अनवट किल्ले २: शिलाहारकालीन अशेरीगड ( Asheri )

Submitted by दुर्गविहारी on 21 April, 2017 - 03:10

गेल्या आठवड्यात आपण गंभीरगडाची सफर केली. संध्याकाळी गंभीरगड उतरुन कासा उधवा रस्त्यावर उभे राहिलो. या रस्त्यावर वाहतुक आहे कि नाही याची मला शंकाच होती. व्याहळीपाड्याचे रुप बघुन तिथे मुक्काम करणे शक्यच नव्ह्ते. जानेवारी महिना असल्याने काळोख लवकर पडला, आम्ही उभे असलेल्या जागेमागे स्मशानाची शेड होती. मला भीती वाटत होती कि एकून आमचा अवतार बघून एखाद्या वाहनचालाकाला आम्ही भुते वाटुन अ‍ॅटॅक वगैरे येतोय कि काय ? पण तसे काहीही न होता, एक जीप थाबंली, पण ती बापगाव पर्यंतच जाणार होती. थोडे जादा पैसे देउन आम्ही त्याला चारोटी नाक्यावर सोडण्यास सांगितले. एका लॉजवर मस्त आराम केला.
सकाळी खिडकीतून बाहेर डोकावलो तर महालक्ष्मी सुळक्याचे भेदक दर्शन झाले. पटकन आवरुन अशेरीकडे निघायची तयारी
केली. अशेरीचे पायथ्याचे गाव आहे "खोडकोना", हे अशेरीच्या दक्षिण पायथ्याला आहे, तर उत्तर पायथ्याला आहे "बुर्हाणपुर". पण बुर्हाणपुर पासून बरेच लांबचे अंतर कापावे लागत असल्याने खोडकोनाकडुनच जावे. खोडकोना मुंबई- अहमदाबाद हायवे पासुन थोडे आत आहे. अशेरी महामार्गापासून जवळ असला तरी लांब पल्ल्याच्या बसगाड्या खोडकोना फाट्यावर थांबत नाहीत. तेव्हा लोकल बस किंवा खाजगी जिपगाड्या हाच पर्याय उरतो. स्वताची गाडी असेल तर मस्तान नाका आणि चारोटीच्या मधे असलेली खिंड हि ठळक खुण लक्षात ठेवावी आम्हीही एका आधीच खच्चुन भरलेल्या सहाआसनी रिक्शात कसेबसे स्वताला कोंबून खोडकोनाकडे निघालो.
a2S9VYnZy8hMYsgyHL_Qkt5C1sAs7TQzXuWMTTa8Jo5BnD263kpXpp922qgx.jpg
मुंबई -अहमदाबाद हायवे वरुन होणारे अशेरीचे दर्शन
आम्ही तिथे पोहचे पर्यंत आपण अशेरीगडाच्या इतिहासात डोकावूया. ईतिहासकाळात हा गड महत्वपुर्ण स्थान पटकावून होता. उत्तर कोकणात शिलाहारांचे वर्चस्व असताना, भोज राजाने हा दुर्ग बांधलेला आहे असे मानले जाते. म्हणजे गडाचे आयुरमान सुमारे ८०० वर्षे. पुढे १४ व्या शतकात माहिमच्या बिंब राजाने कोळी लोकापासून जिंकून घेतला. अशेरीभोवती सागवानाच्या झाडांचे आफाट जंगल आहे. हि सागवानाची झाडे पुर्वी इमारती व जहाज बांधणी साठी उपयोगी असल्याने इथली झाडे कापून त्याचा व्यापार चालायचा, या व्यापारावर देखरेख ठेवण्यासाठी अशेरी गडाची निर्मीति झाली.
गुजरातचा सुलतान खोजा अहमद कडुन पोर्तुगीजानी हा गड १५५६ मधे काही पैसे लाच देउन घेतला. यामुळे सहा परगणे व अडतीस गावे यावर पोर्तुगीज अंमल प्रस्थापित झाला. अशेरीच्या उत्तरे -पुर्वेला चंदहारचे राज्य होते, दक्षिणेला निजामशाहीचा वचक होता, व पाय्थ्याच्या घनदाट जंगलात कोळी राजांचे राज्य होते. या तिघाना शह द्यायला पोर्तुगीजानी किल्ला मजबुत केला. किल्ल्यावर येण्याचे अनेक मार्ग बंद करुन, नव्याने तटबंदी उभारली, मोक्याच्या ठिकाणी मेढेंकोट बांधून त्यावर तीन तोफा तैनात केल्या. पोर्तुगीज काळात गडावर सैनिक, स्त्री, पुरुष, मुले व कैदी असा सुमारे सहा, सातशे जणाचा राबता होता, एवढ्या लोकांसाठी घरे, वाडे , खुले चर्च आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
पुढे शिवकाळात इ.स. १६५७ मधे मराठ्यानी कल्याण भिवंडी घेतले. त्यावेळी मुलुखाची लुटालुट दादोजी व सखो क्रुष्ण लोहोकरे या बधुनी पोर्तुगीजाना शरण यायला भाग पाडले. परंतु हि लढाइ आदिलशहाविरुध्द होती. पण पोर्तुगीज साधनात या तहासंबधी काहीच येत नाही. फक्त "त्याने ( शिवाजी महाराजानी ) आमच्या उत्तर विभागातल्या मुलुखाला उपद्रव दिला" इतकाच उल्लेख व्हाईसरायने पोर्तुगीज राजाला १६५८ रोजी पाठविलेल्या पत्रात केला आहे. अशेरी १६७१ मधे पोर्तुगीजाच्या ताब्यात होता, शिवाजी राजांकडे नव्हता. पुढे संभाजी महाराजानी १६८३ मधे
पोर्तुगीजाविरुध्द मोहिम उघडुन अशेरी ताब्यात घेतला, मात्र लगेच पोर्तुगीजांनी परत तो मिळवीला. पण मराठ्यानी मे १६८४ मधे फिरून अशेरी
जिंकला, अर्थात ऑक्टोबर १६८७ मधे परत पोर्तुगीज अंमल सुरु झाला. हा खो खो चा खेळ पुढे १७३८ मधे संपला.चिमाजी आप्पाच्या स्वारीत मराठ्यानी गडाला वेढा घालून मोर्चे पार कड्याजवळ नेले. अखेर बरीच मेहनत घेतल्यानंतर २४ जानेवारी १७३८ मधे अशेरी शरण आला. पेशव्यानी तो ब्रिटीश सत्ता येइपर्यंत तो ताब्यात ठेवला. १८१८ मधे कॅप्टन डिकीन्सनने ब्रिटीश अंमलाखाली आणला. पुढे १८८१ च्या उल्लेखाप्रमाणे किल्ल्याचा दरवाजा उध्वस्त स्थितीत होता.
खोडकोना फाट्यावरून गाव सुमारे एक कि.मी. आत आहे. ओढ्यावरचा पुल ओलांडुन आम्ही गावात पोहचलो,
h34snUnlnUHK4ndXHixuEgTc_kMVVa_WJ45tJ2GrzGE9Ot7_D8ABy38GYJUV.jpg
गावातुन समोरच गड दिसत होता. ( गडावर जाणारी वाट लाल रेषेत दाखवली आहे ) डावीकडे दिसणार्या खिंडीतुन वर जाण्याची वाट
आहे. जवळ पास २ कि.मी ची तंगडतोड करुन आपण खिंडीत पोहचतो, इथे बुर्हाणपुर गावातून येणारी वाट मिळ्ते. एक वाट पश्चिमेच्या डोंगराकडे जाते, मात्र आपण पुर्वेकड्ची वाट पकडून अशेरीच्या माथ्याकडे निघायचे.
mSAiPIFXv09TBBNTm9r8RkrUpFyZjWmKEZaR1Y7J8i226qq7duhvZGo04FIH.jpg
आधी एक लाकडी खांब व त्यावर कोरलेले वाघाचे शिल्प दिसते. हा आहे आदिवासीचा देव. पुढे गेल्यानंतर या कातळ कोरीव पायर्या दिसतात.
0hXqr2vdQr0tF3Y2PUuAbhNCqQh3nB1fkrwEuND5okhbC90yhWfc21pKW2uo.jpg
या पायर्या म्हणजे गडाच्या प्राचीनत्वावर शिक्कामोर्तब्च. कातळकडा डावीकडे ठेवत थोडे चालल्यानंतर एका बुरुजासारख्या गोल कातळाला वळसा घातल्यानंतर आपण पोहचतो एका अवघड ठिकाणी.
zEW_gy-rMYu_V7dMFd7pyYxj-Iye-P4vUsXKi8bUVw4nSafU8QYhZVJsmtkW.jpg
इथली चढायची वाट उध्वस्त झाल्याने पुर्वी असे प्रस्तरारोहण करायला लागायचे. यामुळे पावसाळ्यात अशेरीला जाणे धोक्याचे होते. ( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
9mqeBpDpGMGhwDqTSp3DNO709ySNLqglldh5-owIkffGHl65qNv9SXbpJ9pB.jpg
मात्र आता हि लोखंडी शिडी बसविल्याने हा ट्प्पा सोपा झाला आहे.
DXurQ4hZut31HjgHKfhRA7kJ1JlXMQ3cHvhbrbYYiEhj6_tF6h2UJAeJC_4l.jpg
त्यानंतर या कातळ कोरीव मार्गाने आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो.
40lM5Z9R4BMpxXdUt3aRYYkqrwMYpAYfOrbjow9CiC0W9Gcd365emWZ08tqo.jpg
समोर आपणास हे पोर्तुगीज राजचिन्ह पहाण्यास मिळते. भोळे भाबडे आदिवासी याचीहि पुजा करतात. त्याच्यां बापजाद्य्याना ह्याच पोर्तुगीजानी किती छळले याची त्याना कल्पना नसावी. असेच राजचिन्ह वसई किल्ल्यावर पहाण्यास मिळते.
NUCPxml5egTUINyLu55NjzabNgarB5GNRkM9AknVOWFopo0g5mlGa_GeshDQ.jpg
पुढे माथ्यावर जाण्यासाठी या कातळ कोर्रीव सोपानाचा वापर करावा लागतो.
-_UQK3tJTan9qj6WmCN5vDUCkg0dJKZgEEPwAUE9FiTgp6LGIXQgzKDQZDpO.jpg
याच्यानंतर उजव्या बाजूला काही कोरीव पाण्याची टाकी लागतात. मात्र यातले पाणी खराब आहे. पाण्यासाठी आपल्याला बालेकिल्ल्याच्या मध्यावर असलेल्या घळीत असलेल्या टाक्यावर अवलंबून रहावे लागते, यासाठी अशेरी गडाच्या ट्रेकवेळी पुरेसे पाणी सोबत ठेवणे आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे पिण्याच्या पाण्याची टाकी सापडत नाहीत तो पर्यंत ते पुरवणे आवश्यक आहे.
bqv5Nr0ms_65b9TuEHhj-z65p7SMn1TJMLZ5NVMiwTNed7RITAWtb9BXY5eO.jpg
पावसात पडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी कातळात असे चर खणलेले आहेत.
I70FJn4bGV4Z1awXSHSzIAQQDhip65ZNcRbmh6CMvtKCvSGQPi8j0nYRIdF6.jpg
बालेकिल्ल्याच्या पुर्व भागाकडे निघालो कि डाव्या हाताला दरीसारखा भाग लागतो, तिथेच कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत.
j0_zyQu7gwgFAIp5hzjS-8SdyLZzu873SfvmXollGs37GMWqi6rRICAUDwHk.jpg
पिण्यायोग्य पाणी फक्त याच टाक्यात आहे. पाणी भरून पुर्व टोकाशी निघालो कि सपाटी लागते.
7szj2WWBuVOpjsmT_8AaHWWZycxOdezVyeUDc21fGf-lWI7lccID4-_saBJ8.jpg
इथे राजवाड्याचे अवशेष दिसतात.
e9t-MPuFUqqfdfCVCxco9KE8KPGFSQ5WlEag_1lWJwqMuWetl7Z_L-H3NADc.jpg
एक उखळी तोफही दिसते.
37SN8S63Ji7SSA2kgPll4Vf9QHAegvZSUv76dlD0cuGzyZ83_Ou1do6cmy3u.jpg
जरा पुढे गेले कि हि कातळ कोरीव गुहा किंवा लेणे दिसते.
2U6xVNCt4FvjTzZnJuy2sTYJXUTO6yUrmxTCh7ZTU9kqBwhBzISZWervzek6.jpg
आतमधे एका देवीची अनगड मुर्ती दिसते. अशेरीवर मुक्काम करायचा असल्यास हि गुंफा एकदम बेष्ट. आता इथे संगमरवरी लाद्याही घातलेल्या आहेत. आम्ही इथे थोडावेळ वामकुक्षी घेतली
( अर्थात पुणे स्टाइल नाही, नाहीतर आमच्या ट्रेकचा बोर्या वाजला असता.)
KtVb5HTTTpg3f2MEATpzy8CnesR1ze4WDxK3BssVKvwEn0hyj1Zd0-d3k3gV.jpg
हा कोरीव काम केलेला एक खांब.
लेणे बघून थोडे आग्नेय कोपर्याकडे गेले कि एक घळ दिसते. ह्या घळीतून आपण थेट खोडकोना गावात किंवा हायवेवर उतरू शकतो. पण नवख्यानी हे धाडस न केलेले चांगले. इथून महामार्गावरची गाड्यांची वर्द्ळ दिसते.
Ks2ItcvrNMWyLY5bmyDSBJLYsV4B_Xk0t62b0MHtytNdOLwNeF4CmEmNipMd.jpg
सर्वोच्च माथ्याकडे निघालो कि काही घराचे चौथरे दिसतात.
Nd92h4RROPDB1XwXzyYu83zjdKrFTiCW6eE7IMoKltEn9kDDz9u-wSebYIJZ.jpg
अशेरीच्या माथ्यावर दोन मोठी तळी आहेत. पण विशेष आकर्षण म्हणजे हे तळे. आपल्या ध्यानीमनी नसताना असंख्य कमळांनी भरलेले हे तळे आपल्याला खुष करुन टाकते.
bxD0Otsl0nLOYv-fAV1-Fxdse-dKGWuWPSdaQ-fzehbxGZ8axAtAbk7DyjmA.jpg
बहुधा २०१४ ला देशात कमळ उमलणार हे मला २०११ ला च समजले.
गडमाथ्यावरुन विस्त्रुत परिसर दिसतो. उत्तरेला महालक्ष्मी सुळका व सेगवाह किल्ला, ईशान्येला गंभीरगड व सूर्या नदी, पश्चिमेला पिंजाल नदीचे पात्र, आग्नेयेला कोहोज किल्ला, दक्षिणेला टकमक किल्ला व वैतरणा नदी तर नैक्रुत्येला काळदुर्ग दिसतो.
गड्फेरी उरकून प्रसन्नचित्ताने आम्ही खोडकोना गावात उतरलो. खरेतर आडसूळे देखील बघण्याचा आमचा प्लॅन होता, पण अशेरीने इतका वेळ घेतला कि तो रद्द करावा लागला.
CVkxd-CXuJT7bym2vVyLFNuE_z1nyHFrRY3nNhC0wjMeii__JNUkajXNA_W8.jpg
मागे वळुन बघितल्यावर मावळतीच्या किरणात न्हाउन निघणारा अशेरी आम्हाला निरोप देत होता.
aOh_Sr05Ky0teFrlMG-ooM5KKQ1KbAnNElbUGBaQuHRInpy5rbf84TPp4Esz.jpg
तर पाण्यात प्रतिबिंब पहाणारा अडसुळ भेटीचे आमंत्रण देत होता.
TuhoLlbYf6r_9vrLvcEvQDTwEpNjlcXCZVe4bRmQ0EED-uAmWq7xMwxr7WsK.jpg
अशेरी किल्ल्याचा नकाशा
V9Xz-enRYMLXagx2fYe188S9DsSwkqLPo6fgCXWh5Yy-Z2S0fRlvH-bma7lU.jpg
अशेरी परिसराचा नकाशा
हायवे वरुन चक्क एका इनोव्हाची लिफ्ट घेउन आम्ही मस्तान नाक्याच्या दिशेने निघालो. कारण दुसर्या दिवशीचा प्लॅन होता, किल्ले कोहोज. पुढच्या आठवड्यात तिथे जाउ या.
सदर्भ ग्रंथः-
१ ) दुर्गसंपदा ठाण्याची- सदाशिव टेटविलकर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध - गुरुसिध्द अक्कलकोट
३ ) ठाणे जिल्हा गॅझेटिअर
४ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
७ ) डोगंरयामैत्री- आनंद पाळंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम माहिती आणि लेख्नन ! विशेशतः ऐतिहासिक पार्ष्वभूमी चे विस्त्रुत वर्णन छान केले आहे.
छायाचित्रेही छान आहेत.

वाचतोय, आवडतंय.
लिहित रहा.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार. आपल्या सगळ्याना लेखन आवडत असेल, तर दर आठवड्याला एका अनवट किल्ल्याची माहिती देत राहीन. पुढच्या आठवड्यात कोहोज किल्ल्यावर लिहीन.