खांडववनदाह, महाभारतातील हत्याकांडाचे एक आकलन - २

Submitted by अतुल ठाकुर on 18 April, 2017 - 06:39

1200px-Krishnarjunas_fight_with_Gods.jpg

कौरवपांडवांमध्ये राज्य विभागले गेल्यावर पांडवाच्या वाट्याला यमुनेच्या किनार्यावरील खांडवप्रस्थ येथील वन आणि पर्वताने वेढलेला भाग येतो. पांडव आपल्या मेहनतीने आणि उद्योगाने तेथे राजधानी वसवतात. द्रौपदीसहीत तेथे सुखाने कालक्रमणा करताना त्यांनी द्रौपदीला वर्षाच्या पाच भागांमध्ये विभागून घेतलेले असते. आणि त्या दरम्यान जर इतर कुठल्या भावाने त्यांच्या एकांतात प्रवेश केला तर त्याने बारा वर्षे तीर्थाटन करून त्याचे प्रायश्चित्त घ्यावे असा नियम देखिल केलेला असतो. त्यानूसार एका ब्राह्मणाच्या गायी वाचविण्यासाठी शस्त्रगारात शस्त्रे घेण्यासाठी अर्जुन प्रवेश करतो आणि तेथे द्रौपदी युधिष्ठीर असतात. नियमभंगाचे प्रायश्चित्त म्हणून अर्जुन बारा वर्षे तीर्थाटनाला निघतो. आपल्या प्रवासात द्वारकेला गेला असता कृष्णाच्या सल्ल्याने अर्जुनाकडून सुभद्राहरण घडते आणि अर्जुनाचा सुभद्रेशी विवाह होतो. अर्जुन बारा वर्षे संपवून परत आल्यावर श्रीकृष्णासहीत सुभद्रेबरोबर यादव मंडळी इंद्रप्रस्थाला येतात. यादवांकडून पांडवांना अपार धन मिळते. यादव परत जातात मात्र कृष्ण इंद्रप्रस्थातच काही वर्षे राहतो. या कालावधीत पांडवांपासून द्रौपदीला पाच मुले तर अर्जुनापासून सुभद्रेला अभिमन्यु होतो. ही खांडववन कथेची पार्श्वभूमि आहे.

अशातच अर्जुन आणि श्रीकृष्ण आपल्या स्त्रियांसहित वनविहारास निघतात. दोघेही आनंद लुटत असलेले हे स्थान खांडववनानजिक असते. तेथे अग्नि ब्राह्मणाच्या रुपात येऊन त्यांच्याकडे भोजनाची भिक्षा मागतो. त्याला खांडववन भस्मसात करुन आपली भूक भागवायची असते. मात्र यात एक अडचण असते. इंद्राचा मित्र तक्षक तेथे आपल्या माणसांबरोबर राहत असल्याने जेव्हा अग्नि हे वन जाळावयास जातो तेव्हा इंद्र वृष्टी करून ही आग विझवतो. ही अडचण दूर करून सुखानैव खांडववनाचा ग्रास घेण्यास अग्नि कृष्णार्जुनाकडे सहाय्य मागतो. दोघेही तयार होतात. परंतू या कामासाठी आवश्यक शस्त्रास्त्रे आपल्याकडे नाहीत अशी अडचण अर्जुन अग्निसमोर मांडतो.

अग्नि वरुणाचे स्मरण करुन त्याच्याकडून अर्जुनाला रथ, गांडिव धनुष्य, अक्षय भाता आणि श्रीकृष्णाला चक्र देतो. अशा तर्हेने ते दोघे शस्त्रसज्ज झाल्यावर अग्नि वन जाळण्यास सुरुवात करतो. कृष्ण अर्जुन त्या वनातून बाहेर पडण्यास धडपडणार्या एकुणएक प्राण्याला आपल्या शस्त्राने ठार मारतात किंवा जखमी होऊन त्यांना आगीत पाडतात. आपला मित्र तक्षकाला वाचविण्यास इंद्र धावून येतो आणि घनघोर वृष्टी करु लागतो मात्र कृष्णार्जुनाच्या पराक्रमापुढे ती निष्फळ ठरल्यावर आपल्या सहकार्यांसहित इंद्राचे कृष्णार्जुनासमवेत घनघोर युद्ध सुरु होते. शेवटी त्यांचा पराक्रम पाहून इंद्र संतुष्ट होतो. तक्षक खांडववनात नाही याची त्याला खात्री पटते आणि तो माघार घेतो. संपूर्ण खांडववन तेथल्या प्राण्यांसहित जाळुन, तेथिल प्राण्याची चरबी पिऊन अग्नि तृप्त होतो.

मूळ कथा समजल्यावर कथनशास्त्र यातील अर्थ लावताना कुठली साधने आपल्या हाती देते आणि त्या साधनांमधून अर्थ कसा लावता येतो हे आता पाहावे लागेल. मात्र त्या आधी मूळ कथेतच वाचताना काही गोष्टी जाणवल्या त्यांचा उल्लेख करणे अस्थानी होणार नाही.

खांडववन दाह कथा, काही शंका

खांडववन दाह कथा मूळात अशी असली तरी ती वाचताना अनेक शंका मनात उभ्या राहतात. कसलाही संदर्भ नसताना अचानक एक ब्राह्मण अग्निच्या रुपात येऊन उभा राहतो आणि खांडववन जाळण्याची भिक्षा मागतो. यामागे कसलाही आगापिछा नाही. कृष्ण आणि अर्जुन सोयीस्कररित्या खांडववनाजवळच वनविहाराला गेलेले असतात. आपली नेहेमीची शस्त्रास्त्रे न घेता क्षत्रिय वनविहाराला जातात हे फारसे संभवनीय वाटत नाही. दुसरे म्हणजे सुभद्रेला घेऊन भरपूर धनासहित यादव अर्जुन तीर्थाटनाहून परतल्यावर इंद्रप्रस्थाला येतात. त्यानंतर काही दिवसातच बाकी सर्व परत जातात पण कृष्ण राहतो. अर्जुन परत आल्यानंतर ते खांडववन दाहाच्या प्रसंगापर्यंत किती काळ गेला हे महाभारतात सांगितले नसले तरी अंदाज बांधता येतो कारण त्याच काळात द्रौपदीला पाच मुले होतात. म्हणजे कमीतकमी दहा वर्षाचा कालावधी गेला असण्याची शक्यता आहे. इतका काळ श्रीकृष्ण आपल्या बहिणीच्या घरी का राहिला हे कळत नाही. आणि अचानक अर्जुनाला वनविहाराला जावेसे वाटणे, तेही खांडववनाशेजारीच जावेसे वाटणे, त्याचवेळी तेथे अग्निने ब्राह्मणाच्या वेशात येणे, वन जाळण्याची भिक्षा मागणे इतके योगायोग एकाचवेळी होणे हेही चमत्कारिक वाटते.

पुढे जे काही घडते त्याची फारशी संगती लागत नाही. तक्षक इंद्राचा मित्र म्हणून त्याला वाचविण्यासाठी इंद्र धावून येतो. हाच इंद्र अर्जुनाचा पिता देखील आहे. हा संदर्भ जणु काही येथे पुसलाच जातो. जो वरुण अर्जुन आणि कृष्णाला हे वन जाळण्यासाठी शस्त्र पुरवतो तोच वरुण इंद्राबरोबर कृष्णार्जुनाविरुद्ध या युद्धात लढतो देखील. अग्नि फक्त वन जाळण्याची भाषा सुरुवातीला करतो. त्यातील प्राणी अथवा माणसे मारण्याचा उल्लेख त्याच्या बोलण्यात कुठेही नसतो. मात्र वन जाळायला सुरुवात केल्यावर अर्जुन आणि कृष्ण एक एक प्राणी, पशु टिपून, वेचून ठार मारतात. फार काय आकाशात उडणार्या पक्ष्यांनादेखील ते सोडीत नाहीत. तक्षकाची पत्नी मुलगा अश्वसेन याला गिळून आकाशमार्गे निसटायला पाहते तेव्हा अर्जुन तिला ठार मारतो. समजा फक्त वन जाळले असते आणि त्यातील जीवाच्या भीतीने सैरावैरा धावणारे प्राणी निसटले असते तरी वन जाळण्याची भिक्षा अग्निला मिळालीच असती. त्यामुळे नुसते वनच नाही तर वनासकट आत राहणारे यच्चयावत जीव ठार मारावेत हे कृष्णार्जुनाने आधीच ठरवले होते असे दिसते.

ज्या तर्हेने खांडववनात संहार झाला आहे त्यामागे दिसणारे क्रौर्य महाभरतातल्या मूळ कथेत अगदी उठून दिसते. आधीच आगीमुळे कुणाचे अंग जळाले, कुणी अतिउष्णतेने भाजून पडले, कुणाचे डोळे फुटले, कुणी बेशुद्ध झाले, कुणी भीतीने पळु लागले, कुणी मुलांशी, मातेशी, पित्याशी बिलगून प्राण सोडले पण प्रेमामुळे त्यांना सोडु शकले नाहीत, कुणी जळाल्याने कुरुप होऊन अनेकवेळा पडून पुन्हा आगीत पडु लागले, अनेक जण पंख, पाय व डोळे जळाल्याने जमीनीवर लोळण घेत मरु लागले, तलावातील जल उकळल्याने त्यातील मासे, कासव मरु लागले, सर्वांचे देह अग्निदेह असल्याप्रमाणे दिसु लागले, जे पक्षी उडत होते त्यांना अर्जुन हसत हसत बाणांनी तुकडे करून अग्नित टाकु लागला. देहात बाण घुसल्यावर आकांत करीत ते वर येऊन पुन्हा अग्नित पडु लागले. हे वर्णन वाचल्यावर अतिशय निर्घृण असे हे हत्याकांड होते हे सहजच समजून येते. यातून वाचण्याचा प्रयत्न करणार्यांना कुटीलतेसाठी कृष्णार्जुन व अग्नि "तुमची प्रतिष्ठा संपेल" असा शाप देतात असा हस्यास्पद प्रकारही येथे आहे. म्हणजे तुम्ही उगाचच आम्हाला क्रूरपणे ठार मारताना आम्ही स्वत:ला वाचवायचा प्रयत्न केला तर तो कुटीलपणा असा अजब प्रकार येथे घडलेला दिसतो.

शेवटी संपूर्ण वन जळून खाक होते. पंधरा दिवसांनी आग विझते. त्यातील प्राण्याचे मांस खावून, चरबी पिऊन अग्नि तृप्त होतो. तुम्ही इच्छा कराल तेथे पोहोचाल, तुमची गती कधी थांबणार नाही असा वर तो कृष्णार्जुनांना देतो. जीवदान दिलेला मय दानव पांडवांसाठी देखणी सभा बांधून देण्याचे ठरवतो. या सगळ्यात ज्यांचा काहीच दोष नसतो ते प्राणी, पक्षी, जलचर, तेथे आधीपासून वस्ती करुन असलेल्या वन्य जमाती अत्यंत क्रूरपणे मारल्या जातात.
कथनशास्त्राची साधने हातात घेऊन त्यांच्या सहाय्याने ही कथा काय सांगते ते पाहता अनेक वेगळ्या गोष्टी हाती लागतात.

(क्रमशः)
अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की नाही सांगता येणार. महाभारताची चिकित्सक आवृत्ती साधारण इसवीसन १००० चे महाभारत उभे करते. त्याच्या आधी गुप्त काळ आहे जो इसवीसन ३०० ते ५०० च्या आसपासचा आहे. >> ईसवीसन पूर्व हवे ना?

<< नक्की नाही सांगता येणार.>>
काही ग्रंथामधल्या नोंदी, खगोलशास्त्र यांचा आधार घेऊन महाभारताचे वर्ष जवळपास नक्कीच काढता येते. यावर सविस्तर लिहिता येइल.

महाभारताबद्दल संस्कृत आणि पुरातत्व या दोन विद्याशाखांमधे झालेल्या संशोधनाचा गोषवारा:

१. महाभारत हे मौखिक परंपरेतून उगम पावून पिढ्यानुपिढ्या चालत आलेले एक महाकाव्य आहे. त्यातून प्रत्येक पिढीत, प्रत्येक आवृत्तीत त्यात भर पडत गेली, बदल होत गेले. महाभारताच्या सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे 'हा जय नावाचा इतिहास आहे'. त्या जय चे भारत आणि महाभारत झाले आणि मूळ ८ का १० हजार श्लोकांचे (नक्की संख्या आठवत नाहीये) एक लाख श्लोक झाले.. सूतांनी हे काव्य सगळीकडे सांगितले आणि या सर्व मौखिक बदलांचं, संपादन प्रक्रियेचं प्रतीक म्हणजे व्यास. ही एक व्यक्ती नव्हे तर अतिशय दीर्घकालीन अशी परंपरा आहे. ही परंपरा साधारण किमान हजारेक वर्षं चालत होती असं आपल्याला दिसतं. पाणिनीच्या अष्टाध्यायीमधे आणि आश्वलायन गृहसूत्रांमधे इ.स.पू. ५/६व्या शतकात या कथेचा संदर्भ मिळतो. तसंच इ.स.च्या पाचव्या शतकातील एका ताम्रपटात याचा उल्लेख शतसाहस्री (एक लाख श्लोकांची) संहिता म्हणून येतो.

२. महाभारत या काव्याचा जुना मूळ गाभा नक्की कोणता यावर बर्‍याच देशीविदेशी विद्वानांनी प्रयत्न केले. पण त्यात सर्वात यशस्वी आणि काटेकोर शास्त्रीय प्रयत्न भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतर्फे डॉ. वि. स. सुखटणकर यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्यांनी महाभारताची चिकित्सक आवृत्ती तयार केली. म्हणजे जगात अस्तित्वात असलेल्या महाभारत काव्याच्या प्रत्येक प्रतीचा काटेकोर ऐतिहासिक भाषाशास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून (यातली सर्वात जुनी प्रत इ.स. १००० च्या आसपासची होती) जितक्या जास्त मागे जाता येईल तितका प्रयत्न केला. त्यातून त्यांना साधारणपणे इ.स.च्या ६व्या/७व्या शतकापर्यंत मागे जाता आले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ही 'व्यासांची ऑटोग्राफ्ड कॉपी' नाहीये. तर साधारण एक लाख श्लोक असलेल्या शतसाहस्री आवृत्तीच्या आसपास त्यांना जाता आले. ही प्रस्तावना मुळापासूनच वाचण्यासारखी आहे. साधारणपणे शतसाहस्री संहिता होईपर्यंत महाभारताच्या कथानकात आणि कथनशैलीत अनेक बदल होत राहिले, गुणात्मक आणि संख्यात्मक आणि तपशीलात्मक सर्वच पातळ्यांवर. पण त्यानंतर मात्र त्याचा वेग मंदावला आणि फार मोठे फेरफार झाले नसावेत. तोपर्यंत पुराणे व इतर धार्मिक वाङ्मयाचे संहितीकरण होत होते त्यामुळेही या कथानकाचे 'स्फटिकीकरण' होण्यात मदत झाली असावी.
म्हणजेच आपल्याकडे आजही 'जय नावाचा इतिहास' नक्की होता कसा याचा ठोस पुरावा संहितारूपात नाहीये.

३. महाभारताच्या ऐतिहासिकतेविषयी बोलायचे झाले तर ही एक 'क्वासी-रीअल' घटना होती असे त्यात काम करणार्‍या विद्वानांचे मत आहे. या गोष्टीची मुख्य घटना म्हणजे युद्ध - एकाच कुळात राज्याधिकारावरून चुलत भावंडांत झालेले युद्ध. जेव्हा कधी झालं तेव्हाच्या जिओपोलिटिकल दृष्टीने इतकं महत्वाचं होतं की आसपासच्या बहुतेक सर्व कुलांनी/राजांनी त्यात या ना त्या बाजूने भाग घेतला. त्या युद्धाचा परिणाम तत्कालीन समाजासाठी इतका दूरगामी आणि सखोल होता की पिढ्यानुपिढ्या त्याची गोष्ट सांगितली गेली. आसपासच्या सर्व प्रदेशांत पसरली आणि त्यावर विविध तपशीलांची पुटं चढली. मूळ घटने भोवती अनेको उपकथानके आली, तपशीलात रंग भरले गेले. या बदलांचा सखोल अभ्यास डॉ. गौरी लाड यांनी 'महाभारत अ‍ॅन्ड आर्किऑलॉजी' नामक छोटेखानी ग्रंथात केला आहे. त्यांच्यामते आज आपण जे युद्धाचे तपशील वाचतो ते बहुतेक मौर्यकाळ आणि नंतरच्या कालखंडातले आहेत आणि मूळ तपशील आपल्यासाठी कायमचे पुसले गेले आहेत. त्यात्या काळात असलेल्या सांस्कृतिक तपशीलांची कथानकात कशी भर पडत गेली ते दाखवताना डॉ. लाडांनी युधिष्ठीराच्या यज्ञात आलेल्या चीनांशुकाचा (चायनीज सिल्क) उल्लेख केला आहे. हा उल्लेख अगदी स्पष्टपणे भारताच्या रोमशी आणि चीनशी असलेल्या व्यापाराशी निगडीत आहे. तो व्यापार जेव्हा इ.स. च्या २-३र्‍या शतकात प्रस्थापित झालेला होता तेव्हात हा उल्लेख महाभारताच्या कथेत आलेला असणार... अशा पद्धतीने महाभारतात कुठल्या कालखंडात कुठले तपशील/ बदल झाले असणार याचा चिकित्सक आढावा या ग्रंथात आहे.

४. पण या सगळ्या अभ्यासातूनही महाभारत नक्की कधी कुठे झालं याचा तलास समाधानकारक लागत नाही. तिथे कामाला आलं ते पुरातत्वशास्त्र. १९५०च्या दशकात बी बी लाल नामक पुरातत्वशास्त्रज्ञाने हा प्रकल्प हातात घेतला (तेव्हा ते टोकाचे हिंदुत्ववादी झालेले नव्हते). महाभारतात आलेल्या प्रत्येक महत्वाच्या गावाची त्यांनी यादी केली आणि त्या ठिकाणांचा आजच्या नकाशांमधे शोध घेऊन तिथे काय काय पुरावशेष आहेत याची छाननी करायला सुरुवात केली. त्यात मेरठजवळ हस्तिनापूर नावाने ओळखल्या जाणार्‍या पांढरीच्या टेकाडाचा त्यांनी समग्र अभ्यास करून उत्खनन केले. तिथे त्यांचा इ.स.पू. ८/९व्या शतकातील लोहयुगीन समाजाचे अवशेष मिळाले. त्यांना लोखंड आणि घोडा दोन्ही ज्ञात होता. ग्रामीण संस्कृती असलेला हा समाज एका विशिष्ट करड्या रंगाची काळी नक्षी असलेली मातीची भांडी वापरत असे. त्यांना तांत्रिक परिभाषेत पेन्टेड ग्रे वेअर असे म्हणले जाते. महाभारतात आलेल्या ठिकाणांची लाल यांनी जी यादी केली होती त्या सर्व ठिकाणांहूनही त्यांना ही खापरे मिळाली होती. त्याआधीचे मात्र कुठले अवशेष मिळाले नव्हते. यावरून ही खापरे वापरणारा ग्रामीण लोहयुगीन समाज हाच महाभारतकालीन असावा असा निष्कर्ष त्यांनी मांडला. त्याला आणखी एक पुष्टी मिळाली ती हस्तिनापूरच्या उत्खननात. भविष्य पुराणातल्या उल्लेखाप्रमाणे जनमेजयापासून पाचवा राजा निचक्षु हा हस्तिनापूरमधे राज्य करत असताना नदीच्या पुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झालं आणि राजधानी कौशांबीला हलवली गेली. उत्खननामधे खरोखरच पेन्टेड ग्रे वेअर च्या काळाच्या शेवटी एका मोठ्या पुराच्या आणि वस्तीच्या वाताहतीच्या खुणा मिळाल्या. यावरून या सिद्धांताला पुष्टी मिळते असे प्रतिपादन लाल यांनी केले आहे. दिल्लीजवळही इंदपत नावाचं छोटं खेडेगाव होतं, तिथेही ही खापरं मिळाली होती.
अजूनही या निष्कर्षाला बळकट करणारे पुरावे नव्याने मिळालेले नाहीत. पेन्टेड ग्रे वेअर वापरणार्‍या लोहयुगीन समाजाचा सखोल अभ्यास झालेला आहे पण खरंच महाभारताशी त्याचा किती संबंध होता यावर वरचे पुरावे सोडता इतर पुरावे मौन बाळगून आहेत.
जर खरंच हे युद्ध अशा समाजात झालेलं असेल तर आजच्या आपल्या दृष्टीने एखाद्या छोट्या टोळीयुद्धासारखं असणार, पण त्यांच्या 'वर्ल्ड व्ह्यू' प्रमाणे मात्र हे युगान्ताचं युद्ध होतं. आणि म्हणूनच नंतरच्या प्रत्येक मौखिक संपादनामधे त्यात्या काळात माहित असलेल्या, आणि कविकल्पनेत शक्य असलेल्या श्रीमंतीचे, संहाराचे तपशील कथानकात येत गेले. मूळ युद्धाचं गांभीर्य टिकवून ठेवायला...

त.टी./--- जरा लांबलचक पोस्ट झालीये त्याबद्दल सॉरी. शिवाय आत्ता हाताशी एकही संदर्भ नाहीये. जसं आठवेल तसं लिहिलं आहे. तेव्हा कदाचित थोडीफार तपशीलाच चुभू असू शकते.

इ.स. पू. ३००० च्या आसपास महाभारत ज्या प्रदेशात झालंय त्या प्रदेशाचा सांस्कृतिक कालानुक्रम अगदी व्य्वस्थित उपलब्ध आहे. पेन्टेड ग्रे वेअर सोडून आणखी आधीच्या कुठल्या काळात असं युद्ध झालं असेल तर तसे काहीतरी जुळणारे पुरावे सिंधू संस्कृतीत मिळायला हवे होते. ते जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आपल्याला इ.स.पू. ८/९व्या शतकाच्या मागे या घटना ओढता येत नाहीत असे आम्हा पुरातत्वशास्त्रातल्या संशोधकांचे मत आहे.

महाभारत युद्धापासून कलियुग सुरू झाले असे मानतात आणि त्या कालगणनेनुसार (ऐहोळे शिलालेखात कलियुग कालगणनेचा स्पष्ट उल्लेख आहे त्यावरून) इ.स.पू. ३१०२ अशी तारीख येते (जर माझी आठवण बरोबर असेल तर). पण त्याला पुष्टीकरण देणारा कुठलाही पुरातत्त्वीय पुरावा उपलब्ध नाही

मस्त माहिती.
जर खरंच हे युद्ध अशा समाजात झालेलं असेल तर आजच्या आपल्या दृष्टीने एखाद्या छोट्या टोळीयुद्धासारखं असणार, पण त्यांच्या 'वर्ल्ड व्ह्यू' प्रमाणे मात्र हे युगान्ताचं युद्ध होतं. >>>इन्टरेस्टिंग, मेक्स सेन्स.

<<महाभारत युद्धापासून कलियुग सुरू झाले असे मानतात आणि त्या कालगणनेनुसार (ऐहोळे शिलालेखात कलियुग कालगणनेचा स्पष्ट उल्लेख आहे त्यावरून) इ.स.पू. ३१०२ अशी तारीख येते (जर माझी आठवण बरोबर असेल तर). पण त्याला पुष्टीकरण देणारा कुठलाही पुरातत्त्वीय पुरावा उपलब्ध नाही >>

होय. दासबोधातही याची अप्रत्यक्ष नोंद आहे.

कुठेतरी वाचनात आले होते की भीष्म पर्वातील श्लोकांच्या आधारे 'अरुंधती- वसिष्ट।' या तारकांच्या पोजिशन वरून काढलेली तारीख इ.स. पूर्व ५५६१ येते. आधी म्हटल्या प्रमाणे यावर सविस्तर लिहिता येइल.

इ.स. ३००० च्या आसपास महाभारत ज्या प्रदेशात झालंय त्या प्रदेशाचा सांस्कृतिक कालानुक्रम अगदी व्य्वस्थित उपलब्ध आहे
>>

इ.स.पू. म्हणायचे आहे ना वरदा? की पांडुरंग सुर्श्याचे महाभारत आहे हे Light 1

अग्नीला खांडववन खाण्याची इच्छा का झाली त्याबद्दल थोडी माहिती इथे मिळाली.

https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4...

श्वैतकि के यज्ञ में निरंतर बारह वर्षों तक घृतपान करने के उप्ररांत अग्नि देवता को तृप्ति के साथ-साथ अपच हो गया। उन्हें किसी का हविष्य ग्रहण करने की इच्छा नहीं रही। स्वास्थ्य की कामना से अग्निदेव ब्रह्मा के पास गये। ब्रह्मा ने कहा की यदि वे खांडव वन को जला देंगे तो वहाँ रहने वाले विभिन्न जंतुओं से तृप्त होने पर उनकी अरुचि भी समाप्त हो जायेगी। अग्नि ने कई बार प्रयत्न किया किंतु इन्द्र ने तक्षक नाग तथा जानवरों की रक्षा के हेतु अग्निदेव को खांडव वन नहीं जलाने दिया। अग्नि पुनः ब्रह्मा के पास पहुंचे। ब्रह्मा से कहा की नर और नारायण रूप में अर्जुन तथा कृष्ण खांडव वन के निकट बैठे हैं, उनसे प्रार्थना करें तो अग्नि अपने मनोरथ में निश्चित सफल होंगे।

बाकी सर्व वर्णन साधारण तसेच आहे.

उत्खननात आजही काही पुरावे सापडतात म्हणून त्या विशिष्ट काळात रामायण, महाभारत घडले होते असे म्हटले जाते. पण खरेच रामायण, महाभारत घडले होते का? ह्यासंबंधी एक थियरी पंचवीसएक वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आली होती, ती सांगतो.

समजा, आजच्या काळात कोणा एका सिद्धहस्त लेखकाने आजची भौगोलिक स्थळे जसे दिल्ली, मुंबई, गुजरात वापरून, समाजावर प्रभाव पाडणाऱ्या आजच्या प्रसिद्ध व्यक्तींना घेऊन, आजच्या काळातील विविध साधने जसे की रणगाडा, रॉकेट, कॉम्प्युटर, पाणबुडी वापरून एखादे मोठे काल्पनिक महाकाव्य (कथा) लिहिले. पण दुर्दैवाने काही कारणाने ते काळाच्या उदरात गडप झाले.

नंतर अजून पाच हजार वर्षांनंतर ते महाकाव्य कोणाला तरी सापडले. तेव्हा त्या महाकाव्यात लिहिल्याप्रमाणे उत्खनन केले असता, तेव्हा पुष्कळसे भौगोलिक स्थान तसेच साधनांचे, व्यक्तींचे पुरावे सापडण्याची शक्यता निश्चितच आहे. आणि त्यामुळे ते महाकाव्य (कथा) खरोखरच घडलेले होते, असा समज खात्रीने होऊ शकतो.

मी फक्त माझ्या वाचनात आलेली एक थियरी सांगितली आहे. कृपया वाद नसावा.

एक शंका - युद्धात एकूण १८ अक्षौहिणी सैन्याचा समावेश होता. १८ अक्षौहिणी म्हणजे काही लाख सैन्य( + हत्ती-घोडे )वगैरे. म्हणजे एवढी लोकसंख्या त्याकाळी होती असं मानलं तर त्यावरून तो काळ म्हणजे कुठला याचं गणित मांडता येत असेल ना?

पण एवढी लोकसंख्या कधी नव्हतीच ना... त्या कविकल्पना आहेत. युद्धाचं गांभीर्य आणि सर्वव्यापी स्वरूप (तत्कालीन समाजासाठीचं) हा मुद्दा महत्वाचा. तपशील बदलू शकतो. आजही महाभारत मौखिक प्रवाहात असते तर ब्रह्मास्त्राच्या जागी अणुबॉम्ब आला असता हे निश्चित. Wink

सचिन काळे, तुमची शंका बरोबर आहे. एका मर्यादेपर्यंत. पुरातत्व किंवा इतिहास ठामपणे असं म्हणतच नाहीये की महाभारत जसं आहे तसं झालं. पण खुद्द ग्रंथातच वारंवार हा इतिहास (हे असं झालं - इति ह आस) आहे असं सांगितलं आहे. म्हणूनच आम्ही त्याला क्वासी-रीअल घटना असावी, त्या कथेच्या मुळाशी असलेल्या घटनेत तथ्य असावं असं मानतो. रामायणात मात्र हा दावा कधीही केला जात नाही. ते काव्य च आहे. वाल्मिकीने लिहिलेलं असं ग्रंथ सांगतो. शिवाय मी वरती दिलेल्या पुराव्यांव्यतिरिक्त आणखी काही मिळालेलं नाही हेही स्पष्ट केलंच आहे. संशोधक नेहेमी 'जरतरी' भाषेत बोलत असल्याने, जर महाभारताशी संबंधित कुठला समाज असू शकला असेल तर ही राखाडी खापरे वापरणारा लोहयुगीन ग्रामीण समाज असून शकेल एवढंच प्रतिपादन पुरातत्वज्ञांनी केलेलं आहे...
असा कुठलाही श्रीकृष्णाच्या अस्तित्वाचा वा संबंधित ठोस पुरावा दाखवता आला नाही म्हणूनच एस आर राव नामक पुरातत्वज्ञाने केलेला द्वारकाशोधाचा दावा विद्याशाखीय जगतात मान्यता पावू शकला नाही. त्यांनी शोधून काढलेलं समुद्रात बुडलेलं बंदर उत्तर सिंधू काळापासून अस्तित्वात होतं या पल्याड कुठलंही विधान त्या स्थळाबद्दल करता येत नाही (त्यांच्या संशोधन आणि दाव्यामधील तांत्रिक त्रुटी लक्षात न घेताही)

पण एवढी लोकसंख्या कधी नव्हतीच ना... त्या कविकल्पना आहेत.>> मूले कुठार: !! Happy

रामायणात मात्र हा दावा कधीही केला जात नाही. ते काव्य च आहे.>>> पुन्हा शंका - म्हणजे ते घडलंच नाही का? (ही फक्त शंका आहे)

वरदा, खूपच छान माहिती! मी सध्या नरहर कुरुंदकरांचं ' व्यासांचे शिल्प' हे पुस्तक वाचायला घेतले आहे. खूपच उद्बोधक आहे.
प्रज्ञा, मला वाटतं , मुळात 'अक्षौहिणी' म्हणजे किती, याचे खात्रीशीर उत्तर माहीत नाही. जाणकार सांगतीलच.

पण एवढी लोकसंख्या कधी नव्हतीच ना... त्या कविकल्पना आहेत. युद्धाचं गांभीर्य आणि सर्वव्यापी स्वरूप (तत्कालीन समाजासाठीचं) हा मुद्दा महत्वाचा. >>>> पटलं

विकीवर आहे ते विश्वासार्ह आहे का? आणि मी "धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे" हे पुस्तक वाचलं, जे पूर्ण वेगळ्या (म्हणजे अध्यात्मिक) कारणासाठी लिहिलंय, पण त्यातही अक्षौहिणीचं गणित दिलंय, आत्ता पुस्तक हाताशी नाही. मिळालं तर लिहीन. पण पुन्हा१ अ. म्हणजे नक्की खरे किती यातून सुटका नाही असं दिसतंय.

अवांतर: संशोधकाची चिकित्साबुद्धी असो, भक्तांची श्रद्धा असो, संस्कृतप्रेमींची भाषाभक्ती असो, नाहीतर अजून काही पण महाभारत एकदा हाती घेतलं की झपाटतं की काय असं वाटतंय!

वरदा, सुंदर पोस्ट.

महाभारताच्या गाभ्यात नसले तरी थोडे थोडे बदल अजून होताहेत, असे म्हणता येईल का ? कर्णाला
हिरो करण्याचे प्रयत्न आपल्याच काळातले. नाही का ? ( तसं तर कैकेयी पण तशी वाईट नव्हती,
अश्या कथा पण वाचनात आल्या माझ्या. )

नाही, रामायण घडलंच नसावं किंवा अशी एखादी गोष्ट घडली असली तरी त्याचं महाकाव्य होईपर्यंत आमूलाग्र बदल झाले असावेत असं वाटतं. महाभारत आर्किऑलॉजीप्रमाणेच रामायण आर्किऑलॉजी नामक प्रकल्पही बी बी लाल यांनी केला होता. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. रामायणाशी संबंधित स्थळांचा इतिहास इ.स.पू ६/७व्या शतकाच्या मागे जात नाही आणि त्याकाळाचा सांस्कृतिक कालानुक्रम (सोळा महाजनपदे, इ.) आपल्याकडे पक्का उपलब्ध आहे.. शिवाय आज आपण जिला अयोध्या म्हणतो ती दोन अडीच हजार वर्षांपूर्वी साकेत या नावाने ओळखली जात असे. रामसेतू म्हणून लंका आणि भारत यामधे जो प्रकार आहे तो भूशास्त्रीय रचनेतून तयार झालेला आहे, मानवनिर्मित नाही.

स्वातंत्र्योत्तर भारतीय पुरातत्वाचे महर्षी ह. धी. सांकलिया यांनी रामायण: मिथ ऑर रीअ‍ॅलिटी नामक पुस्तक लिहिले आहे ते कधी मिळालं तर वाच. त्यांच्या मते जर राम-रावण युद्ध घडलं असेल तर ते छत्तीसगढ वगैरे सारख्या आदिवासी, जंगली प्रदेशात घडलं असणार. त्याच्या आजच्या श्रीलंकेशी काहीही संबंध नाही (ते उत्तम संस्कृतज्ञ होते, तेव्हा त्यांनी त्या ग्रंथाचे मुळातून परिशीलन केले होते)...

शिवाय रामायण घडलंच असेल (किम्वा कुठली तशी गोष्ट - राज्यातून बाहेर काढलेला मुलगा दूर जाऊन 'राक्षस' राजाला हरवतो) तर ते महाभारतानंतर घडलं हे नक्की. कारण संस्कृतभाषिक आर्य संस्कृतीचा प्रसार वायव्य आणि उत्तर दिशांकडून पूर्वेला झाला हे भाषिक, ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुराव्यांमधून स्पष्ट झालेले आहे. त्यात दुमत नाही. महाभारत पंजाब हरयाणा प्रदेशात घडतं तर रामायण अयोध्या, शरयू, मिथिला अशा प्रदेशात (पूर्व उत्तर प्रदेश, बिहार). महाभारतातल्या प्रथा (अनेकपती, नियोग, शत्रूची छाती फोडून रक्त पिणे, इ) आदिम समाजांशी जास्त नाते सांगतात. तर रामायण हे मूलतः शेतीप्रधान नागरी, चातुर्वर्ण्य प्रस्थापित समाजातील राजाची गोष्ट सांगते. यातील संघर्ष हा शेतीप्रधान आर्य संस्कृती आणि जंगलातली अनार्य संस्कृती असा आहे तर महाभारत हा कुलातील अंतर्गत संघर्ष आहे

असो, आता मात्र फारच अवांतर पोस्ट झाली

संस्कृतीकोशातही अक्षौहिणीचे गणित मिळेल.. ते किती का असेना!
एकदा कविकल्पना आहे म्हणल्यावर काहीही गणित असले तरी काय फरक पडतो? हां, आता ते खरंच होतं असं मानायचं असेल तर मग इतकी लोकसंख्या होती असा दाखवा पुरावा!! Proud

या लेखाचा जो मूळ मुद्दा, क्रौर्याचा आहे, तशी अनेक उदाहरणे महाभारतात आहेत.
शारीरीक क्रौर्य तर आहेच ( लाक्षागृहात जिवंत जाळणे, अभिमन्यूचा वध, जरासंधाचा वध, जयद्रथाचा वध, बकासूर,
कर्णाचा वध, अश्वथाम्याची कथा, द्रौपदीच्या मुलांचे वध.. )
आणि मानसिक क्रौर्य पण आहेच ( द्रौपदीवर झालेली विवाहाची सक्ती, तिला पणाला लावणे, वनवास, मयसभा.. )

@ वरदा, सुंदर विवेचन!!!
महाभारतानंतर रामायण घडले असावे यासंबंधीचे आपले विश्लेषण पटतेय! नवीन माहिती मिळाली.

@ प्रज्ञा९, लढाईत सैन्य किती होते, त्यावरून त्यावेळी लोकसंख्या किती होती हे सांगता येईल, हे काही कळले नाही. त्यावेळची संपूर्ण लोकसंख्या काही लढाईत उतरत नसते ना!

@ दिनेश., महाभारताचा मूळ नायक हा अर्जुन नसून भीमच होता. ह्याचे पुरावे दिलेले पुस्तक वाचनात आले होते. त्यात प्रत्येकवेळी इतर पांडवांनी बिघडवलेले प्रसंग भिमानेच कसे सावरून घेतले होते, ते दाखवून दिलेय.
तसेच रामायणात मंथरा दासीला जे व्हिलन बनवले जाते ते कसे चुकीचे आहे. त्याऐवजी तिने घेतलेले निर्णय हे आपल्या मालकीणीच्याच कसे फायद्याचे आणि बरोबर होते हे दाखवून देणारे पुस्तक वाचल्याचे आणि पटल्याचे आठवते.

वा:! पुन्हा रामायण, महाभारत वाचावेसे वाटू लागलेय. Happy

1 औक्षहणी म्हणजे xx पदाती, xx रथ, xx घोडेस्वार, Xx हत्ती,
असं एक युनिट, असे काहीसे वाचनात आले होते,
आता जसे एक डिव्हिजन सैन्य म्हणतात तसे.

Pages