना कर्ण हा लहानपणापासून अन्याय सहन करणारा महावीर वाटला. प्राचिन वाङमयात भासाला कर्णभार आणि उरुभंग सारख्या कृतींमधून कर्ण आणि दूर्योधनाच्या वेगळ्याबाजू मांडाव्याशा वाटल्या. Interiorization मध्ये मूळ कलाकाराने जे काही म्हटले आहे किंवा त्याच्या कलाकृतीमधून त्याला जे काही म्हणायचे आहे ते हूडकण्याची प्रक्रिया असते. हा अनेक वाटांनी सतत घडणारा प्रवास असतो. कदाचित महाभरतकारांना ते म्हणायचं असेल किंवा नसेलही मात्र जर एखाद्याला वेगळं काही वाटलं तर ते वाटण्यामागचे कारण सांगण्याची आणि आपले म्हणणे पटवून देण्यासाठी पुरावे देण्याचे नैतिक जबाबदारी Interiorization च्या निमित्ताने नवा अर्थ शोधून काढणार्‍याची असते.

असा अतिशय यशस्वी प्रयत्न "युगान्त" या लेख संग्रहात डॉ. इरावती कर्वे यांनी केला. बाईंनी खांडववनाच्या व्युत्पत्तीपासून सुरुवात करुन या घटनेचा मागोवा घेतला आहे. खंडू म्हणजे कसलातरी गोड पदार्थ. हा मोहाच्या झाडांचा उल्लेख असण्याची शक्यता आहे असे त्या म्हणतात. म्हणजे मोहाची झाडे विपुल प्रमाणात असलेले वन. तेथे राहणारे आदिवासी. आणि ते संपूर्ण वन आपल्या राज्यात आणण्यासाठी कृष्णार्जुनाने ते जाळले आणि तेथिल रहिवाशांचा विनाश केला असे त्या सूचित करतात. हे करतानाच समाजातील जाती जमातींचे नीतिनियम कसे असतात याचाही त्या उहापोह करतात. मानवतेचे जे काही नियम असतील ते त्या त्या समाजापुरतेच मर्यादीत असतात. बाहेरच्या समाजाशी संघर्ष झाला असता ते नियम लागु होत नसावेत. त्यामुळे एरवी धर्मयुद्धाचा घोषा करणार्‍या क्षत्रिय समाजाच्या कृष्ण आणि अर्जुन यांनी खांडववनातील लोकांना ठार मारताना कसलेही नीतिनियम पाळलेले दिसत नाहीत यावर इरावतीबाई अचूक बोट ठेवतात. पुढे या घटनेचे पडसाद किती दूरवर उमटले याचाही ताळेबंद त्या मार्मिकपणे मांडतात. खांडववन दाह, त्यातून वाचलेला मयासूर, त्याने बांधलेली मयसभा जणु काही शापितच. कारण तेथे दुर्योधनाची फजीती झाली. त्यामुळे द्युत घडले, त्यातून द्रौपदी वस्त्रहरण झाले, त्यातून युद्ध उभे राहिले. खांडववनाचीच आग मनात ठेवून तक्षकाने पुढे परीक्षिताला ठार मारले. हस्तिनापूर काहीतरी परंपरा ठेऊन नाहीसे झाले. इंद्रप्रस्थाचे मात्र नावही राहीले नाही. एकूणच खांडववन प्रकरण पुढच्या अनेक घटनांचे कारण ठरले. इरावतीबाईंनी घेतलेला खांडववन कथेचा हा मागोवा Interiorization चे उत्कृष्ट उदाहरण आहे.
(क्रमशः)

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखमालिका वाचतोय. अतिशय छान चाललीय.
वरदा यांच्या प्रतिसादाने त्यात आणखी भर पडतेय.
युगान्त (आणि व्यासपर्व) पुन्हा एकदा वाचणं आलं.

खांडववनातल्या संहाराला कसे का होईना, काही तरी स्पष्टीकरण मिळालं म्हणून हुश्श झाल्यासारखं वाटतंय का?

महाभारतात एका गोष्टीचं खूप नवल वाटतं - पतीपासून न झालेल्या मुलालाही पतीचं नाव, त्याचं औरस अपत्य मानलं जायचं. अगदी कर्ण कुंतीच्या लग्नाआधी झालेला असला तरी तो पहिला पांडव ठरू शकतो.

दीपगृह,
एक विनंती आहे. तुम्ही नविन धागा काढून तिकडे लिहा ना ही माहिती,,,, इतकी छान माहिती केवळ प्रतिसादात लिहीली तर कमी लोकांपर्यंत पोहोचेल...

ज्यांनी मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं, त्या सर्वांचे आभार! अतुल ठाकुर यांच्या लेखमालिकेमुळे मला इथे प्रतिसाद लिहिण्याची संधी मिळाली म्हणून त्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद!
महाभारताबद्दल लिहायचं आहे, पण सध्या माझ्याकडे असलेली माहिती पुरेशी नाही. त्यासाठी महाभारताचे खंड नीट चाळावे लागतील. महाभारताबद्दलची इतर काही पुस्तकंही वाचायची आहेत, पण अजून ती पुस्तकं वाचायला मिळालेली नाहीत, त्यामुळे हे लिखाण खोळंबलेलं आहे. मी काही वर्षांपूर्वी एका संकेतस्थळावरच्या चर्चेत माझी मतं मांडली होती, त्यातलाच काही भाग या विषयाशी संबंधित होता, तेच लिखाण मी इथे दिलं आहे. त्यात नवीन भर अगदी थोडीशी घातली आहे.
संकेतस्थळावर लिखाण केलं, की इतर सदस्य त्यांच्या शंका विचारतात, त्या शंकांना उत्तरंही देता यायला हवी त्या दृष्टीने पुरेसा अभ्यास झाल्यावर मी नक्की या विषयावर लेख लिहिन.

सुरेख मालिका.
by दीपगृह यांचे विवेचन मस्त आहे.मंगेश पाडगावकरांनी लिहिलेले महाभारताचा एक भाग नुकताच वाचल्याने ,ही मालिका वाचताना मजा आली.

या संदर्भात वास्तुशान्ती या प्रतिनिधिक पूजेच्या प्रथेचे स्मरण झाले.
आमच्या गुरूजींनी या पूजेचा मतितार्थ संक्षिप्त पणे सांगितला होता.
मनुष्य जेव्हा स्वत्;साठी घर बांधतो तेव्हा त्यासाठी जमीन मोकळी करून घेतो. तिथली झाडे पाडली जातात ; त्या अनुषंगाने तिथे वास्तव्याअला असलेल्या सगळ्या जीवांना (प्राणी, पक्षी , वनस्पती) ती जागा सोडायला लावण्यासाठी मनुष्य कारणीभूत होतो.
असे घडणे अपरिहार्य असते.
त्या सर्वांची क्षमा मागणे आणि त्यांना दुसरीकडे वसतीसाठी चांगली जागा मिळावी ही इच्छा व्यक्त करण्यासाठी ह्या प्रार्थनात्मक पूजेचे प्रयोजन असते.

या परंपरेचे खांडववनदाह या घटनेशी थेट नातं दिसतय मला !

"मूळ महाभारतात जे नाहीच ते दाखवणे कितपत योग्य? या बाबत स्वातंत्र्य किती घ्यावं? कि संपूर्ण इतिहास उलटापालटा करावा?"
हा विचार मला कर्णाच्या बाबतीत करावासा वाटतो. मूळात जो कर्ण महाभारतकारांना अभिप्रेतच नाही, तो तसा रंगवणं कितपत योग्य? दाजी पणशीकरांनी "कर्ण खरा कोण होता?" या ग्रंथात ्रंगवलेला कर्ण हा महाभारतकारांना अभिप्रेत कर्ण. बाकी सारे लेखन स्वातंत्र्याच्या नावाखाली लेखकांनी रंगवलेले कर्ण.

लेखमालिका छान.

===
महाभारतात एका गोष्टीचं खूप नवल वाटतं - पतीपासून न झालेल्या मुलालाही पतीचं नाव, त्याचं औरस अपत्य मानलं जायचं. अगदी कर्ण कुंतीच्या लग्नाआधी झालेला असला तरी तो पहिला पांडव ठरू शकतो. >> I am not sure but i think current IPC is also same ie. if a married woman has a child from lover that child is considered legimate child of husband n given husband's name n husband has to bear cost of raising him.

हायला,
म्हणजे ऐशा ची जबाबदारी विक्रांत वर आली की,

------> महाभारतात एका गोष्टीचं खूप नवल वाटतं - पतीपासून न झालेल्या मुलालाही पतीचं नाव, त्याचं औरस अपत्य मानलं जायचं. अगदी कर्ण कुंतीच्या लग्नाआधी झालेला असला तरी तो पहिला पांडव ठरू शकतो.

=====> त्याकाळी पुत्र म्हणून बारा प्रकारच्या पुत्रांना मान्यता होती.
त्याबद्दल (प्रकारांबद्दल) वेगवेगळ्या ग्रंथात थोडे वेगवेगळे उल्लेख आहेत आणि काही ठिकाणी वेगळ्या संज्ञा वापरल्या आहेत. त्यामुळे त्या सर्व उल्लेखांबद्दल लिहितांना एकूण चौदा प्रकार झाले आहेत.
१. औरस पुत्र - पित्यापासून झालेला नैसर्गिक पुत्र.
२. दौहित्र / पुत्रिकापुत्र - एखाद्याला फक्त कन्याच असेल, तर त्या कन्येला विवाहानंतर झालेला पहिला पुत्र हा तिच्या पित्याचा पुत्रिकापुत्र मानला जात असे. (उदा. चित्रांगदेला अर्जुनापासून झालेला बभ्रुवाहन हा पुत्र)
३. क्षेत्रज्ञ - पतीच्या मृत्युनंतर किंवा पती जिवंत असतांना त्याच्या आज्ञेने नियोगाने दुसर्‍या पुरूषापासून झालेला पुत्र.
४. पौनर्भव - विधवा स्त्रीला तिच्या दुसर्‍या विवाहानंतर झालेला पुत्र.
५. कानीन - कुमारी कन्येला झालेला पुत्र.
६. गूढज - विवाहित स्त्रीला तिच्या पतीऐवजी दुसर्‍या कोणा अज्ञात पुरूषापासून गुप्तपणे झालेला पुत्र.
७. दत्तक - दुसर्‍या व्यक्तीचा रीतसर दत्तक घेतलेला पुत्र.
८. क्रीत - मूल्य देऊन विकत घेतलेला पुत्र.
९. कृत्रिम - दत्तकविधी न करता दुसर्‍याचा पुत्रवत मानलेला पुत्र.
१०. स्वयंदत्त - अनाथ किंवा आईवडिलांनी त्यागलेला पुत्र जो स्वतःला दुसर्‍याच्या हाती सोपवतो, तो त्या दुसर्‍या व्यक्तीचा स्वयंदत्त पुत्र मानला जात असे.
११. सहोढ - विवाहाच्या वेळी गर्भिणी असलेल्या स्त्रीला झालेला पुत्र.
१२. अपविद्ध - अनाथ किंवा ज्याच्या आईवडीलांनी ज्याचा त्याग केला आहे, असा, ज्याचा दुसर्‍या व्यक्तीने स्वतः स्वीकार केलेला आहे तो त्या दुसर्‍या व्यक्तीचा अपविद्ध पुत्र मानला जात असे.
१३. ज्ञातिरेता / हीनयोनिज -
१४. लब्ध - अवैध संबंधातून जन्माला आलेला, जो पुत्र मातेने फेकून दिलेला आहे आणि तो ज्याला पुत्र नाही अशा निपुत्रिक व्यक्तीने वाढवलेला आहे, त्या पुत्राला त्या निपुत्रिक व्यक्तिचा लब्ध पुत्र मानले जात असे. ( हा चौदावा उल्लेख मी वाचलेल्या महाभारताच्या प्रतीत नाही, पण इतर प्राचीन ग्रंथात आहे.)

Pages